विश्वासराव सकपाळ
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील कलम ७५(१) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार वर्ष समाप्त झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी किंवा तत्पूर्वी घेणे बंधनकारक आहे.वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्याकरिता मुदतवाढ देण्याची तरतूद नाही. २४ मार्च २०२० पासून राज्यातील करोनाचा उद्रेक व त्यासाठी लागू करण्यात आलेले नियम व र्निबध यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास विशेष बाब म्हणून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली.राज्यातील करोना महामारीच्या प्रकोपामुळे शासनाने वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ५० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी होती. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा कशा पद्धतीने घेण्यात याव्यात याबाबत राज्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन सहकार खात्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना मार्च २०२१ मध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या त्या खालीलप्रमाणे:—
(१) राज्यात करोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग व महसूल व वन विभागाने वेळोवेळी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून,५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था त्यांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास परवानगी देण्यात आली.
(२) ५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांनी ( Video Conferencing) अथवा( Other Audio Visual Means) द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्याची परवानगी देण्यात आली.असहकार विभागाने त्यांच्या आदेश क्रमांक संकीर्ण ०२२१ / प्र.क्र. २४ /१३-स; दिनांक १२ मे २०२२ रोजी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे घेण्याबाबत नव्याने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
(अ) राज्यात करोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक आरोग्य विभाग व महसूल व वन विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना/ आदेशांचे काटेकोरपणे पालन करून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील सर्वसहकारी संस्थांची त्यांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा व अधिमंडळाची विशेष बैठक घेण्याबाबतची कार्यवाही करावी.
(ब) सहकारी संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा/ अधिमंडळाची विशेष बैठक घेण्याबाबत सार्वजनिक आरोग्य व महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) यांनी वेळोवेळी प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे/आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे.
vish26rao@yahoo.co.in