रजनी अशोक देवधर

deodharrajani@gmail.com

‘स्वत: आनंदी राहण्याचा चांगला मार्ग म्हणजे दुसऱ्याला आनंदी ठेवणे.’

– मार्क ट्वेन

सॅम्युएल क्लेमेन्स हा विनोदाचे मर्म जाणणारा, मानवी आयुष्यातील विनोदाचे स्थान ओळखणारा, मार्क ट्वेन या टोपण नावाने प्रसिद्ध असणारा लेखक. एकोणिसाव्या शतकातील अमेरिकेतील विनोदी साहित्यिक- ज्यांचे साहित्य इतक्या वर्षांनंतर जगभर आवडीने वाचले जाते अशा मोजक्या लेखकांपकी एक. उपहासात्मक, मिश्कील शैलीतील त्यांच्या कथा, निबंध तसेच त्यांचे बालसाहित्यही प्रसिद्ध आहे. समाजवादी विचारसरणीचे मार्क ट्वेन (सॅम्युएल क्लेमेन्स) वर्णद्वेष आणि गुलामगिरी प्रथा यावर निर्भीड व्याख्याने देत.

१८३० साली अमेरिकेतील गरीब कुटुंबातल्या जॉन व जेन क्लेमेन्स या दाम्पत्याचा हा मुलगा. लहानपणी दहा वर्षांपर्यंत अशक्त, सतत आजारी पडणारा. त्या काळात अमेरिकेत ताप, गोवर, न्यूमोनिया, कॉलरा अशा साथींमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक होते. सॅम्युएलची भावंडेही त्यात मृत्यू पावली होती. वडील कडक शिस्तीचे, गंभीर प्रवृत्तीचे तर आई जेन मिश्कील स्वभावाची विनोदाची जाण असलेली. मार्क (सॅम्युएल) यांना विनोदाचा वारसा आईकडून आला होता. मार्क अकरा वर्षांचा असताना वडील न्यूमोनियाने वारले आणि या कुटुंबाचा परिस्थितीशी संघर्ष अजून वाढला. जहाजावरती पायलट म्हणून काम करणारा, भावाबरोबर छपाईच्या कामात मुद्रण जुळणीचे काम करताना मार्क स्वत: लेखन करू लागला. टंकलेखन केलेली कादंबरी प्रकाशकांकडे देणारा मार्क हा त्या वेळचा पहिला लेखक होय. तंत्रज्ञानाची आवड, त्याचे महत्त्व समजलेले मार्क ट्वेन वैज्ञानिक निकोला टेस्ला यांचे मित्र. अमेरिकेतील तत्कालीन गुलामगिरी आणि वर्णद्वेषाविरुद्ध ट्वेन यांची निर्भीड मतं, लेखनाची विनोदी व उपहासात्मक शैली यामुळे ते लोकप्रिय होऊन प्रथितयश, प्रतिष्ठित साहित्यिकांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. संपन्न कुटुंबातील ऑलिव्हियाशी विवाह झाल्यावर त्यांनी हार्टफोर्ड या तत्कालीन उच्चभ्रू लोकवस्तीच्या शहरात मोठं घर बांधलं. १८७४ साली ते कुटुंबीयांसह तेथे राहावयास गेले. त्यांचं भव्य प्रासादासारखे घर त्यांच्या कीर्तीला साजेसे.  अमेरिकेत कनेक्टिकट राज्यात हार्टफोर्ड येथील हे घर निओ गॉथिक आणि व्हिक्टोरियन स्टीक पद्धतीचे. ११५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचे, गडद विटकरी रंगाचे तीन मजली उंच. २५ खोल्यांचे हे आलिशान घर संपन्न क्लेमेन्स दाम्पत्याची कलेची अभिरुची दर्शविणारे, देश-विदेशातून खास मागविलेल्या वस्तू आणि साहित्य यांचा कलात्मक वापर करून प्रासादासारखे सजविलेले. घर पत्नी ऑलिव्हियाच्या पसंतीनुसार तयार करण्यात आले. आगळ्यावेगळ्या रचना करण्यात प्रसिद्ध असलेला युनियन विद्यापीठासाठी १६ बाजू असलेली आगळी इमारत बनविणारा वास्तुशिल्पी एडमंड पॉटर व आल्फ्रेड थॉर्प यांच्या कौशल्यातून साकारले गेले. आणि उत्कृष्ट घर म्हणजे मार्क ट्वेन यांचं घर असे त्यावर शिक्कामोर्तब कनेक्टिकटमध्ये तेव्हा झाले. वास्तुशिल्पी एडमंड पॉटरने घराच्या बांधणीत भिंतीच्या बाह्य बाजूवर वेगवेगळ्या आकारांच्या व लाल रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या विटांचा वापर करून भूमितीय आकारांचे प्रमाणबद्ध नमुने करून सजावट केली आहे. छतालगतचे नक्षीदार कंगोरे, लाकडी फ्रेमचे कोरीव काम सजावटीत भर टाकणारे असून घराचे सौंदर्य वाढविणारे आहेत. घर बांधताना अंतर्गत सजावट लिऑन मर्कोट यांची होती. काही र्वष तिथे वास्तव्य केल्यावर क्लेमन्स कुटुंबीयांनी १८८१ मध्ये लुईझ टिफ्फनी यांजकडून अंतर्गत सजावट करून घेतली. लुईझ टिफ्फनी यांनी उत्तम कलाकुसरीच्या नक्षीकामाचे स्टेन्सिल, वॉलपेपरचा दिमाखदार वापर करून मूळचे सुंदर असलेले घर अजूनच देखणे केले. घराचा प्रशस्त दिवाणखाना मोरोक्कन शैलीतील सजावटीचा. जिना, छत व भिंती विटकरी रंगाच्या वॉलपेपर आणि अक्रोडाच्या लाकडावरचे कोरीव नक्षीकाम स्टेन्सिलने सजविलेल्या असल्याने आत येताच घराचे आगळे सौंदर्य दाखवितात. दिवाणखान्यातून आत गेल्यावर स्वयंपाकघर व त्याला जोडून उत्तम क्रोकरी, उंची फíनचर, डायनिंग टेबलने सुसज्ज असा डायिनग हॉल आहे. पाहुणे, लेखक, मित्रमंडळी यांच्यासोबत भोजनाचा आनंद घेणाऱ्या क्लेमेन्स कुटुंबीयांनी त्यामध्ये अजून एक पियानो ठेवला होता. या भव्य घरातील वरच्या दोन मजल्यांवर असलेल्या खोल्यांमध्ये मार्क यांचा शयनकक्ष (मास्टर बेडरूम ), मार्क यांनी जिथे वाचन, लेखन केले ती अभ्यासिका, मित्रांसोबत गप्पागोष्टी, धूम्रपान, खेळ यांसाठी बिलियर्ड रूम, पाहुण्यांसाठी सुसज्ज महोगनी कक्ष, मुलींसाठी खोल्या आहेत. व्हिक्टोरियन काळातील संपन्न कुटुंबांच्या घराची ओळख असलेली कॉन्झव्‍‌र्हेटरी- मार्क यांच्या मुली ‘जंगल’ असे संबोधित- ती लायब्ररीच्या बाजूला ऑलिव्हियाने आवर्जून केली होती. काचेची घुमटाकार तावदान असलेली कॉन्झव्‍‌र्हेटरी कारंजं, हिरवेगार गवत आणि नानाविध वेली, झाडांमुळे मनाला प्रसन्न ताजतवानं करणारी.

या घरात मार्क यांनी त्यांच्या The Adventures of Tom Sawyer, Adventures of Huckleberry Finn, Life on the Mississippi अशा अनेक गाजलेल्या पुस्तकांचे लेखन केले आहे. १८७४ ते १८९१ पर्यंत क्लेमेन्स कुटुंबीयांचे वास्तव्य लाभलेले, कुटुंबीयांच्या समृद्धीच्या काळाचा साक्षीदार असलेले निओ गॉथिक आणि व्हिक्टोरियन स्टीक शैलीचा वापर करून बांधलेले हे घर संपन्न कुटुंबांची कलात्मकतेने सजविलेली तत्कालीन घरं कशी होती ते दर्शवीत डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. अमेरिकेतील ऐतिहासिक वास्तूंमध्ये ही वास्तू समाविष्ट असून तिथे म्युझियम व मार्क यांच्या पुस्तकांचे दालन आहे.

Story img Loader