फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. परंतु  आनंदाच्या भरात फटाके वाजवताना त्याचा आपल्या इमारतीला धोको पोहचू नये, याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे.
आपण दिवाळी आली की, घराची झाडलोट करतो, कधीकधी रंगरंगोटीही करतो, पडदे बदलतो तसंच गृहसजावटीच्या नवनवीन वस्तू खरेदी करतो. या सर्वामागे आपल्या घराविषयीचा आपल्याला वाटणारा जिव्हाळा असतो. सणाला घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपलं घर अधिक सुंदर आणि नीटनेटकं दिसावं, हा यामागचा हेतू असतो. पण हे सर्व करत असताना घराची सुरक्षितता बघणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसात दिवाळी साजरी करण्याचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे फटाके लावणं. फटाक्यांची आतषबाजी ही नेत्रसुखद असते. पण अशा फटाक्यांमुळे वातावरणावर हवा आणि ध्वनिप्रदूषणासारखे दुष्परिणाम होतातच, पण इमारतीला धोकाही निर्माण होऊ शकतो किंवा काही दुर्घटनाही घडू शकतात. असे परिणाम कोणते किंवा याबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणू घेऊ या-
* काही फटाके हे प्रचंड आवाज करणारे असतात. अ‍ॅटमबॉम्बसारख्या किंवा त्याहीपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या नवनवीन फटाक्यांमुळे इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: ज्या इमारती जुन्या आणि मोडकळीला आलेल्या आहेत अशा इमारतींना जर मोठे हादरे बसले तर या हादऱ्यांमुळे इमारतीला बारीक तडे जायची शक्यता असते.
*  इमारतीला आधीच जर असे बारीक तडे गेले असतील, तर ते अधिक रुंदावण्याचीही शक्यता असते.
*  अशा तडय़ांचं एकदा भेगांमध्ये रूपांतर झालं की, त्यानंतर येणाऱ्या पुढल्या पावसाळ्याच्या वेळी त्या भेगांमधून पाणी मुरून िभतींमध्ये ओल येणं, किंवा पाण्याची गळती सुरू होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
*  अशा भेगा जेव्हा इमारतीच्या स्ट्रक्चरल भागांना म्हणजे बीम, कॉलम किंवा स्लॅब यांना जातात, तेव्हा या भेगांमुळे इमारतीला धोका संभवू शकतो.
*  तसंच या भेगांमधून हवेचा शिरकाव झाला की, वातावरणातल्या प्राणवायूचा आतल्या सळ्यांच्या लोखंडाशी संयोग होऊन त्यांना गंज चढण्याची प्रक्रिया सुरू होते.
*  पावसाळ्यात या भेगांमधून आत शिरलेलं पाणी जेव्हा या सळ्यांच्या संपर्कात येतं, तेव्हा सळ्या गंजण्याची प्रक्रिया अधिक वेग घेते.
*  अशा प्रकारे जर सळ्या गंजल्या, तर वजन तोलून धरण्याची बीम किंवा कॉलमची क्षमता घटू लागते आणि इमारतीसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
*  कधीकधी इमारतीच्या पायाखालची माती ही चिकणमातीमिश्रित वाळूची असेल, आणि इमारतीला जर कमी खोलीचा, फुटिंग या प्रकारातला पाया असेल, तर फटाक्यांच्या आवाजामुळे बसणाऱ्या मोठय़ा हादऱ्यांमुळे ही माती खचू शकते. या खचण्यामुळे तो विशिष्ट पाया आणि त्यावरचा विशिष्ट कॉलमही खचू शकतो. तसं झालं, इतर कॉलम खचलेले नसताना केवळ काही ठराविक कॉलम खचले, तर त्याचा ताण त्यावर रेलून उभ्या असलेल्या बीमवर पडून बीमला तडे जायचीही शक्यता नाकारता येत नाही.
*  याव्यतिरिक्त इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी अनेकजण भुईचक्र, अनार यांसारखे फटाके लावत असतात. याच प्रवेशद्वारापाशी विजेचे मीटर बसवलेले असतात. त्यामुळे या फटाक्यांच्या ठिणग्या जर या विद्युत उपकरणांवर पडल्या, तर आगीसारख्या मोठय़ा दुर्घटनाही घडू शकतात. त्यामुळे फटाके लावताना अशा विद्युत उपकरणांपासून ते दूर लावण्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
*  काहीजण गच्चीच्या कठडय़ावरही फटाके लावतात. हेही अत्यंत चुकीचे आहे. कारण जळते फटाके खाली पडले, तर खालून जाणाऱ्या माणसांना इजा व्हायची शक्यता असते.
* याबरोबरच हल्ली बऱ्याचदा केबल टीव्हीच्या आणि इंटरनेटच्या केबल्स एका इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या इमारतीच्या गच्चीवर टाकलेल्या असतात. ते चूक की बरोबर हा वादाचा आणि स्वतंत्रपणे चíचण्याचा मुद्दा असला तरी असे जळते फटाके जर या केबल्सवर पडले, वा या केबल्स जळतजळत जर एखाद्याच्या घरात गेल्या, तर टीव्ही, कॉम्प्युटर अशा उपकरणांचे फार मोठे नुकसान होण्याबरोबरच आग लागण्याचीही शक्यता असते.
हे सर्व धोके जर टाळायचे असतील तर त्याकरता आवाज करून हादरे बसवणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळायला हवा. तसंच केवळ रोषणाई करणारे किंवा बिनआवाजाचे फटाके लावतानाही, ते गच्चीत किंवा इमारतीच्या परिसरातल्या विद्युत उपकरणांजवळ लावू नयेत, तर इमारतीसमोरच्या मोकळ्या आणि सुरक्षित जागेत लावावेत. दिवाळी हा सण आनंदाचा आहे. तो आनंदाने साजरा करण्यासाठी इमारतीची सुरक्षा जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ आपलं घरच सणासुदीला सजवणं पुरेसं नाही, तर आपल्या इमारतीचीही काळजी घेणं हेही तितकंच गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला निवारा देणाऱ्या त्या इमारतीच्या मुळावर उठणं म्हणजे बसल्या फांदीवर घाव घालण्याचा अविचारीपणा करण्यासारखंच होईल. ते टाळायला हवं.

Story img Loader