अक्षय्य तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तामधला अर्धा मुहूर्त म्हणून मानला जातो. म्हणून या दिवसापासून नव्या चांगल्या कार्याचा प्रारंभ करण्याची आपल्याकडे पद्धती आहे. शहरामध्ये अनेक लोक अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घरांची खरेदी करतात किंवा नव्या घरामध्ये प्रवेश करीत असतात. अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश केला तर आपल्या वास्तूमध्ये चिरंतन सुखसमृद्धी, आनंद, यश, आरोग्य टिकून राहते, असा आपल्या भारतीय लोकांचा प्राचीन काळापासून विश्वास आहे.
चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून भारतीय संस्कृतीत उत्साहाने साजरा केला जातो. चैत्र संपून आता वैशाख महिना सुरू होईल आणि २ मे या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाईल.
फाल्गुन-चैत्र महिन्यात वसंत ऋतूच्या आगमनाने जीर्ण झालेली पाने गळून जातात आणि झाडांना नवीन पालवी येते. निसर्गात वसंताचे नवचैतन्य बहरलेले असते. पण आता वैशाखाच्या सुरुवातीला ग्रीष्माचे चटके बसायला सुरुवात झालेली आहे. उन्हाळय़ाचा प्रभाव वातावरणात जाणवायला लागलेला आहे.
वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हिला अक्षय्य तृतीया असेही म्हणतात. अक्षय्य किंवा अक्षय म्हणजेच अविनाशी. जे कधीही नष्ट होत नाही, क्षय पावत नाही, संपत नाही त्याला अक्षय्य किंवा अक्षय असे म्हणतात.
अक्षय्य तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तामधला अर्धा मुहूर्त म्हणून मानला जातो. म्हणून या दिवसापासून नव्या चांगल्या कार्याचा प्रारंभ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. शेतकरी अक्षय्य तृतीयेच्या दिवसाचा शुभ मुहूर्त साधून शेतीच्या कामाची सुरुवात करतात. पृथ्वी-माती आधार देणारी असल्याने आपण प्राचीन काळापासून प्रथम भूमिपूजन करूनच तिच्यावर घर उभे करतो. शहरामध्ये अनेक लोक अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घरांची खरेदी करतात किंवा नव्या घरामध्ये गृहप्रवेश करतात. अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश केला तर आपल्या वास्तूमध्ये चिरंतन सुखसमृद्धी, आनंद, यश, आरोग्य टिकून राहते, असा भारतीय लोकांचा प्राचीन काळापासून विश्वास आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला फार महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करण्याची पद्धती आहे. पूर्वी झाडांखाली पारावर पिण्यासाठी पाण्याचे माठ आणि गूळ ठेवला जाई. येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पाणी पिऊन शांत व्हावे हा त्यामागचा हेतू होता. पशू-पक्ष्यांसाठीही घराबाहेर पाण्याने भरलेले ‘रांजण’ ठेवले जात. माणुसकीने वागण्याचा संदेशच यातून दिला जातो. त्याग, दातृत्व, माणुसकी, सत्य, अहिंसा, दया, प्रेम, करुणा या सर्वच मानवी भावना अक्षय्य आहेत. कधीही नष्ट न होणाऱ्या आहेत.
अक्षय्य तृतीयेला गृहप्रवेश करताना आपल्या वास्तूत सदैव सद्गुणांचाच प्रभाव पडेल असे वर्तन आचरले पाहिजे. घराला घरपण फर्निचर, टी.व्ही., फ्रीजसारख्या भौतिक अद्ययावत साधनांनी येत नाही; घरातील माणसांच्या परस्परांविषयी असणाऱ्या प्रेमभावनेने एकमेकांसाठी केलेल्या त्यागाने येत असते. म्हणून आपली वास्तू समाधान, शांती, सुखाची ‘धनी’ व्हावी यासाठी आपल्या अक्षय्य वारशाचे आपण कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे.
प्राचीन काळी निसर्गातल्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभुतांचे स्तवन केले जाई. स्वत:च्या आणि स्वत:च्या कुटुंबीयांच्या सुख समाधानासाठी या शक्तींना प्रार्थना करीत असत. या महाशक्तींचा प्रभाव वास्तूवर आणि वास्तूत राहणाऱ्या माणसांवर सदैव पडत असतो. म्हणून त्यांची प्रसन्नता ही
माणसाला महत्त्वाची वाटत होती, आजही वाटते.
पृथ्वी हे तत्त्व अक्षय्यपणे निर्मितीची अंकुरण्याची प्रक्रिया करणारे आहे. पृथ्वी पालनकर्ती, वात्सल्यभाव धारण करणारी, आपल्या रसाळ आणि पोषक द्रव्याने सजीवांचे पोषण करणारी, सुगंध देणारी, मनाला रंगीबेरंगी फुलांनी मोहविणारी, आरोग्य देणारी, झाडे, वेली, वनस्पती यांची निर्मिती करणारी आहे. अक्षय्यपणे निर्मितीची, अंकुरण्याची प्रक्रिया जमिनीमध्ये सतत चालू असते.
पंचमहाशक्तींविषयी कृतज्ञता भाव आपण बाळगला पाहिजे. या मौल्यवान अक्षय्य वारशाचे आपण कृतज्ञतेने स्मरण केले पाहिजे. निसर्गाविषयी भक्ती, पूज्यभाव अक्षय्य टिकणारा आहे. पूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी पूजाअर्चा, स्तवन, प्रार्थना यातून भक्ती व्यक्त केली. आज दैवते तीच आहेत, पण भक्तीचे मार्ग बदलले पाहिजेत. या निसर्गशक्तीचं सर्वानी सहकार्याने रक्षण केले पाहिजे. त्यांची जोपासना आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे. आपण आपल्या वास्तूमध्ये यांचे सदैव स्मरण ठेवले आणि त्यांच्याविषयी कृतज्ञभाव ठेवून आपले आचरण ठेवले तर आपली वास्तूही आपल्याला अक्षय्य सुखी, समाधानी, संपन्न निरामय असे जीवन जगण्याचे सामथ्र्य देईल.

Story img Loader