मोहन गद्रे
मुंबई-पुण्यासारख्याच कशाला आता ग्रामीण भागातदेखील एकटय़ा- दुकटय़ा ज्येष्ठ नागरिकांची सोबत आणि सुरक्षा, हा प्रश्न सध्या सामाजिक प्रश्न स्वरूपात उभा होतो आहे.
शहरभागांपुरता विचार करायचा झाल्यास, लहान-मोठय़ा शहरांतील ज्या इमारती आता तीस-चाळीस वर्षांच्या झाल्या आहेत, अशा बहुतेक इमारतींतील पुढची पिढी विवाहामुळे किंवा उच्चशिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी- व्यवसायामुळे, आपले कुटुंब म्हणण्यापेक्षा आपल्या, वयस्कर आई-वडिलांना सोडून दूर ठिकाणी गेलेली आहे. यामध्ये वावगे काहीच नाही. आता कुटुंबांचा आकार, अगदी लहान झाल्यामुळे, त्यातून काही कौटुंबिक/ सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, घरात एकटय़ा- दुकटय़ा राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि सुरक्षा! सरकारला याची जाणीव आहेच, शासनस्तरावर त्यावर काही उपाय सुरूही झालेले आहेत, पण प्रश्नाची व्याप्तीच इतकी मोठी आणि वैशिष्टय़पूर्ण आहे की त्यासाठी अन्य काही उपाय/ पर्यायांचा विचार करावा असे वाटते. त्यामुळे मी सुचवत असलेली कल्पना किंवा योजना बिनधोक असेल, असा माझा दावा नाही, तरीही त्याबद्दल चर्चा तर होऊ शकते. जे अडचणीचे ठरणार असेल त्यावर काही उपाय शोधता येऊ शकतो का, हे पाहाता येईल.
बहुतेक सोसायटय़ांमध्ये आता विद्यार्थ्यांना भाडय़ाने जागा देऊ नयेत, असा तिथल्या रहिवाशांचा कल दिसून येतो. याबद्दल कायदेशीर बाजूचा विचार करता हे योग्य नाही. संस्था असा निर्णय घेऊ शकते का? याबद्दल विधिज्ञ प्रकाश टाकू शकतात, पण घरमालकांनीच विद्यार्थ्यांना जागा द्यायची नाही, असा पवित्रा घेतला असेल तर त्यांच्या निर्णयाला आव्हान कसे देणार? मुळात भाडेकराराने त्याची जागा कोणाला भाडय़ाने द्यावी, हा सर्वस्वी त्याचा अधिकार असणार, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
जागांचे भाव आता गगनाला भिडले आहेत. थोडक्यात, जागा ही मोठी स्थावर इस्टेट गणली जाते. आपल्या वृद्धत्वाचा गैरफायदा उठवून कोणी ती लाटू नये, याबद्दल ज्येष्ठ नागरिक धास्तावलेले असू शकतात. त्याचा परिणाम म्हणून ज्येष्ठ लोक घरात एकेकटे राहणे पसंत करतात, पण अन्य कोणाला घरात थारा देऊ इच्छित नाहीत. काही बातम्या पाहता त्यांची भीती अनाठायी नाही असे वाटते. पण त्या वृद्धावस्थेत सोबतीला कुणी नाही या विचाराने त्यांना चिंतेने ग्रासलेले असते, हेही तितकेच खरे. शेजारी-पाजारीही ज्येष्ठच राहत असतात. अशा ठिकाणी संकटकाळी गरज लागली तर हाक मारायलाही आजूबाजूला कोणी नाही या विचाराने एकएकटे ज्येष्ठ विवंचनेत असतात. आता ज्येष्ठ मंडळीना नवीन तंत्रज्ञान माहिती असलेल्या व्यक्तींची सोबत असणे आवश्यक झाले आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची त्यांना चांगली साथ होऊ शकते.
थोडक्यात, शहरात मोठय़ा जागा आहेत तेथे ज्येष्ठ व्यक्तींना कोणाचा तरी आधार वाटेल अशी साथसोबत हवी आहे. त्याच वेळी, आपले घरदार, कुटुंब सोडून भविष्य घडवायला बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींना, शहरात पैसे देऊनसुद्धा जागा मिळवण्यासाठी मारामार करावी लागते आहे. या अशा वास्तव परिस्थितीचा विचार करून काही नियम करून आपली जागा भाडय़ाने देणाऱ्याला आणि काही कालावधीसाठी भाडय़ाने राहण्यासाठी जागा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, संबंधित विद्यापीठाद्वारे किंवा शासनाच्या विद्यार्थी सेवा केंद्रातर्फे सांगड घालून, ज्येष्ठांच्या एकाकीपणात साथसोबतीचा आणि त्याचबरोबर, विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही नियोजन करता येणे शक्य आहे का? याचा विचार करावा. या व्यवहाराला अधिकृत स्वरूप देता येईल हे महत्त्वाचे.
अर्थातच या विषयावर साधकबाधक चर्चा आणि विचार होणे आवश्यक आहेच. पण तसा विचार करायला तरी काय हरकत आहे? कारण ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यात ज्येष्ठांची सुरक्षा आणि उगवत्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे.
gadrekaka@gmail. Com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा