गृहनिर्माण संस्थेचा कारभार चालविताना पदाधिकाऱ्यांना सोसाटीमधील निष्क्रिय व मनमानी सभासदांच्या वर्तणुकीमुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्याविषयी..
१९७०च्या काळामध्ये गृहनिर्माण सोसायटय़ा बांधणीला जोरात सुरुवात झाली. अशी सोसायटी प्रस्तावित असली की लोक आपापसातले नातलग-मित्र यांच्यासाठी त्यांना सोसायटी सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे. नंतर त्यांची आपापसांत भांडणे व्हायची, तो भाग सोडून द्या. तरीसुद्धा एकोपा भरपूर असायचा. त्यावेळी साधारण १९८०पर्यंत सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका असल्या की निवडणूक लढविणारे भावी पदाधिकारी मला मत द्या म्हणून सभासदांना भेटायचे. सोसायटीमध्ये डोकी किती तर २० च्या आसपास असायची. पण अशा प्रकारच्या वातावरणामुळे सोसायटी जिवंत आहे असे वाटायचे. कोणाकडे जरा काही खट्ट झाले तरी लोक हातांतली कामे टाकून धावत एकत्र व्हायचे. पण आता सर्वच उलटे झाले आहे. त्यावेळी घरमालक सोसायटीची इमारत बांधत असत. पण आता हे सर्व काही बिल्डरच करीत असल्यामुळे नाना प्रकारचे, अनोळखी, भांडखोर, भानगडखोर, वाममार्गी धंदेवाले, भ्रष्टाचारी असे सर्वच जण एकत्र येऊ लागले आहेत. त्यावेळी घरमालक चांगल्या व्यक्तींनाच त्याच्या प्रस्तावित सोसायटीत जागा देत असे. पण आता बिल्डरचा पैशाशी संबंध असल्यामुळे त्याला पैसे मिळाल्यावर तो कोणालाही जागा देतो हे वास्तव आहे.
आता सोसायटीची वार्षिक निवडणूक आली की सभासद त्या मीटिंगला जाणूनबुजून हजर राहत नाहीत. कारण त्यांना सोसायटीचे कोणतेही पदाधिकारी होण्याची इच्छा नसते. मात्र असे लोक सोसायटीच्या निर्विघ्नपणे चाललेल्या कामांत विघ्ने मात्र बरीच आणत असतात. खरे म्हणाल तर प्रत्येक सोसायटीमध्ये कोणीच सोसायटीचा पदाधिकारी होण्यास तयार नसल्यामुळे मीटिंगला हजर असलेल्या सभासदांतील चांगल्या व वाईट अशांना एकदाचे रडतराव म्हणून घोडय़ावर बसविले जाते. प्रत्येक सोसायटीमध्ये उच्चभ्रू, उच्च विद्याविभूषित भरपूर असतात, पण ते सुसंस्कृत नसतात. ते स्वत:ला एक वेगळेच शहाणे समजत असतात. ते त्यांच्या ज्ञानाचा फायदा सोसायटीला जराही करून देत नाहीत. काहींकडे वाममार्गी पैसा भरपूर असतो, त्यांनी निरनिराळ्या सोसायटय़ांमध्ये ३/४ सदनिका घेतलेल्या असतात. वाममार्गी पैसा असणारे भरपूर सभासद असल्यामुळे असे सभासद लोक सहनिबंधक, न्यायालय, पोलीस खाते यांच्याकडे तक्रारी करून सोसायटी सभासदांची झोप उडवीत असतात. त्यामुळे होते काय तर सोसायटी पदाधिकाऱ्यांना स्वत:ची कामे टाकून/रजा घेऊन, स्वत:चे पैसे रिक्षा/फोन यासाठी घालवून या अशा प्रकारच्या निरुत्पादक डोकेदुखीला तोंड द्यावे लागते. याचा परिणाम घरच्या कुटुंबीयांवर काहीतरी प्रमाणात नक्कीच होतो. नंतर काय होते तर या कोर्टकचेरीसाठी प्रत्येक सभासदाकडून हजारो रुपये घेतले जातात. त्यातील काही सभासद सोसायटीला असे पैसे देण्यास तयार नसतात. यामध्ये होते काय तर श्रीमंत उपद्व्यापी सभासदांमुळे गरीब सभासदांना नाहक अशा पैशांचा भरुदड सोसावा लागतो ही वस्तुस्थिती जवळजवळ सर्वच सोसायटय़ांमध्ये आहे. हे असे पैसेवाले सभासद त्यांच्या सदनिका भरमसाठ भाडे घेऊन ११ महिन्यांच्या भाडेतत्त्वावर देतात. त्यांना हे जे भाडेरूपाने भरमसाठ पैसे मिळतात, त्यातील काही वाटा ते सोसायटीला देण्यास तयार नसतात. एवढेच कशाला तर ठेवलेल्या पोटभाडेकरूची माहिती सोसायटीला कळवितही नाहीत. त्यामुळे पोटभाडेकरूची माहिती सोसायटी नियमांप्रमाणे तेथील स्थानिक पोलीस ठाण्यातही कळविता येत नाही. पोटभाडेकरूला सुखाने राहावयाचे असते म्हणून तो सोसायटीमध्ये इतर सभासदांशी सलोख्याचे संबंध ठेवतो. असे सभासद दुसरीकडे राहात असल्यामुळे व सोसायटीमध्ये जराही येत नसल्यामुळे यांच्यापाशी होणारा पत्रव्यवहार रजिस्टर पोस्टाने, कुरियरने करावा लागतो. या पोच पावत्या जपून ठेवाव्या लागतात. त्यामुळे पावत्या येण्याकडे सतत लक्ष ठेवावे लागते.
काही सभासद त्यांना कुठली लहानशी सुविधा मिळाली नाही तरी सोसायटीचे मासिक खर्चाचे पैसे देणे त्वरित बंद करतात व त्यानंतर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन गयावया केली की मग पैसे देतात. त्यामुळे या अशा एका नतद्रष्ट सभासदाने चुकीचे केले तरी त्याची री इतर सभासद त्वरित ओढतात. हल्ली बऱ्याच सोसायटय़ांमधून वृद्ध सभासद जास्त असल्यामुळे त्यांची तरुण मुले सोसायटीचे कोणतेही काम करीत नाहीत. सोसायटी सभासदांची वृत्ती जराही अशी नसते की आपण ज्या झाडाची सावली घेतो त्याला पाणी घातलेच पाहिजे. म्हणजेच सोसायटीचे काही ना काहीतरी काम केलेच पाहिजे. असा एकही सभासद दिसत नाही की त्यांनी त्याच्यासाठी/पंचाहत्तरीला सोसायटीच्या भल्यासाठी साठ हजार अथवा पंचाहत्तर हजार रुपये देणगी दिली आहे. प्रस्तुत लेखकाने अशी देणगी दिली आहे व म्हणूनच हा उल्लेख आणला आहे. हे असे म्हणण्याचे कारण याच जागेत चांगले संस्कार घेऊन अशा सभासदांची भरभराट झालेली असते. आदर्श नागरिकत्वाचे नियम फक्त पुस्तकांत असतात. कृती मात्र चांगलीच बेजबाबदारपणाची असते. या नतद्रष्टांना बोलणार कोण, वाईटपणा घेणार कोण, फुकटची बोलणी व वेळ आल्यास मार खाणार कोण, सरकारी कार्यालयांत स्वत:चा वेळ फुकट घालवून हेलपाटे मारणार कोण या वृत्तीमुळे पदाधिकारी कोणताही वाईटपणा घेण्यास तयार नसतात. आता निरनिराळ्या सोसायटीमधील तक्रारी पाहा. एका सोसायटीमध्ये १ ते ४ गवंडीकाम/सुतारकाम करावयाचे नाही असा नियम आहे. तो सरळसरळ डावलला जातो. एका सोसायटीत रेती-माती-सिमेंट या वस्तू लिफ्टमधून न्यायच्या नाहीत असा नियम आहे, तर तेथील सभासदांचे मजूर अशा वस्तू पहिल्या मजल्यापर्यंत डोक्यावर नेतात व पुढे सर्व मजले लिफ्टने जातात. तिसरा प्रकार सोसायटीला काहीही न सांगता पोटभाडेकरू ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे. चौथा प्रकार जिन्यामध्ये बेधडक सामान/भंगार ठेवण्याचा. यामध्ये दगड, विटा, जुन्या सायकली, लाद्या सर्व काही असते. पाचवा प्रकार दरवाजापुढील जागा ग्रीलने बंद करण्याचा. सहावा प्रकार म्हणजे ७व्या मजल्यावर अग्निशामक दलासाठी मोकळा भाग असतो तेथे कपडे वाळत घालणे, सामान ठेवणे वगैरे. सातवा प्रकार म्हणजे कुंडय़ांना पाणी घालणे, ते पाणी खालच्या मोटारगाडय़ांवर पडणे, त्यामुळे रंगविलेल्या इमारतीवर मातट रंगाचे पट्टे उठणे असले प्रकार चालतात. आठवा प्रकार म्हणजे कचरा, केळ्याची साले, अंडय़ाची साले बेधडक वरून फेकतात. नववा प्रकार म्हणजे एका सोसायटीमध्ये सर्व सभासदांनी इमारत रंगाचे पैसे मासिक हप्त्याने भरले होते. त्या सोसायटीमधील सभासदाने राजीनामा देतेवेळी रंगाचे काम सुरू झाले नव्हते म्हणून भरलेले पैसे परत मागितले. त्यामुळे त्याच्यासारखेच जे इतर सभासद राजीनामा देऊन गेले त्यांनीही असे रंगाचे भरलेले पैसे परत मागितले आहेत. एका सभासदाने तर इतर राखीव निधीमधील पैसेही मागितले आहेत. कारण तो राखीव निधी खर्च झाला नव्हता. जो सभासद स्वत:च्या सदनिकेत निरनिराळी कामे करतो, त्याच्यामुळे लिकेज झाल्यास ते लिकेज मात्र काढून देत नाही. काही सभासद क्लब हाऊस, पोहण्याचा तलाव, न्यायालयीन खर्च याची वर्गणीच देत नाहीत. ते म्हणतात आम्ही क्लब हाऊस, पोहण्याचा तलाव वापरीत नाही म्हणून वर्गणी देणार नाही. बरेच सभासद पदोपदी तत्त्वे सांगतात पण व्यवहाराचा अजिबात विचार करीत नाहीत. सोसायटीच्या नोटीस बोर्डावर येणे बाकीदार सभासदांची नावे लागलेली असतात त्याची त्यांना जराही लाज नसते. हे असेच चालू राहिल्यास सोसायटीचा कारभार सहकारखात्याच्या प्रशासकाकडे जाण्याची लक्षणे चांगलीच दिसू लागली आहेत. अशामुळे प्रशासकाच्या अभ्यासाचे कोर्सेस/डिप्लोमा निघतील. सोसायटीवर येणारे प्रशासक सोसायटीच्या होणाऱ्या आर्थिक व्यवहारांत सोसायटय़ांना भरपूर डुबवतील. सभासदाला प्रत्येक कामासाठी प्रशासकाच्या कार्यालयात जावे लागेल. यामुळे मासिक हप्ते (मेंटेनन्स चार्जेस) भरपूर प्रमाणात वाढतील. प्रशासक सोसायटीची कोटेशन्स/टेंडर्स यामध्ये भरपूर पैसे खाईल. प्रस्तुत लेखकाने वरील लेख लिहिण्याअगोदर बऱ्याच गृहनिर्माण सोसायटींमध्ये जाऊन माहिती काढून आणली आहे. तरी वाचकहो, सर्वच सभासदांनी याबाबत सामंजस्याने विचार केला पाहिजे. बऱ्याच सोसायटय़ा दिसायला झकास, पण आतून भकास अशाच असतात. ती वेळ कोणीही आपल्या सोसायटीवर आणू नये.
निष्क्रिय व मनमानी सभासद: सोसायटीची डोकेदुखी
गृहनिर्माण संस्थेचा कारभार चालविताना पदाधिकाऱ्यांना सोसाटीमधील निष्क्रिय व मनमानी सभासदांच्या वर्तणुकीमुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो, त्याविषयी.. १९७०च्या काळामध्ये गृहनिर्माण सोसायटय़ा बांधणीला जोरात सुरुवात झाली. अशी सोसायटी प्रस्तावित असली की लोक आपापसातले नातलग-मित्र यांच्यासाठी त्यांना सोसायटी सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे.
आणखी वाचा
First published on: 16-02-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrogant and inactive cooperative housing society members its a headache to the society