नगरीची सुरक्षा
मनुने भव्य अशा अयोध्येची निर्मिती केली. त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढील राजांनीही त्याचाच कित्ता गिरवला. दशरथही महापराक्रमी, वेदवेत्ता, उत्तम वस्तूंचा संग्राहक, दूरदर्शी, धर्मनिष्ठ, मनोनिग्रही असा ऋषीतुल्य राजा होता.
अतिशय बलशाली अशा या राजाने आपले शत्रू नाहीसे केले होते. आपल्या नगरीत त्याने द्रव्य आणि धान्याचा इतका मोठा संचय केला होता की, त्याची तुलना इंद्र व कुबेराशी होत असे.
नगरीच्या रक्षणासाठी संपूर्ण नगरीभोवती तटबंदी उभारलेली होती. अत्यंत खोल खंदकांनी युक्त अशा या नगरीत स्वकीयांनाही सहज प्रवेश नव्हता. त्यामुळे अर्थातच शत्रू तिच्या जवळपासही फिरकत नव्हते. अयोध्येतील उंच माडय़ा ध्वज-पताकांनी केवळ सुशोभितच होत्या असे नव्हे तर सुरक्षेसाठी ‘शतघ्नी’ म्हणजे तोफाही ठेवलेल्या होत्या. अरण्यातील उन्मत्त सिंह, व्याघ्र आणि वराहांचा आपल्या तीक्ष्ण शस्त्रांनी व बाहुबलानेही वध करण्याचे सामथ्र्य असलेल्या हजारो वीरांनी नगरी युक्त होती. या योध्यांच्या साहाय्यार्थ बाल्हिक, कांबोज, वनायुज आणि सिंधु प्रदेशातील उत्तम अश्व आणि हिमालय व िवध्याद्रीवरील अतिबलाढय़ गजांची सेना होती. अग्नीप्रमाणे तेजस्वी, स्वभावाने सरळ, अपमान सहन न करणारे आणि शस्त्रास्त्रविद्य्ोत प्रवीण अशा योध्यांनी युक्त असलेल्या या नगरीला म्हणूनच वाल्मीकी सिंहाच्या गुहेची उपमा देतात. (या साऱ्या सुरक्षाव्यवस्थेवरून कोणीही यावे आणि आम्हाला लुटून न्यावे असला चांगुलपणाचा अतिरेक त्या काळी राज्यकर्त्यांना मान्य नव्हता असे दिसते). अर्थात प्रचंड पराक्रमी असूनही हे योद्धे धर्माचे आचरण करतात. ते सहाय्यरहित, अनाथ, भीतीने दडून बसलेले आणि पलायन करणारे अशांवर आपले शस्त्र कधीही उगारत नसत. दशरथाला ही सारी व्यवस्था कमी वाटत होती म्हणून त्याने नगराची सारी व्यवस्था चोख आहे ना, हे पाहण्यासाठी जागोजागी गुप्तहेर ठेवलेले होते. मला वाटतं, हा संदर्भ फार महत्त्वाचा आहे. कारण आज भारत स्वतंत्र होऊन साठ र्वष होऊन गेल्यावरही आमच्या शत्रूराष्ट्रातून घुसखोर येतात आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात असंख्य निरपराध नागरिक बळी पडतात कारण ह्या घुसखोरांची बातमी द्यायला आमची गुप्तहेर यंत्रणा सक्षम नसते. त्यामुळे रामायणातल्या या वर्णनावरून आपल्या राष्ट्राचे रक्षण करण्याचा एक सुंदर परिपाठ आपल्याला घेता येईल.
