डॉ. शरद काळे
sharadkale@gmail.com
एकदा का एखाद्या रोगाने आपला डेरा आपल्या देशात टाकला तर तो पाहुणा घरचा होऊन जातो हे सांगण्यासाठी! चिकनगुनिया, सार्स, डेंग्यू या रोगांचे आपल्या देशातील अस्तित्व नेहमीच दिसत असते. ही परिस्थिती बदलायलाच हवी आहे. समाजस्वास्थ्याशी जोडलेले हे साथीचे रोग शाप आहेत. करोना असाच शाप होऊन आपल्या समाजाला ग्रासू नये असे मनापासून वाटते.
करोना गटाच्या कोव्हिड-१९ या विषाणूमुळे जी जागतिक साथीच्या रोगाची साथ आली ती आटोक्यात येते की अजून भयावह स्वरूपात पसरते हे चित्र पुढील काही आठवडय़ांमध्ये स्पष्ट होईल. जगातील २०२ देशांपैकी १६२ देशांमध्ये या रोगाची लागण तीन महिन्यांत होते आणि साधारण १८९७६८ रुग्ण त्यामुळे बाधित होऊन त्यातील ७ टक्के रुग्ण मृत्यू पावतात त्या वेळी त्याकडे रुग्णांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे किंवा एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मृत्युदर कमी आहे म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही. यात सध्या रोगग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या १०१००० आहे. म्हणजे ८१००० रुग्ण या धोक्यातून बाहेर आलेले आहेत ही दिलासा देणारी गोष्ट आहे. आपल्याला या आशादायक चित्राकडे नजर ठेवूनच कार्य करावे लागणार आहे कारण या स्थितीत समाजात सकारात्मक दृष्टिकोनाची अत्यंत गरज आहे.
चीन, इटली, इराण, स्पेन, दक्षिण कोरिया, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, स्वित्र्झलड, इंग्लंड, नॉर्वे, ऑस्ट्रिया, स्वीडन, बेल्जियम यांसारख्या प्रगत देशांमध्ये करोना विषाणूमुळे होणाऱ्या या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसत आहे. चीनमध्ये वुहान शहरात सुरू झालेली साथ जगभर पसरली. या सर्व ठिकाणी गेल्या तीन महिन्यांत हवामान थंड होते आणि आहे. या थंड प्रदेशात विषाणूचा प्रसार जलदीने झाला. गरम हवामानात हा रोग फारसा घातक ठरणार नाही असा शास्त्रीय अंदाज आहे आणि तसेच व्हावे असे प्रत्येकाला वाटत असेल. पण या रोगाकडून जर आपल्या देशात जे पर्यावरणासंबंधी उदासीन वातावरण दिसते, त्यात जर सुयोग्य बदल घडवून आणता आला तर दीर्घकालीन चांगले परिणाम देशात होतील. तसेच वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता यांचे महत्त्व समाजात अधोरेखित होऊन स्वच्छ भारताच्या चळवळीला गती प्राप्त होईल.
आज देशभरच नव्हे तर जगातच भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एखाद्या अतिरेकी गटाने निर्माण केलेली ही दहशत नसून मानव विरुद्ध विषाणू असा हा मोठा लढा आहे. या लढय़ात प्रत्येकाला लढावे लागणार आहे आणि आपली जबाबदारी उचलावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडित होत आहेत. पर्यटन क्षेत्राला ओहोटी लागली आहे. आपल्या देशात राज्य आणि केंद्र सरकारांनी गर्दी टाळण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले आहेत. शाळांना आणि महाविद्यालयांना सुटय़ा दिल्या आहेत. लोकांनी आवश्यकतेशिवाय प्रवास करू नयेत अशी विनंती केली आहे. अत्यावश्यक गोष्टींची दुकाने सोडून बाकी मॉल्स, कापडबाजार बंद केले आहेत. सिनेमागृहांना टाळेबंदी जाहीर करावयास लावली आहे. सरकारी कार्यालयेदेखील बंद राहणार आहेत. हे सर्व खबरदारीचे उपाय योग्यच आहेत. या एकत्रित उपायांनी या साथीला प्रतिबंध होऊन परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी मदत होणार आहे.
नागरिक म्हणून आपण या लढय़ात जी भूमिका निभावणार आहोत त्याचे ठळक मानाने तीन भाग करता येतील. पहिल्या भागात आपण समाजासाठी काय करता येईल हे पाहू. या अवघड प्रसंगात तुमचा समाज सध्या तरी तुम्ही राहता त्या गृहनिर्माण संस्थेशी जोडला गेला आहे आणि काही काळ तिथेच मर्यादित राहणार आहे. कारण पुढील काही आठवडे तरी आपल्याला परिसर सोडता येणे अवघड आहे.
दुसऱ्या भागात आपण माणूस म्हणून काय करू शकतो याचा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. सर्व व्यवहार ठप्प झालेले असताना मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांची एक विशेष जबाबदारी असणार आहे. जे आर्थिक दुर्बल घटक आपल्या सभोवती वावरत आहेत त्यांची काळजी घेणे हे आपल्या सर्वाचेच कर्तव्य आहे. मोलकरणीने किंवा सुरक्षा रक्षकांनी जर घरी बसून काम करायचे ठरविले तर आपली किती तारांबळ होईल याचा विचार करा. रिक्षा चालक, संस्थेच्या परिसरात असणारा इस्त्रीवाला, भाजीवाला, आपल्या चप्पला बुटांची काळजी घेणारे काका, चावी बनवून देणारे काका, पेपर, दूध पुरविणारी मुले हे सर्व त्यांच्या रोजीरोटीसाठी आपल्यावर अवलंबून असतात. परिस्थितीमुळे हा वर्ग आम्ही घरून काम करू असले काही हट्ट करणार नाही! पण या कठीण प्रसंगात त्यांना आधार हवा आहे, आणि आपण तो द्यायला हवा. त्यासाठी या कालखंडात त्यांच्यासाठी संस्थेमध्ये अन्नछत्र आपण चालविले पाहिजे. घरटी दोन पोळ्या आणि भाजी जर एकत्र करून त्यांच्यासाठी सन्मानाने ते सकाळ संध्याकाळ वाढता आले तर त्यांनादेखील आपण समाजाचा एक भाग आहोत आणि आपल्यालादेखील मानाने वागविले जाते याची खात्री पटेल. हे अन्नछत्र संस्थांच्या कार्यालयात किंवा जिथे सार्वजनिक हॉल असतील तिथे चालविता येतील. कुरिअर, वाहनचालक आणि प्लम्बर, इलेक्ट्रिशियन यांसारख्या गरजू मंडळींनादेखील याचा फायदा देता येईल. बलुतेदारी पद्धतीने या सर्व समाजसेवकांना आपल्यात सामावून घेता येईल. मात्र त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाऊ नये. त्यांनाही स्वच्छतेची सवय लागेल आणि समाज अशा रीतीने प्रगल्भ झाला तर देशाला त्याची मदतच होईल.
यानिमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करावयास हव्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दरवर्षी एक ते दोन कोटी लोकांना विषमज्वराची लागण होते आणि त्यातील १२८००० ते १६१००० रुग्ण मृत्यू पावतात. या रोगावर प्रभावी लसदेखील उपलब्ध आहे. तरीदेखील या रोगाचे प्राबल्य दिसून येते. विशेषत: दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये विषमज्वराने ठाण मांडलेले आहे. दूषित पाण्यातून हा रोग पसरतो हे सामान्यज्ञान सर्वाना आहे, तरीही याबाबतीत आपण अज्ञानी असल्यासारखे वागतो ही वस्तुस्थिती आहे. यावरून आजदेखील विषमज्वर किती घातक आहे याची कल्पना येते. आजदेखील आपल्या देशात पिण्यासाठी स्वच्छ पाणी समाजातील अनेक घटकांना मिळत नाही. हे अधोरेखित एवढय़ासाठी करायचे की एकदा का एखाद्या रोगाने आपला डेरा आपल्या देशात टाकला तर तो पाहुणा घरचा होऊन जातो हे सांगण्यासाठी! चिकनगुनिया, सार्स, डेंग्यू या रोगांचे आपल्या देशातील अस्तित्व नेहमीच दिसत असते. ही परिस्थिती बदलायलाच हवी आहे. समाजस्वास्थ्याशी जोडलेले हे साथीचे रोग शाप आहेत. करोना असाच शाप होऊन आपल्या समाजाला ग्रासू नये असे मनापासून वाटते.
वाचा आणि विचार करा. काळजी घेणे ठीक, पण काय होईल या चिंतेने मरणाच्या जवळ जाऊ नका!
या काळात सर्व गृहनिर्माण संस्थांनी आणि त्यातील सर्व सदस्यांनी घ्यावयाची काळजी –
१. आपल्या संस्थेचे दरवाजे नेहमी बंद ठेवा आणि गरजेनुसार उघडा. सुरक्षा रक्षकांना आपल्या संस्थेचे सदस्य लक्षात यावेत म्हणून ओळखपत्रे द्या किंवा आधार कार्ड दाखवायला सांगा.
२. बाहेरून येणाऱ्यांची नोंद ठेवा. प्रवेशद्वाराशी हात साबणाने किंवा हँड सॅनिटायझर्सने धुण्याची व्यवस्था ठेवा. या ठिकाणी अशी सोय नसेल तर करून घ्या. आणि ती रोजच्या दिनक्रमात सामील करून घ्या. त्या ठिकाणी पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी बेसिनची सोय करा.
३. कोठेही कचरा साठून राहत नाही ना याची दक्षता बाळगा. संस्थेतील प्रत्येक सदस्याने याबाबतीत दक्ष राहावयास हवे. हे काम अध्यक्ष, सचिव किंवा मॅनेजिंग कमिटीचेच आहे असे नाही.
४. संस्थेतील सर्व पाण्याच्या टाक्या दर सहा महिन्यांनी धुतल्या गेल्याच पाहिजेत याकडे कटाक्षाने लक्ष ठेवा.
५. संस्थेत सार्वजनिक शौचालय किंवा न्हाणीघर असतील तर त्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
६. सुरक्षा कर्मचारी, मोलकरणी आणि संस्थेतील सदस्य यांच्यासाठी साथीच्या रोगांसंबंधी माहिती द्या.