प्राजक्ता पराग म्हात्रे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्न झाल्यावर सासरी उरणच्या कुंभारवाडय़ातल्या घरातही एकमजली घर होते व त्यातही किचनमध्ये माळ्यावर एक थोडा सरळ लाकडी जिना होता. सरळ जिन्याची सवय नसल्याने सुरुवातीला मी हळूहळूच चढायचे आणि उतरायचे. या जिन्यावरून टीव्हीही दिसायचा. कधी कधी आम्ही या जिन्याच्या पायरीवर बसून टीव्ही पाहायचो. याच पायऱ्यांवर सकाळचा चहा घेतला जायचा. संध्याकाळी सगळे एकत्र आले की चहासाठी आम्ही काही जण पायरीत, तर काही किचनमध्ये चटया टाकून बसायचो. या जिन्याचा सहवास एक वर्ष घडला.

पायरी ही घराची किंवा कोणत्याही वास्तूची शोभा असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, पायरीशिवाय घर किंवा कोणतीही वास्तू अपुरीच! घर असो, मंदिर असो वा कार्यालय असो.. प्रत्येक वास्तूत पायरीवरूनच प्रवेश केला जातो. पायऱ्या जास्त झाल्या की त्याचे रूपांतर जिन्यात होते. पूर्वी लाकडाच्या पायऱ्या करून बनवलेले जिने असायचे. माझ्या माहेरी उरण-नागांवमध्ये एकमजली घर होतं. तेव्हा घराच्या बाहेरून जिन्याची पद्धत होती. आमचा लाकडी फळ्यांचा जिनाही घराच्या बाहेर ४-५ सिमेंटच्या पायऱ्यांच्या आधारावर विराजमान होता. माळ्यावरच्या खोल्या जास्त वापरात नव्हत्या, पण या जिन्यावर चढणे-उतरणे हा लहानपणी एक खेळ होता. अजूनही आठवलं की, त्याचा तो चॉकलेटी गुळगुळीत स्पर्श मनाला जाणवतो. वापरून वापरून त्या फळ्या अगदी गुळगुळीत झाल्या होत्या. जिन्याच्या दोन साइडच्या उभ्या लांबलचक फळीत विशिष्ट अंतरावर त्यात फळ्या घट्ट रुततील अशा खाचा पाडून त्यात आडव्या फळ्या घालून हा जिना तयार केलेला होता. त्या काळी बहुतांशी असे जिने असायचे. अजूनही काही जुन्या घरांमध्ये आणि बिल्डिंगमध्ये असे जिने जुनी ठेव म्हणून अस्तित्वात आहेत. जिना घराच्या बाहेरच्या बाजूने असल्याने पावसाळ्यात घराच्या छपरावरून पुढे सरकवत त्याला ताडपत्री लावली जायची, पण दंगेखोर पाऊस मात्र वाऱ्याच्या मदतीने बरेचदा त्याला ओलेचिंब करून टाकायचा. मग जिन्यालाही मस्ती यायची आणि पावसाच्या चिकटीने आमचे पाय घसरायचे, त्यामुळे आमचे जिन्यावर येणे-जाणे फक्त काम असेल तरच असायचे. काही वर्षांनी तर मधल्या मधल्या एक-दोन फळ्याही मोडक्या झाल्या तेव्हा तर खेळायला अजून मजा यायची आणि त्या वयात तो थरार खेळ वाटायचा. कारण एक पायरी गाळून तिसऱ्या पायरीवर पाय टाकून वर-खाली जायला लागायचं. हा जिना इतका मनात रुतलेला होता, की मला जिन्याची स्वप्नेही पडायची. स्वप्नात जिना तुटला किंवा मी त्यावरून पडले अशी स्वप्ने असायची, तर कधी चांगली खेळत असल्याचीही असायची.

हा लाकडी जिना खराब झाला म्हणून वडिलांनी नंतर घराच्या अंगणात येईल असा सिमेंटचा जिना करून घेतला. त्यावर रेलिंग लावले. हा जिना सुंदर होता. कारण जिना संपतो तिथे ओटीला लागूनच थोडा चौकोन ओटीला लागून उपओटी म्हणावी असा भाग आला. त्यालाही उतरायला अजून चार पायऱ्या आल्या. मग हा जिना माझ्यासाठी अभ्यासाची जागा आणि करमणुकीची जागा झाली. जिन्यातील पायरीवर बसून अभ्यासही व्हायचा आणि या आभाळाखालील खुल्या जिन्यावर बसून आमच्या आवारातली झाडं-फुलं पाहत बसत माझा निसर्गासोबत सहवास वाढायचा. जिन्याच्या समोरच एक आंबटगोड चव असलेले लव फळाचे झाड होते. याची फळे खायला अनेक पक्षी येत. त्यात जास्त वेडे राघू हे पक्षी खूप यायचे. त्यांच्या हालचाली मी न्याहाळत बसायचे. वेडे राघू हे नाव मला आता कळलं. तेव्हा मी त्यांना छोटे पोपट समजायचे. थोडय़ा दिवसांनी या जिन्यावर कुंडय़ा ठेवून आणि वेली सोडून त्यालाही निसर्गाची साथ दिली. जिन्यावर माझा बगिचा सुंदर दिसत होता. दिवाळीत ओटीबरोबरच जिन्याच्या पायऱ्यांवरही आम्ही पणत्या लावायचो. त्यामुळे तो रोषणाईतला जिना झगमगून जात असे.

लग्न झाल्यावर सासरी उरणच्या कुंभारवाडय़ातल्या घरातही एकमजली घर होते व त्यातही किचनमध्ये माळ्यावर एक थोडा सरळ लाकडी जिना होता. सरळ जिन्याची सवय नसल्याने सुरुवातीला मी हळूहळूच चढायचे आणि उतरायचे. या जिन्यावरून टीव्हीही दिसायचा. कधी कधी आम्ही या जिन्याच्या पायरीवर बसून टीव्ही पाहायचो. याच पायऱ्यांवर सकाळचा चहा घेतला जायचा. संध्याकाळी सगळे एकत्र आले की चहासाठी आम्ही काही जण पायरीत, तर काही किचनमध्ये चटया टाकून बसायचो. या जिन्याचा सहवास एक वर्ष घडला. त्यानंतर आम्ही सगळे कुंभारवाडय़ातच बांधलेल्या नवीन घरी राहायला गेलो. तेही एकमजलीच आहे. यात जिना हे घराचं मध्यभागी आकर्षण म्हणूनच आहे. या जिन्याला ग्रॅनाइट आणि मार्बलच्या गुळगुळीत लाद्या आहेत. शिवाय संगमरवरी डंबेल्सही आहेत. माझ्या दोन्ही मुलींचा श्रावणी आणि राधाचा जन्म याच घरात झाला. त्या रांगायला लागल्या तेव्हा त्या दोघींचीही ही आवडती राइड झाली होती. रांगत रांगत जिना चढायला जायच्या, त्यामुळे सतत एकच लक्ष असायला लागायचं. कधी कधी त्यांना हा जिना चढू-उतरू देऊन खेळूही द्यायचो. हा जिना किचन आणि हॉल दोन्हींच्या मध्ये असल्याने कुठेही काही कार्यक्रम चालू असेल तरी जिन्यात बसून सगळ्यात सामील होता येते. कधी सुट्टीवर असले तर संध्याकाळी नवरा किंवा मुलींची वाट बघण्यासाठी ओटीवरची पायरीच आपलीशी वाटते. या ओटी-अंगण जोडणाऱ्या मोकळ्या पायरीवर बसून सकाळच्या गार हवेत निसर्गाची लीला पाहतानाही खूप समाधान वाटते. आमच्या या पायरीवरही मुली कधी कधी कुंडय़ा ठेवून त्यांना हिरवा ओलावा देतात. पाडव्याची गुढीची पूजा याच पायरीवर झाल्याने पायरीही मंगलमय होते, तर दिवाळीतले दिवे या पायऱ्या आपल्या ओंजळीत तेवत असताना फार प्रसन्न वाटते.

असे का कुणास ठाऊक सोफा, खुच्र्यापेक्षा पायरीवर बसणं जास्त आपलंसं, आरामदायी वाटत. कारण पायरीवर बसताना कुठल्याही प्रकारे शिष्टाचाराचे आसन घालावे लागत नाही. दिवसरात्र या जिन्यांवरून आपली ये-जा चालू असते. खालून वर आणि वरून खाली जाण्यासाठी जिना भक्कम आधार देत असतो. घराच्या दोन भागांना जोडून त्यांच्याशी संधान बांधून देणारा जिना असतो. शेवटी जीवनाच्या अनेक चढउतारांत या जिन्याच्या सहवासात होत असतात व चढउताराचा समतोल कसा राखावा हा आयुष्यातील मथितार्थ या पायऱ्याच शिकवतात.

माझ्या दोन्ही मुलींचा श्रावणी आणि राधाचा जन्म याच घरात झाला. त्या रांगायला लागल्या तेव्हा त्या दोघींचीही ही आवडती राइड झाली होती. रांगत रांगत जिना चढायला जायच्या, त्यामुळे सतत एकच लक्ष असायला लागायचं. कधी कधी त्यांना हा जिना चढू-उतरू देऊन खेळूही द्यायचो. हा जिना किचन आणि हॉल दोन्हींच्या मध्ये असल्याने कुठेही काही कार्यक्रम चालू असेल तरी जिन्यात बसून सगळ्यात सामील होता येते.

prajaktaparag.uran@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on stairs