सिंहावलोकन करण्यात तुलना करण्याचा हेतू नाही, तर काळाच्या गतीनुसार झालेले बदल टिपण्याचा विचार असतो. भूतकाळात डोकावत शतकाची लक्ष्मणरेषा ओलांडली तर काय दिसते. तर शिक्षणाने समाज प्रगत होऊ लागलेला असतो, त्यामुळे अर्थकारण उंचावत. अन्न, वस्त्र निवारा या आवश्यक गरजा. अन्न, वस्त्राची सोय झाल्यानंतर निवाऱ्याचा क्रम लागतो. खिशाच्या आकारमानाला थोडं धाडस करून काढलेल्या कर्जाची साथ देत घराचं स्वप्न पुरं केलं जातं. कुणी मालकीचं घर घेतात तर कोणी भाड्याच्या घराला पसंती देतात. ‘या नं आमचं घर बघायला, दोन मोठ्या खोल्या आणि मागे पुढे गॅलरी, छान मोकळी जागा आहे, असं शब्दघर रेखाटलं जातं. स्वयंपाकघराला लेबल लावलं जातं. पण इतर खोल्यांचं नामकरण करण्याकडे कल नसतो. मोठा बंगला असेल तर ओटी, पडवी, माजघर, बाळंतिणीची खोली, दिवाणखाना अशी वास्तुरचना दाखवली जाते. पण ही ‘झोपण्याची खोली’ असं लेबल सहसा लावलं जात नाही. नाही म्हणायला झोपेशी संबंधित एक माणूस झोपू शकेल अशी एखादी लोखंडी कॉट किंवा शिसवी लाकडाचा भक्कम पलंग, कोपरा अडवून बसलेला असतो. त्याच्या चार कोपऱ्यांना चार दांडे असून त्यावर मच्छरदाणी अडकवायची सोय असते. एरवी बसण्यासाठी त्याचा वापर जास्त. कॉट किंवा पलंगावर एकच व्यक्ती सुखात झोपू शकते. मग घरातल्या इतरांची झोपायची व्यवस्था काय…

…तर तो असतो गाद्या घालण्याचा दिवसाचा शेवटचा जंगी कार्यक्रम. दुपारच्या वेळी घरातील ज्येष्ठ स्त्रीला आडवे व्हावेसे वाटले किंवा काम करून थकवा आल्यावर जमिनीला पाठ टेकवावीशी वाटली तर चटईचा किंवा सतरंजीचा पर्याय उपलब्ध असे. कधी कधी हाताची उशी करूनच ती डुलकी काढत असे किंवा वामकुक्षी घेत असे. खूप वेळ लोळायची तिची तयारी नसे. ज्येष्ठ पुरुषासाठी कॉट असे. दिवस लवकर उजाडत असल्यामुळे रात्रीची जेवणं उरकून झाकपाक झाली की झोपण्यालाच प्राधान्य असे. त्यासाठी मग गादी घालण्याचा जंगी कार्यक्रम असे. रंगभूमीवर जसं नेपथ्य बदललं जातं, तसं झोपण्याची व्यवस्था करण्यासाठी जास्त करून तरुण वर्ग आणि मध्ये मध्ये लुडबुडणारा कुमारवयीन वर्ग कामाला लागे.

सुरुवातीला आपापला पसारा आवरण्याच्या सूचना घरातल्या लहान-मोठ्या सगळ्यांना मिळत. अभ्यासाची दप्तरं भरून जागेवर ठेवली जात. बालगोपाळांची इतस्तत: विखुरलेली खेळणी एका ठिकाणी एकत्र करून ठेवली जात. ‘आता उपसायची नाहीत हं, गाद्या घालायच्या आहेत’ अशी दादागिरी, ताईगिरी चालू असे. ‘कपडा धुवायला टाकायचा आहे की घडी करून ठेवायचा आहे?’ असे प्रश्नही कानावर आदळत. तंद्रीत असलेल्यांना ‘जागं’ करून त्याचं उत्तर शोधलं जाई. त्याबरहुकूम कृती केली जाई. घडी घालून ठेवायच्या खुर्च्या असतील तर घडी घालून त्या दोन कपाटांच्या मधल्या जागेत किंवा सांदीकोपऱ्यात सरकवल्या जात. तसं नसेल तर एकात एक अडकवल्या जात. मध्ये मध्ये लुडबुडणारी स्टुलं कॉटखाली किंवा गॅलरीत ढकलली जात. रोजच्या सवयीमुळे ‘इथे ठेवू की तिथे ठेवू’ हा प्रश्नच उद्भवत नसे. झोपेच्या प्रयोगासाठी रंगमंच व्यवस्था चोख पार पाडली जाऊन रिकाम्या जागा भरल्या जात आणि आयताकृती खोली अंथरूणे घालून घेण्यास सज्ज होई.

