कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कणकवली तालुक्यातील ‘सावडाव’ हे आमचं गाव! या गावाची वाडी ‘खलांत्री’ येथे आमचे मूळ घर! या घराला आता अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाली. याच घरात आम्हा सर्व भावंडाचं बालपण गेलं. कालानुरूप घराला आता नवीन ‘रूप’ आलं आहे, पण घराच्या प्रारंभापासून असणाऱ्या अनेक जुन्या वस्तू आम्ही आजही जपलेल्या आहेत. त्यापैकी एक प्रमुख वस्तू म्हणजे आमच्या घरातील ‘चोपाळा’.
‘चोपाळा’ म्हणजे चार पाय असलेला व मुख्य बैठकीसाठी वापरण्यात येणारा आजच्या भाषेतील दिवाण! हा दिवाण जुन्या पद्धतीचा आहे व आजही त्याच स्थितीत तो आम्ही मुद्दाम जपलेला आहे. त्याचे चार पाय जुन्या पद्धतीच्या रचनेप्रमाणे गोलाकार असून पायांचे शेवटचे भाग बशीच्या आकाराचे आहेत. प्रत्येक पायाचे चार पृष्ठभाग हे बैठकीच्या उंचीपेक्षा थोडे उंच पद्धतीने कोरलेले आहेत.
एकूण दोन फळ्या एकत्र जोडून चोपाळा आखलेला आहे. या फळ्यांची जोडणी इतकी घट्ट आहे की आजही या जोडकामाचं कौतुक करावंसं वाटतं. या फळ्यांचा मुख्य गाभा चारही बाजूच्या लाकडी पट्टय़ांनी घट्ट लपेटलेला आहे. या पद्धतीच्या सुतारकामामुळेच आजतागायत आमचा चोपाळा दणकट व मजबूत स्थितीत आहे.
हा चोपाळा ‘खैराच्या’ लाकडापासून बनविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे बैठकीचा दिवाण बनविण्यासाठी साग किंवा फणसाचे लाकूड वापरले जाते. पण आमच्या घरातील ‘चोपाळा’ हा खैराच्या लाकडापासून बनवण्यात आला आहे. या लाकडाचे वैशिष्टय़ म्हणजे हे लाकूड टणक व टिकावू असते. वाळवीला सहसा दाद देत नाही व वजनदार असल्याने कितीही भार पेलवू शकते. हे लाकूड कोकणामधील हवामानाला पोषक व पूरक असते. बहुधा या वैशिष्टय़ांमुळेच माझ्या वडिलांनी जाणकार मंडळींकडून ‘खैराचा’ चोपाळा बनवून घेतला असावा.
आज हा चोपाळा आमच्या घराचा एक आकर्षण बिंदू आहे. या चोपाळ्याने आजवर तब्बल साठ वर्षे पाहिली आहेत. अठ्ठावन्न वर्षे सध्याच्या घरात व त्या अगोदर दोन वर्षे आमच्या जुन्या घरात! म्हणूनच साठ वर्षांचा प्रवास केलेला हा ‘चोपाळा’ आमच्या घराण्याच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण साक्षीदार आहे. या मूक साक्षीदाराने आमच्या घराण्याच्या साठ वर्षांच्या वाटचालीतील विविध स्थित्यंतरे, चढ-उतार, जय-पराजय व मानापमानही पाहिले आहेत आणि उदरात साठवून ठेवले आहेत.
आज माझं वय ६२ वर्षे आहे. भावंडात मी सर्वात मोठा. माझं बालपण या चोपाळ्यानं पाहिलं आहेच, पण माझ्या वडिलांच्या आयुष्यातील अनेक भल्या-बुऱ्या प्रसंगांचा आज तो एकमेव साक्षीदार आहे. आज माझे आजोबा, आजी आणि वडील हयात नाहीत. पण या चोपाळ्याकडे पाहिलं की मला माझे बालपण तर आठवतेच, पण काळाच्या पडद्याआड गेलेल्या माणसांच्या आठवणी या चोपाळ्यामुळेच मनावर तरंगून येतात.
या चोपाळ्यावर बसून माझे वडील माझा अभ्यास घेत. याच चोपाळ्यावर वाडीतील, गावातील जाणकार व प्रतिष्ठित मंडळी बसून अनेक विषयांवर चर्चा करीत. गावचे सरपंच, तलाठी, मास्तर, पोस्टमन व महालकचेरीमधील सरकारी माणसं कामानिमित्त वाडीमध्ये आमच्या घरी येत; तेव्हा याच चोपाळ्यावर बसवून त्यांना गूळ-पाणी दिलं जायचं. दूध नसल्याने ‘फुटी चाय’ (बिनदुधाचा चहा) याच चोपाळ्यावर भुरके मारून प्यायला जायचा. गणेशोत्सवात चोपाळा पाहुण्यांनी व परिचितांनी भरून जायचा. दिवसा बैठकीसाठी व रात्री झोपण्यासाठी त्याचा वापर व्हायचा.
माझ्या विवाहित बहिणी सणासुदीला आमच्या घरी येतात, तेव्हा पहिल्यांदा चोपाळ्यावर बसल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अनेक आठवणींची उजळणी या चोपाळ्यावर बसूनच त्या करतात. कधी कधी रात्र जागवतात. आपल्या मुलांना, सुनांना, सासवांना, नणंदांना व जावयांना या चोपाळ्याच्या गोष्टी सांगतात.
अशा या जिवाभावाच्या चोपाळ्याची जागा घराच्या दर्शनी भागात आहे. कोकणात त्याला ‘लोटा’ म्हणतात. देवाच्या खोलीला लागूनच चोपाळ्याचं स्थान आहे आणि इतके वर्ष ते कायम आहे. या चोपाळ्याची साफसफाई नियमितपणे करण्याची जबाबदारी लहानपणी आम्ही भावंडांनी वाटून घेतलेली होती. महिन्यातून एकदा चोपाळ्याची यथासांग ‘आंघोळ’ही व्हायची. पण आता ते शक्य होत नाही.
अलीकडे आमचं घर अनेक महिने बंद असतं. आठ-दहा माणसं अंगाखांद्यावर खेळवलेला चोपाळा हल्ली एकटाच असतो. घरातील माणसं शहरात गेल्यानं त्याचं जीवन एकाकी झालंय. सणासुदीला घर गजबजतं तेव्हा चोपाळ्याचा ऊर आनंदाने भरून येतो. पण ते क्षणिक असतं. कोकणातील अनेक घरं ही हल्ली अशीच बंद स्थितीत आहेत. ती एक अपरिहार्यता बनली आहे. या अवस्थेत घर बंद करून मुंबईस परत येताना मन दाटून येतं. चोपाळ्यावरून हात फिरवताना डोळे भरून येतात. घराला कुलूप लावतो, रिक्षात बसतो, रेल्वे स्टेशनवर उतरतो, गाडीत बसतो, गाडी मुंबईच्या दिशेने निघते, पण मन मात्र पुन्हा पुन्हा चोपाळ्याच्या आठवणीने हिंदकळत असतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा