दीपावली म्हणजे वर्षांतला सगळ्यात मोठा आनंदाचा, उत्साहाचा सण! नवीन कपडे, छान छान वस्तू, लाडू, चिवडा, चकल्यांची मस्त मेजवानी, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई आणि अर्थातच प्रियजनांच्या भेटीगाठी! त्यात या वर्षी तुमचं दिवाळी गिफ्ट हे इतरांच्या गृहसजावटीमध्ये भर घालणारं असेल तर..
आपण भारतीय म्हणजे मुळातच उत्सवप्रिय. त्यातही जर दिवाळीचा सण असेल तर आपल्या आनंदाला उधाणच येतं. दिवाळीत आपण आप्त, मित्रपरिवार यांच्याकडे जातो आणि या प्रेमाच्या भेटींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना चविष्ट फराळाबरोबरच भेटवस्तूसुद्धा देतो. मुळात सणाच्या, आनंदाच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देणं हा आपला पूर्वीपासून चालत आलेला रिवाज आहे. शुभदिनाचं औचित्य साधून एकमेकांना भेटवस्तू दिल्या तर आनंदात भर तर पडतेच, शिवाय आपले नातेसंबंध अधिकाधिक समृद्ध, दृढ होण्यासही मदत होते. नात्यातला गोडवा, जिव्हाळा वाढतो. म्हणूनच कदाचित भेटवस्तू देण्याचा हा प्रघात आजही विनाखंड सुरू आहे. मग या वर्षी तुम्ही दिलेली गोड भेटवस्तू एखाद्याच्या घरातील सजावटीत चार चाँद लावणार असेल तर मग क्या बात है!
कटाक्षाने टाळा
दाराची तोरणं, गणपतीची मूर्ती देणं कटाक्षाने टाळा. कारण या गोष्टी प्रत्येकाच्या घरात असतातच. तुम्ही ज्यांना भेटवस्तू देणार आहात त्यांचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर डोअर नॉक, देवतांच्या मूर्त्यां या वस्तू देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार देवतांच्या मूर्त्यां भेट देणं आणि डोअर नॉकची दरवाजावर सतत टकटक होत राहणं चांगलं मानलं जात नाही.
तसंच फेंगशुई, वास्तुशास्त्र मानणाऱ्यांसाठी त्यात सांगितलेल्या शुभ वस्तू देण्याचंही टाळा. कारण त्यासुद्धा त्यांच्या घरासाठी तज्ज्ञाने सांगितलेल्या असल्या पाहिजेत.
हलल पेपरमॅश, लाकूड यापासून बनवलेल्या नेम प्लेट्स मिळतात. पण ही वस्तूसुद्धा न दिलेलीच बरी. कारण एक तर यासाठी मुख्य दरवाजाचं आकारमान कसं आहे. त्यावर किती आकारमानाची (साइज) नेमप्लेट व्यवस्थित बसेल, याचा अंदाज आपल्याला नसतो. म्हणूनच ही वस्तू देण्याचं टाळावं. घडय़ाळ देण्याचा मोहही आवरा. घडय़ाळ्यांमध्येही खूप सुंदर वैविध्यता दिसून येतेय, पण हा मोह टाळलेलाच बरा.
