सागर कारखानीस

karkhanissagar@yahoo.in

Oreo pancake recipe easy cake recipe at home
Oreo Pancake Recipe: काहीतरी गोड खायचंय? मग लगेच बनवा ‘ओरिओ पॅनकेक’, याची रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
paneer makana tikki recipe
पनीरची नवी रेसिपी ट्राय करायचीय? अवघ्या काही मिनिटांत करा ‘पनीर मखाना टिक्की’
Winter special for lunch or dinner methi pulao recipe in marathi methi rise healthy food recipes in winter
पौष्टिकतेला चवीची जोड! हिवाळ्यात घरच्या घरी १० मिनिटांत बनवा मेथी पुलाव
How To Make Crispy Roti Chinese Bhel In Marathi
Crispy Roti Chinese Bhel : कुरकुरीत पोळीची चायनीज भेळ कधी खाल्ली आहे का? मग ट्राय करा ‘ही’ सोपी रेसिपी
loksatta satire article sujay vikhe patil
उलटा चष्म: पातेले कलंडलेच..
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्य़ावर

आधी हाताले चटके, तेव्हां मिळते भाकर!

बहिणाबाईंच्या या कवितेच्या ओळींमधून संसारातील चुलीचे महत्त्व अधोरेखित होते. कारण याच चुलीच्या ठायी असणाऱ्या अग्नीच्या मदतीने आपण विविध अन्नपदार्थाना अंतिम रूप देत असतो. त्यामुळे स्वयंपाकघरातील इतर भांडयाकुंडय़ांचा वेध घेण्यापूर्वी सर्वप्रथम अन्नदायिनी ‘चुली’ला वंदन करू या..

अग्नीच्या शोधानंतर मानवाने सर्वप्रथम स्वयंपाक केला तो ‘तिथरी’ म्हणजेच तीन दगड मांडूनच. पुढे या तिथरीचे रूपांतर मातीच्या चुलीत झाले. नाशिक, दायमाबाद, जोर्वे, ब्रह्मपुरी येथील उत्खननात प्राचीन काळातील मातीच्या व विटांच्या अर्धवर्तुळाकृती चुली सापडल्या आहेत. अजंठा लेण्यांमध्येही इ .स. सातव्या शतकातील स्वयंपाकघराचे व चुलीचे चित्र पाहावयास मिळते. मातीच्या चुलीचे सडा चूल, गलता चूल व कंगणी चूल असे तीन प्रकार आहेत. मातीची चूल तयार करणे तसे कौशल्याचे काम. कारण चुलीचे तोंड मोठे झाल्यास जळण भराभर जळते आणि चुलीच्या तोंडाचा आकार लहान झाल्यास जळण कोंबले जाऊन खूप धूर होतो. त्यामुळे चूल बनवताना धूर कमी होऊन जळण अधिक चांगल्या प्रकारे जळेल यासंबंधी खबरदारी घ्यावी लागते. कोकणात लाल माती तर खानदेशात पिवळ्या मातीचा वापर करून चुली बनवल्या जातात. सुरुवातीला हातानेच चुली बनवत. आता चुलींचे साचेही दिसून येतात. सडय़ा चुलीला लागून असणाऱ्या भागाला ‘वैल’ म्हणतात. मुख्य चुलीतील लाकडांची धग आतील बोगद्याद्वारे वैलापर्यंत पोहोचत असल्याने मंद आचेवर एखादा पदार्थ गरम करण्यासाठी या वैलाचा उपयोग होतो. चुलीवर भांडी व्यवस्थित बसून ज्वालांची आच नीट लागावी म्हणून मुख्य चुलीवर तीन आणि वैलावर चार मातीचे उंचवटे म्हणजेच ‘टोने’ किंवा ‘थानं’ बनवले जातात.

नवी चूल एखाद्या शुभप्रसंगी किंवा सणांचे औचित्य साधून घरी आणली जाते. पूर्वी ग्रामव्यवस्थेमधील बलुतेदारी पद्धतीत चुली या धान्याच्या बदल्यात कुंभाराकडून घेतल्या जात असत. मात्र आता हा व्यवहार रोख पशाच्या स्वरूपात होतो. चूल ही अग्नीचे स्थान असल्याने तिची स्थापना आग्नेय दिशेकडे व स्वयंपाक पूर्वेकडे तोंड करून होईल अशा पद्धतीने करावी असा संकेत आहे. चुलीमध्ये जळण म्हणून लाकूड, शेणी (गोवऱ्या) यांचा वापर केला जातो. आपल्याकडे काडेपेटय़ांचा वापर सुरू होण्यापूर्वी चूल विझू नये म्हणून विस्तवात गोवरी टाकून ठेवत आणि चूल विझल्यास शेजाऱ्यांकडून खापरातून विस्तव आणत. पावसाळ्यात कुणाच्या घरून विस्तव आणताना त्यावर पावसाचे थेंब पडू नयेत म्हणून काळजी घेतली जाई. कारण पावसाच्या थेंबाला चरका बसल्यास पाऊस ‘सराप’ (शाप) देतो अशी भावना होती. त्यातूनच पुढे एखाद्याच्या कंजूसपणाबद्दल ‘चुलीतला इस्तू देत नाही’ अशी म्हण रूढ झाली. चुलीमधील जाळ कमी करण्यासाठी विस्तव बाहेर ओढून काढण्यासाठी जी जागा केली जाते त्यास ‘भानस’ किंवा ‘भानसी’ म्हटले जाते. तर चुलीस हवा लागू नये म्हणून चुलीच्या मागे उभ्या केलेल्या लहान भिंतीस ‘भानवसा’ म्हणतात. या भानवशात ‘आगपेटी’, ‘सांडशी’, ‘फुकणी’, ‘चिमिटा’ ठेवण्यासाठी खास ‘देवळी’ बनवली जाई. यापकी फुंकणी सुरुवातीला कळकाच्या बांबूपासून बनवत. मात्र, पुढे लोखंडी पाइप स्वस्त झाल्याने एक ते अर्धा इंच परिघाच्या लोखंडी फुंकण्या घराघरात दिसू लागल्या. या फुंकणीच्या साहाय्याने विस्तवाची धग तर वाढवली जाईच; मात्र स्वयंपाकात लुडबुड करणाऱ्या मांजरांना, लहान मुलांना फटकेही मिळत. सांडशीचा उपयोग गरम भांडे उतरण्यासाठी केला जाई. रात्रीच्या वेळी स्वयंपाक करताना दिसावं म्हणून चुलीशेजारी दिवा ठेवण्यासाठी ‘ठाणवई’ असे. आठवडय़ाने वा पंधरवडय़ाने ‘चूलचौका’ (विस्तव व्यवस्थित बाजूला ठेवून राख काढणे) केला जाई. राख काढण्यासाठी ‘उलथने’ वापरले जाई. राखेचा उपयोग दात घासण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, भिंतीच्या सारवणात करत. तसेच चुलीवरील भांडी काळी होऊ नयेत म्हणून भांडय़ांना राखेचे ‘माजवण’ करत.

चुलीला शेणाने सारवून, हळद-कुंकू वाहूनच स्वयंपाकाला सुरुवात केली जाई. स्वयंपाक झाल्यावर कृतज्ञता म्हणून चुलीला घास भरवण्याची पद्धत होती. चुलीला पाय लावणे अशुभ मानले जाई. चुलीवर अन्न मंदगतीने शिजत असल्याने चुलीवरील स्वयंपाक रुचकर व चविष्ट लागतो. चुलीवर पदार्थ शिजत असतानाच चुलीच्या विस्तवातील निखारे बाहेर ओढून कधी मसाल्यासाठी कांदे, भरतासाठी वांगं भाजले जाई, तर कधी तोंडी लावण्यासाठी पापड, सुकी मासळी (बोंबील, वाकटय़ा, बांगडे) भाजले जाई तर कधी आंब्याची कोय, फणसाच्या बिया, चिचोके भाजून त्यांचा आस्वाद घेतला जाई. एवढेच नव्हे तर जर कोणाला जखम झाली तर लगेचच चुलीवर असलेल्या तव्याचा काळा बुरसा जखमेवर लेप म्हणून लावला जाई. तसेच कोणी आजारी पडल्यास त्याची दृष्ट काढून ओवाळलेली मीठ-मिरची चुलीत टाकली जाई.

कालानुरूप या चुलीच्या आकारात व रचनेत बदल होत गेला. त्यातून कोळसा व भुशाच्या जळणावर चालणाऱ्या तीन पायांच्या पत्र्याच्या, सिमेंटच्या शेगडीवजा चुली वापरात आल्या. त्यांना सोयीस्कर जागी उचलून नेता यावे म्हणून बादलीसारखी कडी असे. शेगडीला हवा लागावी म्हणून खाली उघडबंद करता येईल असे छोटेसे दार असे. पुढे भरभर आवाज करणारा, पिन-पंप मारावा लागणारा ‘प्रेशर स्टोव्ह’ आणि शांतपणे जळणारा ‘वातीचा स्टोव्ह’ असे दोन प्रकारचे स्टोव्ह आले. यापकी वातीचे स्टोव्ह परवडणारे होते; मात्र त्याच्या वाती काही कालावधीनंतर बदलाव्या लागत. याच वेळी चुलीचं एक आधुनिक रूप एकेरी-दुहेरी, तीन-चार बर्नर असलेल्या गॅस शेगडय़ांच्या स्वरूपात शहरी स्वयंपाकघरात दाखल झाले. पुढे त्याचे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याने मातीच्या चुलींचा वापर कमी होत गेला. अलीकडच्या काळात आलेल्या मायक्रोवेव्ह, इलेक्ट्रॉनिक शेगडय़ांमुळे इंडक्शन हॉट प्लेट आणि सूर्यचुलींमुळे निर्धूर, झटपट स्वयंपाक करणे शक्य झाले आहे. मात्र आजही अनेक मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये काही पारंपरिक पदार्थ बनवण्यासाठी ‘चूल’च वापरली जाते. एवढेच नव्हे तर तेथे काही पदार्थ हे लहान लहान, खेळण्यातील भासतील अशा चुलींवर ठेवून सव्‍‌र्ह केले जातात. ग्रामीण भागात घरांमधून शास्त्र म्हणून गॅसच्या बरोबरीने चूल ठेवण्याची पद्धत दिसून येते. अजूनही गावाकडे परसात पाणी गरम करण्यासाठी किंवा बटाटे, सुके मासे वा तत्सम पदार्थ भाजून खाण्यासाठी चूलच वापरली जाते. अशी ही ‘चूल’आपली भूक शमवण्यासाठी स्वयंपाकघरात सतत राबणारी दुसरी माय आहे.