मनोज अणावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्यम: साहसं ध्रय बुद्धि: शक्ति: पराक्रम:।

षडेते यत्र वर्तन्ते तत्र दैवं सहायकृत्।

विदुर नीतीत सांगितलेल्या या सुभाषिताचा अर्थ स्पष्ट आहे. उद्योग, साहस, धर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण ज्याच्या अंगी असतात, त्याला दैवाचं सहाय्य लाभतं. असं सहाय्य लाभलं की ऊर्जतिावस्था प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. अर्थातच, अशा माणसाच्या घरी लक्ष्मी ही केवळ धनाच्याच रूपाने नाही, तर सुख, शांती आणि समृद्धी बरोबरच आनंदाच्या रूपानेही वास करते. गीतकार जगदीश खेबुडकरांच्या एका चित्रपटगीतातूनही त्यांनी हाच विचार मांडला आहे- उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. जिथे कष्ट, मेहनत आणि हिम्मत यांचा त्रिवेणी संगम होतो, अशा उद्योगधंद्यांमधून केवळ त्या उद्योजकाचीच भरभराट होते असं नाही, तर असे उद्योग ज्या राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये वाढीला लागतात, त्यांच्याही विकासात अशा लहानमोठय़ा उद्योगधंद्यांचा सिंहाचा वाटा असतो. विविध क्षेत्रांमध्ये चालणारे हे उद्योग ज्या ठिकाणी चालतात, त्या कार्यालयांमध्ये किंवा उद्योगाशी संबंधित इतर वास्तूंमध्ये काही कामासाठी गेलेलं असताना तिथे प्रवेश केल्यावर आपल्या मनावर त्याचे तरंग उठतात. काही उंचचउंच टॉवर्समध्ये असलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मनावर उगाचच त्या वास्तूच्या दिमाखाचं दडपण येतं. कधीकधी काही माणसांच्या मनात तर अशा ठिकाणी कामासाठी गेल्यावर न्यूनगंडही उत्पन्न होतो. काही ऑफिसेस मात्र येणाऱ्या माणसांना आपलंसं करून सोडतात. काही वास्तूंच्या माणसं प्रेमात पडतात. तर काही काही ठोकळेबाज इमारतींमधल्या कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांना कावल्यासारखं वाटतं आणि त्यांच्या त्या तसल्या वागण्यामुळे मग त्यांच्याकडे कामासाठी जाणाऱ्या अशिलांनाही तिथे जाणं नकोसं वाटतं. काही काळासाठी एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यावर जर मनावर इतके सारे परिणाम होत असतील, तर साहजिकच तिथे काम करणाऱ्या माणसांच्या मन:स्थितीवर आणि त्यामुळेच त्यांच्या कार्यक्षमतेवरही जर या वातावरणनिर्मिती करणाऱ्या घटकांचा परिणाम होत असेल, तर एकाप्रकारे या उद्योगांच्या वाढीवर हे घटक परिणाम करू शकतात.

कारण आजच्या काळाचा विचार करायचा झाला तर दिवसाचे आठ ते दहा तास किंवा कधीकधी त्याहीपेक्षा जास्त काळ आपण कामाच्या ठिकाणी घालवत असतो. म्हणूनच या घटकांचा सांगोपांग विचार करायचा प्रयत्न या सदरातून केला जाणार आहे. आपण जिथे नोकरी करतो त्या ठिकाणी तिथली अंतर्गत सजावट कशी असावी हे ठरवायचा अधिकार बऱ्याचदा आपल्याला नसतो. पण आपलं कामाचं टेबल किंवा क्युबिकल नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न आपण करत असतो. अनेक लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून आपल्यापकी अनेकजण असा प्रयत्न करताना दिसतात. अशांचे अनुभव आपण जाणून घेतले, तर त्यांचा उपयोग वाचकांना त्यांच्या ऑफिसमध्ये करता येऊ शकतो. इतरांचे अनुभव जाणून घेताना, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी चांगल्या वातावरणनिर्मितीसाठी काय केलं आहे, याच्या संकल्पना जाणून घेताना, ज्या वाचकांचा स्वत:चा लहान मोठा व्यवसाय आहे, अशांनाही या संकल्पना कळल्या तर त्यातून तयार होणाऱ्या नवसंकल्पनांचा वापर त्यांना त्यांच्या ऑफिसातही करता येईल. कधीकधी अशा संकल्पना या विशिष्ट व्यवसाय क्षेत्राशी निगडित असतात. त्या त्या उद्योगक्षेत्रातल्या लोकांना अशा संकल्पनांचा उपयोग होऊ शकतो. अशा संकल्पना इतर उद्योगांना लागू पडतीलच असं नाही. पण काही संकल्पना या सर्वसाधारणपणे कोणत्याही ऑफिससाठी उपयोगी पडू शकतात.

वातावरणनिर्मिती किंवा अंतर्गत सजावटीच्या संकल्पना अथवा निसर्गपूरक संकल्पना यांचा वापर करून ऑफिसमधलं वातावरण जसं प्रसन्न ठेवायला मदत होऊ शकते, तसंच सर्वसाधारण वाचकांना म्हणजे ज्यांचा ऑफिस डिझाइनशी संबंध येत नाही अशांनाही अनेक नव्या गोष्टींची माहिती अशा सदरांमधून मिळायला मदत होते.

वातावरणनिर्मितीसाठी कारणीभूत असणारे घटक कोणते याचा विचार केला, तर केवळ फíनचरच नाही, तर पडदे, सोफा यांची कव्हर्स, ऑफिसमधली रंगसंगती, नसíगक आणि कृत्रिम प्रकाशव्यवस्था आणि इतरही अनेक लहानसहान घटक मानसिकदृष्ट्या परिणामकारकता साधत असतात. या सगळ्याचा वापर करून व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्य घटकाची म्हणजे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची मनं प्रसन्न कशी राहतील याची काळजी घेतली, तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता किंवा उत्पादकता वाढू शकते, हे शास्त्रीय निरीक्षणांमधून आढळून आलं आहे.

संत तुकारामांनी म्हणूनच म्हटलं आहे

‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण’. अशा प्रसन्न वृत्तीने आणि चित्ताने जर कोणतंही काम केलं, तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे षड्गुणांची जोड त्याला दिल्यावर उद्योग व्यवसाय वाढीला लागतील आणि त्यात साधल्या जाणाऱ्या अनेकांच्या वैयक्तिक उन्नतीतूनच समाजाचीही उन्नती साधली जायला मदत होऊ शकेल. त्यासाठीच या विविध उद्योगांच्या घरी जाऊन म्हणजेच विविध कार्यालयांमध्ये जाऊन त्याअनुषंगाने या विषयाचा धांडोळा घ्यायचा हा छोटासा प्रयत्न या सदराच्या माध्यमातून केला जाणार आहे.

(इंटिरियर डिझायनर)

anaokarm@yahoo.co.in

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on office an energy source