दसरा-दिवाळीचं औचित्य साधून अनेक जण आपल्या नवीन वास्तूमध्ये राहायला जातात. घर अगदी नवं कोरं असतं. मोजकं फíनचर, जुजबी वस्तू, गरजेचं सामान इतकंच. अशा वेळी मग दिवाळीची तुमची भेटवस्तू त्यांच्या घराच्या सजावटीसाठी साहाय्यभूत ठरू शकते. आज बाजारात अनेक वस्तू अशा आहेत, की ज्या आपण नवीन घरात राहायला गेलेल्या आपल्या जीवलगांना देऊ शकतो. ज्यांचा वापर त्यांना गृहसजावटीसाठी करता येईल.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण अशी भेटवस्तू देण्याचं ठरवलंय त्यांची आवड प्रथम लक्षात घ्या. म्हणजे असं की, अँटिक वस्तूंची आवड असेल तर डोअर हँड्ल्स, नॅपकिन होल्डर, कंदील, कँडल स्टॅण्ड, लामणदिवा, छोटे पणतीसारखे दिवे, समई, एखादं छानसं तबक असे भरपूर प्रकार निवडीसाठी उपलब्ध आहेत. तांबे-पितळ यातील डोअर हँड्ल्स, नॅपकिन होल्डर, लामणदिवे तर खूपच सुरेख दिसतात. यामध्येच एक प्रकार डोअर नॉकचा आहे. सिंह, हत्ती अशा प्राण्यांचा तोंडाच्या आकाराला खाली गोलाकार िरग असते. घराच्या मुख्य दरवाजाला हे लावता येईल. ज्यांना इलेक्ट्रिक डोअर बेल नको असते, त्यांच्यासाठी हा मस्त पर्याय आहे. पण याचाच वापर नॅपकीन होल्डर म्हणूनही करता येईल. बेसीन, किचनमध्ये हा होल्डर तुम्ही बसवू शकता. पितळेचे डोअर हॅण्डल्सही सुंदर दिसतात. मुख्य दरवाजाची शोभा यामुळे नक्कीच वाढेल. तसेच गुजरातची खासियत असलेल्या शंखेडा फíनचरमध्ये कमी उंचीची आसनं, खुच्र्या मिळतात. असं एखादं आसन देता येईल. अॅंटिक प्रकारामध्ये राधा-कृष्ण, गणपती, गौतम बुद्ध यांच्या मूर्त्यांही असतात.
याबरोबरच फुलदाण्या, पेपरमॅशच्या वस्तू, ज्यूटपासून बनवलेल्या फ्रेम्स, पेंटिंग्ज, वारली या आदिवासी चित्रकलेतून साकारलेल्या वस्तू हे पर्याय आहेतच. फुलदाण्यांमध्येसुद्धा अनेक प्रकार आहेत. काच, सिरॅमिक, टेराकोटा, मेटल या प्रकारांपासून बनवलेल्या फुलदाण्या लक्ष वेधून घेतात. मेटलवर मिनाकारी केलेल्या फुलदाण्या अँटिक वस्तूंच्या दुकानांमध्ये मिळू शकतात. थोडंसं हटके गिफ्ट द्यायचं असेल तर जर्मन सिल्व्हरच्या वस्तू एकदा नजरेखालून घाला. यातही एखादी युनिक वस्तू मिळून जाईल. जर्मन सिल्व्हरमध्ये तबक, चौकोनी डबे, विडय़ाचे तबक, सुरई, कँडल स्टॅण्ड, छोटय़ा पणत्या, नॅपकीन होल्डर, कप-बश्या, किटली, छोटय़ा आकारातील सायकल, घोडागाडी, बग्गी, रिक्षा अशी वाहनंसुद्धा आहेत.
रॉट आयर्न मटेरिअलपासून बनलेल्या डेकोरेटिव्ह वस्तू, जसे की वॉल हँिगग्जसुद्धा आहेत. थोडंसं क्लासी गिफ्ट हवं असेल तर सिल्व्हर कोटेड भेटवस्तूंची निवड करा. यात शोभेच्या वस्तू आहेतच, शिवाय फोटो फ्रेम्सही मिळतात. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे अशा वेळेस एखादा डेकोरेटिव्ह लॅम्प सगळ्यांचं मन जिंकेल.
सुरेख कुंडीमध्ये लावलेलं एखादं छोटंसं रोपटंही छान भेटवस्तू ठरू शकतं. हलल टेराकोटा, सिरॅमिकच्या छान रंगसंगती असलेल्या, आकाराने लहान कुंडय़ा मिळतात. त्यात आवडीचं झाड लावून तेसुद्धा देता येईल.
दिवाळीसाठी अतिशय सुरेख वस्तूंची रेलचेल अनुभवायला मिळतेय. आपली कलात्मक दृष्टी, प्रियजनांची आवड यांची योग्य सांगड घातलीत तर तुमचं गिफ्ट हे परफेक्ट दिवाळी गिफ्ट ठरेल, यात शंकाच नाही.