‘घर हे केवळ चार भिंतींचं नसतं’ असं जरी असलं तरीही त्या भिंतींशिवाय घर पूर्ण होत नाही. घराचा आकार, आकारमान, स्वरूप, सौंदर्य, सुरक्षितता हे सारं काही त्या भिंतींमुळेच त्या घराला प्राप्त होत असतं. खरंतर त्या भिंतीच त्या घराचं अंग, शरीर असतं.
सर्वप्रथम घरात प्रवेश करताक्षणी आपलं लक्ष भिंतींकडेच जातं. भिंतींचा आकार आणि त्यांचं मोजमाप किती आहे, याहीपेक्षा त्या कशा प्रकारे सजवल्या आहेत, याकडेच आपलं लक्ष जातं. या सजावटीच्या माध्यमातून आपल्याला त्या भिंतींच्या दृश्य आकार तसेच आकारमानात काही बदल घडवून आणायचा म्हटलं तर तेही शक्य होऊ शकतं.
आपल्या घराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी, सर्वच नाही, पण किमान एखाद्या भिंतीवर अथवा भिंतीच्या ठरावीक भागावर निराळं वॉल कव्हरिंग चढवता येऊ शकतं. हल्ली बाजारात इंटिरिअर मटेरिअल्स इतक्या विविध प्रकारची उपलब्ध आहेत, की ज्यात फ्लोअरिंगपासून सीलिंगपर्यंत अनेक पर्याय आपण निवडू शकतो.
पूर्वी भिंतींसाठी एक तर पेंट्सचा नाहीतर वॉलपेपर्सच्या व्हरायटीजच उपलब्ध होत असत. त्यानंतर हळूहळू नॅचरल स्टोन्स अथवा सिरॅमिक यांचा उपयोग केला जाऊ लागला. पण अगदी अलीकडच्या काही वर्षांमध्ये आधुनिकीकरणाने जी क्रांती घडून आली, त्यामुळे बाजारात वैविध्यपूर्ण इंटिरिअर मटेरिअल्स आणि त्यांच्या वापराचे अनेक पर्याय उपलब्ध झाले.
आपण आपल्या घरासाठी करत असलेल्या इंटिरिअरमध्ये अनेकदा काही भागांमध्ये डिझाइनिंगच्या दृष्टीने आभास तयार करणं महत्त्वाचं असतं. या आभासातून घरातील प्रत्येक रूम्सच्या डिझाइनिंगमध्ये समतोल साधायचा असतो. कधी भिंतींमध्ये पोकळी निर्माण झालेली असते. काही भिंती अगदी सरळ नसतात. काही वेळा मूळ डिझाइनप्रमाणे त्या आत-बाहेर असतात. अशा तयार झालेल्या ऑफसेटचं काय करायचं, असा काही वेळा प्रश्न पडतो. शिवाय एकच ऑफसेट असेल तर निदान तो त्या भिंतीच्या कोणत्या जागेवर आहे? म्हणजे अगदी सेंटरला का एखाद्या कॉर्नरला? दोन किंवा त्यापेक्षा अधिक ऑफसेट्स असतील तर ते पुन्हा सिमेट्रिकल आहेत का? नुसते सिमेट्रिकलच नाही तर आयडेंटिकल आहेत का? त्याचप्रमाणे त्यापैकी दृश्य किती आहेत? का दरवाजामागे अथवा एखाद्या वॉल-टू-वॉल फर्निचर पीस मागे लपले जाणारे आहेत? अर्थात, असे निर्माण होणारे प्रश्न हे केवळ त्या भिंतीपुरते अथवा एकाच रूमपुरते मर्यादित असतील का घरात इतरत्रदेखील ते विचारात घ्यावे लागतील? हेही लक्षात घेणं जरुरीचं असतं.
कोणत्याही भिंतीची सजावट करण्याचं आपण निश्चित केलं तरीही त्या अगोदर अनेक पातळींवर अभ्यासपूर्वक विचार करून मटेरिअलची निवड करावी लागते. मुळात भिंत इंटरनल पार्टिशन म्हणून बांधलेली आहे का ती घराची एस्कटर्नल वॉल आहे. भिंतीला कोणत्याही कारणाने ओलावा तर नाही ना, भिंतीमधून लिकेज असेल तर प्रथम ते बंद करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. तसेच भिंतीमध्ये मोठय़ा आकाराच्या भेगा असतील तर कशामुळे आल्या आहेत, ते शोधून त्या हार्डनर भरून बंद करून घेतल्या पाहिजेत. असं करण्यामुळे भविष्यातले अनेक प्रश्न निर्माण होण्याअगोदरच मार्गी लावले जाऊ शकतात.
नैसर्गिक वस्तूचं आकर्षण आपल्यापैकी अनेकांना असतं. हल्ली कृत्रिम वास्तू ज्या बाजारात सहजासहजी उपलब्ध होत आहेत त्याही अगदी नैसर्गिकच वाटाव्यात अशा दिसतात. त्यातही युज अँड थ्रो स्वरूपाच्या टाकाऊ वस्तूंच्या रिसायकलिंग करून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंचं प्रमाणही खूप आहे. यातलाच एक प्रकार म्हणजे ‘आर्टिफिशिअल स्टोन्स’
वॉल क्लॅडिंगसाठी अतिशय निराळं असं हे मटेरिअल असून, बाजारात पुरेशा प्रमाणात ते सहज उपलब्धही आहे. ज्याला आपण मॉडर्न किंवा अगदी हटके लूक म्हणतो तसा तो या तऱ्हेच्या मटेरिअलमुळे मिळवता येऊ शकतो. अर्थातच त्याचा वापर किती, कसा व कोठे कधी करायचा हे लक्षात घेणं आवश्यक आहे.
आर्टिफिशियल स्टोन- निरनिराळय़ा नॅचरल स्टोन्ससारखेच दिसणारे आर्टिफिशियल स्टोन्स बाजारात हल्ली मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. कडाप्पा, ग्रानाईट, मार्बल, धोलपूर, स्लेट, इटालियन मार्बल, ग्रीन मार्बल, कोटा, शहाबाद, आग्रा रेड अशा सर्वच प्रकारच्या नॅचरल स्टोन्सप्रमाणेच हे प्रथमदर्शनी दिसतात. या आर्टिफिशियल स्टोन्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार उपलब्ध आहेत. एक त्यापैकी सेमी ट्रान्स्परंट स्वरूपाचा तर दुसरा सॉलिड सरफेस असणारा. सेमी ट्रान्स्परंट स्टोन निवडला तर तो भिंतीवर बसवण्यापूर्वी इनडायरेक्ट लाइटिंगची सोय करून अधिकच सौंदर्यात भर घालता येते. आपण निवडलेला आर्टिफिशियल स्टोन अधिकच खुलून दिसतो. त्याचा मूळ रंग आणि प्रकाश यांचा अनोखा संगम आपल्याला अगदी वेगळाच लूक आपल्या घराला देण्यासाठी उपयोगात येतो. आपल्या मनाला वेगळीच भुरळ घालतो.
उपलब्ध आकार- या आर्टिफिशियल स्टोन्समध्ये सध्या बाजारात विविध आकार उपलब्ध आहेत. लहान आकाराच्या टाइल्सपासून मोठय़ा आकाराच्या स्लॅब्सपर्यंत निरनिराळय़ा आकारांतील हे स्टोन्स निवडण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी प्रकाशयोजनेसह ज्या ठिकाणी आपण वापरण्याचं ठरवणार असू, त्या ठिकाणी स्लॅब्सच्या स्वरूपात उपलब्ध असणारे स्टोन्स निवडणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जेव्हा स्टोन्सच्या मागून प्रकाशयोजना अपेक्षित नसेल अशा ठिकाणी टाइल्स वापरता येऊ शकतात.
रंगसंगती- या मटेरियलची निवड करताना रंगसंगतीचा विचार जरूर करावा लागतो. केवळ निवडलेला स्टोन पसंत आहे. परंतु, तो ज्या रूममध्ये त्याचा वापर केला जाणार आहे त्याच्या इतर इंटिरिअरच्या रंगांच्या दृष्टिकोनातून विचार न करून चालणार नाही, तेव्हा स्टोनच्या रंगाची निवड करताना त्या रूममधील रंगसंगती लक्षात घेणं अथवा उलटपक्षी स्टोनला साजेसा रंगप्रकार ठरवणं महत्त्वाचं ठरतं.
साधम्र्य- स्टोन्स निवडताना केवळ रंग आणि रंगसंगती इतकाच विचार करून चालणार नाही, तर स्टोनच्या आकाराचा त्याच्यावरील मूळ डिझाइनचा, तो बसवण्याच्या पद्धतीचा म्हणजे उभा का आडवा, त्याच्यावरील ग्रेन्स आणि टेक्स्चरचा, त्याच्या सरफेस म्हणजेच त्याचा सरफेस ग्लॉसी आहे का मॅट स्मॅश आहे का रफ, तो टाइलच्या आकाराचा आहे का स्लॅब फॉर्ममध्ये अशा एक ना अनेक बाबींचा विचार व्हावा लागतो. त्या रूममधील प्रत्येक इंटिरिअर आयटमच्या डिझाइन्सशी त्याचं साधम्र्य असणं महत्त्वाचं आहे.
विविध जागा- आपल्या घरात प्रवेश करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराच्या सभोवताली भिंतीवर, घरात प्रवेश केल्या केल्या सर्वप्रथम दिसणाऱ्या पॅसेजमधील अथवा दर्शनी भागातील भिंतीवर, लिव्हिंग रूममधील टीव्ही-शोकेसच्या आजूबाजूला अथवा एखाद्या भिंतीमधील ऑफसेटमध्ये, बेडरूममध्ये हेडबोर्डच्या वरील भिंतीवर, किचनमध्ये प्लॅटफॉर्मच्या वर डॅडो म्हणून, घरातील काही विशिष्ट कॉलम्स अथवा बीम्सवर, बाल्कनी अथवा टेरेसवरील एखाद्या वॉलवर अशा प्रकारे अनेक ठिकाणी या आर्टिफिशियल स्टोन्सचा वापर आपण करू शकतो. अर्थातच प्रत्येक ठिकाणी त्याची गरज, उपयुक्तता लक्षात घेणंही तितकंच आवश्यक असतं. अशा प्रकारच्या मटेरिअल्सचा नेमकेपणानं, पण थोडाच वापर करणं योग्य ठरतं. यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन नेहमीच उपयुक्त ठरतं.
निवड- अशा प्रकारच्या डेकोरेटिव्ह मटेरिअलची निवड फार महत्त्वाची असते. निवड करताना आपल्या कामाचं स्वरूप ठरवून घेऊन ते मटेरिअल आपण किती, कशासाठी, कशाबरोबर, कोठे वापरणार आहोत याचा विचार होणं अत्यंत आवश्यक असतं. नाहीतर करायचं होतं एक आणि झालं भलतंच, यामुळे घराच्या इंटिरिअरचा मूड तयार करण्यामध्ये आपला मूड खराब होऊ नये. निवड करताना केवळ छोटय़ा आकाराच्या सॅम्पल्स किंवा रंगीबेरंगी पॅप्लेटवरून पसंती दर्शवणं नेहमीच टाळावं. थोडा वेळ काढून मार्केटमध्ये जाऊन उपलब्ध आकारातील प्रत्यक्ष मटेरिअल तेदेखील शक्यतो दिवसाउजेडी पाहून मगच पसंत करावे.
कामाचं स्वरूप- अशा प्रकारच्या मटेरिअल्सची निवड करत असताना एकूणच कामाची व्याप्ती किती आहे त्याचा अंदाज घेतलेला योग्य ठरतो. मटेरिअल्सची क्वांटिटी निश्चितपणे प्रत्यक्ष जागेवरील मोजमाप घेऊनच ठरवावी लागते. अंदाज चुकला तर मटेरिअल काही वेळा कमी पडू शकतं, तर कदाचित शिल्लक राहू शकतं. इतर सर्वसाधारण मटेरिअलसारखंयाचं नसतं. मटेरिअल कमी पडलं तर मिळणारा सेकंड लॉट कदाचित थोडासा निराळा असू शकतो. त्यामुळे शक्यतो एकाच वेळी एकाच लॉटमधील मटेरिअल घेणं सयुक्तिक ठरतं.
देखभाल अर्थात मेन्टेनन्स- हे मटेरिअल मेन्टेनन्सच्या दृष्टिकोनातून विचार करता अतिशय चांगलं आहे. पूर्णपणे वॉशेबल असल्यामुळे फ्लोअर क्लिनिंगप्रमाणेच स्वच्छ करता येऊ शकतं. शिवाय हे वापरल्यावर लॅकरिंग अथवा पॉली विनायल कोटिंग करून घेतलं तर ते डस्टप्रुफदेखील होऊ शकतं. नॅचरल स्टोन्सइतकं नाही, तरी पण किमान १२ ते १५ वर्षांपर्यंत तर ते नक्कीच टिकू शकतं.
बजेट- अत्यंत महत्त्वाची बाब की जी इंटिरिअर करताना आवश्यक असते आणि ती म्हणजे बजेट. नॅचरल स्टोन्सच्या तुलनेनं हे मटेरिअल निश्चितच थोडं किमती आहे. पण त्याच्या वापरातून निर्माण होणारं सौंदर्य, त्याचा उपयोग नक्कीच अधिक आहे. साधारणपणे तीनशे रुपयांपासून सहा हजार रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे निरनिराळय़ा प्रकारात सध्या बाजारात हे उपलब्ध आहे. सुमारे शंभर स्क्वेअर फुटाच्या भिंतीवर केवळ आठ फूट बाय पाच फूट या आकारात साधारणपणे एक हजार रुपये स्क्वेअर फुटाचं मटेरिअल निवडलं तर अवघे चाळीस हजार रुपये सौंदर्याच्या साक्षात्कारासाठी पुरेसे ठरतात.
आपल्या घराच्या इंटिरिअरच्या दृष्टीनं वॉल ट्रीटमेंटला अनन्यसाधारण महत्त्व असतं. घरातील भिंतींचं रूप जितकं पालटून जाईल तितकंच घराच्या सौंदर्यात भर पडेल. अनेकदा भिंतीला आलेला ओलावा झाकण्यासाठी देखील किंवा सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन म्हणून आर्टिफिशियल स्टोन्सची निवड योग्यच ठरते. जशी अनेकदा दुसऱ्याच्या घराची तुलना आपण आपल्या घराशी करतो किंवा दुसऱ्याच्या घरी अमुक एक आहे, पण आपल्याकडे ते किंवा तसं नाही, असं कधी वाटू नये म्हणून आपण नेहमीच काहीतरी नवीन शोधत असतो. अशाच अनेक नव्या वस्तूंपैकी एक असं जरी या आर्टिफिशियल स्टोनच्या बाबतीत म्हटलं तरी नक्कीच आपल्या घराचा वेगळेपणा इतरांच्या घराच्या तुलनेनं मनात घर करून राहील असाच असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा