यशवंत सुरोशे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूर्वी पाऊसकाळ चार महिन्यांचा असायचा. हत्ती नक्षत्र उभ्या पिकांची हेळसांड करी. परतीचा पाऊसकाळ सुरू होई. शेतातील पीक पिवळे पडू लागे. शेतकऱ्यांना खळा करायची चिंता लागे. शेतावरचा खळा आणि घरासमोरील अंगण एकाच वेळी करायची धांदल व्हायची. शेतातले धान्य पाहून मनात दिवाळी साजरी व्हायची. इकडे कॅलेंडरमध्येही दिवाळी दिसू लागे. मुले म्हणायची, बाबा अंगण तयार करा, आम्हाला रांगोळ्या काढायला..

मग शेतीच्या सुगीतून एखादा दिवस सवडीचा मिळे. टिकावाने अंगण खोदले जाई. थोडे ओलसर असल्याने खणणे सोपे जाते. मग ढेकळे फोडायची. वडीलधारे इकडून-तिकडे नजर टाकीत. अंगणाचा उंचसखल भाग न्याहाळीत. उंच भागावरील माती सखल भागाकडे न्यायची. टेरप्याने माती सपाट पसरवायची. एवढय़ा सगळ्या कामाला दुपार होई. मग आई, बाबा मुरुमाच्या खाणीवर जात. खाणीतील मुरूम टोपल्यात भरून आणत. तो साठवत. पुरेसा मुरूम आणला की बाबा टोपल्यातून खणलेल्या अंगणभर पसरवण्यासाठी फेकायचे. धान्य पेरल्यागत. मुरुमामुळे अंगणाला चांगला चोप बसतो. भुईला तडे जात नाहीत. मुरूम हे थोडे चिकट, दगडाळ असते. त्यामुळे भुई बिलगून राहते. अंगण गुळगुळीत होते. प्रत्येकाला अंगण गुळगुळीत व्हावे असे वाटायचे, त्यामुळे एवढी मेहनत घेतली जायची.

मग घरातली सगळी माणसे पाणवठय़ावरून पाणी आणत. कोणी कळशी घेई, कोणी हंडा घेई, कोणी पातेल्यात, कोणी बादलीत पाणी आणी. पिंपात पाणी साठवले जाई. बाबा मुरूम पसरवलेल्या अंगणातील मातीवर पाणी मारत. पाणी सोकले जाई. अर्ध्या भागात पाणी मारून ओल्या भागाचा भुरण्याने चोप काढला जाई. विशिष्ट कोनात, विशेष शैलीत, योग्य ताकदीने भुरणे भुईवर आपटले जाई. आपटण्याचा आवाज होई. माती-मुरूम एकजीव होई. भुई चेपली जाई. बाबांचे अंगण चोपणे चालू राही. इतर जण पाणी आणायला जात. कधी कधी लहान मुले नुकत्याच चोपलेल्या अंगणातून जात. त्यांची पावले अंगणभर उमटत. बाबा ओरडून रागवायचे. पोरांची ही धावपळ होई. बाबांना तेवढी जागा पुन्हा चोपावी लागे. एखाद्या ठिकाणी पाणी जास्त झाले असल्यास चोपताना चिखल उडे. शेजारी उभे असणाऱ्यांच्या अंगावर लाल मातीचे शिंतोडे उडत. पण कामाच्या तंद्रीत चिखलाकडे बघायला वेळ नसे. आईने सकाळचा शेणगोठा करताना शेण उकिरडय़ावर न टाकता तसेच टोपलीत भरून ठेवलेले असे. आई दुसरे टोपले घेई. त्यात थोडे शेण कुस्करायची. वरून पाणी टाकायला सांगायची. टोपलीभर शेणकळा करी. चोपलेल्या अंगणभर शेणकळा पसरवी. सडा टाकल्यागत शिंपडवी. शेण कालवे. शेणकळा बनवी. अंगणभर शिंपडवी. शेणकळा दिलेल्या संपूर्ण अंगणाला बाबा भुरण्याने चोपून काढत. प्रत्येक चोपण्याबरोबर बाबांचा एक हुंकार ऐकायला येई. दिवस मावळायला येई. रस्त्यातून जाणारा शेजारी तयार केलेले अंगण पाही. विचारता विचारता भुरणा हातात घेई नि सारे अंगण चोपून काढी. अंगण ओले असतानाच योग्य रीतीने चेपले तर गुळगुळीत बनते. आम्ही लहान मुले चोपायचा प्रयत्न करायचो, पण चोपताना भुरण्याच्या कडा उमटत, कधी खड्डा पडे तर कधी कधी भुरण्याला ओली माती चिकटून येई. बाबा हसायचे. आमचे काम संपे. कधी कधी आईही चोप काढी. तिच्या हातातल्या बांगडय़ाचा सूर होई. असे तीन-चार दिवस शेणकळा दे – चोप काढ, शेणकळा दे, चोप काढ असा कार्यक्रम चाले. अंगण सुकत जाई. मग आई एके दिवशी काळ्याशार शेणाने अंगण सारवी. अंगण अगदी देखणे होई.

मुलांना खेळायला, ताईला रांगोळी काढायला अंगण सज्ज होई. शेतावरून आणलेल्या तुरीच्या शेंगा, उडदाचे वेल, तीळांचे ताटे, खुरासणी याच अंगणात वाळत. माळातल्या लाल झालेल्या मिरच्या इथेच पसरून नाचणीची बोंडे अंगणात मळली जात. चवळीच्या शेंगा इथेच फोलल्या जात.

हा हा म्हणता दिवाळी येई. तोपर्यंत बहुतेकांची अंगणी तयार झालेली असत. संध्याकाळी दिव्यांच्या प्रकाशात अंगण उजळून निघे. कोपऱ्यातल्या तुळशीसमोर दिव्यातली वात थरथरायची तसे अंगण हलायचे. मोठी माणसे घोंगडी पसरून बसायची. गुळगुळीत अंगणात चक्री गोलाकार फिरायची. खूप मजा यायची. डिसेंबर महिना गारठा घेऊन येई. मग याच अंगणात शेकोटी पेटवली जाई. दिवसभर तापलेले अंगण रात्रभर माणसांना ऊब देण्यासाठी तत्पर असे. पावसाळाभर गोठय़ात कोंडलेल्या गाई-गुरांनाही अंगणात मुक्तपणे बसायला मिळे.  हिऱ्याची नथ जशी एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात भर घालते, तसेच अंगणही घरीच्या सौंदर्यात भर घालते. खरं तर अंगण हे आभूषणच जणू!

surosheyashavant@gmail.com