डॉ. मिलिंद पराडकर

आज्ञापत्रात रामचंद्रपंत अमात्य म्हणतात : ‘किल्ल्याची मुख्य गरज तो पाणी.’ पाणी ही तर जीवनाची प्रमुख गरज. पाण्याविना जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. दुर्ग हे जसे राज्याच्या तसेच ते मानवी जीवनाच्याही प्राणसंरक्षणाचे साधन. पाण्याविना दुर्ग ही कल्पनाही केवळ अशक्य. कुण्याही दुर्गाची प्रमुख गरज म्हणजे पाणी. पाणी नसेल तर मग ते स्थळ भौगोलिक, लष्करी वा प्रशासकीयदृष्टय़ा दुर्ग म्हणून कितीही मोक्याचे असले तरी पूर्णतया कुचकामी ठरते. दुर्ग म्हटला की तिथे सन्य राहणार. त्यांच्या वैयक्तिक गरजा अन् दुष्काळ, युद्धादी प्रसंग यासाठी पुरून उरेल इतक्या पाण्याची दुर्गास गरज सदैव भासणार. पाणी नसेल तर सन्यासाठी तो दुर्ग निव्वळ कुचकामाचा. म्हणून मग लष्करीदृष्टय़ा स्थळ पसंत पडले तर पहिल्याप्रथम तिथे पाण्याचा ठाव शोधला जाई. त्यासाठी जिवंत झऱ्यांचा ठाव असलेल्या ठिकाणांचाच दुर्ग म्हणून विचार होई. कोकणातल्या भरतगडाची जागा दुर्ग म्हणून बांधून काढायचं निश्चित झालं होतं. मात्र तिथे पाणी आढळलं नाही. म्हणून ती जागा तशीच सोडून द्यायचे आदेश शिवछत्रपतींनी दिले. तसं लिखित पत्र उपलब्ध आहे. यावरून एक साधार तर्क असा करता येतो की, जमिनीखालचे पाणी वा झरे शोधून काढणारी मंडळी स्वराज्याच्या सेवेत असायलाच हवीत. शिवकालातच नव्हे, तर अगदी प्राचीनतम कालखंडापासून जिथं जिथं माणसांनी ठाव वसवला तिथं तिथं, त्या त्या कालखंडात बहुधा दर गावाआड सापडणारे पाणाडे किंवा वराहमिहिराच्या ‘बृहत्संहिते’च्या आधारे पाण्याचे ठाव शोधणारे शिक्षित विद्वान यांनी ते पाणी शोधून काढले असतील. मात्र दुर्ग अन् पाणी हे नाते अतिशय नाजूक. त्यामुळे त्याची मोठय़ा निरातीने काळजी वाहायची, असे स्पष्ट निर्देश होते.

एखादं स्थळ राज्याच्या संरक्षणाच्या वा संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय मोक्याचे असले; मात्र तेथे नसíगक पाण्याचा स्रोत आढळला नाही, तर अशा स्थळी आधी खडकांमध्ये दगडांच्या खाणी लावून तिथे बांध घालून कृत्रिम तलाव निर्माण करत. अन् त्या दुर्गाची पाण्याची गरज भागवत. खाणीतून काढलेला दगड अर्थातच तटबंदी अन् दुर्गावरील इमारतींच्या कामी येत असे. सह्यद्रीत पाऊस महामूर. त्यामुळे त्याच्या माथ्यावरील या दुर्गास आभाळातून बरसणाऱ्या पाण्याची कमतरता कधीच जाणवली नाही. शिवकाळातील पत्रव्यवहारात तरी तशा नोंदी नाहीत. (महाराष्ट्रातला दुर्गादेवीच्या भीषण अशा दुष्काळानंतरचा दुष्काळ इ.स. १६३० मध्ये पडला.  त्यानंतर अवर्षणाच्या नोंदी नाहीत.) मात्र हे झाले पाण्याच्या कृत्रिम स्रोतांविषयी. परंतु दुर्गावर नसíगक स्रोत जरी उपलब्ध असले तरी तेवढय़ावर कधीच अवलंबून राहिले जात नसे. त्या नसíगक तलावांच्या जोडीला कृत्रिम पुरवठाही तयार असे. जागोजागी वस्ती पाहून टाकी, तळी खडकात खोदून ठेवत. मात्र ते पाणी सहसा उपसले जात नसे. यासाठी दोन शक्यता गृहीत धरल्या जात. पहिली शक्यता अशी की, हे नसíगक स्रोत उणावू शकतील अन् दुसरी अशी की, युद्धांमध्ये तोफांच्या दणदणाटामुळे अन् धक्क्यांनी भूगर्भातील या पाण्याच्या वाटा बदलू शकतात, अन् मग अर्थातच हे झरे आटतात. म्हणून असे जर झालेच तर मग केवळ नसíगक पाण्यावर अवलंबून राहणे हा मूर्खपणा ठरेल. त्याचसाठी या कृत्रिम साठवणुकीची गरज भासे. त्यास ‘जखिरियाचे पाणी’ असे म्हणत.  ते पाणी वापरू देत नसत. अर्थात मोठा तलाव आजूबाजूला असला तर हे पाणी खूप जपले जाई. त्यामध्ये काडीकचरा वाऱ्याने उडून पडून ते पाणी सडू नये म्हणून ते झाकून ठेवले जाई. दुर्गावरले पाणी जिवापाड सांभाळले जाई.

