पण बनारसच्या या घराचं मोठं भावंडं म्हणावं अशा घरात आम्ही जवळजवळ दर उन्हाळी सुट्टीत राहायला जात असू. हे होतं चुलत आजोबांचं घर. ग्वाल्हेरच्या या घरात मोठय़ा दिंडी दरवाजातून शिरल्यावर घरात प्रवेशण्याआधीच डाव्या बाजूला गाद्यांची खोली तर होतीच, पण उजव्या बाजूला बागकामाच्या साहित्याचीही खोली होती. यात फावडी, खुरप्या, कुदळी, टोपल्या, खताची पाकिटं असा सारा सरंजाम असे. माळ्याच्या बरोबरीने आजोबा बागकामात रस घेत. या बागेत बनारसच्या घरात असलेली सगळी झाडं तर होतीच, शिवाय अंजिराचंही झाड होतं.
एकदा मुलासमोर बोलताना मी सहज म्हणाले, ‘आई-आजीसारख्या कुरकुरायच्या, किती लहान घर, पाहुणे आले की पंचाईत होते.’ मुंबईत वाढलेला माझा मुलगा लगेच म्हणाला, ‘आई लहान म्हणजे वन रूम किचन का?’ आणि मी अवाक्च झाले. लहान घराबद्दल माझी कल्पना किती वेगळी होती त्या वयात. तो उत्तराच्या अपेक्षेने माझ्याकडे बघत होता. त्या वयात आम्हाला कोणाची बेडरूम वगैरे संकल्पनाच नव्हती. मी जमेल तसं सांगायला सुरुवात केली. समोर छोटी बाग होती. तिथे जांभूळ, बेल, लिंबू आणि कापूस अशी झाडं आणि तेरडा, लिली वगैरे फुलबाग होती. मग एक व्हरांडा, त्याला लागून पुढची खोली. मग देवघर, पुढच्या खोलीला लागून बाबूजींची खोली, मग आईची खोली. त्यानंतर गाद्यांची खोली, चौक, मागे स्वयंपाकघर आणि बाथरूम-शौचालय’ मुलगा आ वासून ही यादी ऐकत होता. त्याच्या दृष्टीने अंथरूण-पांघरुणांची जागा दिवाणाच्या पोटात होती. त्यासाठी स्वतंत्र खोली असलेल्या घराला आपली आई लहान का म्हणते, हे त्याच्या सात वर्षांच्या मुंबईकर मनाला समजत नव्हतं. पण हे घर होतं बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधलं.
या घराला लहान म्हणायला कारण होतं ते मी नववीत असताना आम्ही राहायला गेलेलो दुसरं घर.
घरातील झाडांची विविधता तर सांगताना दम लागेल अशी होती. अंगणात आंबा, जांभूळ, बेल, केळी, पेरू, शेवगा, इडलिंबू, साधं लिंबू, करवंद, सीताफळ अशी झाडं होती. पिकत आलेली सीताफळं गव्हाच्या कोठीत ठेवून मग ती, मी शाळेत मैत्रिणींसाठी नेत असे. फुलझाडांची बाग वेगळी होती आणि शिवाय राहिलेल्या जागेत बॅडमिंटन कोर्ट.
या घरात गाद्यांची खोली तर होतीच. शिवाय मागच्या चौकात सरपणाचीही खोली होती. कडाक्याच्या थंडीत पाणी गरम करायला चौकात चूल पेटे. त्यासाठीची लाकडं-कोळसा वगैरे इथे असत. घराला लागूनच, पण मागे उघडणारी स्वतंत्र सव्र्हण्ट्स रूम होती. इथे एक न्हाव्याचं जोडपं राही. या सुखदेवची बायको शामा आमच्याकडे घरकाम करीत असे.
खाली आणि वर चार-चार खोल्या असलेल्या या घरात, ज्याला आज अॅटॅच्ड टेरेस म्हणतात, अशी गच्ची होती. आणि त्यावर पेरूच्या फांद्या झुकलेल्या होत्या. स्वयंपाकघरात मातीच्या तयार चुली आणि त्यावर चिमणी होती. शेजारी कोठारघर होतं. बाथरूमच्या आतच बांधलेली मोठी पाण्याची टाकी पाण्याची उणीव भासू देत नसे. या जुन्या पद्धतीच्या ऐसपैस घरात मागचा चौक ओलांडून दोन शौचालये होती. पण वरच्या मजल्यावर चार खोल्या असूनही बाथरूम-शौचालयाची सोय नव्हती. घरातून बाहेर पडायला सहा दारं होती, पैकी तीन हॉलमध्ये होती, ज्यांपैकी एक बाहेरच्या व्हरांडय़ात तर दोन बागेत उघडत असत. हॉलमध्ये चक्क एक फायर प्लेसही होती. या अवाढव्य घरात राहणारे मी, धाकटा भाऊ, आई, बाबूजी आणि आजी. आमच्या या घरानं नात्यातील दोन मुलींची लग्नंही बघितली. इजा-बिजा-तिजा होऊन तिसरं माझं होणार, अशी अनेकांची अटकळ असताना माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी वडिलांनी बी. एच. यू. सोडायचं ठरवलं. या दोन्ही घरांनी पाहुणे मात्र भरपूर बघितले. कारण गंगास्नान आणि काशी-विश्वेश्वर दर्शनाचं माहात्म्य.
पण या घराचं मोठं भावंडं म्हणावं अशा घरात आम्ही जवळजवळ दर उन्हाळी सुट्टीत राहायला जात असू. हे होतं चुलत आजोबांचं घर (वडिलांचे वडील त्यांच्याही आठवणीत नव्हते.) ग्वाल्हेरच्या या घरात मोठय़ा दिंडी दरवाजातून शिरल्यावर घरात प्रवेशण्याआधीच डाव्या बाजूला गाद्यांची खोली तर होतीच, पण उजव्या बाजूला बागकामाच्या साहित्याचीही खोली होती. यात फावडी, खुरप्या, कुदळी, टोपल्या, खताची पाकिटं असा सारा सरंजाम असे. माळ्याच्या बरोबरीने आजोबा बागकामात रस घेत. या बागेत बनारसच्या घरात असलेली सगळी झाडं तर होतीच, शिवाय अंजिराचंही झाड होतं.
या तीन मजली घरात, तळमजल्यावर मोठा हॉल होता. याला लागून लांबलचक पडवी होती. तिच्या टोकाला एक बाथरूम आणि बाथरूमच्या शेजारी गल्लीत उघडणारं एक दार. या दाराशी गाय येई आणि आम्ही दोघं भावंडं तिला पोळी देत असू. या पडवीच्या जाळीच्या भिंतीसमोर माठ ठेवलेले असत आणि जाळीतून येणारा वारा पाणी थंडगार करी. पडवीतून मागच्या अंगणात बाहेर पडल्यावर उजवीकडे वीस माणसांची पंगत बसू शकेल असं देवघर कम जेवणघर. त्याला लागून कोठारघर आणि स्वयंपाकघर असा पसारा होता. उन्हाळ्यात रात्रीचं जेवण स्वयंपाकघराबाहेरच्या मोकळ्या जागेत असे. या मोकळ्या जागेशी जरा फटकून मागच्या बाजूला अजून एक बाथरूम आणि दोन शौचालयं. या दोन्ही शौचालयांच्या भिंतीवर फुलांच्या डिझाइनच्या चकचकीत टाइल्स मी पन्नासच्या दशकात पहिल्यांदाच पाहिल्या.
पडवीतील जिन्याच्या सातआठ पायऱ्या चढल्यावर एक खोली. जिला मधली खोली म्हणत असत. ती आम्हाला मिळे. इथल्या खिडकीतून रस्त्यावरची रहदारी न्याहाळता येत असे. गोऱ्यापान, नऊवारी नेसलेल्या, गुंडय़ाच्या आजी म्हणजेच लक्षुंबाई हातात परडी घेऊन येताना दिसल्या की मी ओरडून दोन्ही आज्यांना सावध करत असे. ‘आजी लक्षुंबाई आल्या, लवकर फुलं तोडून घ्या.’ आईने ऐकलं तर एक धपाटा मिळे. ‘मित्राच्या आजींना आजीच म्हणायचं. लक्षुंबाई नाही.’ असे आई म्हणे.
बाकीच्या पायऱ्या चढून वर गेलं की पुन्हा लांबलचक पडवी आणि दोन मोठय़ा खोल्या. या दोन्ही खोल्यांना रस्त्याच्या बाजूला बाल्कनी होत्या. या विस्तारित कुटुंबात जी जोडपी असत त्यांना या खोल्या मिळत. बाकी ब्रह्मचारी काकालोक आणि आम्ही मुलं वरच्या गच्चीत झोपत असू. तळमजल्यावरून दोघींपैकी एक आजी वाटी-चमचा वाजवून, गच्चीवर झोपलेल्या पब्लिकला सकाळी चहा झाल्याची वर्दी देत असत. सगळ्या खोल्यांमध्ये निदान दोन तरी कोनाडे होते.
या सगळ्या पसाऱ्याशी संबंध नसलेली अशी दुसऱ्या मजल्यावर एक गच्ची आणि खोली होती. तिथे जायला मागील दाराजवळ वेगळा जिनाही होता. ही खोली एखाद्या विद्यार्थ्यांला राहायला दिलेली असे. विद्यार्थ्यांकडून भाडं घेणं आजोबांना मंजूर नव्हतं. एकदा खोलीची चौकशी करायला आलेल्या एका विद्यार्थ्यांनं भाडं विचारल्यावर आजोबा म्हणाले, ‘सध्या राहातोस ती खोली कितीदा झाडतोस?’ तो बुचकळ्यात पडून ‘एकदा’ असे म्हणाला. त्यावर आजोबा म्हणाले ‘इथे दोनदा केर काढत जा, तेच आमचं भाडं.’ विद्यार्थी सद्गदित झाला नसता तरच नवल. वडीलधाऱ्यांच्या अशा वागण्यानेच मुलांवर संस्कार होत असावेत. त्यासाठी वेगळ्या संस्कार वर्गाची गरज नसते.
ग्वाल्हेरला उन्हाळा कडक. सगळ्या दारं-खिडक्यांना वाळाचे पडदे होते आणि त्यावर पायदानी पाणी झिरपायची सोय केलेली होती. बागेतल्या मोठय़ा हौदाच्या नळाला पाइप लावून बागेला पाणी घालायची सोय होती. हे आम्हा दोघा भावंडांचं आवडतं काम होतं. ग्वाल्हेरचा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी असलेल्या या सोयींबरोबरच सुट्टीत दोनदा बाहेरच्या अंगणात मोठय़ा पॉटमध्ये आइस्क्रीम बनवण्याचा कार्यक्रम असे. उन्हाळी सुट्टी संपवून बनारसला परतल्यावर काही दिवस तिथलं घर लहान वाटे.
सत्तरच्या दशकात आज्या, आजोबा गेले. सगळ्या काकालोकांची लग्न झाली. वाटण्या झाल्या आणि त्या ग्वाल्हेरच्या फेऱ्याही संपल्यातच जमा झाल्या.
यथावकाश बनारसही सुटलं आणि अशीच लहान आणखी लहान घरं करत आम्ही मुंबईला ज्याला प्रशस्त म्हणतात, अशा चार खोल्यांच्या म्हणजेच दोन बेडरूमच्या घरात स्थिरावलो. एक दिवस बाई नाही आली तर हे टीचभर घर झाडणं अंगावर येणारी मी, आता विचार करते, एखाद्याच मोलकरणीच्या मदतीने कशी मेंटेन करत असतील ती घरं त्या स्त्रिया? कालाय तस्मै नम:, हेच खरं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा