सुमेधा सिनकर
माझं फस्र्ट होम आहे मुंबईत मुलुंड येथे तर सेकंड होम बदलापूर स्टेशनपासून १८ किमी दूर ‘चोण’ या गावी.. उल्हास व बारवी नद्यांच्या संगमाजवळ! तिथल्या ‘शांतिवन’ कॉलनीतील २२ गुंठे जागेवर १३००स्क्वेअर फुटांचं चार खोल्यांचं प्रशस्त घर बांधून आम्हाला आता १३ वर्ष झाली. आसपास घरं आहेत, पण सुट्टय़ांच्या दिवशी काय ती थोडीफार जाग! अलीकडे उघडलेलं, जुजबी गोष्टी मिळणारं एकुलतं एक दुकानंही मैलभर अंतरावर, बाकी नावाप्रमाणे सर्व शांत!
‘आपण जे देतो तेच आपल्याकडे परत येतं.. प्रेम दिलं तर प्रेमच मिळतं.’ या वचनाची सत्यता मला आमच्या ‘सेकंड होम’च्या (इशान बंगला) बाबतीत प्रकर्षांने जाणवते. अनेकांना ‘सेकंड होम’ हे आवराआवरी आणि घास-पूस या दृष्टीने एक संकट वाटतं. पण मला मात्र ‘त्या’ घरी जायचं या कल्पनेनेच उधाण येतं आणि अंगात दहा हत्तीचं बळ संचारतं.
माझं फस्र्ट होम आहे मुंबईत मुलुंड येथे तर सेकंड होम बदलापूर स्टेशनपासून १८ किमी दूर ‘चोण’ या गावी.. उल्हास व बारवी नद्यांच्या संगमाजवळ! तिथल्या ‘शांतिवन’ कॉलनीतील २२ गुंठे जागेवर १३००स्क्वेअर फुटांचं चार खोल्यांचं प्रशस्त घर बांधून आम्हाला आता १३ वर्ष झाली. आसपास घरं आहेत, पण सुट्टय़ांच्या दिवशी काय ती थोडीफार जाग! अलीकडे उघडलेलं, जुजबी गोष्टी मिळणारं एकुलतं एक दुकानंही मैलभर अंतरावर, बाकी नावाप्रमाणे सर्व शांत! त्यामुळे तिथे जाताना मी यादी काढून सर्व वस्तू आठवणीने बरोबर नेते. खानपान तयारीपासून पिण्याच्या पाण्याचे कॅन (बोअरवेलचं पाणी प्यायला नको म्हणून), बॅटरी, धुतलेल्या चादरी, अभ्रे, आमच्या कॉलनीत कामाला येणाऱ्या गोरगरीबांना वाटण्यासाठी खाऊ व भेटवस्तू इ. गोष्टी पोटात साठवल्याने आमची गाडी म्हणजे एक रणगाडाच होतो.
या घराची जपणूक हा माझ्या अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय. इथून परत जाताना माझं घर अशा प्रकारे आवरलेलं असतं की परत यायला किती का दिवस लागेनात दार उघडताच ती नीटनेटकी वास्तू पाहून मन प्रसन्न झालंच पाहिजे.
आवरणे अध्यायातील पहिली गोष्ट म्हणजे ओटा साबणाच्या पाण्याने धुवून चकाचक करणं.. अगदी गॅसची शेगडी उचलून त्याखालील स्टँडसह! तो कोरडा झाल्यावर त्यावर पातळ कपडय़ाचं पांघरूण घालायचं. आमची ही घरं उभी राहिलीत ती मुंग्या, मुंगळे, पाली यांच्या वस्तिस्थानांवर आक्रमण करून! त्यामुळे घरात एखादा अन्नकण राहून तो मूळ मालकांना आमंत्रण देऊ नये यासाठी दक्षता घेणं गरजेचं.
तिखट-हळद, हिंग,जिरे असे जिन्नस मी छोटय़ा छोटय़ा हवाबंद बाटल्यात भरून नंतर हा ऐवज एका डब्यात ठेवते. त्यामुळे दोन-तीन महिन्यांनी परत आलो तरी या वस्तू जशाच्या तशा राहतात. चहा, साखर, रवा, पोहे इ.साठीही हवाबंद डब्यांची तरतूद! निघताना मी एकूण एक भांडी, पेले-वाटय़ा, चमचे सर्व धुवून पुसून मोठमोठय़ा डब्यांमध्ये भरून ठेवते. ताटल्याही कोरडय़ा करून प्लास्टिक पिशवीत बांधून ठेवते. झुरळांना वाव नको म्हणून मी इथे ओटय़ाखाली कपाटं केलेलीच नाहीत. फक्त मधे एक कडाप्पा घातलाय. देवही ओटय़ाच्या एका बाजूला पाटावर बसवलेत. निघताना त्यांना वाहिलेली फुलं काढणं अनिवार्य! नाहीतर किडे-मकोडे यांचं आक्रमण झालंच म्हणून समजा. फ्रिजही पुसून कोरडा करून उघडा ठेवणं अत्यावश्यक!
कमोडमध्ये जंतुनाशक टाकून त्याचं झाकण बंद केलं नाही तर तो पालींचा स्विमिंग टॅंक बनतो. बाथरूम्सच्या जाळीवरही जुनी मोठी पितळेची पातेली उपडी टाकून मुंगळय़ांना मज्जाव करावा लागतो.
जेव्हा आम्ही घरी परत येतो तेव्हा पहिलं काम म्हणजे व्हरांडा धुणं! कारण तोच तेवढा खुला असतो. घर व बागेच्या कामांसाठी आम्हाला निष्ठावान सेवकांची जोडी मिळालीय ही ईश्वराची कृपा! घरात पाऊल टाकल्यावर आधी खिडक्या पुसून त्या सताड उघडायच्या. लगेचच बाहेरचा गार वारा घरभर खेळू लागतो. पुढचं काम म्हणजे बंदिस्त भांडी, डबे, इ.वस्तू बाहेर काढून त्या स्टॅण्ड पुसून त्यावर लावणे. नंतर पलंगांवर पांघरलेले बेडस्प्रेड काढून बरोबर आणलेल्या स्वच्छ चादरी, अभ्रे गादी-उशांवर चढवले की घराला घरपण येतं.
घराची विचारपूस झाली की चहा घेऊन मी माझ्या झाडामाडांना भेटण्यासाठी बाहेर पडते. माझे यजमान तर आल्याआल्या बागेत फिरून मगच घरात येतात. त्यांचाही जीव इथल्या पानाफुलांत गुंतलाय. घराच्या सभोवती आम्ही सर्व प्रकारची झाडं लावली आहेत. आंबा, फणस, नारळ, चिकू, पेरू, काजू अशा फळझाडांपासून बकुळ,पारिजातक, जाई-जुई, कृष्णकमळ, तऱ्हेतऱ्हेची जास्वंद झालंस तर शेवगा, कडूलिंब, औदुंबर, कढीपत्ता, विडय़ाच्या पानांचा वेल.. काय म्हणाल ते इथे आहे. शिवाय आमचा देवस्वरूप माळी वांगी, पालक, काकडी, मुळा, चवळी अशा भाज्या आलटून पालटून लावत असतो. या सर्व झाडांना स्पर्श करून त्यांची आईच्या मायेने विचारपूस केल्याशिवाय माझ्या इतर कामांना सुरुवात होत नाही. तसंच घरातून परत निघतानाही त्यांचा निरोप घेतल्याविना माझा पाय बाहेर पडत नाही. या छोटय़ाशा बगिच्याने आमच्या प्रेमाची कित्येक पटीत परतफेड केलीय. परतताना मित्रमंडळींना वाटण्यासाठी घेतलेले दारचे नारळ, भाज्या, शेवग्याच्या शेंगा, अळू, कडीपत्ता इ.नी आमच्या गाडीची डिकी ओसंडून वहात असते.
बागेत येणारे अनेक पक्षी हे आमचे सख्खे शेजारी! सकाळी सकाळी चहाचा कप हातात घेऊन व्हरांडय़ात सुखासनात बसून झाडांवर बागडणाऱ्या पक्ष्यांचा गोड किलबिलाट कानात साठवत रहाणं हा आमचा परमानंद! बुलबुल, दयाळ, हळद्या, तांबट अशा अनेक गायकांचे सूर ऐकत आमच्या दिवसाची संगितमय सुरुवात होते. भारद्वाज आणि धनेश हे पक्षीदेखील तारस्वरात आपल्या आगमनाची वर्दी देत राहतात. रात्री रातकिडय़ांच्या एकसुरातील तालाने या संगितसभेची सांगता होते.
