विलास समेळ
माणसाच्या मनात आणि घरात एक हळवा कोपरा असतोच असतो. माझ्याही मनात असाच एक होता जो अनेक वर्षे मला जाणवत होता. माझ्या घरातील हळवा कोपरा मात्र मी वारंवार अनुभवला. वयाची साठी होईपर्यंत मी व्यवसायानिमित्त माझ्या जन्मगावीच वडिलोपार्जित दुकानदारी करत होतो. दिवसभराच्या थकव्यानंतर दुकान बंद केल्यानंतर घरातील सोफ्यावर किंवा बाल्कनीतील झुल्यावर क्षणभर बसलो तरी सारा क्षीण निघून जायचा. व्यवसायातून निवृत्त होऊन गावाहून शहरातील मुलांकडे कायमचा वास्तव्यासाठी आल्यानंतर स्वत:चं मन रमविण्यासाठी काहीतरी करायला हवं होतंच. दिवसभर दुकानात काम करणारा मी नुसता बसून राहू शकतच नव्हतो. अखेर माझ्या अंगी असलेले कलागुण नि छंद जोपासण्याचा निर्णय पक्का झाला. मी ठरवलं की आपल्या सुंदर हस्ताक्षराचा- जी मला दैवी देणगी मिळालेली होती, त्याचा स्वत:चं मन रमवतानाच दुसऱ्यांनाही काही उपयोग होत असेल तर करावा म्हणून कामाला लागलो.
माझ्याच बेडरूममधील बाल्कनीजवळची जागा त्यासाठी ठरवली. खाली बसून मांडीवर रायटिंग पॅड घेऊन बाजूला जुना छोटा ट्रान्झिस्टर लावून छान गाणी ऐकत काम चालू झालं. हळूहळू ती जागा, ते बैठक मारून बसणं, ती वेळ सारं एवढं आवडायला लागलं की, घरात दुसरं कुठेही अगदी टेबलखुर्ची घेऊन बसलं तरी मनासारखं लिहून होईना. एकीकडे लेखन, मध्येच मोबाइलवर बोलणं किंवा संध्याकाळचा चहासुद्धा तिथेच व्हायला लागला.
घरातील बेडरूमची कपाटाला टेकून बसून लेखन करण्याची जागा मनात एक हळवा कोपरा बनून राहिली. गेली दहा-अकरा वर्षं तिथे आणि तिथेच बसून कविता, लेख, इतर लेखन आणि हस्ताक्षरातील अनेक प्रकारचं काम हातून झालं. ते लोकांना आवडल्यानं प्रसिद्धी, मानसन्मान मिळाले. मात्र या साऱ्याचं श्रेय घरातील माझ्या सर्वात आवडत्या, मन शांत करून नवनवीन कल्पना सुचणाऱ्या या जागेलाच- जो माझं हळवेपण जपतोय.