उन्हाळा आता अगदी शिगेला पोहोचल्यासारखाच सुरू झाला आहे, त्यामुळेच मी तुमच्यासाठी सौरऊर्जा वापरायचे विविध पर्याय आणतो आहे. सगळ्यात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे सौरचूल वापरणं.
माझं बालपण पुण्यात वाडय़ात गेलं. उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला आजोळी आलं म्हणजे एक दिवस काही उसंत मिळायची नाही. खेळासोबतच आजीच्या मागोमाग राहून मजा करण्यात दिवस चनीत जायचे. सगळ्यात लक्षात राहणारी मजा म्हणजे वाडय़ाच्या अंगणभर पसरलेली वाळवणं. वर्षभराच्या धान्या-मसाल्यांपासून पापड, लोणची इतकंच काय, अगदी ठेवणीतल्या कपडय़ांपर्यंत सगळं उन्हात चांगलं तापत असायचं.
सौरऊर्जेच्या वापराची ही सोप्पी आणि पारंपरिक पद्धत आजही गावागावांत वापरली जाते. अगदी मुंबई-ठाणे या गजबजलेल्या शहरांतूनही छोटय़ा-मोठय़ा प्रमाणावर ही वाळवणं दिसतातच. बोरिवलीत राहणाऱ्या सत्तरीच्या निर्मल मावशी उत्साहात बोलायला लागल्या. ‘आता या फ्लॅटमध्ये खिडक्या आहेत आणि त्यांतून ऊन येतं हेच समाधान मानायचं. पण मी जाते अजून इमारतीच्या गच्चीवर. तिकडे ठेवते कितीतरी गोष्टी. मी केलेला कैरीचा छुंदा सोसायटीत प्रसिद्ध आहे. कैरी किसायची, एका कोरडय़ा चपटय़ा डब्यात साखर आणि वेलची पूड यांसोबत चांगली मिसळायची. डब्याला झाकण न लावता स्वच्छ पांढऱ्या कापडाने झाकायचं. त्यावर चाळणी उपडी घालायची म्हणजे कावळ्या कबुतरांचा त्रास होत नाही आणि हे सगळं गच्चीत उन्हात ठेवायचं. रोज संध्याकाळी चांगलं ढवळून ठेवायचं. ७-८ दिवसांत छुंदा तयार होतो.’ निर्मल मावशींनी मागल्या उन्हाळ्यात आंबापोळीदेखील घरीच केली, अगदी यशस्वीपणे.
आपल्या घरीच सौरऊर्जेवर असे विविध पदार्थ करण्याचा आनंद काही औरच असतो. आज आमच्या पिढीतली दिवस-रात्र काम करणारी, घरात फक्त रात्री पाठ टेकायला येणारी जोडपी सौरऊर्जेचा वापर करू शकतात. माझा स्वत:चा अनुभव सांगतो. इमारतीच्या सर्वात वरच्या, सातव्या मजल्यावरच्या माझ्या घराला छोटेखानी बाल्कनी आहे. दिवसभर भरपूर ऊन येतं. या घरी आल्यावर मी सौरचूल घेतली आणि शनिवार-रविवार त्यावर शिजवण्याचे प्रयोग केले. दिवसभर सूर्याकडे फिरवत ठेवून वरण-भात आणि बटाटय़ाची भाजी असा सगळा स्वयंपाक तयार केला. दोन दिवसांच्या अनुभवावरून उन्हाची दिशा समजून घेतली आणि सोमवारी सकाळी कामाला निघतानाच सौरचूल अशी ठेवली की दिवसातला जास्तीत जास्त काळ ऊन मिळेल. रात्री जेव्हा घरी आलो तेव्हा स्वयंपाक करायलाच लागला नाही. सौरचुलीत व्हेज पुलाव, मटकीची उसळ आणि मक्याचे पॅटिस तयार होते, तेही गरम.
माझे हे सौरचुलीवरचे प्रयोग कळल्यापासून आमच्या घोलप आजी खूश आहेत. त्यांच्याकडे कितीतरी र्वष सौरचूल वापरतात. आजी-आजोबा, मुलगा-सून आणि छोटी नात अशी मोजकीच माणसं. सगळ्यांच्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची जबाबदारी सौरचुलीच्या मदतीने आजींनी उचलली. इमारतीच्या गच्चीवर त्यांची सौरचूल सकाळी अवतरायची. आजोबा रोज ती पुसून स्वच्छ करायचे. मग आजी-आजोबा मिळून पदार्थाचे डबे त्यात ठेवायचे आणि दिवसभर आळीपाळीने सौरचूल सूर्याकडे फिरवत राहायची. ‘अरे काय सांगू तुला, सौरचूल म्हणजे आमच्या आनंदाचा ठेवा होती. दिवसभर तिला सांभाळण्यात वेळ जायचा. शिवाय सायंकाळी सून, मुलगा ऑफिसमधून आली म्हणजे जेवण तयार असायचं. सुनेलाही आम्ही स्वयंपाक करून ठेवतो याचं कौतुक वाटायचं.’ घोलप आजी आपल्या लाडक्या सौरचुलीचं कौतुक सांगत होत्या. ‘मी त्यात शेंगदाणे भाजायची. झालंच तर रवा, दिवाळीच्या दिवसात चिवडय़ासाठी पातळ पोहे भाजायची.
