मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने अनेक सकारात्मक गोष्टी दिसून येत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला प्रत्यक्षात त्या कशा स्वरूपात चालना देतात, हे महत्त्वाचे आहे.
‘अ च्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात एकहाती सत्ता मिळविणाऱ्या मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्परूपी ‘गिफ्ट बॉक्स’मध्ये सर्वच क्षेत्रे, समाज घटकांसाठी काही ना काही होतेच. त्यात स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठीही ‘लॉलिपॉप’ नाही, मात्र त्याची काडी देण्याचा प्रयत्नही झाला. प्राप्तिकर सवलत, अंतर्गत गृहकर्जावरील व्याजदर वजावट मर्यादा थोडीशी विस्तारून त्या काडीलाही थोडा गोडवा आहे, असेच सकृत्दर्शनी दिसते. अर्थात या काडीला ‘चॉकलेट’च्या जागी ‘आरईआयटी’, ‘स्मार्ट सिटी’ यांचेच वेष्टन अधिक गुंडाळले गेले. या साऱ्यांत मंदावलेल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला पुन्हा ताजे तरतरीत करण्याच्या प्रयत्नात घर खरेदीचा मार्ग वाढत्या दरांवरून सरकायला नको म्हणजे मिळविले.
गृहकर्जावरील व्याजात मिळणारी कर वजावट सवलत अखेर विस्तारली. हा दिलासा मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पातून सामान्य गृहखरेदीदारांना मिळाला. मात्र हे ‘गिफ्ट’ थोडे आणखी मोठे असते तर बरे झाले असते. कारण तसेही वाढत्या ५० हजार रुपयांनी फार काही मोठा फरक पडणार नाही. ही सवलत वार्षिक एक लाखाने विस्तारण्याच्या वाढत्या मागणीमुळे अटकळ होती. ती अर्थात फोल ठरली.
जोडीला स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्त हा नवा गुंतवणूक पर्याय तुम्हा-आम्हाला दिला गेला आहे. त्याचबरोबर अद्ययावत शहरे म्हणून मोठय़ा गृहनिर्माण प्रकल्पांना प्रोत्साहन दिले गेले आहे. माफक घरांची उभारणी मोठय़ा प्रमाणात व्हावी यासाठी ४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विदेशी गुंतवणूकदारांना आता ५० हजार चौरस फुटांऐवजी २० हजार चौरस फूट बांधकामाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करता येईल. झोपडी विकास प्रकल्पात सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) भावनेतून कॉर्पोरेट क्षेत्रालाही आता कार्य करता येईल.
मालमत्ता क्षेत्रात अनुसरले जाणारे नफ्याचे गणित बघून त्यातून आपणही फायदा का कमावून घेऊ नये, असा विचार सरकारनेही केला आहे. म्हणूनच मालमत्ता विक्रीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावरील कर दुप्पट करण्यात आला आहे. मालमत्ता विक्रीतून होणाऱ्या नफ्यावरील कर १०.३० टक्क्यांवरून २०.६० टक्के करण्यात आला आहे. शिवाय दीर्घकालीनची व्याख्याही सध्याच्या एक वर्षांवरून तीन वर्षांची करण्यात आली आहे.
कर वजावटीचा लाभ फार नाही
पुन्हा एकदा जिव्हाळ्याच्या मात्र मूळ मुद्दय़ाशी येऊ. आज तुम्ही १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अगदी २० वर्षांपर्यंत घेतले तर त्याचे वार्षिक व्याज १.५० लाख रुपयांपर्यंत जातेच. तीच मर्यादा आता कर वजावटीसाठी वार्षिक २ लाख रुपये करण्यात आली आहे. मात्र कर्जफेडीचा कालावधी जसजसा कमी होत जाईल, तसतसे व्याजाची रक्कमही कमी होत जाईल. तेव्हा वजावटीचा लाभ तुम्ही म्हणाल तसा अगदी मुदत कालावधीअखेपर्यंत मिळू शकणार नाही. थोडक्यात, वार्षिक १.५ लाख म्हणा किंवा २ लाख, उपरोक्त रक्कम आणि कालावधीसाठी तेवढे व्याज होणारच नाही. आज कोणत्याही बँकेचे गृहकर्ज व्याजदर हे १० टक्क्यांच्या खाली नाहीत. शिवाय कर्जफेडीच्या कालावधीत २० वर्षांपर्यंतचाच अधिक ओघ आहे. (प्राप्तिकर कलम २४(ब)नुसार गृहकर्जाच्या व्याजावरील कर कपात १.५ लाख रुपयांवरून वार्षिक २ लाख रुपये करण्यात आली आहे.)
स्मार्ट सिटी
हा काही नवा प्रकार नाही. अनेक खासगी विकासक मोठय़ा गृहसंकुलांच्या रूपात सर्व सोयी-सुविधांसह एकप्रकारची छोटी शहरेच साकारत आहेत. पुण्यातीलच मगरपट्टा, हिंजेवडी आयटी पार्क किंवा आता शहरातील सोलापूर मार्गावरील (हडपसर) डीएसकेंचे ‘विश्व’ बघा. तेच आहे ते. ‘नया रायपूर’ संकल्पना आता सगळीकडेच रुजू होत आहे.
अशी १०० स्मार्ट सिटी अस्तित्वात आणण्याचे सरकारचे धोरण आहे. म्हणजेच महानगरे, शहरांव्यतिरिक्त अन्य छोटय़ा शहरांनाही मोठय़ांत परिवर्तित करण्यास प्रोत्साहन दिले गेले आहे. अशा छोटय़ा शहरांमध्ये मोठे निवासी गृहनिर्माण प्रकल्प साकारून त्यांना नागरीकरणाचा आकार देण्याचा प्रयत्न आहे. (त्यासाठी ७,०६० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.) जोडीला मेट्रोची तरतूदही आहेच.
पायाभूत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून विकासाचा चेहरा उजळवू पाहणाऱ्या भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारने महामार्ग, बंदर, विमानतळ याचबरोबर स्थावर मालमत्ता हा त्यांचा मुख्य मतदार (गुजराती विकासक) राहिलेल्या वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषयही पहिल्याच अर्थसंकल्पात अंतर्भूत केला आहे. घर खरेदीदारांसाठी याबाबतच्या उपाययोजना प्रथमदर्शनी सकारात्मक वाटत असल्या तरी त्या ग्राहक म्हणून खिशावर काय
परिणाम करतात, हे येणाऱ्या कालावधीत पहावे लागेल. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला त्या कशा स्वरूपात चालना देतात, हे महत्त्वाचे आहे. अन्यथा चालना म्हणजे प्रती चौरस फूट वाढते दर असे व्हायला नको.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा