ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या ज्या ठराविक टोलेजंग इमारती आहेत; त्यातील क्रॉफर्ड मार्केट (आता म. जोतिबा फुले मंडई)चे स्थान वरच्या श्रेणीतील आहे. प्रशासकीय कामाची उत्तम जाण असलेले ऑर्थर क्रॉफर्ड हे मुंबई महापालिका आयुक्त असताना इ. स. १८६५ ते ७१ या काळात ही इमारत बांधली गेली. गॉथिक शैलीच्या या इमारतीच्या बांधकामातून ब्रिटिश प्रशासकांच्या दूरदृष्टीसह कलात्मकता तसेच त्यांनी केलेल्या पर्यावरणाचा विचार याची कल्पना येते. पुरातत्त्व वारसा यादीत या इमारतीचा समावेश आहेच. आता या इमारतीचा पुनर्विकास जरी करण्यात आला असला तरी मूळ इमारतीच्या सौंदर्याला बाधा आलेली नाही. हा पुनर्विकास साधण्यासाठी शासन नियुक्त समितीत प्रख्यात वास्तुविशारद चार्लस् कोरिया, वारसा समिती अध्यक्ष के. जी. कांगा आणि महापालिका आयुक्त शरद काळे या तज्ज्ञ जाणकारांचा समावेश होता.
स्वातंत्र्योत्तर काळात या मंडईचे म. जोतिबा फुले मंडई असे नामकरण झाले असले तरी अजूनही क्रॉफर्ड मार्केट म्हणूनच तिची सर्वत्र ओळख आहे. मध्य रेल्वेच्या छ. शिवाजी टर्मिनसला जवळ असलेली ही म. फुले मंडई २.२५ हेक्टर म्हणजेच २२४७२ चौ.मी. क्षेत्रावर वसलेली आहे. या वास्तूच्या उत्तर पश्चिमेस दादाभाई नौरोजी रोड, उत्तरेस लो. टिळक रोड, उत्तर पूर्वेला रमाबाई आंबेडकर मार्ग दक्षिणेकडे दौंडकर मार्ग अशा चतु:सीमा आहेत. त्रिकोणी आकाराच्या भूखंडावर ही मंडई इमारत उभी आहे.
दैनंदिन गरजा भागवणारी ही वास्तू आमजनतेची सोय बघून बांधल्याचे जाणवते. भौगोलिक स्थान आणि मालाची आवकजावक करण्यासाठी रेल्वे, बंदराच्या नजीक ही वास्तू असल्याने ग्राहक, व्यापारी आणि पुरवठादारांना सर्वच बाबतीत सोयीची ठरली आहे.
इमारत उभारताना सभोवतालची जागा मोकळीच असल्याने मंडईतील दैनंदिन उलाढालीतून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाची परस्पर विल्हेवाट लावण्याची कल्पना वाखाणण्यासारखी आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त ऑर्थर क्रॉफर्ड यांचे नाव या वास्तूला देणं स्वाभाविक होतं. कारण त्यांच्याच कल्पकतेतून ही इमारत साकारली आहे. या ‘गॉथिक’ शैलीच्या इमारतीच्या बांधण्यासाठी कुर्ला खाणीतील तसेच गुजरातमधील पोरबंदर येथून टिकाऊ दगड आणण्यात आले. या अवाढव्य मंडई बांधकामासाठी त्या काळी रु. १९,४९,७०० इतका खर्च झाल्याची नोंद आहे. प्रारंभीपासून ही मंडई पहाटे चार ते रात्री १० पर्यंत सर्वासाठी खुली असे. मार्केटच्या मध्यभागी एक सुशोभित कारंजाही होता. त्याचा आराखडा जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे त्यावेळचे संचालक लौकवूड किपलिंग यांनी तयार केला होता. तर त्याच्या बांधकामासाठी सर कावसजी जहांगीर या दानशूर पारशी माणसाने देणगी दिली आहे.
इ. स. १८६४-६५ मध्ये तटबंदी असलेला मुंबई किल्ला नामशेष झाल्यावर या मार्केटच्या बांधकामाला प्रारंभ झाला. इमारतीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी बरोबर मध्यभागी भारतीय समाजजीवनाशी आणि संस्कृतीशी सुसंगत जी कलात्मक शिल्प उभारली होती त्यासाठी जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक लॉकवूड किपलिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जे. जे.च्या विद्यार्थ्यांनी श्रम घेतले आहेत. जोडीला एक छोटेखानी आकर्षक बागही होती. त्याचा आराखडा उद्यानशास्त्र जाणकार इमर्सन यांनी तयार केला होता.
कालांतराने वाढत्या लोकसंख्येबरोबर सभोवतालच्या वाढत्या इमारतींमुळे या सौंदर्यशाली इमारतीला बाधा आली. सध्या तर इमारतीचे विद्रुपीकरण आणि जोडीला नुकसान होत आहे. कोणत्याही मार्गाने या मंडईत प्रवेश करणं शक्य असल्याने ग्राहकांना वावरताना अडचणीचे होत नाही. या इमारतीचा उंच मनोरा मंडईत प्रवेश करण्याआधी नजरेत भरतो. जमिनीपासून त्याची उंची सुमारे १२८ फूट आहे. इमारतीला दोन पदरी लोखंडी छत असून ते उंच लोखंडी स्तंभावर उभे आहेत. या मंडई वास्तूचा आराखडा प्रख्यात ब्रिटिश वास्तुविशारद विल्यम इमर्सन यांनी तयार केला. त्याच्या बांधकामासाठी प्रामुख्याने लोखंड आणि दगडाचा वापर करण्यात आला आहे.
इमारत पूर्ण झाल्यावर प्रारंभीच्या काळात इ. स. १८६७ साली या मंडईतून फळे आणि भाजीपाल्याची घाऊक-किरकोळ विक्री व्हायला लागली. नंतर दहा वर्षांनी लोकांच्या मागणी-गरजेनुसार मटण, मासळी, बीफ यांची विक्री व्हायला लागली. फळभाज्या विभाग १६ जानेवारी १८६८ मध्ये सुरू झाला, तर गोमांसाची विक्री १८६९ मध्ये सुरू झाली.
दैनंदिन कामकाजासाठी पर्यवेक्षक कार्यालय व निवास, दक्षिणेकडे गुदाम आणि कुक्कुटपालन विक्री विभाग, तर पूर्वेकडे मटण गोमांस, मासळीची खरेदी-विक्री चालत असे. वाढत्या लोकसंख्येला हे मार्केट आजही पुरे पडतेय. या अवाढव्य मार्केटमध्ये जीवनावश्यक सर्वच वस्तूंची उपलब्धता आहे. सर्व प्रकारच्या भाज्या, धान्य, पाव, लोणची, बिस्किटे, चॉकलेट्स, सुकामेवा, आकर्षक लेखन सामग्री, कटलरी, मसाले, किराणा माल, तंबाखू, पादत्राणे असल्या टिकाऊ-नाशिवंत वस्तूंची दिवसभर उलाढाल चालूच असते. मांसाहारी खवय्यांसाठी या मंडईत विविधता आहे. (१) मुंडी आणि हेड विभाग (२) मासे आणि मटण विभाग आणि (३) गोमांस विभाग अशा तीन विभागांत त्याचे वर्गीकरण करून ग्राहकांची सोय साधली आहे. मटणाचा घाऊक पुरवठा बरीच र्वष वान्द्रे येथील कत्तलखान्यातून व्हायचा. पण ही जागा अपुरी पडल्याने आता देवनारच्या कत्तलखान्यातून मटण-बीफचा पुरवठा होतोय. दांडा, वर्सोवा, वसई, विरार, भाईंदर तसेच गुजरातमधून दररोज मासळीचा पुरवठा होतोय. मुंबई सागरी किनाऱ्यावरील कुलाबा, माझगाव, वरळी, ससून डॉक, वरळी माहीम येथूनही मासळीचा पुरवठा होत असतो. पण सध्या सागरी प्रदूषणामुळे येथून होणारा पुरवठा कमी व्हायला लागलाय.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसप्रमाणे भविष्यकाळाचा विचार करून दूरदृष्टीने ही इमारत ब्रिटिशांनी उभारली आहे. बाहेरून या इमारतीचा डौल संस्थानी थाटाचा वाटतो. त्याच्या मुख्य इमारतीवर घडय़ाळाचा उंच मनोरा असून त्यावरील घडय़ाळाचे टोले परिसरात ऐकू येण्यासाठी त्यात ६०० कि. वजनाची प्रचंड घंटा बसवण्यात आली होती. या इमारतीकडे बारकाईने लक्ष दिल्यास ब्रिटिश वास्तुकला-तंत्रज्ञान आणि स्थानिक हस्तकलेचा मिलाफ जाणवतो. इमारत बांधताना मुंबईच्या भौगोलिक स्थितीसह पर्यावरण शास्त्राचाही अभ्यासपूर्ण विचार केल्याचे जाणवते. पर्जन्य आणि उन्हाच्या तीव्रतेपासून रक्षण करण्यासाठी भलेभक्कम भिंती उभारल्या आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उतरणीची छप्पर व्यवस्थासुद्धा आदर्श आहे.
ग्राहकांना सोयीची जागा आणि सर्वच जीवनावश्यक वस्तू गुणवत्तेसह माफक दरात एकाच ठिकाणी मिळत असल्याने या मंडईत स्थानिक  ग्राहकांप्रमाणेच परदेशी प्रवासी-पर्यटकांचीही येथे नेहमीच गर्दी असते. या मंडईत सर्वधर्मीय विक्रेते आणि ग्राहकांच्या सततच्या वर्दळीमुळे नकळत राष्ट्रीय एकात्मतेचे अनोखे दर्शन घडते.
ज्यांचे नाव या मंडईला दिले गेले आहे. त्या महात्मा जोतिबा फुल्यांनाही हेच अभिप्रेत होतं…