इमारतीची देखभाल कशाप्रकारे केली जाते, यावरच इमारतीचे आयुष्य अवलंबून असते. इमारत ‘ऑल इज वेल’ ठेवण्याकरिता इमारतीतील रहिवाशांनी मिळून सारेजण या वृत्तीने काम करण्याची गरज असते.
मनुष्याला आपल्या जीवनात कुटुंबाखेरीज अनेक बहुमूल्य वस्तूंचा सांभाळ करावा लागतो. त्यात पैसा, दागदागिने, जमीन, संपत्ती, घर इत्यादींचा समावेश होत असतो. मनुष्य त्या सर्वाचा सांभाळ सदैव जीवापाड करण्याच्या प्रयत्नात असतो. पैसा, सोने-नाणे, महत्त्वाची कागदपत्रे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवून त्याची सुरक्षितता वाढविता येते व त्याचे स्वरूप व्यक्तिगत राहते. तर इस्टेट, घर, जमीन, संपत्ती यांचा सांभाळ करण्याचे काम त्या-त्या हिस्सेदारांचे कर्तव्य ठरते. तसे घर, इमारत इत्यादींची देखभाल करून सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी त्या इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाची असते. तसे पाहिले तर आपल्या सुंदर घराचे वास्तव्य हे इमारतीत आहे म्हणून प्रत्येक रहिवाशाची इमारत ही अमानत आहे व ती सदैव ‘ऑल इज वेल’ राहणे व ठेवणे खूप जरुरीचे आहे. तर त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे, कामे पूर्ण करणे आवश्यक असते.
इमारत बांधताना चांगले साहित्य, बांधकाम, मार्गदर्शन, देखरेख मिळाल्यास उच्च प्रतीची गुणवत्ता मिळत असते व अशा इमारतीसाठी सोसायटीच्या देखभालीकरिता पैसा व त्रास कमी लागतो. याच्याबरोबर उलट परिस्थिती कमी गुणवत्तेने बनविलेल्या इमारतीसाठी लागते व त्यासाठी देखभालीची, दुरुस्तीची सुरुवात लगेचच करावी लागते. पैसा, वेळ व त्रास अशा ठिकाणी वाढीस लागतो, पण हे सर्व जरी खरे असले तरी कोणत्याही परिस्थितीत इमारतीची देखभाल करणे क्रमप्राप्त होत असते व त्यावरच इमारतीचे आयुष्य अवलंबून असते. इमारत ‘ऑल इज वेल’ ठेवण्याकरिता लागणाऱ्या अनेक गोष्टींवर एक नजर टाकू या..
१)    घराच्या आतील भागाचे रंगकाम, फर्निचर खराब होऊ नये म्हणून इमारतीच्या बाहेरील भिंती व आरसीसी यांच्या सांध्यातून होणारी पाण्याची गळती लगेच बंद करावी. नाहीतर त्या ठिकाणचे लोखंड गंजून इमारत कमजोर होते.
२) दरवर्षी क्रॅक फिलिंग करून भिंती चित्रविचित्र पट्टय़ाने रंगविलेल्या अनेक इमारती दिसतात. त्यांच्या डेड वॉल (ज्या भिंती सपाट असून तेथे खिडक्या नसतात) मध्ये बीम बॉटममधून सहा इंची लेज भरून गळती पूर्णपणे थांबविता येते.
३) जेव्हा वरीलप्रमाणे आरसीसी बदल केल्यावर संपूर्ण भागाचे रिप्लॅस्टरिंग करून इमारतीचे आयुष्य सहज वाढविता येते.
४) संडास, बाथरूम, किचन, बाल्कनी, गच्ची येथून येणारे एसी, सीआय, जीआय पाइपांमधून होणारी गळती पूर्ण बंद करण्यासाठी पीव्हीसी व सीपीव्हीसी पाइपांचा वापर केल्यास गळतीपासून वर्षांनुवर्षे सुटका होते.
५) इमारत सुंदर दिसण्यासाठी टिकाऊ रंग म्हणून ‘टेक्स्चर’ लावल्यास इमारत दीर्घायुषी होऊन तिचे सौंदर्य वाढविता येते.
६) गच्चीमधून होणारी गळती मोठय़ा प्रमाणात असल्यास जुने वॉटर प्रूफिंग, कोबा काढून मूळ स्लॅबवर सिमेंट व केमिकलच्या मिश्रणाचा थर देऊन त्यावर नवीन कोबा चायना चीप्स लावून केल्यास इमारत चांगल्या प्रकारे संरक्षित करता येते व गळतीच्या समस्येला रामराम करता येतो.
७) वीज पडून गच्ची व इमारतीचे नुकसान टाळण्यासाठी ‘लायटनिंग अ‍ॅरेस्टर’ लावून नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येते.
८) इमारतीला चांगली अर्थिग मिळविण्यासाठी अर्थिग प्लेट, कोळसा व मीठ वापरून खोल खड्डा करून जमिनीशी संबंध आल्याने परिणामी चांगली अर्थिग मिळते.
९) लिफ्ट, वॉटर-फायर पंप्स, गॅस लाइन, इंटरकॉम, व्हिडीओ डोअर फोन, सोलर सिस्टीम, सीवेज ट्रिटमेन्ट केंद्र, पेस्ट कन्ट्रोल, फायर सिस्टीम इत्यादींसाठी वार्षिक देखभाल करार केल्याने इमारतीची सर्वच कामे वेळच्या वेळी होऊन लावलेल्या सर्व उपकरणांची कार्यक्षमता वाढविता येते.
१०)    पाण्याच्या टाक्या, सेप्टिक टँक, आवार यांची नियमित स्वच्छता राखल्याने रहिवाशाचे आरोग्य चांगले ठेवता येते.
११)    भविष्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे ही काळाची गरज आहे. म्हणून प्रत्येक इमारतीसाठी असे प्रकल्प असायला हवेत.
१२)    नैसर्गिक ऊर्जेचा वापर गरम पाणी व वीज म्हणून स्वीकारणे हे स्वत:च्या व सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
१३)    कम्पाऊंड वॉल, मेन गेट, विकेट गेट, प्रवेशद्वाराचे लोखंडी दरवाजे, सोसायटी ऑफिस, मीटर, पंप, फायर पंप रूम, जनरेटर केबिन इ. सुस्थितीत असले पाहिजे.
१४)    इमारतीच्या ओपनस्पेस जागी चेकर लाद्या, पेव्हर ब्लॉक्स लावल्यास चांगल्या प्रकारे स्वच्छता ठेवता येईल.
१५)    देखभाल शुल्कांची वेळीच जमा होणे आवश्य आहे. थकबाकीदारांकडून वसुली लवकरात लवकर होण्याकडे सोसायटीच्या कार्यकारिणीने लक्ष द्यावे कारण पैशाशिवाय कोणतेही काम होत नसते.
१६)    तसेच मुदत ठेव गुंतवणूक वेळच्या वेळी करणे, सभा नियमित घेणे, इन्श्युरन्सची पॉलिसी भरणे, सभासदांकडून येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण होण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये सलोखा राहण्यास मदत होते.
१७)    विद्युत मंडळ, बँका, पोलीस ठाणे, नगरपालिका, महानगरपालिका, टेलिफोन निगम, महानगर गॅस, सिक्युरिटी कंपनी यांच्याशी पत्रव्यवहार वेळच्या वेळी केले पाहिजे.
१८)    हिशोबासाठी वैधानिक लेखापरीक्षकांची व इमारत दुरुस्तीसंदर्भात सिव्हिल इंजिनीअर किंवा ऑर्किटेक्टची नेमणूक करणे. त्या त्या तज्ज्ञांमुळे कामाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राखता येते.
१९)    रस्तारुंदीकरण, रस्त्यावरचे दिवे, कचऱ्याची विल्हेवाट, गटाराची स्वच्छता, जंतुनाशक फवारणी इत्यादी कामांसाठी महानगरपालिका, नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा केला पाहिजे.
२०)    वार्षिक महापूजा, स्नेहसंमेलन, स्नेहभोजन इत्यादी कार्यक्रम करून सोसायटीत राहणाऱ्यांचा मानसन्मान करणे, लहान-मोठय़ा मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिल्याने सोसायटीचे वातावरण आनंददायी तर होईल, शिवाय रहिवाशांमध्ये आपलेपणा व संबंध अधिक दृढ होऊन भांडण-तंटा, कोर्टबाजी, गटबाजी इत्यादी प्रकारांना आळा घालण्यास मदत होते.
वरील सर्व सूचनांचे पालन व अंमलबजावणी झाल्यास इमारत खऱ्या अर्थाने ‘ऑल इज वेल’ होईल व दुसऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल. ते शिखर गाठण्यासाठी गरज आहे प्रयत्नांची व त्यावर योग्य विचार करण्याची!

Story img Loader