सुचित्रा प्रभुणे
गणपतीचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे, त्यामुळे घरोघरी प्रसाद, मखर, सजावट यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अलीकडच्या व्यस्त जीवनशैलीमुळे एक-दोन महिने आगोदरपासून मखर तयार करणे हे चित्र आता दुर्मीळ होऊ लागले आहे. शिवाय बाजारात सजावटीचे आकर्षक आणि परवडणारे पर्याय सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना आणि हाती वेळ नसताना उगीच मेहनत घेण्यास कुणीच तयार नसते. या सजावटीसाठी कोणता पर्याय तुम्ही निवडू शकता यासाठी काही खास कल्पना तुमच्या समोर मांडल्या आहेत.
पर्यावरण पूरक सजावट करताना कित्येकदा असे लक्षात येते की, आपण हौसेने खूप नवनवीन गोष्टी विकत आणतो, पण त्यांचा वापर झाला की त्या तितक्याशा उपयोगाला येत नाहीत. अशावेळी एकतर त्या अडगळीत तरी जातात किंवा आपण त्या फेकून तरी देतो. म्हणूनच अशावेळी पर्यावरण पूरक अशा गोष्टींचा वापर करावा- जसे खरी पाने, फुले.
यासाठी बाजारात दोन ते आठ दिवस टिकणाऱ्या पाना-फुलांची तयार आरास उपलब्ध असते. तुम्ही तिचा वापर करू शकता. यामध्ये फुला -पानांची संगती इतकी छान जुळवून आणलेली असते की त्यामध्ये गणपतीची मूर्ती उठून दिसते. इथे मला मी पाहिलेल्या एका ठिकाणच्या सजावटीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, एका हॅगिंग पट्टीवर पांढरी चादर टाकून त्यावर केळीची मोठाली पाने एका पुढे एक अशी लावली होती. या हिरव्या पार्श्वभूमीवर बाजारात मिळणाऱ्या खोटय़ा झेंडूच्या फुलांच्या माळा लावल्या होत्या. आणि त्यामधून लायटींगच्या माळा चढविल्या होत्या. थोडय़ा वेळाने मूर्तीवर वेगवेगळे लाइट्स पडल्यामुळे एक उत्तम परिणाम दिसून येत होता. ( केळीची पाने चार ते पाच दिवस सहज टिकतात आणि तितकीशी महागही नसतात.)
खऱ्या झेंडूच्या माळादेखील आठ ते दहा दिवस सहज टिकतात, तेव्हा या माळेचा उपयोग पडद्यासारखा करूनदेखील सजावटीचा नेमका परिणाम साधता येतो. वेगवेगळय़ा रंगातील फुलांच्या पाकळय़ा आणून त्याद्वारे मूर्तीच्या खाली अथवा समोर सुबक सजावट करता येईल. त्याच बरोबर घरात असलेल्या रिकाम्या बाटल्यांना सोनेरी किंवा चमकता पेपर लावून त्यामध्ये वेगवेगळय़ा प्रकारची फुले ठेवून ती मूर्ती सभोवती ठेवता येईल. अथवा वेगवेगळय़ा पानांच्या फांद्यांचे मंडप तयार करून त्यामध्ये देखील मूर्ती ठेवून त्यावर लायटिंग लावता येऊ शकेल. ठेवणीतील चादरी, साडय़ा किंवा ओढणीचा वापर प्रत्येक घरात सणा-समारंभासाठी अशा खास चादरी, साडय़ा, ओढण्या ठेवलेल्या असतात. या गोष्टींचा अशावेळी कल्पकतेने वापर करून आरास करता येते. याव्यतिरिक्त सध्या बाजारात उत्तम रंगसंगती साधणारे खास सजावटीसाठीच असलेले पडदे उपलब्ध आहेत. तसेच सिल्क, पैठणी कपडय़ांचा वापर करून त्यावर एखादा मंत्र अथवा श्लोक लिहून तयार केलेले पडदे बाजारात मिळतात. नुसतेच पडदे नाही तर या पडद्यांवर खुलून दिसतील अशा तयार झालरीदेखील सध्या बाजारात उपलब्ध आहे. यांचा वापर करूनदेखील आकर्षक सजावट करता येते.
लायटींगने केलेली सजावट- पूर्वी फक्त गणपती किंवा नवरात्र या सणावारीच लायटींग केले जात असे. पण अलीकडे मात्र प्रत्येक छोटय़ा पूजेपासून ते मोठय़ा सणवारापर्यंत सजावटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लायटींग हा या सजावटीचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे. अलीकडे बाजारात वेगवेगळे परिणाम साधणारे लायटींग उपलब्ध आहेत. त्याच बरोबर फोकस लाईट ही संकल्पना देखील जनमानसात विशेष लोकप्रिय होत आहे. या लाईट्समध्ये मूर्ती छान उठून दिसते. शिवाय दिवाळी आणि अनेक प्रकारच्या सणांच्या दिवशी या लायटींगचा वापर होत असल्यामुळे यामध्ये केलेली गुंतवणूक ही पैसा वसूल असते. इकोफ्रेंडली मखर हा देखील एक चांगला पर्याय बाजारात उपलब्ध आहे. यात फोल्डिंगचे पंखे, मखर अशा तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टींचा समावेश असतो. शिवाय ते हाताळायला सुटसुटीत असतात. यामध्ये थीमनुसार विविध प्रकार पाहावयास मिळतात, जसे वेगवगेळय़ा शैलीतील मंदिरे, गोपुरेही असतात. ही कागदाची आणि त्यातही फोल्डिंगची असल्यामुळे सहज हाताळता येतात.
याशिवाय, पेपर बॉल्सच्या माळा, कागदी किंवा चमचमणाऱ्या झिरमिळय़ा यांच्या सहाय्याने मूर्तीच्या मागे आकर्षक सजावट करता येते. अलीकडे बऱ्याच प्रदर्शनांमधून भिंतीवर सहजपणे बसविता येतील असे नक्षीदार साचे मिळतात. या ४-५ साच्यांच्या मदतीने दोन-तीन प्रकारच्या नक्षींचे आकार साधता येतात. सजावटीसाठी डेकोरेटिव्ह पेपर हा एक चांगला पर्याय आहे. यात विविध रंगाबरोबर सोनेरी, चंदेरी पेपर उपलब्ध असतात. मूर्तीच्या मागे हे पेपर नुसते चिकटवून त्यावर लायटींग केले तरी सजावट आकर्षक बनते. तसे पहिले तर सजावट ही जाच्या त्याच्या कल्पकतेचा भाग असतो. काहींना साधी, पण आकर्षक सजावट हवी असते तर काहींना भपकेबाज, उठून दिसणारी अशी सजावट हवी असते. संस्कार भारती सारखी एखादी मोठी रांगोळी सजावटीचा भाग बनू शकते किंवा नाजुकशी वेलबुट्टी आणि त्याभोवती फुलांची आरास अथवा आरतीच्या थाळीमधली रांगोळी, मूर्तीच्या दोन्ही बाजूला घंटा लटकवायच्या आणि मधोमध समई ठेवल्यास एकदम पारंपरिक आणि सात्विक भाव प्राप्त होतो. वेगवेगळय़ा प्रकारचे लटकन, वॉल हंॅगिग यांचा खुबीने वापर करून सजावट आकर्षक करता येते.
अलीकडे इरकल किंवा पैठणी कपडय़ामध्ये लॅम्प शेड्स आकारातील कंदील बाजारात मिळतात. या कंदिलांचा वापर करून छान रंगबेरंगी आरास करता येते. या प्रकारची आरास मूर्ती भोवती छान तर दिसतेच, पण त्याच बरोबर तिचा जो पारंपरिक लुक असतो तो खूपच नजरेत भरतो. सध्याच्या काळात सजावटीसाठी साधने आणि पर्याय मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या कल्पनाशक्तीची आणि त्या जोडीला खऱ्या भक्तीभावाची. अनेकदा साधी सजावट देखील आकर्षक होऊन जाते.