‘केरसुणी फिरवा बरं का!’ न चुकता घरातील जेष्ठ ‘आकाशवाणी’ होई. केर काढला जाई, पण ‘रोज काढतो तरी सूचना द्यायला विसरत नाही’ असा रागावलेला भाव केर काढणाऱ्याच्या चेहऱ्यावर हमखास उटत असे. मग ठरावीक जागी ठरावीक सतरंज्या, चटया किंवा जाजम घातलं जाई. यात नियमभंग चालत नसे. पाहुण्यांचा आकडा बघून स्वयंपाकघरही त्यातून सुटत नसे. काही गाद्या कॉटवर एकावर एक पहुडलेल्या असत तर काही आटोपशीर, घट्ट गुंडाळी करून घडवंचीवर ठेवलेल्या असत. छोट्यांनी हट्ट केला की शिक्षा करण्यासाठी ते उच्चासन असे. एक एक गादीची गुंडाळी हळूच सतरंजीवर टाकली जाई, पण कधी नेम चुके. अशा वेळी गादी न उचलता सरकवण्याचा प्रयत्न केला तर सतरंजी विस्कटत असे. त्यावेळी गादी पुन्हा गुंडाळून टाकली जाई. सूचनांची पार्श्वभूमी सावध करतच असे. कॉटवर आडव्या लोळणाऱ्या गाद्या उचलताना कोणीतरी दोघेजण पुढे येत आणि दोन कोपरे धरून गादी पाळण्यासारखी हलवत आवश्यक ती काळजी घेत खालील सतरंजी किंवा चटईवर टाकली जाई. नुकतंच पाय, तोंड फुटलेलं लहानगं झोपाळा करण्याचा हट्ट करे. मग वाजंत्री आणि नंतरची फेकाफेकी टाळण्यासाठी हट्ट पुरवावाच लागे. मनासारख्या व्यवस्थित, भिंतीपासून थोडंसं अंतर ठेवून गाद्या टाकून झाल्या की पलंगपोस घालण्याच्या कामाला वेग येई. ‘एकमेकां साहाय्य करू’ या मंत्राचा उच्चार होई. ‘अरे किती ओढतो आहेस, एकाच बाजूला, चारी बाजूंना सारखे अंतर ठेव बघू’ त्यातल्या त्यात ज्येष्ठ कर्मयोगी सल्ला देण्याची जबाबदारी पार पाडत. सुरकुत्या न पाडता मनापासून पलंगपोस घातला की तिरकी मान करून बघताना घालणाऱ्याला समाधान वाटे. भूमितीचा विषय मनात ताजा झालेला असे. घतलेल्या गाद्यांवर चिमण्यापावलांची सर्कस चालू होई. अशातच उषा आपापल्या जागेवर बसत. पायाशी पांघरूणं घडी घालून बसत. सोलापुरी चादरीबरोबरच घरातील जुन्या नऊवारी साड्यांच्या चौघड्या असत. त्यांच्या मऊ, ऊबदार स्पर्शाचं सगळ्यांना अप्रूप असे. थंडीत तर त्यांचा ‘भाव’ फारच वाढत असे. चादरींच्या आतल्या बाजूला लपून त्या ऊब निर्माण करत. प्रत्येकाचं पांघरूण, चौघडी ठरलेलं असे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी पांघरूणं असत. उशा कमी पडल्या की एक उशी दोघंजण वाटून घेत. त्यावेळी डोक्याला डोकी आपटत. जास्त कमी माणसं जमली तर शेजारी शेजारी, आपापसात गप्पा मारत सर्वजण झोपी जात. काही कारणाने खूप गर्दी झाली तर अडचणीत अंथरूण पाहून पाय पसरत सगळे जोपी जात. खाली पडण्याची भीती नसल्यामुळे सगळे सुखात लोळत.

कोणी मुर्कुंडी घालिती। कोणी कानवडे निजती।

कोणी चक्री फिरती। चहुकडे।

येक दु:स्वप्ने निर्बुजले। येक सुस्वप्ने संतोषले।

येक ते गाढमुढी पडिले। सुषुप्तिमध्ये ।

या समर्थ वचनांची प्रात्यक्षिकं बघायला मिळत. उन्हाळ्याच्या दिवसांत हाच प्रयोग गच्चीत, अंगणात किंवा पत्र्यावर होत असे.

सकाळी मात्र लवकर उठावेच लागे. आधी ‘हाका’ मारून, मग पांघरूण खेचून उठवलं जाई. पलंगपोस, चादरी, चौघड्या यांची चारी टोकं जुळवून नीटनेटक्या, आटोपशीर घड्या करून बंद बाजू दर्शनी भागात करून एकावर एक ठेवल्या जात. हाताला व्यवस्थितपणाचे वळण असेल तर अगदी कपड्यांचं दुकान आहे असंच वाटे. आल्या गेलेल्याला कसं सामावून घ्यायचं हा धडा चांगला गिरवला जात असे. एखादा काही कारणाने झोपला असेल तर आाजूबाजूचं सगळं आवरून पूर्ववत करून टाकलं जात असे. असं जमिनीवर झोपण्यातलं सुख काही आगळंच असे.

काळ पुढे सरकला आणि बीएचके संस्कृती अस्तित्वात आली. झोपण्यासाठी बेडरूमला नावानिशी स्वतंत्र अस्तित्व मिळालं. मोठ्या डबल बेडने खोली अडवून टाकली. गाद्या घालणं, काढणं, आवरणं हे भूतकाळांत जमा झालं. सहज होणारा सामुदायिक हलका व्यायाम संपुष्टात आला. लोळण्यासाठी २४ तास गादी वाट पाहू लागली. ‘झोप’ खोलीभर पसरली. खोलीचं दार बंद झाल्यामुळे ‘प्रायव्हसी’ ने आत पाऊल टाकलं. कालाय तस्मै नम:। आर्थिक स्तराबरोबर झोपही उंचावली. साहजिकच जमिनीपासून दूर गेलो लांब गेलो, अंतर पडलं. काळानुरूप बदल हे व्हायचेच नाही का!
suchitrasathe52@gmail.com