आतापर्यंत आपण संस्कृत काव्यसृष्टीतील वास्तुसंकल्पना व संरचनांचा विचार केला. काव्यगत अशा या संकल्पना निश्चितपणे आकर्षक आहेत. पण केवळ काव्यकल्पना निवासासारख्या रचनांच्या बाबतीत पुरेशा नसतात. त्या वास्तूंना शास्त्रीय आधार लागतो. अशा प्रकारचा शास्त्रीय आधार आपल्याकडे निश्चितच होता. त्यामुळेच प्राचीन काळी बांधलेल्या एकापेक्षा एक सरस अशा वास्तू आजही दिमाखात उभ्या असलेल्या दिसतात. स्वाभाविकच वास्तूविषयक शास्त्रग्रंथांचा विचार अपरिहार्यपणे येतो. इथून पुढे आपण असे शास्त्रीय ग्रंथ व त्यातील वास्तुशास्त्र समजून घेणार आहोत.
वास्तुशास्त्रीय परंपरा
भारतीय परंपरेत प्रामुख्याने दक्षिणी व उत्तरी परंपरा अशी विभागणी असली तरी ‘बेसर’ अशा आणखी एका परंपरेचा संदर्भ येतो. याशिवाय नसíगक वैविध्याने नटलेल्या भारतातील प्रत्येक प्रांतात तिथल्या वैशिष्टय़ांसह वेगवेगळ्या परंपरा विकसित झाल्याचे दिसते. असे जरी असले तरी आपण दक्षिणी व उत्तरी या प्रमुख परंपरांचा विचार करणार आहोत.
दक्षिणी किंवा द्राविड परंपरा
भारतीय संस्कृती ही धार्मिक वृत्तीची असल्याने ज्ञानाची प्रत्येक शाखा देवप्रणीत असल्याचे मानले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे उपलब्ध ग्रंथात प्रत्येक ग्रंथकार नम्रपणे आधीच्या ग्रंथांचा उल्लेख करतो. मग हे विकसित ज्ञान त्या ग्रंथकर्त्यांला कोठून प्राप्त झाले, असा प्रश्न नूतन ग्रंथकारालाही पडत असेल. आपल्या परंपरेत व्यक्तिपूजेला महत्त्व नाही. त्यामुळे स्वत:च्या नावापेक्षा आपले कार्य महत्त्वाचे या भावनेतून अनेकदा ग्रंथकर्त्यांनी नाव-गाव दिलेले नसते. अशा परिस्थितीत ज्ञात ग्रंथकर्त्यांना हे ज्ञान कोणत्यातरी देवतेकडून प्राप्त झाले असे सांगणे सोपे असते. हे करताना एक फायदा असा असतो की देवाकडून प्राप्त झालेले ज्ञान समाज चटकन स्वीकारतो आणि त्याचा विकासही होतो. याच विचारातून दोन्ही परंपरा ईश्वरप्रणीत असल्याचे दिसून येते. दक्षिणी परंपरेतील पहिला शिल्पशास्त्रज्ञ ब्रह्मा आहे. त्यानंतर ही यादी त्वष्ट्रा, मय, मातंग, भृगू, काश्यप, अगस्त्य, शुक्र, पराशर, नग्नजित, नारद, प्रल्हाद, शुक्र, बृहस्पती अशी आहे.
उत्तरी परंपरा
उत्तरी परंपरा शंभूपासून सुरू होऊन गर्ग, अत्री, वसिष्ठ, पराशर, बृहद्रथ, विश्वकर्मा, वासुदेव अशी आहे. अर्थात दोन्ही परंपरेतील आचार्याची सरमिसळ झालेली दिसते. मत्स्यपुराण, बृहत्संहिता अशा वास्तुशास्त्रावरील ग्रंथात दोन्ही आचार्याची नावं एकत्रित येतात.
वास्तुशास्त्रीय वाङ्मय
दक्षिणी आणि उत्तरी अशा दोन्ही परंपरांमध्ये वास्तुशास्त्रीय वाङ्मय हे अशास्त्रीय किंवा धार्मिक व शास्त्रीय किंवा अधार्मिक, असे विभागले गेले आहे.
दक्षिणी परंपरा – दक्षिणी परंपरेत शैवागम, वैष्णव पंचरात्र, अत्री संहिता, वैखानसागम, तंत्रग्रंथ, तंत्रसमुच्चय, ईशानशिवगुरुपद्धती असे अनेक अशास्त्रीय किंवा धार्मिक ग्रंथ येतात. दक्षिणी परंपरेतील आगम ग्रंथांचे स्थान पुराणांसारखे मानले जाते. पण पुराणांपेक्षा आगम ग्रंथांची संख्या व आकारानेही हे ग्रंथ अधिक मोठे आहेत. पुराणं अठरा तर आगम ग्रंथांची संख्या अठ्ठावीस आहे. ‘स्टडी ऑन वास्तुविद्या’ या ग्रंथाची रचना करणाऱ्या तारापद भट्टाचार्याच्या मते, कामिकागमासारख्या ग्रंथात वास्तुविद्य्ोवरील अत्यंत विस्तृत विवेचनामुळे हे आगमग्रंथ वास्तुशास्त्रीय ग्रंथ मानावे लागतील. पण या धार्मिक ग्रंथांव्यतिरिक्त विश्वकर्मीयशिल्प, मयमत, मानसार, काश्यपशिल्प ऊर्फ अंशुमभेद, अगस्त्यसकलाधिकार, सनत्कुमार वास्तुशास्त्र, शिल्पसंग्रह, शिल्परत्न, चित्रलक्षण असे अनेक ग्रंथ आहेत.
(पूर्वाध)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा