माझ्याकडे दोन लव्ह- बर्डस् आहेत. त्यांचे दुसरे नाव बगीज. माझ्याकडे कोणी आले की ह्य़ा पक्ष्यांच्या अंगांत संचारते. म्हणजे माझे बोलणे रहाते बाजूला, आधी ह्य़ा पक्षांचे बोलणे ऐकावे लागते. दिवसभर बडबड बडबड सुरू असते. त्यात चिमण्या त्यांचे खाणे खायला आल्या की त्यांच्याबरोबर त्यांचं बोलणं सुरू होतं. बहुतेक गावाच्या उठाठेवी सांगत असतील. किंवा चिमण्यांची विचारपूस करत असतील. मध्यंतरी त्या पक्ष्याच्या घराजवळ चिमण्यांनी भाडय़ाने घर घेतले होते. हा शेजार बरा, त्रासदायक नाही म्हणून चिमण्यांनी दोन अंडी दिली होती. माझ्या या पक्ष्यांना त्याचे केवढे कुतूहल. त्यातून दोन पिल्ले बाहेर आली. दिवसभर ओरडायची ती. त्यांना गोंजारत हे लव्हबर्डस् त्यांना सारखे सांगायचे, ‘थांबा, ओरडू नका. तुमची आई दाणा आणायला गेली आहे, आत्ता येईल.’
या माझ्या पक्ष्यांना पिल्लू न झाल्याने त्याचे दु:ख मला होतेच. दीडवर्ष झालं तरी माझी पक्षिण अंडी देत नव्हती. म्हणून मी एक दुसरी त्याच जातीची पक्षिण विकत आणली.  पहिल्या पक्षिणीने (बहुतेक घाबरून) पाच अंडी दिली. त्यामुळे पक्षिण अंडी उबवायला १५, २० दिवस बॉक्समध्ये बसली होती. हा त्यांचा संसार पाहून मीही मनोमन सुखावले, की चला आता माझ्याकडेही भरपूर पक्षी होणार. पक्षिणीने अंडी दिल्यावर मी घरात ‘कुछ मीठा हो जाए’ यासाठी सात-आठ कॅडबरी आणून ठेवल्या होत्या. अंडय़ातून पिल्लं केव्हा बाहेर येतात व ही खूष खबर मी माझ्या मैत्रिणींना कधी ऐकवते, असं मला झालं होतं. कारण त्या मला नेहमी सांगायच्या, ‘कसले पक्षी वगैरे पाळतेस घरात. उगाच व्याप.’
..पण माझे बॅड लक. अंडय़ावर बसलेली पक्षिण बाहेर आली व नवीन पक्षिणीला मारायला लागली. मी सारखी त्यांची भांडणं सोडवायचे. तसे पाहिले तर नवीन पक्षिण आणल्यापासून माझंही मन मला खात होतं. कारण मी पहिलीची सवत आणली होती. माझ्या मनात सारखा विचार येत होता की, हिला पिल्लं झाली नाही म्हणून माझ्या सुखाकरता मी दुसरी पक्षिण आणायला हवी होती का?
नव्या पक्षिणीने दोन अंडी फोडली व माझ्या हलगर्जीमुळे ती उडून गेली. माझ्या जुन्या पक्षिणीने त्या पक्ष्याचे हाल केले. त्याला मारून मारून त्यांचे पंख काढून टाकले. मी विचारच करत होते की या पक्षाला दुसऱ्या घरात ठेवेन, पण दोन-तीन दिवसांत त्या दोघांचे काय सूत जमले कुणास ठाऊक, ते पुन्हा  गोडीगुलाबीने वागू लागले. माणूससुद्धा आपल्या जोडीदाराशी इतक्या बरोबरीने राहत नाहीत, पण पक्षी जोडीनेच फिरतात. एकत्र राहतात. कोणी एक दुसऱ्याला सोडून राहत नाहीत.
आजकाल माझ्या टेरेसच्या कठडय़ावर एक भारद्वाज पक्षी येवून बसतो. माझे पक्षी त्याच्याशी काय बोलतात कुणास ठाऊक. बहुतेक करून माझी कागाळी करत असतील, की कसे आम्हाला बंद करून ठेवले आहे या बाईने. माझ्याकडे एक गोंडस पॉमेरियन साडेतेरा वर्षे होते. त्याचे नाव न घेता आपण जर त्याच्याविषयी बोललो की हे लगेच उडी मारून माझ्या मांडीत येऊन माझ्याकडे हसून पाहायचे आणि जणूकाही मला विचारायचे, ‘तू माझ्याविषयी बोलते आहेस?’
ते लहान असताना जिथे तिथे शू करायचे. मी रागाने त्याला म्हणायचे, ‘कोणी शू केली?’ कोणासमोर त्याला  असे विचारले की त्याचा अपमान व्हायचा व ते चूपचाप खाली मान घालून कॉटखाली जायचे.
मी मध्यंतरी १५/२० दिवस नव्हते. कामवालीबाई चूपचाप पक्ष्यांना खाणं देऊन जायची. म्हणून की काय सध्या पक्ष्याची माझ्याशी कट्टी फू आहे. कारण मी त्यांना खाणे देताना, डेटॉलने त्यांचे घर पुसताना त्यांच्याशी बोलायचे. पक्ष्यांच्या या बोलीत रमून जाताना माझा दिवस कसा सरतो हे कळंतच नाही.

Story img Loader