अमित्रियान पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राजवाडे अँड सन्स’, ‘मन्या’, ‘सत्या’ व आगामी ‘आसूड’ या चित्रपटांतून तसेच अनेक जाहिरातींमधून प्रकाशझोतात आलेला चॉकलेट बॉय अमित्रियान पाटीलच्या बोक्याचं नाव आहे ‘शेरखान’. शेरखान जसा मोगलीला पूर्ण जंगलात पळवत असतो, अगदी तसाच हा अमित्रियानला पूर्ण घरभर फिरवत असतो.

अमित्रियानजवळ शेरखानच्या आधी बेला नावाचं एक गोंडस मांजर होतं. त्याच्या मैत्रिणीने त्याला दिलं होतं. मित्रपरिवारात सगळ्यांना माहिती होतं की, अमीचं आणि बेलाचं किती छान टय़ुनिंग होतं ते. अमित्रियानचा बॉलीवूडमधला एक खूप चांगला लेखक मित्र होता- आतिफ मलिक नावाचा. त्याने त्याला हा शेरखान बोका दिला आहे. मुळात शेरखानचा खरा मालक आतिफच होता, त्याने हे पिल्लू पाळलं होतं; पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्याला इंडस्ट्री सोडावी लागली आणि त्याला काश्मीरला परत जावं लागलं. म्हणून त्याने अमित्रियानला हा बोका देऊन टाकला. त्याच्या मित्राला पक्का विश्वास होता की अमित्रियानच त्याचा चांगला सांभाळ करू शकेल आणि अमित्रियानही त्याला छान जपतोय.

शेरखानचा घरातला पहिला दिवस हा अमित्रियानच्या मनाला टोचणी देणारा ठरला. कारण ज्या दिवशी तो शेरखानला घरी घेऊन आला, त्या दिवशी अमित्रियानला एक महत्त्वाचं शूट होतं आणि ते त्याला टाळता येण्यासारखं नव्हतं. अमित्रियान त्याची सगळी सोय करून शुटिंगसाठी निघाला होता. त्याचा फूड बॉक्स त्याच्याजवळ व्यवस्थित ठेवला होता. त्यानंतर तब्बल दहा ते बारा तासांनी अमित्रियान घरी परत आल्यावर घराच्या एका कोपऱ्यात शेरखान शांत बसला आहे, असं चित्र त्याला दिसलं. अमित्रियानने जाता जाता टीव्हीवर त्याला कॅट रिलॅक्सिंग व्हिडीयो लावून दिला होता, ते तो बघत बसला होता. घरी परत आल्यावर अमित्रियानने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेरखान खूप त्रासला असल्याचं त्याला जाणवलं.  आतिफने कदाचित त्याला काही सवयी लावल्या असतील, ज्या अमित्रियानला माहीत नसल्याकारणामुळे त्याला त्याने हात लावलेलं आवडलं नव्हतं, कारण त्याच्यासाठी सगळं नवीन होतं, नवीन घर, नवीन माणूस आणि पहिल्याच दिवशी तो एकटा होता. त्यामुळे एखाद्या नाराज झालेल्या प्रिय व्यक्तीला जसे मनवावं लागतं अगदी तसंच शेरखानला अमित्रियानने मनवलं. पुढे जाऊन त्याला अमित्रियानची सवय झाली आणि आता त्यांच्यात चांगलंच मैत्र जुळलं आहे.

अमित्रियान सांगतो, ‘‘शेरखान घरात वावरताना स्वत:ला घराचा मालक असल्यासारखा वागतो. त्यामुळे घरी कोण आलं किंवा त्याला असं वाटलं की, समोरची व्यक्ती डॉमिनंट आहे, तर तो त्याच्याकडे खुन्नस देऊन बघतो. जणू काही ‘हे माझं जंगल असून, इथे माझंच राज्य चालतं, तू इथे काय करतोयस? निघून जा इथून..’ असं तो त्याच्या नजरेतून त्या व्यक्तीला सांगतो.

एकदा अमित्रियानची मत्रीण घरी आली होती. ती खूप मोठय़ा आवाजात बोलत होती. शेरखानला काय वाटलं काय माहीत, त्याने थेट तिच्यावर झेपच घेतली आणि ती जे काही खात होती ते सगळं पाडून टाकलं. कदाचित त्याला वाटलं असेल की, माझ्या घरात ही कशाला आली आहे? तो तिच्याकडे असा बघत होता की, तो तिला सांगतोय की, ‘डोन्ट मेस विथ मी’. घरात अनोळखी माणूस आला, की तो आपल्या जागेविषयी खूप पजेसिव्ह होतो. घराबाबत तो खूप प्रोटेक्टिव्ह असतो, आपल्या घराचं तो जणू काही रक्षणच करत असतो.

एके दिवशी मी घरात माझ्या फिल्मच्या शूटिंगच्या संवादांचा सराव करीत होतो. एकदा-दोनदा संवादफेक केल्यानंतर, चौथ्यांदा जेव्हा संवाद म्हणायला गेल्यावर याचं ‘म्याव’ ऐकू येऊ लागलं. मला वाटलं, इज इट फेज लाइक टॉकिंग टू मी. म्हणजे माझ्या सहकलाकारासारखा मला तो क्ल्यू देत होता, की हे संवाद असे नाही असे म्हण.. हे सांगत होता. तो त्या दिवशी त्याच्या भाषेत काय बडबडत होता माहीत नाही, पण नाटकात जसा प्रॉम्प्टर असतो अगदी तसंच काहीसं तो तेव्हा मला प्रॉम्प्ट करत होता असं मला वाटलं. एरव्ही तर त्याच्या मूडचा अंदाज घेणं तसं कठीण असतं, पण रंगात आला की घरभर याची म्याव म्याव सुरू असते.’

शेरखानच्या घरातल्या आवडत्या जागा दिवस आणि रात्रीच्या वेळेनुसार ठरलेल्या असतात. जसं दुपारी त्याला बाल्कनीत बसायला खूप आवडतं. बाल्कनीत मस्तपकी ऊन खात तो पडलेला असतो. संध्याकाळी तशी त्याची ठरलेली जागा नसते, तो पूर्ण घरात भटकत राहतो आणि पहाटे ४ वाजता त्याची जागा माझ्या बेडवर असते आणि ५ वाजता मला उठवण्यासाठी त्याची जागा असते ती अगदी माझ्या डोक्यावर!! अगदी सकाळी सकाळी तो माझ्या डोक्यावरच येऊन बसतो, त्यामुळे माझी झोपमोड होते आणि मला त्याला हटवावं लागतं.

असा हा अमित्रियानचा शेरखान खूप मूडी, पजेसिव्ह, रागीट आणि तितकाच प्रेमळ व काळजी घेणारा आहे.

शब्दांकन : मितेश जोशी

mitesh.ratish.joshi@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on amitriyan patil pet dog
Show comments