रांगोळ्या काढण्याची हौस दिवाळीत पूर्ण करून घ्यायचे. रांगोळीचा डबा घेऊन अंगणभर रेषा, ठिपके मारायचे. याच दिवशी कंदील दीपावलीचे स्वागत करण्यासाठी दारासमोर झगमगत असे. कंदिलाचा रंगसंगतीतील ओटी-अंगणात पसरणारा प्रकाश हे खास आकर्षण असे.
आ मच्या गावात- उरणमधील नागांव (मांडळ आळी) तसे सगळेच सण पूर्वी उत्साहात साजरे व्हायचे. त्यात दिवाळी म्हणजे सगळ्यात मोठा सण. इतका मोठा की पूर्वी दिवाळीच्या स्वागताला प्रत्येक घर जवळजवळ महिनाभर आधीपासून तरी सज्ज असायचं. त्यातून गावातील घरांच्या दिवाळीसाठी शहराच्या तुलनेने जास्तच तयारी असायची. घराची डागडुगी करून रंगरंगोटी करायची. घरासमोर अंगण असायचे. ते अंगण कुदळीने उखळायचे. पाणी शिंपडून चोपणीने चोपायचे. येणारे बारीकसारीक दगडही काढून टाकायचे. अंगणाची पातळी एकसमान करायची. चोपायचा कार्यक्रम दोन-तीन दिवस तरी चालायचा.
ओटीच्या पायऱ्यांच्या समोर खास रांगोळी काढण्यासाठी अंगणापासून थोडय़ा उंचीवर ओटा तयार करावा लागत असे. त्यासाठी अंगणाची पातळी तयार झाल्यावर ओटय़ापुरती जास्त माती आणून ओटा चोपला जाई. त्यानंतर अजून पाणी मारून अंगण व ओटा दोन्ही गुळगुळीत करून घ्यावे लागायचे. हे गुळगुळीत केलेले अंगण-ओटा सुकला की त्याला शेणाने सारवले जायचे. या सर्वात आठवडा तरी जायचाच. शेण खराटा व हाताने दोन्ही प्रकारे सारवता यायचे. खराटय़ाची किंवा हाताने शेण सारवल्याची सुंदर नक्षी अंगणात उमटत असे. मग अंगण अगदी सुंदर, स्वच्छ नवेकोरे वाटायचे.
पूर्वी तांब्या-पितळेची भांडी असायची. या भांडय़ांना कल्हई लावून घ्यावी लागायची तेव्हा कल्हईवाले दर आठवडय़ाला दारावर ओरडत यायचे. ‘कल्हाईईईईईई’ अशी त्यांची हाकही तितकीच लयदार असायची. स्टोव्ह दुरुस्तीवालाही दारावर येत असे. त्याची ‘इस्टो रिपेर’ अशी हाक ऐकू आली की त्याला बोलावून आणायची घाई व्हायची.
स्वयंपाक खोलीतील भांडी घासण्याचा कार्यक्रम एक दिवस असे. अगदी पितळी टाक्या, तांब्याचे-पितळेचे हंडे, कळश्या, पातेली, तांबे, डबे, समई व इतर बाकीची भांडी आधी चिंचेने, मग राखेने घासून लख्ख केली जात. मग ती वाळवून, पुसून पुन्हा ऐटीत जागच्या जागी सोन्याप्रमाणे चमकायची. स्टोव्हही पितळेचा असल्याने तोही चिंचेने घासावा लागायचा. घडवंचीवरील भांडी तर त्यांच्या रचण्यामुळे फारच सुबक दिसायची. स्टीलची भांडी चिंच लावावी लागत नसल्याने पटकन घासली जायची. त्यात डझनभर ग्लास, तांब्या, पेले, चमचे, ताट, वाटय़ा असायच्या. त्यात कडीवाले उभे डबेही असायचे. शिवाय दिवाळीचा फराळ ठेवण्यासाठी मोठमोठे डबे असायचे ते वेगळेच. एखाद्या सुट्टीच्या रविवारी आई-वडील सामान भरायचे. महिन्याच्या किराण्यासोबत दिवाळी स्पेशल खरेदीही असायची. त्यात दिवाळीच्या पदार्थाचे सामान, उटणे, रांगोळी, पणत्या, साबण असायचा. साबण मोतीचा असायचा. हे सगळं सामान घरी आणल्यावर काढून बघायला खूप गंमत वाटायची. मग आई रांगोळी, रंग डब्यांमध्ये भरून ठेवायची. दिवाळीचे सामान वेगळे ठेवून रोजचे सामान जागच्या जागी ठेवले जायचे.
एका बाजूला दिवाळीच्या फराळाची तयारीही चालू असायची. डाळी, पोहे, साखर वाळवायची. आमच्या घरी जाते होते. आजी, आई त्यावर पीठ, साखर सगळी दिवाळीला लागणारी दळणे दळत असत. इतर जिन्नस निवडून ठेवले जात. अनारशाचे पीठ करण्यासाठी तांदूळ २-३ दिवस भिजवून ते दळले जायचे. मग अनारशाचे मिश्रण तयार करून ठेवले जायचे.
भाऊ कंदील बनवण्यासाठी सज्ज असायचा. कंदील बनवण्यासाठी वेगवेगळे रंगीत कागद वडील आणून देत असत. दिवाळीपर्यंत जेव्हा भाऊ कंदील करायचा तेव्हा फारच गंमत वाटायची.
मी जरा मोठी झाल्यावर घराबाजूच्या खडीमध्ये सापडणारे शिंपले, सागरगोटे घेऊन ते खलबत्त्यात बारीक कुटायचे आणि ते चहाच्या गाळणीत किंवा पीठ चाळायच्या चाळणीत गाळून त्याची रांगोळी बनवायचे. रांगोळी काढण्यासाठी लागणारा ठिपक्यांचा कागदही पूर्वी घरी बनवला जायचा. एका वर्तमानपत्रावर उभ्याआडव्या समांतर रेषा मारून उजळणीला लागणाऱ्या रकान्यांप्रमाणे रकाने करायचे व प्रत्येक रकान्याच्या कोपऱ्यावर धूर येणाऱ्या अगरबत्तीने भोके पाडायची. मध्येच ही भोके जास्त वेळ जळल्याने मोठी व्हायची.
मुलांना दिवाळीची सुट्टी पडलेली असायची. शाळेतला दिवाळीच्या सुट्टीतला गृहपाठ हा भराभर उरकला जायचा. तो एकदाचा उरकला की मुले घरासमोर मातीचा किल्ला बनवून त्यावर मातीचे मावळे उभे करून त्याच्या भोवती मेथी पेरायचे. ही मेथी आठ दिवसांत दिवाळीपर्यंत उगवून किल्लय़ाचा परिसर हिरवागार, लॉन लावल्यासारखा दिसायचा.
दिवाळीला ८-१० दिवस बाकी असले की गावात सगळ्यांच्या घरातून तिखट-गोड फराळाचा वास सुटायचा. पूर्वी गावातील सर्व ओळखीच्या घरांमध्ये, नातेवाइकांमध्ये आपले स्नेहभाव प्रकट करण्यासाठी घरात बनलेल्या फराळाच्या पुडय़ा आपापसात वाटल्या जायच्या. करंज्या लाटण्यासाठी आजूबाजूच्या मुली-बायका मदत म्हणून हौसेने यायच्या. तेव्हा प्रत्येकाकडे मदतीला जाण्याची मुलींचा दिवस ठरलेला असायचा.
दिवाळीच्या म्हणजे वसुबारसेच्या दिवसापर्यंत फराळ तयार असायचा. रांगोळ्या काढण्याची हौस या दिवसापासून चालू व्हायची. रांगोळीचा डबा घेऊन अंगणभर रेषा, ठिपके मारायचे. याच दिवशी कंदील दीपावलीचे स्वागत करण्यासाठी दारासमोर झगमगत असे. कंदिलाचा रंगसंगतीतील ओटी-अंगणात पसरणारा प्रकाश हे खास आकर्षण असे. त्यातून भावाने स्वत: बनवलेला कंदील म्हणून त्याचे अजून कौतुकही असे.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आई रांगोळी काढून पाट मांडायची आणि त्यावर घरातील दागिने, जुनी नाणी, चांदीच्या वस्तू एका ताटात घेऊन त्यावर हळद-कुंकू, फुले वाहून, दिवा ओवाळून धनाची पूजा करायची. ते सजवलेलं ताट फार देखणं दिसायचं. धणे आणि गुळाचा प्रसाद सगळ्यांना वाटला जायचा.
त्यानंतर यायची पहिली अंघोळ/नरक चतुर्दशी. हा दीपावलीचा सगळ्यात मोठा, खास दिवस. या दिवशी पहाटे चार-पाच वाजताच आई स्वत: उठून सगळ्यांना उठवायची. भाऊ उठला की तो फटाके वाजवायचा. त्या आवाजानेच मला जाग यायची. मग आजी-आई सगळ्यांना उटणे लावून त्यांची अंघोळ व्हायची. तेव्हाच्या उटण्यालाही एक अनोखा सुगंध होता. उटणे लावताना प्रत्येकाच्या समोर फुलबाज्या लावून ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ या ओळी आनंदात गायल्या जायच्या. प्रत्येक व्यक्ती जेव्हा अंघोळ करून बाहेर यायची त्यासाठी एक चिरांटू/चिरांटे फळ ठेवलेले असायचे. आमच्या घराच्या आसपास या फळांच्या वेली होत्या. त्या आदल्या दिवशीच शोधून त्यावरची फळे आणून ठेवली जायची. ही फळे पायाच्या अंगठय़ाने दाबून फोडली जायची. आजी सांगायची की ही फोडली म्हणजे आपण नरकासुराचा वध केला. मला ती चिरांटू फोडायला खूप गंमत वाटायची. ती फोडताना मी खूप शूर आहे असे वाटायचे. मग एकाऐवजी दोन-तीन चिरांटी पायाने जोरात फोडून टाकायचे.
अंघोळी झाल्या की नवेकोरे कपडे घालायचे. मग आई आमचे औक्षण करायची. देवाला फराळाचे नैवेद्य दाखवायची. नैवेद्यात चकली, चिवडा, २-३ प्रकारचे लाडू, अनारसा, करंजी, शेव, शंकरपाळी असे पदार्थ असायचे. या पदार्थाचा आम्ही घरातील सगळी मंडळी एकत्र बसून फराळ करायचो. मला ठिपक्यांची रांगोळी काढता यायला लागल्यापासून मी रांगोळी काढू लागले. रंगांचा तो विशिष्ट वास, चुकलेली रांगोळी दुरुस्त करणे, तासन् तास त्या रांगोळीसाठी बसण्यात काही वेगळाच आनंद होता.
९-१० च्या सुमारास पाहुण्यांची, फराळ वाटणाऱ्या व्यक्तींची वर्दळ चालू व्हायची. मग प्रत्येकाला आई फराळाची डिश भरून देत असे. गावामध्ये फराळ वाटण्याची डय़ुटी असे. एका मोठय़ा पिशवीत फराळाच्या पुडय़ा घेऊन मी सगळ्या घरांमध्ये वाटून येत असे. मग प्रत्येक घरात काही ना काही पदार्थाची चव घ्यावी लागायची. संध्याकाळ झाली की दिवेलागणीची, अमावस्येच्या काळोख्या रात्रींना पणत्यांच्या तारकांनी धरतीवर लखलखाट करण्याची वेळ. मातीच्या पणत्या आईने सकाळीच पाण्यातून काढून सुकवलेल्या असायच्या. त्या पणत्या पेटवल्या जायच्या. मग ओटीवर दाराच्या दोन खिडक्यांच्या बाजूला, माळ्यावरच्या कठडय़ावर, रांगोळीच्या मधोमध, तुळशीभोवती, देवळावर, (आमच्या अंगणासमोर शंकराचे छोटेसे मंदिर आहे) पडवीत आम्ही पणत्या लावायचो. पणत्या लावल्या की सगळ्या अंगणात त्यांची रोषणाई पाहण्यासाठी जमायचो. तो दीपोत्सव पाहतच राहावा असे वाटायचे. मध्येच वारा यायचा एखादी पणती विझायची, मग ती पुन्हा लावायची.
दुसरा दिवस लक्ष्मीपूजनाचा. लक्ष्मीपूजनाची संध्याकाळी लगबग चालू व्हायची. लक्ष्मीपूजनासाठी आई पुन्हा देवघरात पाटाखाली रांगोळी काढून त्यावर ताट ठेवून ताटात घरातील पैसे, जुनी नाणी वगैरेंची पूजा करायची.
पाडव्याच्या/बलिप्रतिपदेच्या दिवशीही चार-पाच वाजताच उठून आई घरातील केर काढायची. तो केर एका पुठ्ठय़ावर भरायचा, एक जुनी केरसुणी आधीच आईने जपून ठेवलेली असायची. त्या केरावर ती जुनी केरसुणी ठेवून त्यावर दिवा लावून वडील तो केर बाहेर घेऊन जायचे व एका कोपऱ्यावर ठेवायचे. केर नेत असताना आम्ही ताटाचा लाटण्याने टण-टण आवाज करायचो. पाडव्याच्या दिवशी झेंडू, आपटा व भाताची कणसे मिळून केलेले तोरण दाराला बांधले जायचे. प्रत्येक घराच्या समोर पाच शेणाचे गोळे व त्यावर झेंडूचे फूल टोचून त्या गोळ्यांची पूजा केली जायची.
दिवाळी झाली तरी दिवाळी संपली असे वाटायचे नाही, कारण तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळीचेच वातावरण असायचे. दारासमोर रांगोळ्या असायच्या, आकाश कंदील पेटलेलाच असायचा, पूर्ण ओटीभर नसल्या तरी रोज रात्री दोन पणत्या बाहेर तेवत असायच्या.
थोडय़ाच दिवसांत तुळशीच्या लग्नसराईची लगबग असायची. तुळशीच्या लग्नाचा एखादा दिवस ठरला की देऊळ व तुळस रंगवली जायची. तुळशीभोवती रांगोळी काढली जायची. लग्नात तुळशीसमोर ठेवण्यासाठी चिंचा, आवळे आम्ही झाडावरून तोडून आणायचो व तोडताना त्याचा आस्वादही घ्यायचो. वडील ऊस तोडून आणायचे व तुळशीत रोवायचे. मग अंतरपाट धरून कृष्ण तुळशीसमोर ठेवून एखादा छोटा मुलगा तुळशीसाठी लग्नाला तयार करून मंगलाष्टके म्हणायची. आम्ही बच्चेकंपनी तांदूळ हातात घेऊन सावधान म्हटल्यावर कोणाला तरी टार्गेट करून त्याच्या अंगावर तांदूळ उडवायचो. मग मोठय़ा माणसांचा ओरडा मिळायचा.
अशा प्रकारे दिवाळीचा सहवास एक ते दीड महिना सहज असायचा. रंग, सुगंध, रोषणाई, आतषबाजी, खमंग आस्वाद, परस्परांतील स्नेहभाव याचा मिलाप म्हणजे दिवाळी. घरभर प्रेम ओसंडून वाहणारी दिवाळी..
घरभर उत्साहाची आणि आनंदाची दिवाळी
रांगोळ्या काढण्याची हौस दिवाळीत पूर्ण करून घ्यायचे. रांगोळीचा डबा घेऊन अंगणभर रेषा, ठिपके मारायचे. याच दिवशी कंदील दीपावलीचे स्वागत करण्यासाठी दारासमोर झगमगत असे. कंदिलाचा रंगसंगतीतील ओटी-अंगणात पसरणारा प्रकाश हे खास आकर्षण असे.
आणखी वाचा
First published on: 18-10-2014 at 01:59 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali enthusiasm and joy around the house