नीता नरेंद्र देवळेकर
माझे सर्व बालपण कोकणात खारेपाटण या गावात गेले, अगदी मॅट्रिकपर्यंत. त्यामुळे मला गावाची खूप ओढ व कौलारू घराचे वेड!
माझे लग्न झाल्यानंतर मला वाटलं माझ्या मिस्टरांना गाव असेल, पण त्यांना गाव नव्हतं. मला असलेल्या गावाचे वेड व कौलारू घराचे वेड मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. त्यांनी मला त्या वेळी समजून सांगितलं की, ‘मी तुला केव्हातरी मला जमेल तसं गावाकडे कौलारू घर बांधून देईन.’ त्यानंतर मध्यंतरीच्या काळात खूप वर्षे निघून गेली. आम्ही खूप फिरलो. स्वत:चं गावचं घर हवंहवंसं वाटायचं. पण आम्ही बोरीवलीत घेतलेल्या घराचे हप्ते, मुलींची उच्चशिक्षणे, इत्यादींमुळे गावाकडील घर घेणं जमलंच नाही. पण नंतर असा छान योग जुळून आला. २००७ साली ‘लोकसत्ता’मध्येच जाहिरात वाचली आणि आम्ही सहजच विकासकाला फोन केला. आमचं बोलणं झालं. व्यवहार आमच्या बजेटमध्ये जमण्यासारखा होता.
आम्ही जागा बघून आलो. वाडा तालुक्यात पोशेरी या निसर्गरम्य गावात आम्ही २००७ साली जागा घेतली. खूप छान वाटलं. जागेचं अॅग्रीमेंट व सात-बाराचा उतारा येईपर्यंत काही दिवस गेले. हातात जागा मिळाली. सर्व कागदपत्रे मिळाली, मग आम्ही एक छोटंसं घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि कर्णिक डेव्हलपर्स यांच्या बरोबर विचारविनिमय करून कौलारू घर बांधण्यास सांगितलं. त्यांनी आम्हाला छान घर बांधून दिलं. २००९ मध्ये आमचं घर तयार झालं. घरासमोर एक छोटंसं तुळशीवृंदावन बांधून घेतलं. मला विहिरीची खूप आवड होती, त्यामुळे पाणी साठविण्यासाठी विहिरीच्या आकाराची सिमेंटची टाकी बांधून घेतली. एकंदरीत विहिरीचीही हौस पूर्ण झाली.
बोरीवली ते पोशेरी दोन तासांचे अंतर. आम्ही बहुतेक शनिवारी दुपारी पोशेरीला जाण्यासाठी निघायचो व रविवारी रात्री बोरीवलीत यायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी डय़ुटीवर हजर. जाताना घरात लागणारी भांडी व इतर काही वस्तू घेऊन जायचो. खूप आनंद व्हायचा, आपलं गावात घर झाले व आपल्याला गाव मिळाल्याचा. घराच्या बाजूने झाडे लावली- आंबा, काजू, पेरू, लिंबू, नारळ. घराच्या दारासमोर प्राजक्त लावला. घराच्या मागील बाजूस शेवग्याचे झाड व इतर फुलझाडे लावली. पाच ते सहा वर्षांत झाडांना फळे येऊ लागली. आपल्या घराच्या झाडांना फळे धरल्याचा एक वेगळाच आनंद असतो. प्राजक्ताचे झाडही छान फुलू लागले. त्याचा सडा दारात पडतो. शेवगा तर एवढा धरायचा- खूप शेंगा यायच्या, मग मी आमच्या बोरीवलीच्या घरी सर्व बिल्डिंगमध्ये त्या शेंगा द्यायचे. सर्वाना खूप छान वाटायचं. मीपण आनंदून जायचे. पण या वर्षीच्या पावसात ते झाड उन्मळून पडलं. खूप वाईट वाटलं.
आम्ही आमचं घर बांधून झाल्यावर सर्व नातेवाईक, मी नोकरी करीत असलेल्या शाळेतील माझ्या मैत्रिणी, शेजारी, मिस्टरांचे मित्र या सर्वाना हौसेने घेऊन गेलो. छोटसं दोन खोल्यांचं घर, पण गॅलरी मात्र मोठी बांधून घेतली. त्यामध्ये दगडांची चूल केली व त्या चुलीवर सर्वाना आवडणारे पदार्थ करून घातले. सगळे मजा करून आपापल्या घरी परतायचे.
गाव खरंच निसर्गरम्य. दोन्ही बाजूंनी डोंगर, घरासमोर सूर्योदय, अगदी डोंगराला आभाळ टेकल्यासारखं वाटतं. सकाळी खूपच छान वाटतं. अजिबात प्रदूषण नाही, मोकळे वातावरण, उन्हाळ्यात खूप ऊन, पावसाळ्यात खूप पाऊस व हिवाळ्यात खूप थंडी. तिन्ही ऋतू जबरदस्त. पावसाळ्यात व थंडीत वातावरण खूप आल्हाददायक असते. पावसाळ्यात आमच्या घराच्या मागील बाजूस खूप पाणी साचते व त्यामध्ये मोठाले बेडूक रात्रभर ओरडत असतात, जणू काही त्यांची स्पर्धाच सुरू असते. पावसाळ्यात घराच्या पागोळ्यांचा आवाज अतिशय विलोभनीय वाटतो. त्या पागोळ्यांचे तुषार अंगावर घेण्याची मजाच वेगळी असते. तिथूनच जवळ जव्हारचा राजवाडा पाहण्यासारखा आहे. धबधबा आहे. पावसाळ्यात तिथला निसर्ग खूप छान वाटतो.
आता मात्र मी व माझे मिस्टर आम्ही दोघेच पोशेरीला जातो. गॅलरीत बसून झाडांवर येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणे आणि झाडांशी बोलणे, बागेत फिरणे, रोज सकाळी छान वातावरणात फेरफटका मारून येणे हा आनंद अवर्णनीय असतो. तिथे गेल्यावर आमचा हाच दिनक्रम असतो. चार-पाच दिवस कधीच निघून जातात.
या माझ्या घराने मला अतिशय वेड लावलं. माझ्या मुली, जावई व नातू यांना पोशेरीचं घर खूप आवडते. आणि हो, माझ्या मिस्टरांनी माझे घराचे स्वप्न पूर्ण केले म्हणून या माझ्या घराला मी ‘स्वप्नपूर्ती’ हे नाव दिलं.
माझं हे घर पोशेरीमध्ये आमची दर महिन्याला वाट पाहत आमच्या स्वागताला उभं असतं.