रामचंद्रपंत अमात्य म्हणतात : ‘..जुझामध्ये भांडीयांचे आवाजाखाली झरे स्वल्प होताती. तेव्हा तितकियावरी विसंबून न राहता जागोजागी म्हणून टाकी तळी खोदावी. ते पाणी जखिरियाचे म्हणोन वापरावे. त्यात केर कसपट किमपि पडो देऊ नये. गडाचे पाणी बहुत जतन राखावे !’

राजगड आणि रायगड या दोन्ही स्वराज्याच्या राजधान्या. एक अनभिषिक्त तर दुसरी अभिषिक्त. आपल्या थोरल्या राजांचा अवघा जीवनपट या दोन दुर्गानी अगदी जवळून पाहिलेला. आयुष्यभर दुर्गाचे राजकारण केलेला तो दुर्गपती राजा या दोन्ही दुर्गावर मिळून आयुष्याची पस्तीस र्वष राहिला. हे दोन्ही दुर्ग त्याने स्वत:च्या मनाजोगे सजवून घेतले तट कुठं, बुरूज कुठं, महाद्वार कुठं, चोरवाटा कुठं, तलाव-टाकी कुठं, वाडेहुडे कुठल्या बाजूला, राजवाडा कुठं असायला हवा असं सगळं त्यानं मनोमनी पाहिलं अन् बजवार रचून घेतलं. दुर्गशास्त्रात दुर्गाची जी जी वैशिष्टय़े आढळतात ती ती या दोन्ही दुर्गावर आढळतात. कौटिल्यांपासून ये रामचंद्रपंत अमात्यांपर्यंत ज्या अवघ्या विद्वानांनी जी दुर्गमहती गायली आहे ती सारीच गुणवैशिष्टय़ं या दोन्ही दुर्गावर ठायी ठायी सापडतात. म्हणूनच स्वराज्याच्या या दोन्ही राजधान्यांचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. प्राचीन दुर्गशास्त्राचे परिपूर्ण प्रतिनिधी या दृष्टीने या दोन्ही दुर्गाचा ऊहापोह इथं केला आहे.

या दोन्ही दुर्गावर अतिशय परिपूर्ण अशी जलव्यवस्था आढळते. गडाच्या कोणत्याही कोपऱ्यात अगदी आजही गेले, तरीही आजूबाजूस अगदी हाकभर अंतरावर पाण्याचा एखादा स्रोत आढळतोच आढळतो. राजगडावर पठार दुर्मीळ आहे. थोडीफार सपाटी उत्तरेकडल्या पद्मावती माचीवर आहे. साहजिकच शिवकाळात गडाची सारी वस्ती याच माचीवर एकवटलेली होती. तशीच थोडीशी सपाटी बालेकिल्ल्यालाही लाभलेली आहे. या दोन्ही ठिकाणी दोन भले मोठे, नसíगक स्रोतांवर बांधलेले तलाव आहेत. अगदी आजही या दोन्ही तलावांमध्ये तुडुंब पाणी आढळते. पद्मावती माचीवरला तो १०० फूट लांब व ८० फूट रुंद असा पद्मावती तलाव अन् बालेकिल्ल्यावरला चंद्रकोरीच्या आकाराचा, ५० फूट लांब व १५ फूट रुंद असा, म्हणून ते चंद्रतळे. राजगड हा समुद्रसपाटीपासून ४५७४’ एवढय़ा उंचीवर आहे, हे म्हटलं की मगच या देवजळाचं महत्त्व ध्यानी येतं! याखेरीज पद्मावतीच्या माचीवर आणखीन सात टाकी आहेत. राजवाडय़ाशेजारी आणिक एक लहानगा तलाव आहे. पाण्याच्या दृष्टीने पद्मावती माची स्वयंपूर्ण आहे. केवळ पद्मावती माचीच नव्हे, तर पूर्वेकडील सुवेळा माची, त्या माचीचा दक्षिणेकडील काळेश्वरीचा बुरूज, नऋत्य दिशेस पसरलेल्या संजीवनी माचीचे तीनही टप्पे अन् वर म्हटल्याप्रमाणे ४५७४’ उंचीवरला बालेकिल्ला, हे सारेच दुर्गभाग पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण आहेत. या ग्रंथाच्या शेवटी जोडलेला राजगड व रायगडावरील उपलब्ध पाणी व वस्ती यांचे साहचर्य दर्शविणारा नकाशा याविषयी बरेच काही सांगून जातो. शिवकाळात या दुर्गास पाण्याची कमतरता कधीच जाणवली नसावी असे अगदी छातीठोकपणे म्हणता येते.

रायगड ही तर स्वराज्याची अभिषिक्त राजधानी. या दुर्गावरली सारी रचना, साऱ्या सोयी ‘राजधानी’ ही कल्पना मनी धरूनच निर्माण केल्या गेल्या. शिवछत्रपतींनी निश्चित केले की, रायगडाचे स्वरूप बदलून त्यास आपल्या कायमच्या वास्तव्याचे ठिकाण बनवायचे. त्यांच्या ध्यानी आले होते की, एका दृष्टीने आडवाटेवर असला तरी रायगड हमरस्त्यावरच आहे, अन् कुठेही जाण्यास सोयीचा आहे. कुलाबा गॅझेटिअरकार म्हणतात की, रायगडचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे; शिवाय शत्रूपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने आटोपशीर आहे, शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातील ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही तो जवळ आहे.

शिवछत्रपतींचा समकालीन बखरकार कृष्णाजी अनंत सभासद म्हणता : ‘राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवर चखोट गड खरा; परंतु तो उंचीने थोडका. रायगड दौलताबादचे दशगुणी उंच, असे देखोन संतुष्ट जाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.’

हे शब्द समकालीन बखरकाराचे आहेत. काही अधिकउणा भाग वगळला तरी यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात की, स्वत: शिवछत्रपतींनी हा दुर्ग बहुधा स्वत: चहुबाजूंनी हिंडून पाहिला होता अन् त्याचे दुर्गमत्व ध्यानी येताच स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडाची योजना करायचे त्यांच्या मनाने निश्चित केले. कल्याणचे सुभेदार आबाजी सोनदेवांस गडावर इमारती बांधण्याच्या आज्ञा सुटल्या.  इ.स. १६७१-७२ च्या एका जाबत्यामध्ये रायगडासाठी ५०,००० होनांची तरतूद झालेली दिसते. त्यांपकी दोन तलावांसाठी २०,००० होन, ५,००० होन दुर्गासाठी, चुनेगच्चीसाठी १०,००० होन व तटबंदीच्या कामासाठी १५,००० होन अशी ही तरतूद होती.  येथे हे कलम महत्त्वाचे आहे की, पन्नास हजार होनांपकी चाळीस टक्के रक्कम ही तलावांच्या म्हणजेच पाण्याच्या सोयीसाठी वर्ग झाली होती. दुर्गाच्या बाबतीत पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ही बाब पुरेशी आहे.