सकाळचे दहा वाजले की चरायला जाणाऱ्या गाई- गुरांचा कळप आमच्या घरावरून जातो. बंगल्याची उघडलेली दारं-खिडक्या, तिथली हालचाल त्यांनाही जाणवत असावी. माझे कानही त्यांचा वेध घेत असतात. गेटजवळ रेंगाळणाऱ्या त्या गोमातांना घमेल्यात तांदूळ व गूळ यांच्या मिश्रणाबरोबर दारचा मुळा, पालक आणि येताना खास त्यांच्यासाठी आठवणीने आणलेले पिकल्या केळय़ांचे घड असा गोग्रास देऊन त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला की त्या आपल्या डोळय़ांतून जो आशीर्वाद देतात तो लाखमोलाचा!
आगामी संकटाचे संकेतही आमचं घर देतं असं आम्हाला प्रकर्षांने वाटतं. दोन वर्षांपूर्वी माझ्या पतींना का कोणास ठाऊक वाटलं की घराचं वॉटर प्रूफिंग करून घ्यावं, त्याबरोबर गच्चीवर घातलेल्या पत्र्यांचे स्क्रूही घट्ट करून घ्यावेत. खरं तर तशी निकड नव्हती पण ही कामं करणारी व्यक्तीही नेमकी समोर आली आणि ते होऊन गेलं. त्यानंतर ध्यानीमनी नसताना जे चक्रीवादळ (२०२०) आलं त्यामुळे आजूबाजूच्या घरांची, बागेची बरीच पडझड झाली, पण आमचं घर मात्र सर्व आघात सोसत, ताठ कण्याने उभं राहिलं. एकदोन मोठी झाडं पडली तीही कुंपणाला किंवा आसपासच्या झाडांना किंचितही इजा न करता, मोकळय़ा जागी!
आमचं हे सेकंड होम तसं आडनिडय़ा वाटेवर असूनही गेल्या तेरा वर्षांत इतकी माणसं इथे येऊन राहून गेलीत की त्यांची गणतीच नाही. माणसांचं प्रेम सतत मिळत राहिल्याने आमची ही वास्तू, वास्तुशांत न करताही शांत, समाधानी, तृप्त वाटते. इथे गजानन चरित्रामृताचं पारायण होतं, तसंच ३१डिसेंबरची रात्रही जागवली जाते. कधी गणपतीचं आगमन तर कधी भाचे-भाच्यांचं केळवण-डोहाळेजेवण! एकूण काय तर आनंदाचे दिवस साजरे करण्याचे ठिकाण एकच.. ‘इशान बंगला’! (इशान हे आमच्या नातवाचं नाव )
या घरात आम्ही ( जाणूनबुजून) टीव्ही ठेवलेला नाही. पण इथे आल्यावर त्याची कोणालाही आठवण होत नाही हे विशेष! काम करताकरता पाहुण्यांशी गप्पा करता याव्यात म्हणून आम्ही हॉल आणि किचन यामध्ये िभतीचा अडसर घातलेला नाही. हॉलही चांगला २७ x २० फुटांचा ऐसपैस ! झोपण्यासाठी भरपूर गाद्या-उशा, अंथरूण-पांघरूण यांची व्यवस्था! बाहेर सर्वत्र हिरवागार, निर्मळ निसर्ग. त्यामुळे करोनाचा पहिला धाक ओसरला तेव्हाही बाकी सर्वत्र सन्नाटा होता, पण आमच्या सेकंड होमचं मात्र गोकुळ झालं होतं.
आमच्या या घरात कोणी व्यक्ती एकदाच आलीय असं आजवर झालेलं नाही. जो येतो तो घराशी नातं जोडूनच जातो. हे अनोखे भावबंध बघताना आम्हा दोघांनाही आसुसून वाटतं की ही वास्तूच आल्यागेल्यांना ‘पुनरागमनायच’ म्हणत असणार!
आमच्या या घराचं चारंच ओळीत वर्णन करायचं झालं तर मी म्हणेन..
झुळुझुळु वाहे नदी जवळुनी
फळाफुलांची बाग डवरूनी
वारा वाहे शीतल सुमधुर
जगावेगळे भासे सुंदर
ते माझे घर..ते माझे घर।
sumedhasinkar2020@gmail. com
शब्दांकन- संपदा वागळे