‘रथचक्र’ या कादंबरीला आज जवळजवळ ५० र्वष झाली, पण आजही ती पुन्हा वाचताना आपण त्या व्यक्तिरेखांशी, विशेषत: ‘ति’च्याशी समरस होऊन जातो. रथचक्रमध्ये व्यक्तिरेखा आणि वास्तू यांचं एक अभिन्न नातं दिसतं. यातल्या व्यक्तिरेखांना नावं न देता ‘थोरली’ ‘मधली’ ‘मुलगा’ ‘ती’ अशा नावांनी उल्लेख केला आहे. ‘ती’चं खरं नाव ‘लक्षुंबाई’ पण हा उल्लेख फक्त एकदाच येतो. किंवा तिला ‘हळूकाकू’ म्हणून चिडवलं जातं तेही एखाद्या वेळीच बाकी ‘ती’ म्हणूनच आपल्याला सबंध कादंबरीत सामोरी येते.
त्यांच्या घराचं वर्णनही त्यातल्या माणसांच्या अनुरोधानं, ओघाओघात, प्रसंगातून येतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या कोनांतून, वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून आपल्याला ते भिडत राहतं. एक अगदी कोकणी नमुन्याचं घर! अंगण ओटी, माजघर, परसू, तुळशीवृंदावन, गोठा, उतरतं छप्पर, न्हाणी- ऐवज जवळजवळ तोच पण कसा आकाराला येतो? कसे त्याच्यात प्राण फुंकले जातात. आता ही बाळंतिणीची खोली..
या खोलीशी तिच्या अनेक आठवणी निगडित आहेत. ‘ती’ची पहिली रात्र लग्नानंतर तब्बल सहा महिन्यांनी उगवते. त्याबद्दलही तिलाच दोषी ठरविलं जातं. आज ती रात्र आली आहे. मग ती अंधारी खोली आपल्या मनासमोर उजळू लागते. खोलीचा भोवताल काळोखाने भारलेला फक्त खिडकीची चौकट अंधुकशा उजेडात! उशाजवळच्या कोपऱ्यातली उभी मुसळ ती उचलून नीट रचते, दुसऱ्या कोपऱ्यात. फुलांची सेज, गजरे असं काही नाहीच. पण आगरातून आंब्याच्या मोहराचा रसरशीत वास घेऊन आलेली मंद झुळूक तिला फुलवून जाते. नकळत ‘ती’ त्याची आतुरतेने वाट पाहू लागते. पण स्मृतीचीही घृणा वाटावी अशी पहिली रात्र तिच्या वाटय़ाला येते.
पण याच बाळंतिणीच्या खोलीत उजव्या कोपऱ्यात तिचा सुपातही न मावणारा बाळसेदार मुलगा जन्माला आलाय. ‘ती’ कौतुकानं त्या लुसलुशीत गोळ्याला निरखते. तिथून दिसणारा समोरच्या देवघरातील लामणदिवा, उंबऱ्याशी रेंगाळणारी त्याची प्रकाशाची टोकं, देवघरात तासन् तास ध्यान लावून बसलेला तिचा नवरा किंवा सासरे. तिथून ऐकू येणारी झुलणाऱ्या झोक्याची करकर. याच झोपाळ्यावर बसून पहिल्या रात्री तिच्याकडे जावं की जाऊ नये म्हणून तो हेलकावे घेत होता. आंबा, प्राजक्तावरून येणाऱ्या सुगंधी झुळका, निंब, माड, बेल यांच्या पानांची सळसळ, विहिरीच्या रहाटाच्या माळेचा तालबद्ध आवाज नाद, गंध, आकारासह बाळंतिणीची खोली प्रकाशझोत टाकावा तशी वाचकांच्या डोळ्यांसमोर उजळत जाते. याच खोलीतून तिने त्याला प्रथम पाहिलं होतं ते गोठय़ातल्या उतकडावर बसून सुखडी सोलताना. तो उजेडात आणि ती अंधाऱ्या उबदार जागेत खिडकीतून डोकावणारी. कधी तिच्या डोळ्यांनी त्याचं सुखडी सोलण्याचं कौशल्य पाहायला लागतो, ते कळतच नाही.
..आणि ही ओटी! घरात काहीही घडलं की, सगळ्या भावांची बैठक भरते ती ओटीवर! ज्यात बायकांना स्थान नाही, पण प्रश्न तर त्यांच्याशी निगडित असत. त्यांचे नवरे समर्थ असल्यामुळे घरात सत्ता असणाऱ्या त्या दोघी जावा माजघराच्या दरवाजाशी येऊन ओटीवर लक्ष ठेवतात. तर ही पुन्हा बाळंतिणीच्या खोलीतून टाचा उंच कर करून पाहत राहते तिच्या भविष्याचा फैसला; तराजूसारखं खालीवर होत राहणारे संभाषण, ज्यावर हेलकावत राहतं तिच्या मुलाचं भवितव्य. ‘ती’चा मुलगा अतोनात हुशार, तालुक्यात पहिला आलेला. त्याला शिक्षण द्यावं या एकाच इच्छेने प्रेरित होऊन तिनं जणू अख्खा रथ खांद्यावर उचलला आहे. नवरा साधू बनून तीर्थक्षेत्री गेलाय म्हणून ती आणि तिच्या मुलांचा वाली कोणी नाही.
या ओटीवर धाकटय़ा जावेनं भरलेलं मण्यांचं तुळशी वृंदावन भिंतीवर लावलेलं आहे. या झोपाळ्यावर बसून तिचा साधू नवरा तिच्याकडे जाण्यापूर्वी विचारात पडलेला असतो तर लखनौवाला (दीर) आला की, त्याच झोपाळ्यावर बसून भावांना ओरडणं, समजावणं महत्त्वाच्या चर्चा करणं हे करतो.
पण पडवी मात्र खास बायकांची! तिथे बसून धाकटी जाऊ शिवणकाम, भरतकाम करते. पडवीतला झोपाळा तिला आधार देणार आहे. तिचे उसासे शांतपणे ऐकणारा, वेळोवेळी ती त्याच्याशी हितगुज करते. मुलगा जिल्ह्य़ात पहिला आल्याचा आनंद असो, कधी जावांच्या तिरकस शेऱ्याने विद्ध झालेली असो, कधी असा अचानक नवरा आला तर काय होणार याचा भोवंडून टाकणारा विचार असो तिला त्या वेळी झोपाळाच सोबत करतो. तिचं एकाकीपण अधोरेखित करणारा झोपाळा आणि मागल्या दारचं तुळशी वृंदावन तिच्या विसाव्याचं ठिकाण आहे.
माजघरात आडवारणाऱ्या बायका, त्यांच्या पायाशी पाय दाबून देणारी ‘ती’ मधल्या जावेचे पाय चेपायचे कारण तिच्या हातात असलेली सत्ता तर थोरलीचे खरोखरीच्या आदरापोटी, ती थकली असेल म्हणून. उजव्या हाताला खोपटासारखी छोटीशी खोली- खास! थोरलीचं पहिलं वपन झालं तेव्हा याच खोलीनं तिचे हातभर लांबीचे कमरेपर्यंत येणारे दाट केस जमिनीवर पसरलेले पाहिले. निमूटपणे ती या कृत्याला सामोरी गेली. ना दंगा ना आरडा ना एवढाही विरोध! आणि पुढेही कैक वेळा न्हाव्यासमोर मान खाली घालून बसली त्याची साक्षीदार ही खोली.
माजघराप्रमाणे स्वयंपाकघरही बायकांचंच. एकीकडे फोडलेले नारळ पडलेत, ते खवणारी ‘ती’, पत्रावळीवर पडणारा नारळाचा शुभ्र किसाचा ढीग! दुसरी जाऊ पाटय़ावर पुरण वाटतेय. वरवंटा रेटताना येणारा तिचा जड हुंकार. थोरली वैलावर कढीला चरचरीत फोडणी देतेय त्याचा खमंग वास, चांदीची भांडी हलक्या हातानं पुसणारी मधली, त्यांच्या नेत्रकटाक्षांनी आणि तिरकस बोलण्यांनी घायाळ होत असलेली ‘ती’. या स्वयंपाकखोलीला चवीचंही परिमाण लाभलेलं आहे.
विहीरही या घराचा एक भाग. तिच्यावर ओठंगलेला माड, त्याला लगडलेले नारळ, त्याच्यावर माकडासारखा उडय़ा मारीत नारळ पाडणारा तिचा मुलगा, कधी तो उडी मारून विहिरीत पडे आणि प्रेतासारखा तरंगत राहून तिचा श्वास थांबवी, तर धाकटय़ाला पोहोयचीच भीती! ती विहीर, तिचा माळेचा रहाट दु:खामागोमाग सुख येईल, अशी आशा दाखवतात.
घराला असलेलं श्रीमंत आगार त्या वास्तूचं देखणेपण वाढवतं. उत्पन्नाचं साधन असलेल्या नारळी-पोफळी, लक्ष बिल्वपत्रांचा नेम धरता येईल अशी बेलाची झाडं, वेगवेगळ्या जातींचे स्वादाचे आंबे, लखनौवाल्याने लावलेला चवदार कापा फणस त्याहूनही चविष्ट. थोरलीने केलेली त्याची भाजी, कडुनिंबावर लहानपणापासून देवाचं नामस्मरण करणारा ‘ती’चा नवरा. त्याच झाडावरून पडल्यामुळे कोपरापासून त्याचा हात कापावा लागतो. विंझणवारा घालणारा शेवगा..
..आणि अशा या वातावरणातून ती एकदम तालुक्याच्या धर्मशाळेसारख्या कमर खचविणाऱ्या जागेत जाते. लांबच्या लांब पडवी आणि बारीकशी ओटी. तिथे किराणामालाचा, गुळाच्या ढेपींचा भपकारा. नदीला पूर येतो आणि हे घर खोलगट भागांत म्हणून इथल्या सर्वच घरांची जोती उंच होती. त्यामुळे घर बेढब दिसत होतं. वेडंवाकडं का होईना, पण या घराने तिला दोन वर्षे निवारा दिला. तिच्या मुलाचं शिक्षण झालं. इथे जावांची तिरकस बोलणी नव्हती त्यामुळे तिला या घराबद्दल कृतज्ञताच वाटते.
लांब-रुंद आगार, २५ गुरांचा गोठा, प्रशस्त अंगण आणि या सगळ्या पसाऱ्याला पेलून धरील असं मोठं थोरलं घर. कुडाच्या भिंती असलेल्या खोपटातून हे वैभवशाली माडीवालं घर उभं राहिलं आहे. बालदीभर दूध देणारी म्हैस आणि सकाळी ताकासाठी लागलेली बाहेरच्यांची रांग हे सर्व टीचभर घरात राहणाऱ्या आणि फुलकावणी ताक पिणाऱ्या तिच्या दृष्टीने नवलाईचं होतं.
‘मंतरलेले गंडे’ विकून हे वैभव आलंय ते कसं? या रहस्याचा स्फोट माडीवर होतो. मंत्राऐवजी ‘मर लेका..मोज पैसा.. घे गंडा’ असं म्हणत हसत-खिदळत गाठी मारल्या जात. या युक्तीचा धनी मधला दीर तो स्वत:साठी स्वतंत्र खोली बांधतो, दिवसभर चहा-पानाचा रतीब, सरकारी अंमलदारांचं येणं-जाणं, मेजवान्या आणि स्वत:ला मोठा समजणं. तोच तरीचाही मक्ता घेतो. तरीचा खुर्दाही माडीवरच मोजला जातो. वैभव वाढतच जातं, पण माणसांच्या वृत्ती हलक्याच राहिल्यात. हळूहळू ओसरणं सुरू होतं. लखनौवाला भरपूर मदत करीत असतानाही, व्यवस्थितपणाचा अभाव, वारेमाप खर्च, कर्जाचा डोंगर यामुळे घर पोखरलं जातंय. शिक्षणाला त्यांच्या लेखी किंमत नाही आणि तिची शिक्षणाची असोशी समजून घेण्याची इच्छा वा ताकदही त्यांच्यात नाही. रथाचं चाक जसं ऐन युद्धात जमिनीत धसतच जावं तशा तिच्या आकांक्षा मातीत रुतत जातात. एका खांद्यावर पेलून रथ उठवायचे तिचे अथक प्रयत्न आपल्याला दिसत राहतात. ज्या मुलाच्या शिक्षणासाठी ती सगळ्या कुटुंबाशी वैर घेते, भुकेशी सामना करते, खस्ता काढते, कुठल्याही कष्टाची लाज बाळगीत नाही तो सरतेशेवटी मॅट्रिकला पहिला येतो. त्याला तिच्या कष्टांची, निर्धाराची जाणीव आहे, पण आई म्हणून कुठलाही संबंध त्याला ठेवायचा नाही. मोठा मुलगाही आता तिला मानतोय पण दिरांच्या तावडीतून त्याची सुटका नाही. म्हणजे एक आहे म्हणावं तर दुसरं तिच्या हातातून निसटतंय. २० वर्षे त्या घरात राहूनही, दु:ख आणि कष्ट जास्त भोगूनही, घरातल्या माणसांशी नातं न जुळूनही त्या वास्तूशी मात्र तिची नाळ जोडली गेली आहे.
आता हे आयुष्य संपवावं असं तिच्या मनात येतं, पण पाय घसरून विहिरीत पडते तेव्हा रहाटाच्या माळेच्या दोन्ही बाजूंना दोन्ही हातांनी धरून माळेच्या खालच्या टोकावर पाऊल रोवून ती वर पाहते त्याच विहिरीला ती विहिरीच्या आतून पाहते. तेव्हा वर रुंद होत गेलेलं विहिरीचं तोंड आ वासून तिच्याकडे पाहत होतं आणि वर आकाशाचा घुमट पसरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा