मानवी जीवनाच्या सर्वागीण उन्नतीसाठी जगाला शांतता, सहिष्णुतेचा संदेश देणारा गौतमबुद्ध म्हणजे विश्ववंदनीय ठरलेला महामानव. आज अडीच हजार वर्षांनंतरही त्याच्या लोकोत्तर कामगिरीनी जगभरच्या लोकांना भारत भूमीची ओढ आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याची तत्त्वप्रणाली विषद करणारी जी अनेक ऐतिहासिक साधनं आजही उपलब्ध आहेत, त्यातील आठशे कोरीव लेण्यांपैकी ऐंशी टक्के लेण्या आपल्या महाराष्ट्र भूमीवर निर्माण झाल्यात. त्या लेण्या म्हणजे आमच्या महाराष्ट्र भूमीचे वैभव आहेत, पण या देखण्या लेण्यांबरोबरींने त्यातील ‘स्तूप’ या स्मारकस्वरूपी बांधकामालाही इतिहास आहे आणि ते बुद्धाच्या विचारसरणीच्या प्रसाराचे साधनही आहे. तसेच ती ऐतिहासिक ऐवजही आहेत.
‘स्तूप’ म्हटल्यावर मध्यप्रदेशातील भोपाळ शहरानजीकचा रांची येथील टोलेजंग स्तूपाचे रेखाचित्र आपल्या नजरेसमोर येते. पण देशभरातील अनेक लेण्यांमधील चैत्यगृह स्वरूपाच्या प्रार्थना मंदिरस्थानी लहान आकाराचे स्तूपाचे अवशेष हमखास बघायला मिळतात. खरं तर ‘स्तूप’ शब्दाचा अर्थ ढिगारा असा असून आदरणीय मृत व्यक्तीचे स्मारक म्हणून ते उभारले गेल्याची त्यापाठीमागे संकल्पना आहे. गौतमबुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या भक्त-अनुयायांनी त्याची रक्षा, केस व त्याच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे स्मृतीप्रित्यर्थ संवर्धन करून त्यावर छोटे-मोठे स्तुप उभारलेत. बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाचे संस्मरणीय प्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडले त्या ठिकाणी स्तूप आणि अन्य स्वरूपाची स्मारके उभारली गेली. ती अशी आहेत.
१) जन्मस्थान लुंबीनी
२) ज्ञान प्राप्तीचे ठिकाण बुद्धगया
३) पहिल्या प्रवचनाचे स्थळ. सारनाथ-मृगवन
४) महापरिनिर्वाणाचे ठिकाण म्हणजे राजगृह आणि सांक्ष्मा ही सर्वच एकूण आठ ठिकाणं म्हणजे अष्टमहास्थाने म्हणून बौद्ध धर्मात महशूर आहेत. येथील स्मारकांना उभारलेल्या स्तूपांमुळे वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे.
प्राचीन-वेदकालीन मृतदेहाचे दफन (पुरणे) करण्याची पद्धती नव्हती. मात्र, मृताच्या अस्थी किंवा रक्षा जमिनीत पुरून त्यावर मातीचा ढिगारा उभारण्याची पद्धती अस्तित्वात आल्यावर त्या प्रथेतूनच कालांतरानी पुढे ‘स्तूप’ बांधकामाची कल्पना आली असावी असे जाणकारांचे मत आहे. थोडक्यात, स्मृती जतन करण्यासाठी स्मारक हवे ही कल्पना त्यापाठीमागे होतीच.
लेण्या व मैदानी प्रदेशातील छोटय़ा मोठय़ा स्तूपांचा आकार हा अर्धवर्तुळाकार असतो. मात्र लेणी समूहातील स्तूपांमध्ये अवशेष नसतात. त्याची प्रतीकात्मक पूजा करण्याचा परिपाठ आहे. देशभरच्या बौद्धस्तूप वास्तू रचनेपाठीमागे गर्भित अर्थ सामावलेला आहे. त्यातून बौद्ध विचारसरणीची वैचारिक प्रगल्भता जाणवते. ती खालीलप्रमाणे..
१) ज्यावर स्तूप वास्तू उभारली गेली ते जोते किंवा चौथरा.. म्हणजे भूलोक
२) त्यावरील अर्धवर्तुळाकार बांधकाम याला अंड असे संबोधतात. याचा घुमटीवजा अर्धगोलाकार आकार म्हणजे आकाशाचे प्रतीक मानण्यात येते.
३) त्यावरील भागाला ‘हर्मिका’, असे म्हणतात. म्हणजेच देवलोक मानले जाते.
४) ‘यष्ठी’- विश्वाचे रूप दर्शन
५) यष्ठीवर ज्या छत्र्या दर्शवल्या जातात त्याला ‘छत्रावली’ असे संबोधतात.
भव्यतेच्या स्तूप वास्तूशी सुसंगत असा ध्वजस्तंभही प्रांगणात उभारण्याचा प्रघात होता.
देशातील कोणत्याही लेणीसमूहात जे प्रशस्त दगडी प्रार्थनागृह पाहावयास मिळते तेच कालांतराने ‘चैत्यगृह’ म्हणून ओळखले जायला लागले. या चैत्य गृहाच्या टोकाला बुद्धाचे स्मारक म्हणून छोटेखानी स्तूपाचे बांधकाम पाहावयास मिळते. त्याचं पावित्र्य, गांभीर्य ध्यानी घेऊन या स्तूपाची पूजापाठ करण्यासाठी व संरक्षणासाठी लाकडी अर्धगोलाकार कमानी उभारल्याचे दिसते. ‘स्तूप’ वास्तूचा अर्ध गोलाकार आकार ध्यानी घेऊन चौकोनी किंवा आयतकोनी प्रशस्त दगडी सभागृहात त्याची टोकाला निर्मिती केल्याचे जाणवते. अर्धगोलाकार स्तूपाच्या वरचा छताचा भागही अर्धगोलाकार किंवा हत्तीच्या पाठीसारखा आहे. त्याला आकर्षक टिकाऊ लाकडी पट्टय़ांचे कोंदण असल्याने चैत्यगृहाला एक वेगळीच शान प्राप्त झाली आहे.
स्तूपाच्या बांधकामाला पुरातन इतिहासाच्या पाश्र्वभूमीसह धार्मिकतेचे अधिष्ठान आहेच. भारत देशात सर्वात प्राचीन स्तूप उत्तर प्रदेशातील ‘बस्ती’ जिल्ह्यातील ‘पिपरवा’ या गावी आढळला आहे. या स्तूपाची निर्मिती इस. पूर्व ४५०च्या सुमारास झाली आहे. पण त्याकाळच्या स्तूपांच्या बांधकामात कलात्मकतेचा अभाव असून विटांच्या बांधकामावर सुरक्षिततेसाठी जाड गिलावा देऊन दिव्यांसाठी कोनाडे ठेवल्याचे आढळते. महाराष्ट्रात प्राचीन स्तूपांचे अवशेष ठाणे जिल्ह्यातील नालासोपारा, मुंबई उपनगरातील कान्हेरी लेणी आणि घारपुरी लेणीसमूहात पाहावयास मिळतात. सारनाथ, बुद्धगया, सांचीप्रमाणे दक्षिण भारतात अमरावती, नागार्जुन कौंडा इ. ठिकाणचे महाकाय स्तूप मोकळय़ा मैदानात असून, त्याचे बांधकाम दगड, विटा, चुना आणि मातीच्या साह्याने केले गेले आहे.
प्राचीन काळी अज्ञात शिल्पकारांनी लेण्या खोदताना पहाडातील मर्यादित जागेत मैदानी विशाल स्तूपांची निर्मिती करणं शक्य नाही हे जाणले होते. त्यामुळे प्रसारातील खोदकाम करून लहानशा उपलब्ध जागेत आपले निसर्गदत्त कौशल्य पणाला लावून त्यांनी स्तूपाच्या शिल्प निर्मितीने हेतू साध्य केलाय हे विशेष. महाराष्ट्रातील कार्ला-बेडसा लेण्यातील स्तूपाच्या शिल्पातून स्तूपाच्या मूळ कल्पनेचा आविष्कार ध्यानी येतो. विशेष म्हणजे कार्ले, बेडसे, भाजे येथील स्तूपांवर लाकडी छत्रावलीची रचना आहे. येथील ‘स्तूप’ स्तूपसंकल्पनेची कल्पना येण्यास पुरेसे आहेत.
लेणीसमूहात जेथे स्तूप आहेत त्या कक्षाला चैत्यगृह असे नामाभिमान आहे. हे चैत्यगृह म्हणजे बौद्धस्तूपधारी प्रार्थनागृह. चैत्यगृहाचा आकार हा आयत कोनी असून त्याच्या टोकाला स्तूपाचे स्थान असते. येथील स्तूपांना प्रदक्षिणा घालण्यासाठी त्याच्या सभोवताली कठडय़ासह प्रदक्षिणामार्ग असतो. चैत्यधारी लेणीसमूह म्हणजे धार्मिक, शैक्षणिक पाश्र्वभूमीचे एक व्यासपीठ प्राचीन काळी होते. धर्म प्रसाराच्या बरोबरीनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी बौद्ध आचार्य, भिक्षू यांची सतत देशभर भ्रमंती चाललेली असायची. त्यांच्या निवास, चिंतन, मनन, अध्ययनासाठी लेणीसमूहात जे कक्ष निर्माण केले गेले. त्यांनाच ‘विहार’ असे म्हणतात. काही ठिकाणी असल्या कक्षामध्ये दगडी बाकांची सोय असून बंदिस्तपणासाठी दरवाजेही होते.
सांचीचा महास्तूप : मध्यप्रदेशातील भोपाळपासून ४० कि.मी. अंतरावरील हा महास्तूप देशाचा राष्ट्रीय ठेवा आहे. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बौद्ध धर्म प्रसारासाठी ज्या वास्तू, स्तंभ उभारले त्यातील ही जगविख्यात वास्तू. अशोकाने बांधकाम केलेली ही मूळ वास्तू खरं तर लहान स्वरूपात होती. मात्र त्याच्या पश्चात त्याचे वारसदार व अनुयायांनी त्याचे आकारमान विस्तृत केले. या स्तूपाचा व्यास सुमारे १२० फुटांचा आहे. तसेच या महाकाय स्तूपाच्या चारही दिशांना चार देखणी-आकर्षक तोरणे उभी केली गेली. त्याच्या बांधकामात एकसूत्रीपणा आहे, मात्र त्यातील कोरीव कामात फरक जाणवतो. त्यापैकी एका तोरणाजवळ सम्राट अशोकाचा शिलालेख आहे. या वास्तूशिल्पातील सौंदर्य आणि प्रमाणबद्धपणा पाहाता क्षणीच जाणवतो. तोरणावरील जातक कथेतील प्रसंगासह गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रमुख प्रसंगांच्या कोरीव कामातील सादरीकरणातून शिल्पकारांनी खूप काही साध्य केलंय. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या प्रसंगीचे दु:खद भाव चेहऱ्यावर दाखवण्यात शिल्पकारांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे. चार दिशांना उभारलेल्या तोरणावरील शिल्पातून त्या काळातील समान, जीवन, वेशभुषा, केशभुषा, दागिने कसे होते याची चटकन कल्पना येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा