अजित सावंत
या लेखात आपण रेडीमेड फर्निचर व कस्टममेड फर्निचरची तुलना पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण रेडीमेड फर्निचरबद्दल माहिती घेऊ या. रेडीमेड फर्निचर म्हणजे अर्थातच विकतचे तयार फर्निचर. आधीच्या काळात रेडीमेड फर्निचर शोरूम्स खूप कमी प्रमाणात होती; पण साधारणपणे गेल्या वीसेक वर्षांत या शोरूम्सचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या शोरूम्समध्ये फर्निचरच्या डिझाइनचे अनेक पर्याय उपलब्ध असून, फर्निचरच्या किमतीचा आवाका हा काहीशे रुपयांपासून काही लाख रुपयांपर्यंत आहे. बऱ्याच शोरूम्समध्ये सुलभ हप्त्यांवरदेखील फर्निचर मिळते. हे फर्निचर दिसायला सुंदर जरी असले तरी त्याला काही मर्यादा आहेत. याच्या साइझेस ठरलेल्या असतात. म्हणजेच स्टँडर्ड साइझेस असतात तसेच डिझाइन्ससाठी काही वेळेस एकसुरी असतात. म्हणजेच एकाच धाटणीच्या फर्निचरचा ट्रेण्ड हा बहुतांश शोरूम्समध्ये पाहावयास मिळतो. या साइझेस व डिझाइन्स आपल्या गरजा भागवतीलच याची खात्री नसते. आपल्या गरजेनुसार फर्निचर बनवून देतात, पण अशा शोरूम्सची संख्या कमी आहे. बहुतेक फर्निचर हे चायना, मलेशिया, इ. देशांतून आयात केले जातात. हे फर्निचर मॉडय़ुलर पद्धतीचे असते. समजा, एक वॉर्डरोब आयात केला तर तो वॉर्डरोब काही मॉडय़ुल्समध्ये म्हणजे काही भागांत विभागलेला असतो. त्याला लागणारे हार्डवेअर (हँडल्स, बिजागऱ्या इ.) एका खोक्यात पॅक केलेले असते. वॉर्डरोबचे सुटे भाग व हार्डवेअर हे एका चपटय़ा खोक्यात भरून कंटेनरमार्फत आयात केले जाते. हे सगळे भाग इथे जोडून ग्राहकास विकले जातात.
रेडीमेड फर्निचरबद्दल काळजीचा मुद्दा म्हणजे फर्निचरसाठी वापरले जाणारे मटेरियल अशा प्रकारच्या फर्निचरसाठी पार्टिकल बोर्ड किंवा एम डी एफ बोर्ड (मीडियम डेन्सिटी फायबर बोर्ड) वापरले जातात. ही मटेरियल्स प्लायवूडच्या तुलनेत वजनाने हलकी असल्याने फर्निचरही हलके होते. हे बोर्डस् प्री-फिनिश्ड म्हणजेच कंपनीतूनच फिनिशिंग करून येतात. म्हणूनच या फिनिशेसवरही मर्यादा असतात. हे बोर्डस् मजबूत व टिकाऊ नसतात म्हणूनच वाळवी किंवा बोअररसारखी कीड लागण्याची शक्यता जास्त असते. या कारणास्तव हे फर्निचर वापरायचे असल्यास सगळय़ात उत्तम प्रतीचे पेस्ट कंट्रोल करून घ्यावे, जेणेकरून फर्निचरचे आयुष्य वाढण्यास मदत होईल. काही शोरूम्स प्लायवूडने बनवलेले फर्निचर विकतात. या फर्निचरवर विनियर लावलेले असते व हे विनियर ग्लॉसी मॅकलाइन पॉलिशने फिनिश केलेले असते. हे फर्निचर अगदी तयार स्वरूपात मिळत असल्याने, वरील फिनिशच्या आत कोणत्या प्रकारचे, प्रतीचे मटेरियल वापरले आहे याचा अजिबात अंदाज येत नाही. साधारणपणे यात अतिशय साध्या प्रतीचे कमर्शियल प्रकारचे प्लायवूड वापरले जाते. या कारणामुळे वरवर शाही दिसणारे फर्निचर हे तकलादू असू शकते. केवळ प्लायवूडच नव्हे तर हार्डवेअर, अॅडेसिव्ह, विनियर, लॅमिनेट अशा सगळय़ाच गोष्टींची क्वॉलिटी फार महत्त्वाची आहे. या सगळय़ा गोष्टींचा विचार करता रेडीमेड फर्निचर हे अत्यंत सचोटीने व्यवहार करणाऱ्या विश्वासार्ह शोरूममधूनच विकत घ्यावे.
रेडीमेड फर्निचरचा एक मोठा फायदा असा आहे की, हे फर्निचर तयार मिळत असल्याने, आपल्याला ते बनवल्यावर कसे दिसेल यासाठी कल्पनाशक्ती लढवण्याची गरज नसते. शोरूमध्ये डिस्प्ले केलेल्या फर्निचरपैकी आपल्याला आवडेल ते फर्निचर आपण निवडू शकता. येथे आपणास प्रत्येक किमतीचे फर्निचर मिळते. उदा. दीड हजार रुपये किमतीच्या सेंटर टेबलपासून, दीड लाख रुपये किमतीचे सेंटर टेबलही मिळते. म्हणूनच आपल्या खिशाला परवडेल असे फर्निचर आपण निवडू शकता. फर्निचरची किंमत ही त्याची क्वॉलिटी, डिझाइन व साइझवर ठरत असते.
भारतीय बनावटीचे व परदेशातून आयात दोन्ही प्रकारचे फर्निचर विकत मिळते. परदेशातून आयात केलेल्या फर्निचरचे प्रमाण जास्त आहे. चायना व मलेशिया या देशांतून आयात केलेले फर्निचर स्वस्त असते, तर इटली, जर्मनी या देशांतून आयात केलेले फर्निचर खूप महाग असते. एखादे टी.व्ही. युनिट घरी बनवून घेतल्यास त्याची किंमत जर ४०,०००/- रु. इतकी येत असेल तर तसेच टी.व्ही. युनिट जर चायना मेड घेतले तर त्याची किंमत रुपये २०,०००/- ते रु. २५,००० /- इतकी असते. तसेच डिझाइन जर इटालियन बनावटीचे घेतले तर त्याची किंमत रु. १,००,०००/- ते रु. १,५०,०००/- इतकी असू शकते. इटालियन फर्निचर महाग असले तरी ते तितकेच सुंदरही असते.
पूर्वी रेडीमेड फर्निचर विकणारी शोरूम्स कमी होती; पण आता चित्र बदललेलं आहे. आता तर रेडीमेड फर्निचर विकणाऱ्या बाजारपेठा तयार झाल्या आहेत. अशा बाजारपेठांत ओळीने चाळीस/ पन्नास शोरूम्स असतात; पण बहुतेक शोरूम्समध्ये जवळपास सारखाच माल विकायला ठेवलेला असतो. सोळा वेगवेगळय़ा प्रकारचे सिटिंग्ज्, सेंटर टेबल, कॉर्नर टेबल, डायिनग टेबल हे फर्निचरचे प्रकार रेडीमेड फर्निचर शोरूम्समध्ये सगळय़ात जास्त विकले जातात. काही शोरूम्स इतकी मोठी आहेत की, त्यात तऱ्हेतऱ्हेच्या फर्निचरसोबतच पडदे, पिक्चर, फ्रेम्स, म्युरल्स, स्क्ल्पचर्स, आर्ट इफेक्ट्स, घडय़ाळे, प्लँट्स, गालिचे, वॉलपेपर्स अशा इंटीरियरसाठी लागणाऱ्या विविध गोष्टीही उपलब्ध असतात. त्यामुळे ग्राहकांना हा इंटीरियर मॉलसारखा वन स्टॉप शॉप हा प्रकार भुरळ पाडतो.
रेडीमेड फर्निचर विकत घेण्यामागे काही विशिष्ट कारणं असतात. जसे की- घरी सुतारकाम करून घेण्याचा त्रास वाटतो. दिवसभराच्या दगदगीनंतर घरच्या सुतारकामाचा राडारोडा आवरावा लागतो (जर सुतार कामचुकार असतील तर), सुतार मध्येच काम सोडून जातील याची भीती वाटते, घरी दिवसभर कोणी नसल्यास सुतारांवर घर सोडून जावेसे वाटत नाही, फर्निचर बनल्यावर कसे दिसेल याचा अंदाज बांधता येत नाही, स्वत:च्या घराच्या इंटीरियरमध्येही विशेष रस नसतो, घर भाडय़ाचं असतं, त्यामुळे जास्त खर्च करण्याची इच्छा नसते, राहात असलेलं घर लवकर सोडायचं असतं, नोकरीतील बदलीमुळे वचवाचं बिऱ्हाड असतं, कामामुळे अजिबातच वेळ नसतो, दर दोन/तीन वर्षांनी फर्निचर बदलायची सवय असते किंवा इंपोर्टेड ते उत्तम अशी धारणा असते. अशा अनेक कारणांमुळे रेडीमेड फर्निचर विकत घेतले जाते.
आता आपण कस्टममेड म्हणजेच आपल्या गरजेनुसार, आवडीनुसार व बजेटनुसार बनवून घेतलेल्या फर्निचरबद्दल माहिती घेऊ या.
हे फर्निचर अगदी आपल्याला हवे तसे बनवून घेता येते. या प्रकारच्या फर्निचरमध्ये डिझाइनच्या अमर्याद शक्यता असतात. अमाप विविधता असते. याचे बाह्य स्वरूप व अंतर्गत रचना आपल्या मर्जीनुसार करून घेता येते.
कस्टममेड फर्निचर बनवून घेताना सर्वप्रथम आपल्या गरजा लक्षात घ्याव्यात, फर्निचरचे बाह्य स्वरूप, अंतर्गत रचना ठरवावी, साइज ठरावावी व अर्थातच बजेट ठरवावे. या सगळय़ा गोष्टी कागदावर नमूद कराव्यात व आपल्या इंटीरियर डिझायनरशी या बाबींबाबत चर्चा करावी. या चर्चेनंतर आपल्या जागेची रचना, आपल्याला अपेक्षित असलेला लुक, आपल्या गरजा व बजेट या सगळय़ा गोष्टींची सांगड घातलेलं डिझाइन बनवून घ्यावे. आपण निवडलेल्या डिझाइनचे तपशीलवार कोटेशन घ्यावे. या कोटेशनमध्ये वापरण्यात येणाऱ्या सगळय़ा मटेरियल्स व साइझचे तपशील नमूद केलेले असावेत तसेच हे फर्निचर किती दिवसांत बनून तयार होईल याची नोंद असावी. या डिटेल कोटेशनचा अभ्यास करून ते अप्रूव्ह करावे व नंतरच काम सुरू करावे.
आपल्याला अगदी हवे तसे फर्निचर बनवून मिळणे हा या कस्टममेड फर्निचरमध्ये गरजेनुसार वेगवेगळय़ा आकारांचे व जाडीचे कमर्शियल व मरिन प्लायवूड वापरले जाते. सर्वसाधारणपणे कमर्शियल प्लायवूड वापरले जाते व जेथे पाण्याच्या संपर्काची शक्यता असते तेथे मरिन प्रकारचे प्लायवूड वापरले जाते. कारण मरिन प्लायवूड हे कमर्शियल प्लायवूडपेक्षा जास्त मजबूत असते. किचन प्लॅटफॉर्मखालील शटर्ससाठी किंवा बाथरूम, ड्राय बाल्कनी, टेरेस अशा ठिकाणी जर फर्निचर (स्टोरेज) बनवायचे असेल तर मरिन प्लायवूडचा वापर केला जातो. मरिन प्लायवूड हे कमर्शियल प्लायवूडपेक्षा महाग असते.
कमर्शियल प्लायवूडची प्रति चौरस फुटाची किंमत साधारणपणे ७५/- इतकी असते, तर मरिन प्लायवूडची किंमत ही १२५/- प्रति चौरस फूट इतकी असते. या किमती १८ एसएम जाडीच्या प्लायवूडच्या आहेत. काही जण अट्टहासाने सगळे फर्निचर मरिन प्लायवूडमध्ये बनवून घेतात; पण त्याची गरज नसते. प्लायवूड हे भरीव प्रकारचे असो वा कमर्शियल प्रकारचे, ते पार्टिकल बोर्ड व एम डी एफ बोर्डपेक्षा खूपच मजबूत, टिकाऊ व सरस असते. प्लायवूडवर विनियर, लॅमिनेट, पी यू कोटिंग असे काही प्रकार फिनिशिंग म्हणून वापरले जातात. यात खूप विविधता आहे. लॅमिनेट फिनिश हे सगळय़ात जास्त प्रमाणात वापरले जाणारे फिनिश आहे. लॅमिनेट म्हणजे ज्याला आत्तापर्यंत बोलीभाषेत ‘सनमायका’ म्हटलं जात असे. लॅमिनेटमध्ये तर अक्षरश: शेकडो प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
या फर्निचरचा आणखी एक फायदा म्हणजे काही वर्षांनी जर तुम्हाला फर्निचरचा लुक बदलायचा असेल तर केवळ वरचे फिनिश बदलून कमी वेळात व कमी खर्चात आपण आपल्या फर्निचरला नवीन फ्रेश लुक देऊ शकता. आपल्या इंटीरियरच्या थीम, स्टाईल किंवा कॉन्सेप्टला साजेसं फर्निचर आपण बनवून घेऊ शकता.
अशा अनेक बाबींचा विचार करता
कस्टममेड फर्निचर जास्त फायदेशीर ठरते म्हणूनच जवळपास ९०% लोक फर्निचर
बनवून घेतात. जर आपण आपल्या घराच्या इंटीरियर बाबतीत थोडेसे चोखंदळ असाल व थोडा वेळ खर्च करण्याची तयारी असेल तर फर्निचर बनवून घेणे हा सर्वतोपरी उत्तम पर्याय आहे.
(इंटीरियर डिझायनर)