अजित सावंत
मागील लेखात आपण नैसर्गिक फ्लोरिंफ्लोरिंग मटेरियल्सची माहिती घेतली. या लेखात आपण कृत्रिम फ्लोरिंग मटेरियल्सची माहिती घेऊ या.
लॅमिनेटेड फ्लोरिंग : लॅमिनेटेड फ्लोरिंग हा वुडन फ्लोरिंगचा एक प्रकार आहे. पण यात पूर्णत: नैसर्गिक लाकूड वापरले जात नसून, हार्ड डेन्सिटी बोर्डवर एका प्रकारचे लॅमिनेट लुक देते. लॅमिनेटेड फ्लोरिंग हे वुडन फ्लोरिंगसारखाच लुक देते. लॅमिनेटेड फ्लोरिंगचा लुक व वुडन फ्लोरिंगच्या लुकची जर तुलना करायची झाली तर ती व्हिनियरचा लुक व लॅमिनेटच्या लुकशी होऊ शकते. वुडन फ्लोरिंगला पाण्याचे वाकडे असते, पण लॅमिनेटेड फ्लोरिंग आपण ओलसर कपडय़ाने पुसू शकता. डाग पडल्यास घासून काढू शकता. हे फ्लोरिंग आपण सध्या लावलेल्या टाइल्सवरदेखील लावू शकता. टाइल्स लावलेल्या नसतील तर स्लॅबवर सिमेंटिंग करून फ्लोर लेव्हलिंग केले जाते व त्यावर हे लॅमिनेटेड फ्लोरिंग बसवतात. वुडन फ्लोरिंगप्रमाणे हे फ्लोरिंगही इंटर लॉकिंग पद्धतीने बसवतात. आधी केवळ परदेशी कंपन्या हे फ्लोरिंग बनवत, पण आता भारतीय कंपन्यादेखील हे प्रॉडक्ट्स बनवतात. होम इंटिरियर्समध्ये लॅमिनेटेड फ्लोरिंग हे जास्त करून बेडरूममध्ये लावले जाते. हे खूप छान दिसते व एका दिवसात लावून होते. या सगळय़ा कारणांमुळे हे फ्लोरिंग खूप लोकप्रिय झाले आहे. लॅमिनेटेड फ्लोरिंग हे साधारणपणे चार फूट बाय सहा/आठ इंच या आकाराच्या फळय़ांमध्ये तसेच चौरस टाइल फॉर्ममध्येही उपलब्ध असते. या प्लँक्सचा (प्लँक्स) म्हणजेच फळय़ांचा थिकनेस सहा ते बारा एमएम इतका असतो. जास्त थिकनेस असलेले फ्लोरिंग दीर्घकाळ टिकते. हे फ्लोरिंग ऑफिसमध्येही वापरले जाते. यात लाकडाचे विविध रंग तसेच लाकडाची डिझाईन्स उपलब्ध आहेत.
हेही वाचा >>> ज्येष्ठांसाठी निवारा..
* वुलन कारपेट : ‘वुलन कारपेट’ हे लोकरीपासून बनवले जाते. लोकर ही नैसर्गिक असली तरीही वुलन कारपेट फ्लोरिंगच्या कृत्रिम प्रकारात गणले जाते. हे कारपेट मोठय़ा शीट्सच्या स्वरूपात मिळते व आपल्या रूम साइझप्रमाणे कापून चिकटवले जाते. हे चिकटवण्यासाठी अॅडेसिव्हचा ( अिँी२्र५ी) वापर करतात. यात विविध रंग उपलब्ध आहेत. यात वेगवेगळय़ा रंगांचे कॉम्बिनेशनही करता येते. शीट्सप्रमाणेच यात टाइल फॉमची कारपेट्सही उपलब्ध आहेत. या कारपेटवर पाणी पडू देऊ नये. कारण ते जर पटकन सुकवलं नाही तर कुबट वास येतो. हे लावण्यासाठी, ज्या रूममध्ये हे लावायचंय, ती रूम एअर क्लीनरने साफ करावी. डाग पडल्यास प्रोफेशनल कारपेट क्लीनर्स ते डाग काढून देऊ शकतात. नैसर्गिक मटेरियल वापरल्यामुळे हे महाग असते. पण महाग जरी असले व मेंटेन करण्यास थोडे कठीण असले तरीही या वुलन कारपेट्स लुक खूप सुंदर असतो.
* आर्टिफिशियल कारपेट : वुलन कारपेटचा लुक असलेले सिंथेटिक मटेरियलने बनवलेले कृत्रिम कारपेट बाजारात उपलब्ध आहे. यात कृत्रिम मटेरियल वापरले असल्याने याची किंमत वुलन कारपेटपेक्षा खूप कमी असते. हेदेखील वुलन कारपेटप्रमाणेच लावले जाते. यात बरेच रंग उपलब्ध आहेत. या कारपेटला बाजारात खूप मागणी आहे.
* विनाईल कारपेट : विनाईल कारपेट हेदेखील शीट स्वरूपात उपलब्ध आहे. तसेच टाइल्सच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. हे कारपेटही आपल्या सध्याच्या टाइल्सवर चिकटवले जाते. हे इतर फ्लोरिंगपेक्षा साफ करण्यास खूप सोप्पे आहे. तसेच स्वस्तदेखील आहे. यात भारतीय व परदेशी कंपन्यांचे प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. योग्य प्रकारे वापरल्यास विनाईल कारपेट सहज सात/आठ वर्षे टिकते. यात रंगांचे व डिझाइन्सचे खूप पर्याय उपलब्ध आहेत. यात मार्बल फिनिशचे तसेच वुडन फ्लोरिंग फिनिशचेही डिझाइन्स उपलब्ध आहेत. स्वस्त आणि मस्त असा हा पर्याय आहे.
वरील सगळे पर्याय हे झटपट लुक बदलण्यासाठी खूप कामी येतात.
हेही वाचा >>> पुणे: व्यवसाय, निवासासाठी उत्तम पर्याय
* सिरॅमिक टाइल्स : सिरॅमिक टाइल हा पर्याय आत्तापर्यंत सगळय़ात जास्त वापरला गेला आहे. या टाइल्सना बरेच जण स्पारटेक टाइल्स म्हणत, पण ‘स्पारटेक’ ही या टाइल्स बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्यांपैकी एका कंपनीच नाव होतं. या टाइल्स खूप टिकाऊ असून यात रंग व डिझाइनचे खूप पर्याय मिळतात. हा पर्याय चांगला जरी असला तरी विट्रीफाइड टाइल्स बाजारात आल्यापासून सिरॅमिक टाइल्सचा खप हा ९०% इतका कमी झाला आहे.
* विट्रीफाइड टाइल्स : साधारण वीस एक वर्षांपूर्वी या टाइल्स बाजारात मिळू लागल्या. तेव्हापासून सगळय़ा बाजारपेठेवर या टाइल्सची सत्ता आहे. सगळय़ात जास्त किंबहूना ९५% ठिकाणी विट्रीफाइड टाइल वापरली जाते. आधी केवळ २ फूट * २ फूट, १ मीटर * १ मीटर, ४ फूट * ४ फूट, ६ फूट * ४ फूट अशा विविध साइझमध्ये या टाइल्स उपलब्ध आहेत. टाइल्स शक्यतो मोठय़ा आकाराच्या घ्याव्यात- जेणेकरून टाइलचे जॉइंट्स कमी येतील व रूम मोठी भासेल. यात अनेक रंग व डिझाईन्स उपलब्ध आहेत, पण इटालियन मार्बलचा लुक असलेल्या टाइल्सना जास्त पसंती आहे. या सुंदर तर दिसतातच, पण तितक्याच या मजबूत आहेत. पदार्पणात या टाइल्सचं वर्णन हे मार्बलसारखं सुंदर व ग्रॅनाईटसारखी मजबूत असं केलं गेलं. बऱ्याचशा अंशी ते खरं देखील आहे. यात भारतीय कंपन्यांच्या टाइल्स खूप प्रसिद्ध आहेत, तरीही दुबई, स्पेन, चीन व इतरही देशांतून या टाइल्स आयात केल्या जातात. या विट्रीफाइड टाइल्स या खूप अप्रतिम दिसतात, तसेच या टाइल्सना मेंटेन करण्याची गरज भासत नाही. फ्लोरिंग मटेरियल्सच्या बाजारपेठेचा ९५% हिस्सा हा विट्रिफाइड टाइल्सचा आहे. यावरून या टाइल्सची सुंदरता, उपयुक्तता व लोकप्रियतेचा अंदाज येतो.
फ्लोरिंगबाबतचे सर्वसाधारण मुद्दे, त्याचे नैसर्गिक व कृत्रिम पर्याय यांच्या सखोल अभ्यासाने आपण आपल्या इंटिरियला, आपल्या अभिरुचीला व मुख्य म्हणजे आपल्या बजेटला साजेसं फ्लोरिंग निवडू शकता.
(इंटिरियर डिझायनर)
ajitsawantdesigns@gmail.com