प्राची पाठक
संक्रांतीच्या निमित्ताने दरवर्षी हळदी–कुंकू केलं जातं. त्यात एकमेकांना भेटणं आणि मजा करणं, अशीच छटा जास्त जाणवते. ‘सवाष्ण’ स्त्रीला, आपल्या जाती–धर्मातल्याच स्त्रीला त्यात सामावून घ्यावे, या पलीकडे हे सेलिब्रेशन नक्कीच जाताना दिसते. सरसकट सगळीकडे नाही, तरी अनेक जण आपापल्या स्तरावर विधवा, एकटय़ा स्त्रियांना, इतर जाती–धर्मातील स्त्रियांना, आपल्यापेक्षा वेगळ्या आर्थिक, सामाजिक गटातील स्त्रियांना या सर्व मजेत सामावून घेताना दिसतात. कुठे ‘हा केवळ स्त्रियांचाच उत्सव’, अशीही समजुतीची भक्कम भिंत जराशी खिळखिळी केलेली दिसते. स्त्री–पुरुष सर्वानी जमायचं निमित्त, असंही याकडे बघितलं जाऊ लागलं आहे. पण हे बदल थोडेथोडके आहेत. त्यात आजच्या काळानुसार आणखीन काही पलू देखील जोडले गेले आहेत. निवडणुकांच्या आधी त्यात वेगळे परिमाण असतात– जनसंपर्काचे. संक्रांतीचे वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये आता काळानुरूप बदल होताना दिसतो आहे. काहींसाठी ते स्टेट्स सिम्बॉल देखील असते. कोणी काय लुटलं, याचं नाही म्हटलं तरी तसं न करणाऱ्या अथवा ते न परवडणाऱ्या लोकांना टेन्शन येतंच. पुन्हा, या छोटय़ा–मोठय़ा वस्तू खरोखर आपल्या गरजेच्या असतात का? काळ बदलला तसं सणांच्या साजरीकरणाच्या पद्धतीत नवीन आणि तरीही पर्यावरण सुसंगत असं आपण काय आणत आहोत, हे बघितलं पाहिजेच. आपल्याला खरोखर अशा छोटय़ा छोटय़ा निरुपयोगी वस्तू देऊनच सण साजरे करायचे आहेत का, यावर जरूर विचार केला पाहिजे.
आपल्या घरातच डोकावून बघू या. वेगवेगळ्या आकारांच्या कितीतरी हळदी–कुंकवाच्या डब्या, पिशव्या, झिप लॉक बॅग्स, पुडय़ा येऊन पडलेल्या असतात. लग्नपत्रिकांसोबत येणाऱ्या हळदी–कुंकवाच्या पुडय़ा वेगळ्याच असतात. या अनेक डब्या अतिशय निकृष्ट अशा प्लॅस्टिकच्या असतात. त्यांच्यावर प्लॅस्टिकच्याच पारदर्शी पातळ पदराचे सील असते. जेणेकरून हळद आणि कुंकू सांडू नाही, अथवा एकत्र होऊ नये. एकाच प्लॅस्टिक पिशवीला तीन भागांत सील करून हळद, कुंकू, अक्षता वेगवेगळ्या असलेल्या देखील अनेक पिशव्या असतात. सणांच्या निमित्ताने, काही पूजनाच्या निमित्ताने हळद आणि कुंकवाचे अनेक पॅक घरात येऊन पडतात. ते तसेच कुठे कुठे कोंबून ठेवले जातात. सगळे सामान एकत्र करून एका जागी क्वचितच ठेवले जाते. त्याला भावना, श्रद्धा वगैरे सुद्धा लपेटून आल्याने सहजच फेकवत नाहीत ते. फेकले तरी तो रंगीत आणि रासायनिक असाच कचरा असतो. जुन्या पडून राहिलेल्या अशा पुडय़ांवर पाणी पडलं तर भिंतीला, वस्तूंना त्याचे डागसुद्धा लागतात. म्हणूनच घरात जेव्हा जेव्हा हळद–कुंकवाच्या पुडय़ा, डब्या भेट म्हणून येऊन पडतात, तेव्हा तेव्हा त्या एकाच ठिकाणी साचवत जायचे. फार जास्त प्रमाणात ते जमा झाले असेल, तर ज्यांना या वस्तू नेहमी लागतात, तिथे त्या सरळ देऊन टाकायच्या.
संक्रांतीच्या वाणात आणखीन काय काय असतं ते बघू. छोटे स्टीलचे चमचे, वाटय़ा, वाडगी, उलथणे, पळी, ताटल्या वगैरे गोष्टी असतात. त्या अगदीच तकलादू असतात. अशाच प्लॅस्टिक वस्तू वाणात भरपूर असतात. त्या वेळीच वापरून टाकायच्या, अथवा स्टेशनरी किट्समध्ये, गार्डन किट्समध्ये, लहान मुलांना खेळणी म्हणून वापरून टाकायच्या. छोटे कंगवे, लहान डब्या, चमचे, छोटय़ा–मोठय़ा काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बरण्या, आरसे, ब्रँडेड, पण छोटय़ा आकारातले साबण, हेअर ऑइल, फेस क्रीम्स, पावडर, छोटय़ा ड्रायफ्रुटच्या बॅग्स असं काय काय असतं त्यात. हे साबण आकाराने लहान असल्याने क्वचितच वापरले जातात. कोणी प्रवासाला ते वापरू म्हणून वेगळे ठेवतात. पण ऐनवेळी एकही सापडत नाही. म्हणूनच या वस्तू मिळाल्या तशाच ठरवून एकेक करून वापरून टाकायच्या. अन्यथा त्या फेकून द्याव्या लागतात. कोणी तुळशी, झेंडू, गुलाब यासारख्या झाडांची रोपे देखील वाण म्हणून देतात. ते देखील वेळच्यावेळी नीट जागी ठेवायचे. रोपं मरणार नाहीत, याची काळजी घ्यायची.
या सगळ्या वस्तू साधारणपणे पाच–पन्नास रुपयांच्या असतात. म्हणजे समोरच्याला भेटवस्तूचे ओझेही वाटायला नको आणि काहीतरी सहजच दिल्यासारखे देखील होईल. या वरवर साध्या वाटणाऱ्या देवाणघेवाणीत, साध्याशा मजेतसुद्धा अनेक पलू असतात. त्यात भरपूर शो ऑफ, स्टेटस् सांभाळणे, पब्लिक रिलेशन्स, चढाओढ, राजकारण वगैरे सुरू असते. कोणत्या का कारणाने होईना, आपण इथे हजेरी लावली तर आपल्या घरात उगाच पडून राहतील अशा अनेक निरुपयोगी गोष्टी वाण रूपात साठत जातात. निदान आपण वाण म्हणून देताना साधीशी जरी गोष्ट दिली तरी ती वापरून टाकता येईल, अशी निवडून देऊ शकतो. घरात येत जाणाऱ्या वस्तू एकत्र करून ठेवू शकतो. आणि त्यांचा कल्पक वापर कसा करता येईल, ते आपापल्या परीने शोधूनही काढू शकतो. या संक्रांतीला पर्यावरणस्नेही जीवनशैलीचेच वाण, वसा, व्रत शेअर करून बघू या..
prachi333@hotmail.com