आमच्या देशमुख वाडय़ाला जवळजवळ ३०० वर्षे उलटून गेली, पण तो अजूनही दिमाखात उभा आहे. या वाडय़ाचा दिल्ली दरवाजा उत्तराभिमुख आहे. दरवाजातून आत गेल्यावर या मोठय़ा मोठय़ा देवडय़ा; येथून आत गेल्यावर डावीकडे कोर्ट. येथे आमचे काका जज्ज म्हणून बसत. तेथेच पूर्वी कोर्ट चालत असे. परिणामी देवडय़ावर चोर-पोलीस यांचा राबता असायचा. कोर्टाच्या वरती मोठा बंगला, येथे काका-वडील यांच्या वेळेस दसऱ्याची पान-सुपारी होत असे. मोठमोठय़ा गायकी लोकांच्या मैफली होत असत. मास्टर कृपनराव फूल्र्मीकर, ज्योत्स्ना भोळे, पंडित जगन्नाथ बुवा पंढरपूरकर यांच्या मैफली येथे रंगल्या आहेत. बाजूलाच दोन छोटे बंगले- एक वडिलांचा व एक काकांचा. ही त्यांची एकांतात बसण्याची बैठक. खालील जागा बँकेला दिलेली. या बँकेतही अनेक मोठमोठे मंत्री येऊन गेलेले. मधुकरराव चौधरी, श्री. वानखेडे, श्री. भारदे अशी बडीबडी असामी येऊन गेली आहेत.
बगीच्यातील डेरेदार कामीनीयाची झाडे. या झाडांना १८० वर्षांहून ज्यास्त वर्षे झाली. अजूनही या झाडांना बहर आला की सर्वदूर सुगंध पसरतो. इथला कारंजा, झोपाळा अनेक वर्षांपासून आहे. आमच्या वाडय़ाला आत जाण्यास पूर्वाभिमुख दरवाजा आहे. दोन्हीकडील मोठे ओढे आहेत. लग्नकार्याच्या वेळेस येथे मांडव घालतात. या वाडय़ात जवळजवळ ३५ ते ४० खोल्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात. हा चौक ही मोठी बैठक आहे. आमचे काका व धाकटा भाऊ वकील होता. ते येथील झोपाळ्यावर बसून बैठकीवरील बाहेरील (गावातील) लोकांना सल्ले देत. त्यांच्याकडे खूप लोक येत. डावीकडील बंदुकीची खोली. यात पूर्वीपासूनच्या बंदुकी असायच्या. आता त्या सरकारजमा केल्या. भिंतीवर जर्मन घडय़ाळ असून या घडय़ाळाला जवळजवळ १५० वर्षे होऊन गेली आणि अजूनही ते चांगले आहे. उजवीकडील खोली म्हणजे देवघर. या खोलीत मोठा देव्हारा आहे. देव्हाऱ्यात आमचे पूर्वापार देव व श्रीकुल दैवत आहे.
माजघरातही झोपाळा आहे. येथे स्त्रियांना बसण्यासाठी व नास्ता वगैरे करण्यासाठी खोली आहे. बाजूची अंधारी खोली ही बाळंतिणीची खोली म्हणून ओळखली जायची. त्याबाजूला स्वयंपाकघर आहे. मोठे स्वयंपाकघर असून येथे मोठय़ा सणाचा व लग्नकार्याचा स्वयंपाक होतो. दोन्ही ओसऱ्यांवर पंगती अजूनही बसतात. लागूनच तळघर आहे. येथून बाहेर जाण्याचा रस्ताही होता. आता तो बुजवला आहे. येथे श्रीमहादेवाचे देऊळ व पीर अजूनही डोले तांबूत आहे. बाजूची दिव्याची खोली. पूर्वी येथे दिवे ठेवायचे व पाटही ठेवायचे म्हणून पाटाचीही खोली म्हणतात. समोर चहाची खोली आहे. येथे चहा व्हायचा. एकेकाळी जवळजवळ २५ माणसे घरात असायची. आमचे आई-वडील, आम्ही सहा भावंडे, काका-काकू, त्यांच्या तीन मुली, आजी, आजीचा भाऊ-भावजय, त्यांची चार मुले, जवळचे नातलग सर्व या वाडय़ातच राहात. पण कोणात दुजाभाव नसे. जवळच धान्याची खोली (कोठीघर) आहे. त्यानंतर आंघोळीची खोली व जवळच कपडे बदलण्याची खोली. विहीर, रहाटही आहे. पुढे लहान चौक आहे. वर उजवीकडे भावाची खोली व डावीकडे भांडय़ाची खोली. या खोलीत मोठमोठी भांडी ठेवतात. बाजूला काका-काकू, आई व लहान भाऊ यांच्याही स्वतंत्र खोल्या. समोर गालीच्याची खोली. या खोलीत जरीचे सुबक व काश्मिरी कलाकुसर केलेले भरजरी गालीचे मोठमोठय़ा पेटीत ठेवलेले असायचे.
आता या वाडय़ात एक भाऊ, लहान भावाची बायको (आता भाऊ नाही) भावजय, भाचे कंपनी, भावाच्या सुना-मुले असे राहातात. या वाडय़ातील व्याही लोक वाडय़ाला शोभणारेच आहेत. नाशिकचे सरदार विंचूरकर, मालेगांवचे राजेबहाद्दूर, एलीयपूरचे देशपांडे, सोलापूरचे डॉ. मुळे, देवासचे रावबहाद्दर बिडवई व बाबासाहेब पुरंदरे..
पाठीमागील बाजूस मारुतीचे देऊळ आहे. हा स्वयंभू मारुती आहे. याचे देऊळ आमच्या आजीने बांधले. वर ४-५ खोल्यांचा ब्लॉक आहे. मारुतीच्या दर्शनास पाचलेगांवकर महाराज, बिडकर महाराज असे लोक येऊन गेले.
बाहेरील बाजूस पूर्वापार मेणे व पालख्या अजूनही आहेत, त्याही चांगल्या अवस्थेत. दोन वर्षांपूर्वी बराच खर्च करून आमच्या लहान भावाने वाडय़ाची सर्व डागडुजी केली. त्यामुळे आमचा हा वाडा नव्यासारखा आजही दिमाखात उभा आहे. खरंच आमचा हा वाडा आमच्या देशमुख घराण्याचा व रावेर गावाचे भूषणच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा