अरुण मळेकर

आपल्या संस्कृतीत जलदान, जलसंवर्धन आणि त्याचे व्यवस्थापन करताना अज्ञात वास्तुरचनाकारांनी नुसत्याच पुष्करणी बांधल्यात असे नव्हे, तर त्यांना कलापूर्ण चेहरा देताना त्या प्राचीन ‘स्वयंभू’ वास्तुरचनाकारांनी आपल्या अंगभूत कालकृतीचा अजरामर आविष्कारही दाखवल आहे. हा कलाकृतीचा प्राचीन वारसा जपायलाच हवा ही त्या अज्ञातांचीही हाक आहे..

१८ एप्रिल या जागतिक वारसा दिनानिमित्त..

आपल्या देशात कलापूर्ण स्थापत्यशैलीच्या बांधकामात सुमारे १२०० लेणी शिल्पाकृती आणि प्रत्येक प्रांताच्या सांस्कृतिक तसेच त्यांच्या विविध शैलींच्या मंदिर वैभवांनी सर्वाधिक लौकिक मिळवलाय. श्रद्धेपोटी आणि मंदिर वास्तुवैभवाच्या आकर्षणाने भाविक, अभ्यासू आणि पर्यटकांचे ते एक आकर्षण आहे. परंतु त्यातील मंदिर वास्तूंच्या चित्ताकर्षकपणाकडे आपले सारे लक्ष केंद्रित होताना त्या मंदिर प्रवेशद्वाराच्या दीपमाळा, त्याच्या सभोवतीच्या तटबंदीवरील कलाकृतीसह प्रांगणातील पुष्करणींकडे तितक्याच जाणीवर्पूक आपण लक्ष देत नाही.

आपल्या पूर्वापारच्या संस्कृतीमध्ये घरासमोरचे तुळशी वृंदावन, केरसुणी, चूल यांची पूजा करून ऋण मानण्याचा परिपाठ आहे. त्यात ग्रामीण भागात विहिरींचीही मनोभावे पूजा करण्याचा रिवाज आहे. उपरोक्त घटक आमचं दैनंदिन जीवन सुखद करण्यासाठी अत्यावश्यक असून, त्याला पूर्वजांनी देवस्वरूप दिल्याने त्यांच्या संवर्धनाबरोबर त्यांचे पावित्र्यही जपले जाते.

वास्तविक भव्य मंदिर वास्तूत प्रवेश करण्याआधी याच पुष्करणीच्या पाण्याने मंदिर पावित्र्य राखण्यासाठी हात-पाय धुऊन प्रवेश करत असतो. मात्र, मंदिर वास्तूतील देवदेवतांच्या मूर्तीसह सभोवतालच्या कलाकृतीमध्ये काही पुष्करणींचा सर्वत्र बोलबाला झालाय. असल्या पुष्करणींची निर्मिती होण्यासाठी मंदिर वास्तू कारणीभूत आहेतच. कारण मंदिर उभारणीसाठी नजीकचा पत्थर काढण्यासाठी जो खड्डा निर्माण होऊन त्यात पाणीसाठा होत असतो. दूरदृष्टीचा अज्ञात वास्तुविशारदकांनी त्यालाच प्राचीन काळी कलापूर्ण पुष्करणींचे स्वरूप देऊन बारमाही पाणी साठय़ाची सोय केली.

कालांतराने पाणीसाठा करणाऱ्या पुष्करणींना देवस्वरूप देऊन त्या अधिकाधिक चित्ताकर्षक करण्याच्या प्रयत्नात त्यात तितक्याच आकर्षक मूर्तीची निर्मिती करण्याबरोबर उपलब्ध क्षेत्रानुसार त्याचा आकार ध्यानी घेऊन पुष्करणीच्या आत उतरण्यासाठी दगडाच्याच सुरक्षित पायऱ्यांची सोय करण्यात आली. हे आकारमान साधत पुष्करणीच्या चौफेर उभारण्यात आलेल्या कोनाडे तयार करताना वास्तुकारांनी भूमिती शास्त्राचा उपयोग केल्याचे दिसते..

या कोनाडय़ातील देवादिकांच्या सुबक मूर्ती निर्माण करताना कलाकाराने आपल्या कौशल्याचा आविष्कार दाखवलाय. भगवान विष्णू आणि पाण्याचं अतूट नातं असल्याने बऱ्याच पुष्करणींत शेषशायी विष्णूचे शिल्प आढळते.

वारसा यादीत समावेश झालेल्या प्राचीन पुष्करणीत काहींनी विश्वव्यापी लौकिक मिळवलाय. त्यातील गुजरातमधील मोधेरा सूर्यमंदिरासमोरची पुष्करणी म्हणजे स्थापत्यकलेचा आदर्श, वस्तुपाठ आहे. मोधेराच्या सूर्यमंदिराइतकेच त्या समोरच्या अलौकिक वास्तुकलेची ही पुष्करणीही आपले लक्ष वेधून घेते. मंदिर मुखमंडपावरील शिल्पाकृतीच्या दगडी कमानी पार करून बाहेर मार्गस्थ झाल्यावर सरळ पायऱ्या उतरून आपण या पुष्करणीच्या क्षेत्रात येऊन पोचतो, चौरस-आयतकोनी या पुष्करणीत भक्कम आकर्षक बांधकाम साधले आहे ते तर लाजवाब आहे. पुष्करणीच्या चौफेर कोनाडे आहेत त्यातून बांधकामातील एकसूत्रीपणाबरोबर अचूकपणाचेही दर्शन घडते.

अलौकिक कलाकृतीची आणखीन एक पुष्करणी म्हणजे गुजरातमधील पाटणनजीकची ‘रानी की बाव’ सुमारे एक हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या कलापूर्ण अशा पुष्करणीला सांस्कृतिक मोलासह इतिहासही आहेच. गुजरात सत्ताधीश राजा भिमदेवाची स्मृती जतन करण्यासाठी त्याची पत्नी राणी उदयमतीनी इ. स. १०२२ ते १०६३ या प्रदीर्घ काळात निर्माण झालेली ही पुष्करणी वास्तुकलेचा अजब नमुना आहे. ही पुष्करणी देखणी तर आहेच, पण आमचे प्राचीन वास्तुरचनाकार जल व्यवस्थापनासह स्थापत्य शास्त्रात कसे प्रगत होते हे जागोजागी जाणवते.

या सात मजली पुष्करणीचे बांधकाम दगडाचे असून, त्यातून गुजरात-राजस्थानी वास्तुशैलीचे दर्शन घडते. ६४ मीटर लांब, २० मीटर रुंद, २६ मीटर खोलीवरून या पुष्करणीची व्याप्ती ध्यानी येते. या विहिरीच्या अंतर्गत भागात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि सुरक्षेसाठी जे अनेक खांब उभे केलेत त्यावर धार्मिक पाश्र्वभूमीची उत्कृष्ट शिल्पे आहेत. त्यातून महिशासुरमर्दिनी, राम, वामन या मूर्तीतील भाव तर सजीव आणि बोलके वाटतात.

मोधेरा पुष्करणीच्या उभारणीप्रमाणे येथेही अज्ञात शिल्पकारांनी आपले कसब पेश करताना भूमितीचा आधार घेतलाय. या पुष्करणीला एकूण सात मजले असून, आजही पाच मजल्यांचे बांधकाम सुरक्षित आहे. जलस्रोत संवर्धनाबरोबर आपत्कालीन सुरक्षेसाठी या पुष्करणीत भुयारी मार्गाचीही योजना होती. परंतु नैसर्गिक स्थित्यंतराने तो मार्ग बंदच झालाय.

वेरुळ लेण्याच्या खोदकामाप्रमाणे शिखरावरून तळाकडे या पुष्करणीचे बांधकाम साकारले आहे. धरणीमातेच्या उदरातील एक अप्रतिम सौंदर्य म्हणून या पुष्करणीचा जगभर बोलबाला झाल्याने आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये तिचा समावेश झालाय. भारतात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या प्राचीन पुष्करणी आहेत त्या सर्वाची सम्राज्ञी म्हणून तिचे स्थान अबाधित आहे.

सामाजिक जाणिवेने एक पुण्यकर्म म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातही काही ठिकाणी पुरातन पुष्करणी आजही आपलं अस्तित्व राखून आहेत. उदा. अहमदनगर जिल्ह्यतील अमृतेश्वर शिवालय मंदिराशेजारची पुष्करणी. तिच्या बांधकामात कलापूर्ण चेहरा आहेच, तर सिद्धेश्वर मंदिरानजीकच्या पुष्करणीला अनेक सुबक मूर्तीचे कोंदण लाभले आहे. या सर्वच प्राचीन पुष्करणींचा आढावा घेतल्यावर आमचे पूर्वज दूरदृष्टीसह स्थापत्य शास्त्रात कसे वाकबदार होते हे जागोजागी जाणवते.

औद्योगिकीकरण, शहरीकरणाच्या झंजावातात आपला मूळ चेहरा लुप्त होत असलेल्या मुंबईसारख्या अवाढव्य शहरातही तीन शतक पार केलेल्या पुष्करणींना वारसा वास्तूसह तेथील जलसाठय़ाबरोबर संस्कृतीचे मोल आहे. मुंबईतील चर्चगेटनजीकची पारशी बावडी धार्मिक अधिष्ठानासह आपलं समाजऋ ण मानत सांस्कृतिक मोलही जपून आहे. दानशूर भिकाजी बेहरामची या श्रद्धावान माणसाच्या नावे ही विहीर असली तरी ‘पारसी बावडी’ म्हणून तिची ओळख आहे.

वारसा यादीत समावेश झालेल्या अन्य पुष्करणींच्या तुलनेत या विहिरीला कलात्मक चेहरा तसा अल्पच आहे. सुमारे २५० वर्षांपूर्वी अरबी समुद्राचं पाणी चर्चगेट स्थानकापर्यंत येत असे तेव्हा त्याच्या नजीकच्या या पुष्करणीला गोड पाणी कसे? हा चमत्कार समाजमनात रुजल्यावर ही पुष्करणी सर्वच धर्मीयांचं आपली मनोकामना पूर्ण करणारं श्रद्धास्थानही झालं. हा लौकिक आजही आहेच.

या बावडीच्या चौफेर संरक्षणासाठी भिंत आहे. दर्शनीभागी जी कमान लागते त्यावर पारसी धर्मीयांच्या तत्त्वप्रणालीनुसार काही बोधचिन्हेही आढळतात. अग्नीबरोबर जलदेवतेलाही पारसी धर्मीयात अनन्यसाधारण श्रद्धास्थान आहेच. समाजऋ ण मानून पारसी बांधवांनी सर्वत्र अनेक पुष्करणी बांधल्यात तरी श्रद्धेचं स्थान या पारसी बावडीला आहे. या बावडीचे संवर्धन करताना त्याच्या पुरातन बांधकामाला बाधा येणार नाही यासाठी आपल्या संस्कृतीचे मोल जपणारा पारसी समाज नेहमीच दक्ष आहे.

एक प्राचीन वास्तू म्हणून पारसी बावडीला ‘अ’ श्रेणीचा वारसा वास्तू दर्जा लाभलाय..

‘पाणी म्हणजे जीवन’ हे सार्वत्रिक सूत्र मान्य केल्यावर आपल्या संस्कृतीत जलदान, जलसंवर्धन आणि त्याचप्रमाणे जलव्यवस्थापन करताना अज्ञात वास्तुरचनाकारांनी नुसत्याच पुष्करणी बांधल्यात असे नव्हे, तर त्यांना कलापूर्ण चेहरा देताना त्या ‘स्वयंभू’ वास्तुकारांनी आपल्या अंगभूत कलाकृतीचा अजरामर आविष्कारही दाखवलाय या आपल्या पूर्वजांच्या अलौकिक कलाकृतीचा हा प्राचीन वारसा जपायलाच हवा. ही त्या अज्ञातांचीही हाक आहे..

arun.malekar10@gmail.com