धन म्हणजे फक्त पैसा  नव्हे. तर ते विचाराचे, संस्काराचे, मनाच्या मोठेपणाचेही असू शकते, तसेच जैवविविधतेचे सुद्धा! सोसायटीची बठक आटोपल्यावर एका सभासदाने मला बँक ठेवीबद्दल सहज माहिती विचारली तेव्हा मी म्हटले, ‘‘मित्रा! ही सभोवतीची वृक्षराजी, त्याच्यावरील पक्ष्यांचे थवे, फुले, फळे, फुलपाखरे हीच माझी या निसर्गरूपी बँकेतली ठेव, मिळणारी सावली, शुद्ध प्राणवायू, चतन्य आणि उत्साह हे माझे व्याज. सभासद मित्र क्षणभर हळवा झाला. गृहसंकुलातील वृक्ष, तेथे बागडणारे पक्षी हे सोसायटीचे जैविक धन आहे. अशा धनाचा सांभाळ प्रत्येक सभासदाने करावा ही अपेक्षा असते.
 संकुलातील पक्ष्यांची संख्या ही तेथे असणाऱ्या सदनिकांबरोबरच रहिवाशांच्या भाबडय़ा प्रेमावरही अवलंबून असते. प्रकल्प विकासकाने वड, िपपळ, शिरीषसारखे वृक्ष जागेवर ठेवले असतील तर तेथे विविध प्रकारचे पक्षी येतातच, कारण या वृक्षांना भरपूर पर्ण संभार त्यामुळे अन्नसुरक्षेबरोबरच पिल्लांना घरसुद्धा मिळते. मानवाच्या सहवासात आढळणारे पक्षी गृहसंकुलात हमखास आढळतात. यांमध्ये चिमणी, साळुंखी, कावळा, कबुतर आणि कोकिळची कुहुकुहु यांचा प्रामुख्याने समावेश असतो. इतर पक्ष्यांच्या तुलनेत चिमण्या कमी आणि कबुतरांची संख्या नेहमीच जास्त असते.
 चिमणी हा छोटा पण धीट पक्षी सदनिकेच्या गॅलरीत अनेकदा येत असतो. एक घास चिऊचा! असे पूर्वी बाळाचे जेवण असे. याच घासातील भाताचे शीत हा चिऊताईचा हक्काचा आहार असे. आई, बाळ आणि चिऊ यांचे हे आगळेवेगळे सहजीवन आता संपल्यातच जमा आहे. चिऊताईची संख्या रोडावली आणि काऊ? तो मात्र गृहसंकुलाच्या बाहेर ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंडीत जंकफूड शोधताना दिसतो. किंवा सदनिकेच्या एखाद्या खिडकीत आई-आजीने दिलेली बिस्किटे, ताज्या पोळीचा तुकडा अथवा फरसाणावर मनसोक्त ताव मारत असतो. हे त्यांचे खरे अन्न आहे का? याचा कुणी विचारच करत नाही. गृहसंकुलात कावळे असावेत का? या प्रश्नाचे उत्तर नको हेच आहे. कावळा हा निसर्गातील सफाई कामगार आहे. मृत्युपंथास लागलेला जीव अथवा मृतप्राणी, सडलेले पदार्थ, नासलेली फळे हे त्याचे अन्न. तो कायम त्याच्या शोधात असतो. गृहसंकुलाच्या आत अथवा सभोवती असे अन्न उपलब्ध असल्यास कावळ्यांची संख्या वाढते. संकुलातील उंदीर कावळ्यांना कायम आमंत्रित करत असतात. स्वयंपाकघराच्या खिडकीमध्ये ‘काव काव’ करून हक्काने अन्न मागणारा हा पक्षी अनेक गृहसंकुलात कौतुकाचा विषय असतो. कावळ्यांचे असे असणे हे परिसर अस्वच्छतेचे दर्शक आहे.
गृहसंकुलात गर्द वृक्षराजी असेल तर कोकिळची कुहुकुहु अनेकांना पहाटेच्या निरव शांततेमध्ये जाग आणते.  हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा हा सुमधुर आवाज सकाळी लवकर उठविण्यासाठी कितीतरी चांगला. कोकीळ आणि कावळा यांचे आगळेवेगळे सौख्य सर्वानाच माहीत आहे. ज्या संकुलात कावळ्यांची संख्या जास्त तेथे कोकीळची कुहुकुहु तुम्हास हमखास ऐकू येणारच.
चिमणी हा आपल्या सर्वाचाच जिव्हाळ्याचा पक्षी म्हणून गृहसंकुलात तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. चिमुकला आकार आणि गोड चिवचिवाट म्हणून प्रत्येकास चिमणीने आपल्या घरात यावे असे वाटत असते, पण सिमेंटच्या जंगलामुळे ते शक्य होत नाही. मात्र, तुमच्याकडे बाल्कनीतील हसरी बाग अथवा परस बाग असेल तर ती हमखास येणारच. लहान किडे, अळ्या, पानावरची कीड, गवताच्या बिया आणि धान्याचे लहान कण हे तिचे मोजके अन्न. चिमण्यांना जगविण्यासाठी अनेक लोक गॅलरीमध्ये लाकडांची घरटी टांगतात, पण हा प्रयोग तेवढा यशस्वी होत नाही. यावर पर्याय म्हणून गृहसंकुलाच्या बागेत बांबूचे छोटे, पण उंच घर करून त्यावर पन्हाळी पत्रे टाकल्यास बांबू आणि पत्रा यांमध्ये अनेक वळचणी तयार होतात अशा ठिकाणी चिमण्यांना घरटे करणे सोपे जाते. यासाठी एका लाकडी खोक्यात गवताच्या काडय़ा, भाताचे काढ, कापसाची लहान बोळी जरूर ठेवावीत. येथे वर्दळ कमी असावी अन्यथा चिवचिवाट वाढून प्रयोग फसण्याची शक्यता जास्त असते. गृहसंकुलात चिमण्या असणे हा सुदृढ पर्यावरणाचा संकेत आहे.  ‘या चिमण्यांनो परत फिरा रे!’ हा संदेश संकुलाच्या प्रत्येक घरात जाण्यासाठी सोसायटीने प्रतिवर्षी २० मार्च हा ‘जागतिक चिमणी दिवस’ अवश्य साजरा करावा. जिथे चिमणी तिथे साळुंखी हमखास आढळतेच हीसुद्धा संकुलात हवीच.
गृहसंकुलातील कबुतरे हा रहिवाशी आणि सोसायटीस कायम डोकेदुखी असणारा पक्षी आहे. याबद्दलची मनोरंजक माहिती पुढील लेखात.