अरुण मळेकर
पारंपरिक वास्तुस्थापत्यशैलीला बाजूला सारून आपल्या वैशिष्टय़पूर्ण वास्तुकलाकृतीच्या आधारे नावलौकिक प्राप्त झालेल्या दीदी कॉन्ट्रॅक्टर या अमेरिकन वास्तुरचनाकार नव्वदीतही कार्यरत आहेत. परिसरातील उपलब्ध चुना, लाकूड, दगड, माती यांचा उपयोग करून हिमाचल प्रदेशात त्यांनी अनेक इमारती बांधल्या आहेत. ही त्यांची कामगिरी वास्तुरचनाकार लॉरी बेकरशी साधर्म्य साधणारी आहे. महात्मा गांधींनाही हेच अभिप्रेत होतं. ८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याविषयी..
गेल्या शतकात आपल्या अंगभूत, अजोड कलाकृतींचं दैवी देणं घेऊन भारतभूमीवर अनेक जण आले आणि या देशाचे ऋण मानत ते या देशाचे सगेसोयरेच होऊन गेले. या देशातील सांस्कृतिक, सामाजिक आणि नैसर्गिक वैचित्र्याचं त्यांच्यावर गारुड पडलंच होतं, त्यात गौतमबुद्ध आणि युगपुरुष महात्मा गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर होताच. या पलटणीत लॉरी बेकर, टॉम अल्टर, मीरा बेन आणि मराठी भाषेत शिक्षणाचा आग्रह धरणाऱ्या मॅक्सिन मावशी यांच्या बरोबरीने दीदी कॉन्ट्रॅक्टर यांचे नाव घ्यावे लागेल.
पारंपरिक वास्तुस्थापत्य शैलीला बाजूला सारून आपल्या स्वत:च्या वैशिष्टय़पूर्ण वास्तुकलेच्या आधारे नावलौकिक मिळवलेल्या दीदी कॉन्ट्रॅक्टर या अमेरिकन वास्तुरचनाकार आता नव्वदीतही कार्यरत असून, हिमाचल प्रदेशातील धरमशालेजवळील ‘रक्कार’ गावाच्याच त्या होऊन गेल्या. परिक्षेत्रातील सहज उपलब्ध होणाऱ्या नैसर्गिक सामग्रीतून केवळ चुना, लाकूड, दगड, माती या घटकांचा उपयोग करून त्याला आपल्या कौशल्याची जोड देत हिमाचल प्रदेशात त्यांनी अनेक इमारती उभारल्या. ही त्यांची कामगिरी लॉरी बेकर यांच्याशी मिळतीजुळती अशी आहे.
‘‘साधेपणा आणि स्थानिक नैसर्गिक सामग्रीचा वापर या महात्मा गांधींच्या शिकवणुकीचा माझ्यावर खोल परिणाम झाला,’’ असे दीदी सांगतात. वास्तुरचनाकार होण्यासाठी कोणत्याही वास्तुकला, अभियांत्रिकी संस्थेची पदवी नसतानाही दीदी ‘वुमन आर्किटेक्ट’ म्हणून सर्वत्र ओळखल्या जातात. त्यांच्या अजोड कामगिरीसाठी २०१७ चा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.
दीदी कॉन्ट्रॅक्ट यांचे मूळ नाव डेलिया किंगझिंगर असे आहे. वडील जर्मन तर आई अमेरिकन. हे दोघंही चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहेच. कोलोराडो विद्यापीठात कला शाखेचे शिक्षण घेत असतानाच समकालीन रामजी नारायण या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या भारतीयाशी त्यांचा परिचय झाला. नंतर मैत्री, प्रेम याची फलश्रुती विवाहात झाली. विवाहानंतर भारतात आगमन हा साराच उमेदीचा प्रवास सत्तर वर्षांपूर्वीचा. बांधकाम करणाऱ्या रामजी नारायण यांना सर्वत्र कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळख लाभली. तेव्हा पर्यायाने मूळ नाव डालिया किंगझिंगर हे नाव मागे पडून त्या दीदी कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत असे आपल्या कल्पनेतील घर बांधून त्यांनी मुंबईतील जुहू येथे वास्तव्यास प्रारंभ केला. या उमेदीच्या आणि उमेदवारीच्या काळातच चित्रपट नाटय़महर्षी पृथ्वीराज कपूर यांनी दीदींची नावीन्यपूर्ण वास्तू बघितल्यावर आपल्या नियोजित ‘पृथ्वी’ थिएटरची इमारत बांधण्याचं काम दीदींकडे सोपवलं. त्यांच्या कारकीर्दीचा हा श्रीगणेशा होता. या नंतरच्या आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत दीदींनी मागे वळून बघितलेच नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे, पारंपरिक वास्तू उभारणीत त्यांना स्वारस्यच नव्हते. तर वास्तू उभारणीतील साधेपणातही चित्ताकर्षकपणा, नेत्रसुखद रंगसंगती, हवा-प्रकाशाचा यथा योग्य मेळ साधण्याचे त्यांचे कसब या घटकांवर त्यांचा भर होता.