लोणी कढवून ठेवायची. अरे एकदा प्रयोग म्हणून नानकटाई केली, सुरेख झाली. माझ्या नातीला
तर घरचीच नानकटाई आवडायची. अरे त्या वेळी फक्त सहाशे रुपयांत घेतलेल्या सौरचुलीमुळे आम्ही किती काय मिळवलं.. इंधन वाचायचं, शिवाय दिवसभर आम्हा दोघांना एक उद्योग असायचा
आणि सुनेला मदत व्हायची ते वेगळं.’ आजींची सौरचूल १०-१२ र्वष वापरल्यावर नुकतीच
चोरीला गेली, त्यामुळेच आजी सध्या अगदी हळव्या होऊन आपल्या सौरचुलीची आठवण काढत असतात.
सौरचूल आता माझ्या आयुष्याचाही एक अविभाज्य भाग झाली आहे. मध्यंतरी माझ्या घरी आई-वडील राहायला आले असताना त्यांनाही सौरचुलीची गोडी लागली. चटकन मत्री झाली. माझ्या आईने त्यात रोज थोडे असं करत चांगले ३-४ चार किलो टॉमेटो उकडले. सोबतच लसणीच्या पाकळ्या आणि थोडी काळीमिरी असंही छान भाजून घेतलं. टप्प्याटप्प्याने सगळं मिक्सरमधून काढून गर करून फ्रीजमध्ये ठेवलंय. आता हवा तेव्हा त्यातला थोडा गर काढायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि जरुरीपुरतं पाणी घालून उकळलं की वाफाळतं सूप तयार. आई आणि मी मिळून ओले मसालेही करून ठेवले आहेत. कांदा, लसूण, आलं आणि मिरची एकत्र शिजवून घेतलं. मिक्सरमधून वाटून घेतलं. आता रसभाजी करताना ग्रेव्ही झक्कास होते. मध्यंतरी पालक स्वस्तात मिळाला म्हटल्यावर आईने खूप सारा पालकही उकडून ठेवला आहे. पालक पनीर, पालक पुलाव, पालक सूप असं आता दोन मिनिटांत तयार होतं.
पुण्यात राहणाऱ्या माणिक अंबिके प्रसिद्ध आहेत भरतनाटय़मच्या गुरू म्हणून. अनेक उत्तमोत्तम शिष्या त्यांनी घडवल्या आहेत. त्यांना सौरचूल आवडते त्यामुळे त्यांच्या घरी १९८७ पासून सौरचूल आहे. तेव्हापासून तीन-चार चुली झाल्या. आजही दोन आहेत घरात – एक नेहमीची एका आरशाची आणि दुसरी चार आरशांची, डब्यांना प्रेशर-कुकिंगची सोय असलेली. माणिकताईंची ओळख सौरचुलीशी कशी झाली याचा एक झक्कास किस्सा त्या सांगतात. ‘माझ्या तरुणपणी मी नृत्य प्रशिक्षणासाठी बडोद्याला होते. माझ्या गाíडयन कुटुंबासोबत राहत होते.
तिकडे आमच्या बा रोज सकाळी सगळी जेवणाची तयारी करायच्या, डब्यांतून भरायच्या आणि घराच्या गच्चीवर सगळे डबे घेऊन जायच्या. मी तरुण होते, तोपर्यंत स्वयंपाक येत नव्हता. मात्र बांच्या त्या वागण्याचं कुतूहल वाटलं म्हणून एक दिवस त्यांच्या सोबत गच्चीत गेले. तिकडे पाहिलं तर सौरचूल.
पुढे एका प्रदर्शनात माझी पहिली सौरचूल विकत घेतली आणि आज जवळजवळ दोन तपांपेक्षा जास्त काळ मी ती वापरते आहे. मटण-चिकनपासून, वरण-भातापासून, केक, तंदूरसारखे पदार्थ मी करत आले आहे. प्रयोग केले, शिकले. सौरचूल प्रदूषणरहित आहे. फुकट आहे. सगळं मान्य. पण मला ती का आवडते सांगू? सौरचुलीत शिजवलेलं अन्न खाताना मी सूर्य वाटून घेतला आहे, असं वाटतं मला! निसर्गात सगळेच त्याच्या प्रकाशावर पोसले जातात. मीदेखील त्यांच्यापकी एक झाले असं वाटतं मला.’
माणिकताईंच्या या तरल विचारांनी मला दिलेल्या धक्क्यातून सावरतो तोच त्या म्हणाल्या, ‘आणि काय गंमत आहे पाहा. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना  पाणी मिळत नाही. मिळालं तरी शुद्ध नाही. या वेळी सौरचूल स्वस्तात पाणी उकळून प्यायची सोय करते बघ.’
सौरचुलीचं आपल्या वास्तूतलं महत्त्व मला कळलं म्हणूनच मी ती विकत घेतली. मनोभावे वापरतोदेखील. मात्र सूर्य वाटून घेण्यातली मजा आता कुठे उमगायला लागली आहे असं वाटतं आता.