रायगडावर गंगासागर, हत्तीतलाव, कुशावर्त, कोळिंब, बामणटाके, काळा हौद व हिरकणीचा तलाव हे सात भले मोठे तलाव आहेत. याशिवाय खडकात कोरलेली जवळजवळ २६ टाकी आहेत. बालेकिल्ल्यामध्ये पडणारे पावसाचे पाणी, त्याचे भूपृष्ठाखालील मार्ग शोधून काढून, फिल्टर सिस्टीमच्या द्वारे कुशावत्रेश्वराच्या मंदिराशेजारील एका जलमंदिरात जमा होऊन, तिथून ते कुशावर्तामध्ये उतरते. या प्रकारची प्रणाली इतर कुण्याही दुर्गावर अजूनपर्यंत दृष्टोत्पत्तीस आलेली नाही. आज यातला बराचसा भाग बुजलेला असला तरी शिवकाळातही पर्जन्यजलसंधारणाची व्यवस्था केवळ कल्पनेत नव्हे, तर प्रत्यक्षात आणली गेली होती, याचे आश्चर्य तर वाटतेच. मात्र त्याहून त्या हिरोजी इंदुलकरांसारख्या स्थपतींच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वाविषयी निरतिशय अभिमानही वाटतो. इथे एक गोष्ट अजूनही नमूद करावीशी वाटते, की आजच्या घटकेस अंदाजे दीड-दोन लाखांवर पर्यटक रायगडदर्शनासाठी येतात. त्यांची पाण्याची गरज एकटा गंगासागर तलाव पुरवतो; किंबहुना पुरून उरतो! ही एकविसाव्या शतकातील वस्तुस्थिती आहे. शिवकाळात गडावर सन्यशिबंदी व कारभारी मिळून पाचसात हजारांपर्यंत वस्ती असावी. मात्र दोन मल लांब अन् मलभर रुंदीच्या या पठारावर जिथे जिथे वस्ती होती, तिथे तिथे पाण्याचे ठाव आढळतात.

गडावरील पाणी सांभाळून जतन करावे, हे सांगणारा राजा आपल्या गडकऱ्यांसाठी पाण्याची मुबलक सोय करायला विसरला नाही, हेसुद्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे ठरते!

जसा पाण्याचा विचार केला, तसाच गडावरल्या इमारतींचा, राहत्या घरांचाही विचार केला जात असे. सभासद पुढे म्हणतो : ..तक्तास जागा गड हाच करावा असे करारी करोन, तेच गडी घर, वाडे, माडिया, सदरा, चौसोपे आणि अठरा कारखाने यांस वेगळाले महाल व राणियांस महाल, तशीच कारकुनांस, सरकारकुनांस वेगळी घरे व बाजार, पंचहजारियांस वेगळी घरे व मातबर लोकांस घरे व गजशाळा व अश्वशाळा व उष्टरखाने, पालखी महाल व वहिलीमहाल, कोठी, थटीमहाल चुनेगच्ची चिरेबंदी बांधिलेठ.

अर्थ असा की, रायगड ही राजधानीची जागा म्हणून ठरल्यानंतर शिवछत्रपतींनी घरे, वाडे, माडय़ा- म्हणजे एक मजला असलेली घरे, चौसोपी म्हणजे चार सोपे वा पडव्या असलेले वाडे, अठरा कारखान्यांच्या इमारती हे सारे बांधले. कारखाने याचा अर्थ राज्यकारभाराच्या सोयीसाठी असलेले प्रशासकीय विभाग. हे विभाग पुढीलप्रमाणे होते : खजिना-कोषागार, जवाहिरखाना-रत्नशाळा, अंबारखाना-धान्यसंग्रह, शरबतखाना-पेयस्थान, तोफखाना, दफ्तरखाना-लेखशाला, जामदारखाना-वसनागार, जिरातखाना-शस्त्रागार, मुदबखखाना-पाकशाला, उष्टरखाना-उंटशाला, नगारखाना, तालीमखाना-व्यायामशाळा, पीलखाना-हत्तीशाला, फरासखाना-राहुटय़ा, डेरे, इ., आबदारखाना-जलस्थान, शिकारखाना-पशुपक्ष्यांची जागा, दारूखाना-दारूगोळा साठवण्याची जागा, शहतखाना-औषधीशाळा वा आरोग्यगृह.

यावेगळे बारा महाल, हे पुढीलप्रमाणे होते: पोते-तिजोरी, सौदागीर-व्यापार, पालखी, कोठी-धान्यागार, इमारत-बांधकामे, वहिली-रथशाला, पागा-घोडदळ, सेरा-खासगी, दरूणी-राणीवसा, थट्टी-गोशाला वा कुरणे, टंकसाल-टाकसाळ, छबिना-रात्रीचा पहारा वा गस्त.

इथे संकेत असा की, कारखाने राज्याच्या मालकीचे अन् महाल राजाच्या मालकीचे. वर दिलेली यादी ही सभासदाने त्याच्या बखरीत दिलेली आहे. इथे तिचा उल्लेख हा केवळ संदर्भापुरता केलेला आहे. मात्र बारा महालांपकी इमारत, पागा, थट्टी अन् टंकसाल हे महाल अन् शरबतखाना, मुदबखखाना, तालीमखाना, शिकारखाना हे कारखाने यांची विभागांची अदलाबदल केली की हे विभाग काहीसे व्यापक भासतात अन् परिपूर्णसुद्धा वाटतात.

याचाच अर्थ राजधानी रायगडावर हे अठरा कारखाने अन् बारा महाल अस्तित्वात होते. किंबहुना ही तत्कालीन प्रशासकीय पद्धत होती, त्याअर्थी राजगडावरसुद्धा हे सारे विभाग अन् त्यांच्या इमारती अस्तित्वात होत्या, असणार. निदान उत्तरकाळात तरी त्यांची योजना झालीच असणार. ही व्यवस्था कार्यालयीन इमारतींची. याव्यतिरिक्त या राजधानीच्या दुर्गावर स्वत: राजा राहणार. त्याचा राणीवसा, कुटुंबकबिला, त्याचे सेनापती, सरदार-दरकदार, त्यांची कुटुंबे, दुर्गाच्या रक्षणासाठी नेमलेले सन्य, ही सारी अत्यावश्यक मंडळी, अन् दुर्गाच्या वा या असामींच्या इतर गरजा पुरवणाऱ्या इतर असामी, नोकरचाकर ही सारीच मंडळी त्या दुर्गावर राहणार, त्यामुळे त्यांची राहती घरेही त्या दुर्गावर असणार. त्यांपकी स्वत: राजाच्या घराखेरीज दुसरी मोठी इमारत बांधू नये असा धारा होता. हा राजवाडाही विटांचा बांधला जाई. या साऱ्याच बांधकामांमध्ये चुना भरपूर वापरला जाई. हा चुनाही बहुधा शंखिशपले वा चुनखडी जाळून व त्याची भुकटी करून ती भिजवून, त्यात राळ, ताग, मेण असे पदार्थ मिसळून मग ते मिश्रण सांध्यांसाठी वापरले जात असे.  हे मिश्रण किती टिकावू असे हे आजही या दुर्गाची तटबंदी पाहून दृष्टोत्पत्तीस येते. बहुधा सारीच घरे या पद्धतीने बांधली जात. कीडमुंगी, उंदीर, विंचू राहू शकतील एवढय़ाही फटी ठेवल्या जात नसत. घराभोवती कुंपण म्हणून झाडी जोपासत. राजवाडय़ात राजा रोजच असे असेही नाही. मग राजा नसताना हवालदाराने त्या घरात राहावे, धुरी करावी. सारवून स्वच्छ ठेवावे, त्या घरामध्ये कीडमुंगी, जीवजंतू होणार नाहीत हे पाहावे. धनी गडावर येणार हे कळताच या अधिकाऱ्याने समक्ष उभे राहून सारे घर सारवून, रांगोळी घालून सजवावे अन् काही दगाफटका होऊ नये या दृष्टीने धनी येईपर्यंत तिथे मुक्काम करावा, असा धारा होता. दुर्गावरील साऱ्याच घरांच्या बाबतीत अशी काळजी घेतली जाई.

दुर्गावरली राहती घरे, अंबारखाने, दारूकोठारे ही सारी दगडी जमीन असलेली अन् चुनेगच्ची असत. त्यामुळे किडेकीटक, वाळवी आदींचा उपद्रव टळेल अशी धारणा होती.

अभंग, अखंड, दोषरहित असा खडक पाहून तिथे टाकी खोदली जात. लहानसहान फटी, चिरा पक्क्या चुन्याने बुजवून घेऊन, त्या टाक्यांचा तळ चुनेगच्ची करत. त्यात मोठमोठय़ा रांजणात तेलातुपाचा साठा करत. बहुधा हे कुजलेले तूप असावे. त्या काळी कुजलेले तूप हा शस्त्रांमुळे झालेल्या जखमांवर लावायचा उत्तम उपाय होता. ही सोय बहुधा त्यासाठीच केली जाई.