नगराची व्यवस्था पाहिल्यावर आपण आता रामायणकालीन वनवासींची निवास व्यवस्था पाहणार आहोत. कैकयीच्या शापामुळे वनात गेल्यावर निवासासयोग्य अशा चित्रकुट पर्वताची निवड राम करतो. येथे स्थापत्य शास्त्रातील पहिला नियम जागेची निवड याचा विचार आपल्याला करवाच लागेल. चित्रकुट पर्वताचीच निवड का याची अनेक कारणं रामाने दिली आहेत. नाना प्रकारचे वृक्ष असलेल्या, रम्य, पवित्र अशा या सपाट जागी आपण आनंदाने कालक्रमणा करू. ही कालक्रमणा आनंदाने का तर त्या जागेवर नाना जातीच्या लता व वृक्षांची विपुलता असून हे सारे लता-वृक्ष फळं व फुलांनी बहरलेले आहेत. येथे कंदमुळेही विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. माल्यवती नदीच्या काठी हे ठिकाण आहे. थोडक्यात, अन्न-पाण्याची कमतरता येथे नसल्यामुळे उपजीविकेची चिंता इथे नाही. या ठिकाणी महात्मे आणि मुनी निवास करतात म्हणून आपणालाही हे निवासस्थान चांगले आहे. (अयोध्या. ५६.१५). रामाच्या जागा निवडीत अन्न-पाण्याची भरपूर उपलब्धता हा जसा मुद्दा आहे, तसा उत्तम शेजार हाही रामाला महत्त्वाचा वाटतो. आजही जागा घेताना आपण ठराविक ठिकाणांना जास्त महत्त्व देतो त्यामागे तेथील वातवरण थोडक्यात, कशा प्रकारचे लोक आहेत हे पाहतोच. म्हणजे उत्तम शेजार ही अनादी काळापासून माणसाची गरज राहिली आहे.
रामाने निवड केलेल्या त्या जागेवर लक्ष्मण उत्तम व भक्कम लाकडं आणून कुटी उभारतो. ही कुटी जागेच्या अंदाजानुसार उत्कृष्ट रीतीने उभारलेली, वृक्षपर्णानी आच्छादलेली, पाऊस-वाऱ्याचा कडेकोट बंदोबस्त केलेली आहे. कुटी बांधून झाल्यावर राम म्हणतो, लक्ष्मणा, मृगमांस आणून आपण वास्तुशमन करू या. चिरंजीवी होऊ इच्छिणाऱ्यांनी शास्त्रसंमत असा हा विधी केला पाहिजे (अयोध्या. ५६.२३-२४). वास्तुशमन म्हणजेच वास्तुशांत. कदाचित वास्तुशांतीचा हा सर्वात प्राचीन संदर्भ असू शकतो. वास्तुशांत केल्यावर बळी ठेवण्याची पद्धत आजही अस्तित्वात आहे. रामानेही देवालये, पार आणि बळी ठेवण्यास योग्य अशा सर्व ठिकाणी बळी ठेवला, असा उल्लेख अयोध्याकांडात आहे.
रामायण हे रामाच्या पराक्रमी प्रवासाचे वर्णन असल्यामुळे तो एका जागी फार काळ राहिलेला नाही. त्यामुळे चित्रकुटावर काही काळ वास्तव्य केल्यावर तो पुढे जातो. त्यानंतर त्याने पंचवटीत दीर्घकाळ मुक्काम केला आहे. पंचवटीत राहायचे ठरल्यावर चित्रकुटाप्रमाणेच सपाट भूमी, स्वच्छ जलाशय, पुष्प-फळं-पर्ण-कुश आणि लाकूड यांनी संपन्न अशा ठिकाणाची राम निवड करतो. जागेची निवड झाल्यावर पुन्हा एकदा लक्ष्मण कुटी उभारतो. या ठिकाणी मात्र आश्रम उभारणीचे थोडे विस्तृत वर्णन येते. येथील पर्णशालेच्या संघात मृत्तिका म्हणजे मातीच्या िभती आहेत. पर्णकुटीला चांगले खांब लावलेले आहेत आणि बांबूचे लांबच लांब वासे त्यावर ठोकलेले आहेत. शमीच्या शाखा त्या वाशांवर अंथरलेल्या आहेत. त्यांवर कुश, काश, शर नावाचं गवत आणि पानांचे उत्तम आच्छादन आहे. येथेही पुन्हा वास्तुशांतीचा उल्लेख आहे. या ठिकाणी खोल्यांशिवाय लांबच लांब पसरलेल्या पर्णशालेचे वर्णन वाचल्यावर मला आदिवासी पाडय़ांतून आढळणाऱ्या घरांची आठवण झाली. ती घरेदेखील या पर्णशालेप्रमाणे एकच लांब खोली असलेली असतात. आजच्या काळातील आदिवासींच्या घराचे रामाच्या पर्णशालेशी असलेले हे साम्य पाहिल्यावर रामायणासारख्या प्राचीन काळात वास्तुविषयक आलेली वर्णनं ही वास्तवाला धरून असावीत, असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा