दिवाळीतही आपले घर वेगळेच रूप धारण करते. घराचा कोपरान् कोपरा उजळून निघतो. वेगवेगळ्या कोनांतून घर विलक्षण झगमगून जाते. वेगवेगळ्या फ्रेम्समधून घराचे वेगवेगळे आयाम जाणवतात. एकदा दिवाळीच्या दिवसात मी खरेदी करून रात्री घरी परतले तर ‘हे माझेच घर आहे ना?’ मला प्रश्न पडला. आमावस्या जवळ आली असल्याने अंधार माखला होता. त्या पाश्र्वभूमीवर अंगणात पणत्यांची रांग उजळली होती. खिडक्यांवर दीपमाळ तेजाळली होती. आकाशदिवा झगमगत होता आणि तुळशीपाशी एक पणती तेवत होती. तिच्या प्रकाशात त्या कृष्णतुळशीची पाने अधिकच उठून दिसत होती.
शरद ऋतूतली कोजागरी आणि आश्विन पौर्णिमा गरम सुगंधी दुधासोबत गुलाबी थंडीची शाल घेऊन आली. थंडीची चाहूल लागलेलीच होतीच- बऱ्याच लांबलेल्या पावसाच्या शेवटच्या शिडकाव्यांमुळे. म्हणजे आता घरात दिवाळी आलीच म्हणून समजा. अंगणात बसून दुधामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पाहून मग निवांत बसून गप्पाटप्पा करत दुधाचा पेला ओठाला लावतानाच बालपणी ऐकलेले आजीचे शब्द आठवले, ‘कोजागरीपासूनच दिवाळीचे वेध लागतात. कोजागरी ही जणू येणाऱ्या दिवाळीची नांदीच.’ तर त्यावर आई म्हणाली होती तेही आठवले, ‘कोजागरी ते तुळशीचे लग्न.. इतके दिवस दिवाळी असते आपल्या घरात.’ आईच्या ह्या वक्तव्यावर मला त्या वेळी बालसुलभ प्रश्न पडला होता- कोण ही ‘दिवाळी’? ती घरी आल्यावर कुठल्या खोलीत राहणार? ती कशी दिसते? ती केवढी आहे?’ आजी-आईसह सारे घर त्या वेळी ‘खो खो’ हसले होते. दिवाळी ही कोणी छोटी मुलगीच आहे, ती आपल्या घरी येणार आहे- माझ्याशी खेळायला- असा माझा समज होता. हसून आई म्हणाली, ‘तसं समज. दिवाळी आपली मैत्रीणच तर असते. ती आपल्या जीवनात प्रकाश तर आणतेच, पण आनंद, गोडधोड पदार्थ आणि मुख्य म्हणजे नात्यातली माणसे घेऊन येते. त्या दिवाळीच्या स्वागतासाठी आपण आपलं घर आवरून स्वच्छ करू या.’ तर अशी ही ‘दिवाळी नामक मैत्रीण’ घरी येणार म्हणून मी कंबर कसून घर स्वच्छ करायला मदत केली.
या साऱ्या माझ्या बालपणीच्या आठवणी नेमेचि येणाऱ्या प्रत्येक दिवाळीच्या वेळी ताज्या होतात. मसाला दुधाची चवही आठवणींप्रमाणे रेंगाळत राहते.
आश्विनीला ज्येष्ठ अपत्याला ओवाळण्याची परंपरा असली तरी धाकटय़ालाही मी ओवाळले. त्याचं धाकुटेपण त्यात उजळून निघालं. रात्री कितीतरी वेळ ते निरांजन तेवत होते. त्याच्या प्रकाशात घर अगदी वेगळेच भासत होते. दिवाळीतही आपले घर वेगळेच रूप धारण करते. घराचा कोपरान् कोपरा उजळून निघतो. वेगवेगळ्या कोनांतून घर विलक्षण झगमगून जाते. वेगवेगळ्या फ्रेम्समधून घराचे वेगवेगळे आयाम जाणवतात. एकदा दिवाळीच्या दिवसात मी खरेदी करून रात्री घरी परतले तर ‘हे माझेच घर आहे ना?’ मला प्रश्न पडला. आमावस्या जवळ आली असल्याने अंधार माखला होता. त्या पाश्र्वभूमीवर अंगणात पणत्यांची रांग उजळली होती. खिडक्यांवर दीपमाळ तेजाळली होती. आकाशदिवा झगमगत होता आणि तुळशीपाशी एक पणती तेवत होती. तिच्या प्रकाशात त्या कृष्णतुळशीची पाने अधिकच उठून दिसत होती. शेजारीच सालाबादप्रमाणे चिरंजीवांनी वानरसेना जमवून भलामोठा किल्ला बांधला होता. त्या किल्ल्यावरही पणत्या ठेवल्या होत्या. किल्ल्यावर शिवाजी महाराजांपासून डायनासॉपर्यंत आणि भाजीवाल्या बाईपासून हेलिकॉप्टपर्यंत सर्व काळातल्या तमाम गोष्टी विराजमान झाल्या होत्या. मी क्षणभर गुंगून गेले. किती वेगळं दिसत होतं ते सारं! चिरंजीवाने किल्ल्याजवळ कोपऱ्यात फिरत्या रेल्वेच्या पलीकडे मातीची एकदोन छोटी घरं बांधली होती. त्याबाहेर सवत्स धेनू आणि मोळीवाली बाई होती. ‘या घरांत पण एकेक पणती ठेव ना,’ मी सुचवले. चिरंजीवाने त्या मातीच्या पिटुकल्या घरात पणत्या ठेवल्या. तत्क्षणी ती घरेही जिवंत भासू लागली. दिवाबत्ती केली की ओसाडीचे घरही जिवंत वाटू लागते. दिवा आणि माणूस यांचे नातेच असे असते!
दिवाळी ही असा प्रकाश घेऊन येते घरी. ‘जुने जाऊ द्या मरणालागुन.. जाळुन अथवा पुरुनी टाका..’ ही काव्यपंक्ती आळवत घरातले जुनेपुराणे निरुपयोगी सामान बाहेर काढले जाते. भंगार, रद्दी, मोड विकून घरातच जागा तयार होते. माळ्यांवरच्या वर्षभर धुळीत पडलेल्या नकोशा सामानाला गृहिणीचा हात लागतो आणि त्यांची देखभाल करायची, विल्हेवाट लावायची.. यांवर चर्चा रंगते. काही निरुपयोगी वस्तू, कपडे गरजूंना दिले की सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते. शिवाय आपलेच घर जरा मोकळा श्वास घेऊ  शकते! दिवाळी हे त्यासाठी उत्तम निमित्त ठरते.
माणूस किती उत्सवप्रिय असतो नाही? प्रत्येक ऋतूला समजून नि सामावून घेतो तो आपल्या दिनचर्येत, आपल्या घरात. त्यातही तेजाचे, उजेडाचे त्याला भारी आकर्षण. जेव्हा अग्नीचा शोध लागला नव्हता, तेव्हा आदिमानवाला सूर्योदयाचे जसे अप्रूप वाटत असेल, तशीच आणि तितकीच आस वर्षांतून एकदा येणाऱ्या दिवाळीची असते. दिवाळीच्या आधीपासूनच घर कात टाकू लागते. पावसाळ्याने धुमाकूळ घातल्याने घराला जी ओल आलेली असते, भिंतींना जे पोपडे पडलेले असतात, त्यांवर रंगाचा लेप द्यायचा तर शिशिर ऋतूचा मुहूर्तच चांगला असतो. वर्षभराची जळमटे झाडून, डागडुजी करून, उघडय़ा पडलेल्या चिरा सांधून, लिंपून घर एखाद्या तेल लावून भांग पाडलेल्या सुस्नात-शहाण्या-हसऱ्या मुलासारखे भासू लागते. खेडेगावात, पाडय़ांवर, डोंगराळ-वस्त्यांवर दिवाळीपूर्वीच घराची शाकारणी होते. शेतकऱ्यांच्या कारभारणी पदर खोचून उभी नि आडवी सारवणं करताना स्वत:ही शेणानं माखून जात. उभी सारवणं झाली की साधारण २ फूट उंचीवर नक्षीदार रंगीत वेलबुट्टीची आडवी किनार रेखाटली जायची. त्यातच एखादी पणती, एखादे निरांजन काढून मध्येच ‘शुभ लाभ’ अशी अक्षरे कोरून काढली की दिवाळीची छान वातावरणनिर्मिती होते! आमची मदतनीस- रेखा तर दिवाळीच्या आधी दोन दिवस सुट्टीच घेते. तिला तिचे घर (खोली) दिवाळीनिमित्त रंगवायची असते. एकच खोली तिची. ती आणि तिची मुलं मिळून रंगवतात. दिवसभर घरातला पसारा रेखा फुटपाथवर झाकून ठेवते. घराच्या प्रत्येक विटेविटेवरून, चिराचिरांवरून दरवर्षी रेखाचा मायेचा हात फिरतो. आपले घर आपणच रंगवायचे, ही कल्पना खूप रम्य आहे. संध्याकाळी फुटपाथवरचा सारा पसारा पुन्हा घरात येतो. दिवाळीत घर रंगवण्याचा खटाटोप रेखाला आनंद देतो. तो तिच्या थकलेल्या, पण कृतकृत्य चेहऱ्यावर दिसतो.
शहरांमध्येही दिवाळी आणि गृहसजावट यांची सांगड घातलेली दिसते. दिवाळी बोनस हाती पडायचा अवकाश की घराचे रंगकाम, नवे फर्निचर, नव्या वस्तू यांनी वास्तूचा कायापालट होतो. दिवाळीच्या सुमुहूर्तावर नव्या गृहप्रकल्पाच्या योजना आखल्या जातात. गृह-नोंदणीचा श्रीगणेशा करायला दिवाळी हे सुंदर निमित्त पुरते.
दिवाळीच्या पहाटे घर जसे उजळते, तसे ते गंधाळूनही जाते. सुगंधी तेल, साबण, उटणे यांचा घमघमाट हे ‘कार्तिक स्नाना’चे व्यवच्छेदक लक्षण असते. जणू घराच्या भिंतींतून नि दारातूनच सुगंध दरवळतोय..! नवऱ्याला नि पोरांना तेलाने रगडून झाल्यावर ती गृहिणीही ‘सुगंधाबाई’ होते. आमच्याकडे घरातले पुरुष स्त्रीलाही- हाता-पायांना तेल लावतात. (अभ्यंगस्नानात विषमता नसते!) न्हाणीघर, बादल्या, कपडे.. सारेच सुगंधी. जणू घराला अत्तराचा फवारा मारलाय! असे सुगंधी उखाणे वर्षभरासाठी ऊर्जा पुरवणारे ठरतात. दुसरेही काही गंध घरात दरवळतात- ते तिखट-खमंग नि गोड फराळाचे. धूप-पात्रातून पेटत्या धुपाची धूम्रवलये गोल गोल फिरत आसमंत भारून टाकतात, तसे स्वयंपाकघरातून पदार्थाच्या वासांची धूम्रवलये भूक उद्दिपित करतात. दिवाळीत स्वयंपाकघरही वेगळंच रूप धारण करतं.
रंग-रूप-गंध-स्पर्श आणि शब्द यांनी घर गजबजून उठते. पाचही ज्ञानेद्रियांचीच ही दिवाळी! माणसाला घराशी जोडते दिवाळी. वर्षभर पायाला भिंगरी लावून गतिमान आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी वेडय़ासारख्या धावणाऱ्या माणसाला काही दिवस घरात राहून सौख्याचा मनमुक्त आनंद घ्यायला शिकवते दिवाळी. घर कसे एल्ल्न८ करायचे, हे सांगते दिवाळी. गाय-माणूस, पती-पत्नी, लक्ष्मी, बहीण-भाऊ अशा कितीतरी नात्यांचा समन्वय साधते नि घर सांधून ठेवते दिवाळी. विखुरलेल्या नात्यांना नि विस्कटलेल्या घराला पुन्हा घरपण मिळवून देते ही दिवाळी. घरोघरी नेमेचि येणारा दिवाळीतील पाडवा आमावस्येलाही पौर्णिमेचे उत्फुल्ल तेज देऊन जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा