आज (२३ फेब्रुवारी) विश्वकर्मा जयंती आहे. त्याचे औचित्य साधून प्राचीन काळातील या महान वास्तुविशारदाची व त्याने निर्माण केलेल्या वास्तुशास्त्राचे अप्रतिम नमूने म्हणून प्रसिद्धी पावलेल्या अनेक नगरांची आणि तत्कालीन वास्तुशास्त्राचे नियम, मार्गदर्शन तत्त्वांची माहिती देणारा लेख
ब्रह्मदेवाच्या दक्षिण वक्षभागातून विश्वकर्मा उत्पन्न झाला असे महाभारतात म्हटले आहे. सृष्टीच्या प्रारंभी केवळ हाच अस्तित्वात होता.  प्रारंभी विश्वकर्मा हा सौरदेवतेची उपाधी म्हणून मानला जात होता, पण नंतरच्या काळात तो समस्त प्राणीसृष्टीचा जनक मानला गेला.  एक वैदिक देवता असाही उल्लेख आढळतो.  ऋग्वेदाच्या एका सुक्तात त्याला पृथ्वी, जल व सर्व प्राणी यांचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ देव म्हटले आहे.  सर्व देवांचे नामकरणही यानेच केले.  हा सर्वद्रष्टा असून, याला असंख्य मुखे, नेत्र, भुजा, पाय इत्यादी अवयव आणि पंखही होते, असे रूपवर्णन पौराणिक साहित्यात केले आहे.  याला सर्वद्रष्टा प्रजापती / विधाता प्रजापती म्हटले आहे.  पुराणे व महाभारत यात विश्वकम्र्याला देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे.  याने इंद्रासाठी इंद्रलोक निर्माण केला.  सुतलनामक पाताळलोक यानेच निर्माण केला.  श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ ही नगरे यानेच निर्माण केली. एक विख्यात शिल्पशास्त्रकार या नात्याने गरूड भवनाची निर्मितीदेखील विश्वकर्मा यानेच केली. विश्वकर्मावास्तुशास्त्र हा ग्रंथ विश्वकर्मा यांच्या नावावर आहे.  या ग्रंथात पुढील गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत.
वास्तुविद्या :-  वास्तुविद्या म्हणजे गृहरचनाशास्त्र.  वस = राहणे,  या  धातूपासून वास्तू हा शब्द बनलेला आहे.  त्याचा अर्थ निवासस्थान किंवा राहण्याचे घर असा होतो. निवासस्थान बांधण्याचे शास्त्र एवढाच मर्यादित अर्थ प्राचीन काळी वास्तुविद्या या शब्दाला होता. वास्तुविद्या ही शिल्पशास्त्राची एक शाखा होती.  शुक्रनीतिसार या ग्रंथात मंदिरे, देवप्रतिमा, उद्याने, तलाव, प्रासाद इत्यादींच्या निर्मितीचे शास्त्र अशी शिल्पशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. परंतु त्यानंतरच्या वास्तुशास्त्रविषयक ग्रंथांत त्या संपूर्ण शिल्पशास्त्रालाच वास्तुशास्त्र म्हटले आहे. तथापि सर्वसाधारणपणे वास्तुविद्या म्हणजे गृहे, मंदिरे, प्रासाद, तट, मनोरे, बुरूज, किल्ले, तलाव, विहिरी, कालवे, स्तूप, विजयस्तंभ इत्यादी बांधण्याचे शास्त्र होय.  याविषयी अनेक संस्कृत ग्रंथ उपलब्ध असून त्यात वास्तुशास्त्राचे नियम दिलेले आहेत.  भारतात सर्वत्र मंदिरे, प्रासाद, मनोरे, स्तंभ, गडकोट, तलाव चांगल्या स्थितीत किंवा भग्नावशेषरूपात आढळतात त्यांना वास्तुशिल्पे  म्हणतात.
वास्तुशास्त्र  :–   त्या काळी वास्तुरचना हे एक धार्मिक कृत्य मानले जात होते.  वास्तुशास्त्राचे  काही नियमही अस्तित्वात होते, तसेच गृहरचनेविषयी सामान्य मार्गदर्शक तत्त्वेदेखील अस्तित्वात  होती.  उदाहरणार्थ घर बांधण्यासाठी योग्य भूमी कशी असावी, कोणत्या जागी मुख्य स्तंभ उभा करावा, त्याच्या भोवती निरनिराळ्या खोल्यांची रचना कशी असावी, या विषयीचे नियम होते. घरातील दरवाजे कुठे असावेत, यालाही खूप महत्त्व होते.  घराभोवती झाडे लावताना, कोणते झाड कोणत्या दिशेला लावावे किंवा लावू नये याबाबतदेखील नियम होते.  घरे  बांधण्यासाठी भाजलेल्या विटा वापरण्याची पद्धत अस्तित्वात होती. रामायण काळातदेखील वास्तुशास्त्र बरेच विकसित झाले होते.  राजे वास्तुशास्त्रज्ञांना खूप मान देत आणि वास्तुरचनेविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत.  विश्वकर्मा हे त्या काळातले प्रख्यात शिल्पतज्ज्ञ होते.  मय हा असुरांचा तर विश्वकर्मा हा देवांचा प्रमुख वास्तुविशारद मानला गेला आहे.  त्या काळातील भव्य प्रासादांची वर्णने रामायणात पुष्कळ ठिकाणी आढळतात.  त्यांचे विविध प्रकार होते.  सात किंवा आठ मजली प्रासादही त्या काळी बांधले जात.  त्यामध्ये विटा व दगड यांचे उल्लेख अगदी थोडे आहेत.  बहुतेक वर्णने काव्यमय असल्यामुळे वास्तुरचनेसाठी कोणते पदार्थ वापरले जात ते मात्र निश्चितपणे सांगणे कठीण आहे.  वास्तुशास्त्रावर ग्रंथ लिहिणाऱ्या १८ वास्तुशास्त्रज्ञांची नावे पुढीलप्रमाणे  :–
(१) भृगू  
(२) अत्री
(३) वसिष्ठ
(४) विश्वकर्मा
(५) मय
(६) नारद
(७) नग्नजित
(८) विशालाक्ष
(९) पुरंदर
(१०) ब्रह्मा
(११) कुमार
(१२) नन्दिश
(१३) शौनक
(१४) गर्ग
(१५) वासुदेव
(१६) अनिरुद्ध
(१७) शुक्र
(१८) ब्रहस्पति.
विश्वकर्मा हे नाव परंपरागत आहे.  तो देवांचा वास्तुविशारद होता.  कालांतराने विश्वकर्मा या शब्दाला चांगला वास्तुविशारद असा अर्थ प्राप्त झाला आणि पुढे अनेक वास्तुशास्त्रज्ञांनी विश्वकर्मा ही पदवी धारण केली.
(संदर्भ- भारतीय संस्कृतिकोष )

which day will Vasant Panchami be celebrated
Vasant Panchami 2025: आज वसंत पंचमी; जाणून घ्या सरस्वती पूजनाचा शुभ मुहूर्त, तिथी आणि पौराणिक कथा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Indian astronomers discover a giant cosmic web filament Spread over eight and a half million light years
खगोलशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन; शोधला वैश्विक जाळ्याचा तंतू
Navi Mumbai , Science Center ,
नवी मुंबई : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विज्ञान केंद्राचे ९० टक्के काम पूर्णत्वास
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
history of Prayagraj
Maha Kumbh Mela 2025: २५०० वर्षांहून प्राचीन असलेल्या ‘प्रयागराज’चा पुरातत्त्वीय इतिहास नेमकं काय सांगतो?
mahacon 2025 news update
भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या महाकॉन ला सुरुवात
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ
Story img Loader