सुचित्रा साठे
घर म्हंटलं की काही जागा ठरलेल्या असतात. मुख्य दरवाजाजवळ पादत्राणं काढून ठेवण्याची जागा, बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची जागा, झोपण्याची जागा, तशीच स्वयंपाक करण्याची जागा ही ठरलेली असते. किंबहुना ही घरातील अति महत्त्वाची जागा असते. तिच्या स्वच्छतेबाबत तिला बाहेरच्या माणसांपासून जरा अलिप्त ठेवण्याबाबत आग्रही भूमिका घेतली जात असते.
नदीच्या उगमस्थानाकडे जाण्यासाठी जसं विरुद्ध दिशेने पोहत मागे जावं लागतं, तसं काळाची पानं उलटत मागे गेल्यास विसाव्या शतकाच्या मध्यावर स्वयंपाकघराचं सर्वसाधारणपणे चित्र दिसायचं ते असं. घरोघरी मातीच्या चुली स्वयंपाकघर नामक खोलीच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेल्या असायच्या. उठल्याबरोबर चूल पोतेरं करून रांगोळीची रेघ काढून सजल्यावर ‘त्या’ डोळ्यात भरायच्या. घरातली स्त्री चुलीजवळ पाटावर बसून स्वयंपाक करायची! बाजूच्या भिंतीवर स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक असलेली भांडीकुंडी असायची. पातेली, डब्यांची उतरती भाजणी, तर वाटय़ा, पाणी प्यायची भांडी यांचे मनोरे उभे राहायचे. ताटाळ्यात ताट, ताटल्या यांचं आपापसात गुळपीठ असायचं. कपबशाळं कानांत कप अडकवून घ्यायचे. जाळीच्या कपाटातून दूधदुभत्याची श्रीमंती डोकवायची. स्वयंपाकपाणी करताना हात धुवायला, पदार्थ धुवायला मात्र बहुतेक वेळा तिथे जागा नसायची. थोडी गैरसोयच असायची. चुलीसमोर बसून पोळ्या भाकरी करताना समोरच पंगत बसायची. तव्यावरची टुम्म फुगलेली पोळी किंवा भाकरी जेवणाऱ्याच्या पानांत उडी मारायची. अशी सगळी अंगतपंगत जमायची. एक मात्र व्हायचं, स्वयंपाक म्हणजे सांडलवण आलीच. त्या जागेभोवती लक्ष्मणरेषा नसल्यामुळे तिथे बालगोपाळांचे, धसमुसळ्या किशोरवयीन मुलामुलींचे पाय पडण्याची शक्यता निर्माण व्हायची. घरभर खरकटं होणं, तसं शिस्तीत बसायचं नाही, मनाला पटायचं नाही. कदाचित ही गोष्ट मनात खटकत असल्यामुळे स्वयंपाकाची जागा आडव्या रूपात चार-पाच इंच उंच झाली ‘बैठा ओटा’ या नामकरणाने ओटय़ाचा जन्म झाला.
याच सुमारास चुलींची जागा, वाजता किंवा वातीच्या स्टोव्हने पटकावली. सिमेंटच्या बैठय़ा ओटय़ाच्या सोबतीला हात धुवायला, पदार्थ धुवायला छोटासा कोपरा ‘मोरी’ म्हणून चिकटला. ओटा आणि मोरी यातल्या सामाईक भिंतीने मान दोन-अडीच फुटांपर्यंत वर उंचावली आणि त्या रुंद कठडय़ावर पाणेरं म्हणजे पाण्याचं पिंप, माठ असं साठवण विसावलं. स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला थोडंसं उच्च स्थानावर बसल्यासारखं वाटू लागलं. आवश्यक ती भांडय़ांची आरास दिमतीला होतीच. स्वयंपाकाच्या जागेवरचे पोराटोरांचे अतिक्रमण कमी व्हायला लागले. जेवणाचं कोंडाळं खाली स्थिरावतं.
कालचक्र पुढे सरकलं. ओटय़ावर ‘बसून’ स्वयंपाक करून करून जणू पाय अवघडले. त्यातच स्टोव्हची जागा गॅसच्या शेगडय़ांनी घेतली. लायटरची वर्णी लागेपर्यंत एका पत्र्याच्या गोल डब्यात पोस्टकार्डासारख्या जाडसर कागदाचे लांबट तुकडे आगपेटीच्या काडय़ांची बचत करण्यासाठी ओटय़ावर आवर्जून हजेरी लावू लागले.
स्वयंपाकाबरोबरच शिक्षणामुळे, परिस्थितीमुळे स्त्रीवर अर्थार्जनाची जबाबदारी येऊन पडली. वेळ हा कळीचा मुद्दा ठरला. उठबस करण्यात वेळ घालवण्यापेक्षा उभ्या उभ्या काम उरकणं सोपं पडेल असं तिला वाटू लागलं. तिच्या मताचा आदर ठेवत ओटा चांगलाच उंचावला. त्याने स्टँडर्ड उंची आणि खोली गाठली. त्याचं स्थान नजरेत भरू लागलं. इतकंच नव्हे तर त्याच्या पोटातही त्याने ‘जागा’ दिली. घरातल्या भांडय़ांच्या पसाऱ्यानुसार तिथे कप्पे केले गेले. ओटय़ाची धारणक्षमता वाढली. लाल सिलिंडरने ओटय़ाखालची अगदी कडेची जागा कायमस्वरूपी पटकावली. आणखीन एक बदल झाला. ओटय़ाच्या शेजारी असलेल्या मोरीने बोन्साय रूप ‘सिंक’ या नावाने धारण करून ओटय़ाशी कायमस्वरूपी न तुटणारी युती केली. एवढं स्थित्यंतर होऊनही ओटय़ाचं रूप तसं साधं ओबडधोबडच होतं.
घराने बीएचके सूत्रात बांधून घेतल्यावर स्वयंपाकघराचं किचन झालं आणि ओटय़ाच्या रूपात लक्षणीय बदल होत गेला. त्याचा आकार एल, यू, जे या इंग्रजी आद्याक्षरांशी मिळताजुळता होत गेला. मार्बल किंवा काळा, हिरवा अशा विविधरंगी ग्रॅनाइटने तो चमकू लागला. गुळगुळीत दिसू लागला. त्याच्या मागच्या, बाजूच्या भिंतींनाही सुंदर आकर्षक नक्षीच्या टाइल्स चिकटल्या. रूपच बदलून गेलं.
ओटय़ाच्या खालची जागा तर आता इंच इंच लढवून योग्य प्रमाणात वापरली जाते. प्रत्येक गोष्टीला गरजेनुसार जागा ठरवून दिलेली असते. त्यासाठी ड्रॉवर्स असतात. अॅडजेस्टेबल शेल्फ होतात. पूल आउट कॅबिनेट तयार होतात. ट्रॉलीज्असतात. आणि हे सगळं बंद दाराआड सामावतं. गुलदस्त्यात राहतं. फक्त ओटय़ाच्या खालचीच जागा वापरली जाते असे नाही, तर ओटय़ाच्या वरती कपाटं भिंतीत ठोकली जातात. सगळं कसं मोजूनमापून आकर्षक पद्धतीने केलं जातं. त्यातलं वैविध्य टिपताना ‘बघत राहू दे तुझ्याकडे’ अशीच अवस्था होते.
गॅसच्या शेगडीवरील चिमणी धुराला बाहेर पळवते शिवाय पदार्थावर प्रकाशझोत टाकते. स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचं लक्ष एकवटावं, पदार्थाच्या रंगरूपाच्या बाबतीत जागरूक असावं म्हणून ही काळजी. मायक्रोवेव्ह, मिक्सर अशी इलेक्ट्रिक उपकरणे व्यवस्थित जागा पकडून ओटय़ाचं ‘स्टेटस् वाढवतात. अॅक्वागार्डच्या कार्यशैलीमुळे शुद्ध पाणीपुरवठा ‘आरोग्य’ संभाळतो. घरात ओटय़ावर फारसा उजेड असतोच असे नाही. चिमणी ‘चिमणी एवढा’ प्रकाश पाडते तरीसुद्धा खास दिव्यांची योजना करून ओटय़ाचे ‘लाड’ केले जातात. स्वयंपाकघराच्या स्वच्छतेची सगळी जबाबदारी ‘सिंक’ संभाळते.
हा सगळा मेकओव्हर अनुभवी नजरेतून सुनियोजितपणे केला जातो. उपयुक्ततेबरोबरच सोय आणि स्टाइल जपली जाते. सगळ्या गोष्टी ‘हाताशी’ असणं, हात जरासा उंच केला की हातात येणं, घरातील सर्वाना विचारात घेणं हे महत्त्वाचं. सगळा मागचापुढचा, बारीकसारीक विचार करून ओटा सजवला जातो. साहजिकच स्वयंपाक करणाऱ्यांचा हुरूप वाढतो, प्रसन्नता वाढते. शेवटी सगळं टीचभर पोटासाठीच की!
suchitrasathe52@gmail.com