सण म्हटलं की साफसफाई, नवीन खरेदी, गोडधोडाचं जेवण हे सारं आलंच. दरवर्षी परीक्षेच्या मौसमात येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणाला छोटे बदल जरी घरात केले तरी या सणाचा मनसोक्त आनंद घेता येतो, फक्त गरज आहे ती थोड्या नावीन्यपूर्ण कल्पनांची जोड देण्याची.

गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. गुढी म्हणजे ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा. याचाच अर्थ चंद्र पंधरवड्याचा पहिला दिवस.

थोडंसं इतिहासात डोकावून पाहिल्यास या सणाभोवती अनेक प्रकारचे संदर्भ असलेले दिसून येतात. १४ वर्षांच्या वनवासानंतर रामाचा राजा म्हणून या दिवशी राज्याभिषेक करण्यात आला. रामाच्या विजयाचं प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारली जाते. तर महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मित्ती केली, त्याचं प्रतीक म्हणून गुढी अर्थात ब्रह्मध्वज उभारला जातो अशीही आख्यायिका आहे.

सर्वसाधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या सुमारास हा सण येत असतो. आणि बऱ्याच ठिकाणी हे दिवस म्हणजे वार्षिक परीक्षांचे असतात. त्यामुळे दिवाळी-दसरा अथवा गणपतीच्या काळात जशी घराची साफ-सफाई केली जाते, तशी या काळात होत नाही. पण तरीही या सणाचं असलेलं पारंपरिक महत्त्व आजही तितकंच जपलं जातं.

आता हेच पाहा ना, एखादी नवीन वस्तू, घर किंवा कोणत्याही नवीन कामाचा शुभारंभ या दिवशी केला जातो. तेदेखील पूजा- सजावट, गोडधोडाचा पारंपरिक नैवेद्या दाखवून साजरा होतो, म्हणजे या सणामागे असलेली पारंपरिकता आजही तितकीच जपली जाते. म्हणूनच या सणाचं महत्त्व विशेष ठरतं.

हा सण साजरा करण्याची प्रत्येक घराची पद्धत वेगळी असली तरीही घरात आणि सभोवताली वातावरण कसं सकारात्मक राहील, याकडे अधिक लक्ष दिलं जातं.

गुढी उभारणं हा या दिवशीचा महत्त्वाचा भाग. हल्लीच्या काळात घरोघरी मोठ्या गुढी उभारणं हे जागेअभावी शक्य होत नाही, त्यामुळे बाजारात छोट्या जागेत मावतील अशा अनेक रेडीमेड गुढी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. या दिसायला सुबक तर असतात, पण त्यावर असलेल्या खण, पैठणी यांसारख्या वस्त्रांमुळे गुढीची पारंपरिकताही जपली जाते. अशा किंवा तुम्हाला घरच्या घरी छोटी गुढी बनविणं शक्य असल्यास अशी एखादी गुढी बाल्कनीत अथवा घराच्या खोलीत मधोमध ठेवल्यास खोलीमध्ये सणाला साजेशी अशी वातावरणनिर्मिती होते.

घरासभोवतीचं वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी घराबाहेर तुम्ही सुंदरशी रांगोळी काढू शकता. यासाठी बाजारात आज असंख्य साचे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून तुम्ही फारसा वेळ न दवडता चुटकीसरशी रांगोळी काढू शकता. यात विविध रंगांचा वापर ती नजरेत भरतेच, पण मनालादेखील तितकीच उत्साहित करते. रांगोळीचा वापर करणं शक्य नसल्यास या काळात बाजारात झेंडूसह अनेक तऱ्हेतऱ्हेची रंगीत फुलं उपलब्ध असतात. ही फुलं, आंब्याची, कडुनिंबाची पानं यांचा वापर करून तुम्ही दरवाजाच्या सभोवताली आकर्षक सजावट केल्यास मुख्य दरवाजापासूनच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहताना जाणवू लागेल.