तट, बुरूज, पहाऱ्याच्या चौक्या, परकोट हे युद्धप्रसंगी जाया होत. त्याची मजबुती वारंवार केली जाई. त्यासाठी इमानी, सांगितल्या कामी चुकारपणा व आळस न करणारे असे अधिकारी नेमले जात. दुर्गावरल्या साऱ्याच इमारतींच्या केवळ बांधकामाचीच नव्हे, तर त्यांच्या मजबुतीची अन् डागडुजीचीही जबाबदारी यांचीच असे. या बाबतीत दुर्लक्ष क्षम्य नसे.

जशी इमारतींची, किंबहुना त्याहून काकणभर जास्तच काळजी तटबंदीची घेतली जाई. तटबंदीच्या सांदीसपाटीमध्ये झाडे वाढतात. ती वरचेवर कापून टाकली जात कारण ती जर वाढू दिली तर ते बांधकाम निखळून पडायची भीती. तटावर व तटाखाली जे गवत वाढते ते जाळले जाई. त्यांस गड नहाणावा असे संबोधित असत. गडावर काडीकचरा, केरकसपट पडू देऊ नये अशी ताकीद असे. होणारा सारा कचरा गडाखाली न फेकता तो जाळून, ती राख परसात घालून, त्यावर होतात ते भाजीपाले करावे असाही दंडक होता. दुर्गावर जी झाडी असेल, ती राखली जाई. त्याखेरीज फणस, चिंचा, वड, पिंपळ अशी मोठमोठी झाडे, निंबे, नारिंगे, आदी लहान झाडे, पुष्पवृक्ष, वेली किंबहुना प्रयोजक अथवा अप्रयोजक जी जी झाडे ती गडावर लावली जात. सांभाळली जात. त्यामागची कारणपरंपरा स्पष्ट होती. या झाडांपासून सावली मिळते. गारवा मिळतो. फळेफुले लाभतात. नपेक्षा लाकूड तरी मिळतेच मिळते अशी त्यामागची धारणा होती. म्हणून मग या सर्व कामांसाठी दुर्गाच्या गरजेनुसार इमारत कारखाना असे. हा विभाग अतिशय विश्वासू, कबिलेदार अशा कारखानीसाच्या स्वाधीन केलेला असे. अगदी उदाहरणच द्यायचे झालं, तर अजरेजी यादवांनी  मोरोपंत पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड रचला, अन् हिरोजी इंदुलकरांनी रायगड सजवला. कुंभारजुव्याचे सुभेदार गोविंद विश्वनाथ प्रभूंनी शिवलंका सिंधुदुर्ग उभा केला. राजगडासारखा देखणा अन् अप्रतिम दुर्ग मोरोपंत पेशव्यांनी रचला असा एक्याण्णव कलमी बखरीत स्पष्ट उल्लेख आहे. या ज्ञात रचनाकारांची नावं वाचली, तरी जाणवतं की ही कामं अथवा जबाबदाऱ्या येऱ्यागबाळ्याला दिल्या जात नसाव्यात!

दुर्गव्यवस्थेचं हे काम इतकं बारकाव्याचं, इतकं जोखमीचं, इतकं सतर्कतेचं होतं. ढिला, आळशी, बेजबाबदार, कपटी, लोभी असा मनुष्य शिवछत्रपतींच्या या कठोर आणि शिस्तबद्ध राज्यव्यवस्थेत टिकणं केवळ दुरापास्त होतं. केवळ तलवारी चालवून अन् गाजवून राज्ये निर्माण होत नाहीत अन् झाली तरी टिकत नाहीत याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

युद्धे अन् त्यातील जय-पराजय, त्यातून होणारे फायदे-तोटे ही नाण्याची एक बाजू झाली, मात्र त्याच तोडीचं राज्याचं चतुरस्र व्यवस्थापन ही दुसरी बाजू म्हणायची. तसं असलं तरच ते नाणं खणखणीत वाजतं!

discover.horizon@gmail.com

Story img Loader