याच प्रारंभीच्या काळात त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अशा वास्तुदर्शनासाठी जिज्ञासू, अभ्यासू – स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी त्यांच्या घरी यायला लागले. जोडीला पृथ्वीराज कपूरसारख्या दर्दी माणसाचं समाधानाच प्रशस्तीपत्रक त्यांना लाभलं. या कारणांनी अनेक गृहनिर्माण उपक्रमाची कामं त्यांच्याकडे आपसूक चालून आली. भारतीय संस्कृती, येथील समाजमनाची मानसिकता, परिसरातील उपलब्ध नैसर्गिक स्रोत याचा सखोल अभ्यास करून यापुढे त्यांनी ज्या लक्षवेधी इमारती उभारल्या, त्यामध्ये जयपूरच्या लेक पॅलेसचे सुसज्ज हॉटेलमध्ये रुपांतर आणि त्याची शाही वातावरणाशी सुसंगत अंतर्गत सजावट, तसेच चित्रपटांचे भव्य सेट या ठळक कामगिरींचा बोलबाला देशभर झाला.
निसर्गाच्या उपजत ओढीने ७० च्या दशकात हिमाचल प्रदेशातील भ्रमंतीत तेथील वातावरणावर त्या इतक्या प्रभावित झाल्या की, धरमशालेनजीकच्या सिद्ध बारीचा परिसर हीच आपली कर्मभूमी दीदींनी निश्चित करून टाकली. मात्र दिलखेच आकर्षक इमारतींचा आराखडा तयार करणाऱ्या दीदींच्या संसाराच्या इमारतीला याच काळात तडा गेला. स्वत:च्या कल्पनेनुसार आपल्या अभिरुचीच्या वास्तुरचना उभारणीसाठी स्वैरपणे उत्तुंग भरारी घेणाऱ्या दीदींचे पतीराजांबरोबर मतभेद व्हायला लागले. अखेर त्याची परिणती परस्परांपासून विभक्त होण्यात झाली. आपल्या कर्तृत्वावर विश्वास असलेल्या दीदींनी आपल्या दोन मुलांसह तडक धरमशालेचा रस्ता धरला, तेव्हा त्यांनी चाळिशी पार केली होती. या एकाकी काळात त्यांची वास्तुरचनाकार म्हणून शोधयात्रा सुरूच होती.
योगायोगाने या संघर्षमय काळात तेथील एका डॉक्टरांच्या रुग्णालयाचे काम त्यांच्याकडे चालून आलं. वास्तुरचना कामाच्या ध्यासपर्वात पुढे दीदींकडे आपसुक कामं चालून आली. त्याला कारणही तसंच होतं. निसर्गसमृद्ध हिमाचल प्रदेशाच्या भौगोलिक वातावरणाचा सखोल अभ्यास करून परिक्षेत्रातील उपलब्ध निसर्ग दौलतीचा मुबलक वापर करून सरस घरांची उभारणी त्यांनी केली. या वैशिष्टय़ांमुळे अनेक आव्हानात्मक कामं त्यांच्याकडे येतच राहिली.
वास्तुरचनाकार म्हणून गतीमान कारकीर्दीला कलाटणी देणाऱ्या या काळातच हिमाचल प्रदेशाची विधानसभा इमारत ‘निष्ठा’ या केन्द्राचे (रुरल हेल्थ एज्युकेशन, अॅण्ड इन एन्व्हायर्नमेंट सेंटर) बांधकाम, संभावना इन्स्टिटय़ूट यांचे काम म्हणजे दीदींच्या कर्तृत्वाचा चढत्या आलेखाचा लँडमार्क आहे.
झपाटल्यासारखे अनेक गृहनिर्माण उपक्रमांचे काम करताना भारतातील नावलौकिकासह परकीय वास्तुरचना अस्थापनांनीही त्यांची दखल घेतली आहे. पर्यावरणपूरक वास्तू निर्मितीत दीदींचे योगदान सर्वत्र लोकांपर्यंत पोचण्यासाठी एका स्वीस चित्रपट निर्मात्याने दीदींच्या कामाचा आढावा घेणारा एक लघुपटही बनवला आहे. तसेच ‘अर्थ क्रुसेडर’ या छोटेखानी माहितीपटाची भारत सरकारने निर्मिती करून त्यांची दखल घेतली आहे.
दीदींच्या व्रतस्थ कार्यकुशलतेचा संपूर्ण प्रवास ज्यांना जाणून घ्यायचा असेल त्यांनी जोगिंदर सिंग लिखित ‘अॅन अॅडोब रिव्हायव्हल- दीदी कॉन्ट्रॅक्टर्स आर्किटेक्चर’ हा ग्रंथ मुळातूनच वाचायला हवा.
संस्कारक्षम वयात पाश्चिमात्य संस्कृती – जीवनशैलीचे संस्कार होऊन दीदी कॉन्ट्रॅक्टर भारतभूमीशी एकरूप झाल्या, हे त्यांचे वेगळेपण आपलं कुतूहल जागवणारं आहे. आता नव्वदीकडे झेपावणाऱ्या स्वयंभू दीदी कॉन्ट्रॅक्टर सभोवतालच्या देवदुर्लभ निसर्गासारख्याच शांत- निवांत आणि कृताथ जीवन जगताहेत..
निसर्गसमृद्ध हिमाचल प्रदेशाच्या भौगोलिक वातावरणाचा सखोल अभ्यास करून परिक्षेत्रातील उपलब्ध निसर्ग दौलतीचा मुबलक वापर करून सरस घरांची उभारणी त्यांनी केली. या वैशिष्टय़ामुळे अनेक आव्हानात्मक कामं त्यांच्याकडे येतच राहिली.
arun.malekar10@gmail.com