अलीकडे सणासुदीचे दिवस सुरू झाले की फुलांचे भाव खूपच वाढतात. अशा वेळी प्रत्येकाला भरभरून फुलं घेणं परवडतंच असं नाही. यासाठी बाजारात अनेक कृत्रिम फुलांची तोरणं अथवा फुलं उपलब्ध असतात. यांचा वापर करूनदेखील आकर्षक सजावट करता येते. कोणे एके काळी ही फुलं प्लास्टिक अथवा कागदाची आहेत, हे लगेच समजून यायचं. पण आजकाल बाजारात सॅटिन, मखमल किंवा चकचकीत कागदातली इतकी सुरेख फुलं उपलब्ध आहेत की, ती खोटी आहेत हे पटकन लक्षातही येत नाही. शिवाय ती धुऊन पुन्हा वापरता येत असल्यामुळे हल्ली बहुतांश घरांत अशी फुलं आढळतात.

यामध्ये नुसतीच फुलं नाहीत तर घंटाचे, स्वस्तिक आणि कलश किंवा त्या जोडीला नारळ अशा विविध मंगल चिन्हांचा वापर करून तयार केलेली तोरणंदेखील मिळतात. सणावारी दाराभोवती अथवा देवघराभोवती अशा तोरणांचा वापर केल्यास घरातील वातावरण अधिक मंगलदायी वाटतं.

सणाच्या निमित्ताने घरात नवीन पडदे, नवीन चादरी किंवा उशांना नवीन अभ्रे घातले तरीही खोलीचा लुक बदलून जातो. हा लुक अजून छान करण्यासाठी खोलीचा एखादा चांगला कोपरा निवडून त्या ठिकाणी लायटिंग करावं. घरात कापूरमिश्रित धूप जाळावा किंवा सुगंधित उदबत्ती लावावी. यामुळे खोलीचं वातावरण मंगलमय होण्यास मदत होते.

अनेक घरांमध्ये या दिवशी घरातील देवघरांमधील जुनी वस्त्रं बदलून नवीन वस्त्रं चढविली जातात. देवघरातील हा छोटासा बदलदेखील घरामध्ये सकारात्मकता वाढवायला मदत करतो. काळानुसार आपण आपलं घर कितीही आधुनिक सोयींनी युक्त केलं तरी देवघराची मात्र प्राचीनता जपत असतो.

अलीकडे उदबत्ती लावण्यासाठी वेगवेगळ्या धातूंमधील आकर्षक आणि सुबक आकारातील साचे मिळतात. अशा साच्यांचा वापर करून देवघरालाही एक छान लुक देता येईल. याशिवाय चांदी कोटेड असलेले आणि काच असूनही गरम न होणारे बोरोसिलचे अनेक नावीण्यपूर्ण दिवे-समयादेखील बाजारात उपलब्ध आहेत. शिवाय त्यांचे आकारही फार मोठे नसल्यामुळे लहानशा देवघरात ते सहजपणे मावतात. यांसारख्या तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टींचा उपयोग करून सणावारी देवघराचा लुकदेखील एकाच वेळी पारंपरिक आणि तितकाच आकर्षक करता येऊ शकतो.

सणावारी सजावट जितकी महत्त्वाची असते तितकंच महत्त्व गोडाधोडालादेखील असतं. यादरम्यान आंबे बाजारात दाखल होतात. त्याचबरोबर कैरी पन्हं, आंब्याची डाळ हे पदार्थदेखील घरोघरी बनविले जातात.

संपूर्ण चैत्र महिना घरोघरी आल्यागेल्यांचं स्वागत पन्हं आणि आंब्याच्या डाळीने केलं जातं. इतकं हे समीकरण घट्ट आहे. रामनवमी, चैत्र-गौरीचं हळदी-कुंकू, हनुमान जयंती अशा अनेक गोष्टी या काळात साजऱ्या होत असतात. त्यामुळे नुसतं घरातच नव्हे तर घराबाहेरदेखील एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा खेळत असते. किंबहुना याचमुळे या सणामागची पारंपरिकता आजही तितकी जपली जाते.

मुळातच मार्च-एप्रिल महिने हे मुलांबरोबर घरच्यांचीदेखील परीक्षा बघणारे दिवस असतात. अशा या ताणयुक्त वातावरणात येणारा गुढीपाडव्याचा सण म्हणजे घरावरीलच नाही, तर मनावरील मरगळ दूर सारून नवीन वर्षाची नव्या उमेदीने सुरुवात करण्याचा संदेश आपल्याला देत असतो. सणासुदीच्या काळात केले जाणारे छोटे छोटे बदलदेखील नवा उत्साह निर्माण करण्यास पुरेसे ठरतात.

suchup@gmail.com