भविष्यातले शहर ही ओळख नव्याने मिरविणाऱ्या बदलापूरमध्ये केंद्र व राज्य शासनाचे अनेक प्रकल्प व योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे स्थलांतरित होऊन अनेकजण कायमस्वरूपी स्थायिक होत आहेत. या स्थलांतरितांसाठी बदलापूर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात मोठ-मोठय़ा बांधकाम व्यावसायिकांकडून सध्या गृहप्रकल्प होत असून सर्व सोयी ग्राहकांना येथे पुरविण्यात येत आहेत.
हिरवाईच्या निसर्गदत्त देणगीने संपन्न असलेले मुंबईचे उपनगर म्हणजे बदलापूर. गेली अनेक वर्षे आपल्या नैसर्गिक संपन्नतेची ख्याती मिरविणाऱ्या बदलापूरचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण होत आहे. या पाश्र्वभूमीवर आज येथे मोठय़ा प्रमाणावर मोक्याच्या ठिकाणी गृहप्रकल्प होत आहेत. मोठे बांधकाम व्यावसायिक सर्व सुखसोयींनी सज्ज व खिशाला परवडेल अशा दरात येथे घरांची विक्री करत आहेत. सोयी-सुविधांनी युक्त अशा बदलापुरात निसर्ग देणगी शिवाय शहराची इतरहीअनेक गुणवैशिष्टय़े कारणीभूत आहेत. नव्वदच्या दशकानंतर शहरीकरणाची स्वप्ने बदलापूरला पडू लागली व दहा वर्षांनंतरच शहरीकरणाची चुणूक बदलापूरने दाखविली. आज मोठय़ा प्रमाणात बदलापूरचे नागरीकरण झाले असून, शहराचा विकास झाल्याची कबुली येथील बुजुर्ग मंडळी देत असतात.
हिरवेगार गाव ही ओळख वृद्धिंगत करत शहरीकरणाला आमंत्रण दिल्यानंतर हळूहळू येथे साऱ्याच सुविधा होत गेल्या. रेल्वे स्थानक, रिक्षा, बससेवा, खासगी वाहतूक आदींच्या साहाय्याने बदलापूर मुंबईपासून जवळच नाही तर मुंबईच्या शेजारीच वसल्यासारखे भासू लागले. याच काळात नगरपालिका, सरकार आदींकडूनही येथे सुविधांची उभारणी होऊ लागली होती. या पाश्र्वभूमीवरच या शहरात मोठ-मोठय़ा शाळा, महाविद्यालयही उभी राहिली आहेत आणि परिपूर्ण शहर म्हणून बदलापूर नावारूपाला येत आहे. गेल्या वीस वर्षांत कमावलेल्या संचिताच्या जोरावर आज बदलापूर भविष्यातले शहर हा कित्ता मिरवत आहे. बदलापूरला ही पावती केवळ येथे राहायला येणाऱ्या मुंबईकरांनीच नव्हे तर नुकतेच बदलापुरात येऊन गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दिली आहे. ‘भविष्यातले शहर’ ही बदलापूरची ओळख आता अधिक विस्तारणार असून, केंद्र व राज्य शासनाचे अनेक प्रकल्प व योजना येथे राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे स्थलांतरित होऊन अनेकजण कायमस्वरूपी स्थायिक होत आहेत. या स्थलांतरितांसाठी बदलापूर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात मोठ-मोठय़ा बांधकाम व्यावसायिकांकडून सध्या गृहप्रकल्प होत असून सर्व सोयी ग्राहकांना येथे पुरविण्यात येत आहेत. काही गृहप्रकल्पांमध्ये तर अगदी एलसीडी टीव्हीपासून फ्रीजपर्यंत सुविधा देण्यात येत असून, घरात लागणाऱ्या जवळपास पन्नासएक वस्तू व साधनांचा पुरवठादेखील करण्यात येत आहे. या साऱ्या गोष्टी हे प्रकल्प २९०० पासून ३५०० पर्यंतच्या दरात उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळेच बदलापुरात सध्या गृहखरेदीसाठी हमखास झुंबड उडालेली दिसते. तर, ग्राहकांच्या सोयीसाठी सगळ्याच मोठय़ा बँकादेखील बदलापुरात ठाण मांडून बसल्या आहेत. थोडक्यात, हिरवेगार शहर, पाण्यासाठी धरण, आधुनिक संसाधने, वाहतुकीसाठी मिनिटा-मिनिटाला लोकल ट्रेन, बसेस व राहण्यासाठी स्वस्त घरे त्यामुळे या जोरावर नागरिकांचे आता बदलापुरात घर घेणे पसंत करीत आहेत.
वाढते बदलापूर आता महानगरांच्या केंद्रस्थानी येत असून, मुंबई परिक्षेत्र तसेच अलिबाग ते विरार परिक्षेत्र आदींसाठी भौगोलिकदृष्टय़ा मध्यवर्ती भागात हे शहर येत आहे. त्यामुळे येथे घर घेणे ही आता लोकांची गरज बनत चालली आहे. अशा शहरात आम्ही रेल्वे स्थानकापासून जवळ प्रकल्प करत असल्याने येथे येणाऱ्यांची नागरिकांची चांगली सोय होणार आहे.
– पंकज शर्मा, प्राणजी समूह
बदलापूर शहरात आता सर्व सुखसोयींनीयुक्त घरे निर्माण होत आहेत. येथे या घरांच्या बरोबरीनेच रस्ते, पाणी, वीज या सुविधा पूर्वीपेक्षा सुधारून उत्तम दर्जाच्या होत आहेत. तसेच, ठाणे, कल्याण आदी भागांत ज्या वेगाने घरांच्या किमती वाढल्या आहेत त्या वेगात येथील घरांच्या किमती वाढल्या नाहीत. त्यामुळे स्वस्तात घर घेण्याचे स्वप्न बदलापुरात साकार होत आहे.
– भाविन पटेल, तुलसी इस्टेट
मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात शांतता हरवलेले नागरिक हिरव्यागार बदलापूरकडे वळत आहेत. आम्ही व्यावसायिक मंडळीही निसर्गाच्या कुशीत वसलेले गृहप्रकल्प उभारून रस्ते, महामार्गापासून जवळ घरे बांधत आहोत. तसेच ठाण्यात नव्वदीच्या दशकात अडीच-तीन हजारापर्यंत मिळणारी घरे आज त्याच किमतीत त्यापेक्षा जास्त सोयींसह येथे मिळत आहेत. भविष्यात चिखलोली रेल्वे स्थानकामुळे नागरिकांचा प्रवासही सोपा होणार आहे.
– दीपक पंडय़ा, फाइव्ह पी समूह
स्वस्त घरे, संसाधने, सुविधा तसेच दळणवळणाच्या अत्याधुनिक सेवांमुळे बदलापूर हे भविष्यातील महत्त्वाच्या शहरांच्या पंक्तीत आजच जाऊन बसले आहे. त्यामुळे बदलापुरात घर घेणे ही प्रतिष्ठेची बाब असून मुंबईजवळच्या या उपनगरात अत्यंत स्वस्तात नागरिकांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळेच अनेकजण आता बदलापूरकर होण्याच्या दृष्टीनेच येथे येत आहेत.
– बिपीन जेठानी, कोणार्क समूह
महाराष्ट्रीयन माणसांचा चेहरा ही बदलापूरची पहिल्यापासूनच ओळख आहे. या ओळखीच्या जोरावरच येथे येणारे मराठी भाषिक इतर शहरांपेक्षा बदलापूरची निवड करत आहेत. येथे स्थायिक होणाऱ्या लोकांना त्यांनी घरासाठी भरलेले पैसे हे पुरेपूर वसूल झाल्याचे समाधान मिळत आहे. त्यांच्या आयुष्याची समृद्धतेकडे वाटचाल होत असल्याचे ग्राहक आम्हाला सांगत आहेत.
– राहुल पनवेलकर, पनवेलकर समूह
बदलापूर आणि टिटवाळा येथे आजूनही सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलबध होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी बांधण्यात आलेल्या घरांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो, असे चित्र आहे. टाऊनशिपमुळे लोक इथल्या घरांकडे आकर्षित होत आहेत. हे टाऊनशिप अनेक सोयी-सुविधांनी उपलब्ध आहेत. येत्या दीड वर्षांत येथील घरांच्या किंमती ३० टक्क्यांनी वाढणार आहेत.
मोहन थारवानी, थारवानी इन्फ्रोस्ट्रक्चर्स
बदलापूर शहर हे वाहतुकीच्या प्रश्नांपासून अलिप्त असलेले शहर असून, धावपळीच्या आयुष्यातून घरी बदलापुरात आलो की मिळणारी शांतता हेच या शहरातील सुखी आयुष्याचे गमक आहे. तसेच, गृहखरेदीसाठी येथे स्वस्ताई तर आहेच, पण रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर गृहप्रकल्पाचे काम चालू आहे. तसेच येथून अर्धा तास लांब असलेल्या डोंबिवलीपेक्षा निम्म्या दरात येथे घर खरेदी करता येते.
– द्वारकादास वाधवा,
वाधवा अॅण्ड सन्स समूह (अंकिता बिल्डर्स)
दळणवळणाच्या सोयींनी परिपूर्ण असलेले शहर ही बदलापूरची ओळख वृद्धिंगत होत आहे. गृहखरेदीसाठी सगळ्यात स्वस्त घरे येथे उपलब्ध आहेत. या कारणास्तव सगळ्यात जास्त बांधकाम व्यावसायिक व सगळ्यात जास्त गृहखरेदीदार बदलापुरात आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत जात असल्याने याचा फायदा खरेदीदाराला चांगल्या सोयीसुविधांच्या माध्यमातून मिळत आहे.
– सिद्धेंदू पटेल, तुलसी सिटी
मुंबई नजीकचे महत्त्वाचे उपनगर म्हणून बदलापूरची ख्याती वाढत आहे. येथे असणाऱ्या उत्कृष्ट शाळा, महाविद्यालये तसेच दळणवळणाच्या सोयींमुळे येथे मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्प होत आहेत. या साऱ्याचा परिपाक असा की, बदलापूर शहर हे उत्कृष्ट निवासी अधिवास म्हणून नावारूपाला येत आहे. त्यामुळे येथे घर घेणे हीच प्रत्येक घर घेणाऱ्याची प्राथमिकता झाली आहे.
– अक्षय अग्रवाल, अरिहंत सुपरस्ट्रक्चर्स
संकेत सबनीस