परीक्षेनंतर होस्टेल सुटतं. नोकऱ्या लागतात. मुलं पांगतात. पण मोबाइलवर, ईमेलवर, आंतरजालावर भेटीगाठी होत राहतात. कविता मोकाशी या कवयित्रीच्या एका कवितेत उमटलेली ही नव्या पिढीची अस्वस्थता समजून घ्यायला गेलो, की आपण त्यांच्या होस्टेलमध्ये – त्यांच्या थेट प्रायव्हसीमध्ये – प्रवेश करतो.
‘हात हलवत राहतात
शहरभर पसरलेले दिवे
दीपस्तंभासारखे
दाखवतात हजार वाटा
एकाही वाटेवर असत नाही ऊन
नसते सावलीही
दाटून येतो अशात उमाळा
भरतात आठवणींचे ई-कल्लोळ
होतात ई-गप्पा’
या गप्पा आपण फक्त ऐकायच्या. त्यावर आपली शिष्ट टिप्पणी करायची नाही. विल्यम वर्डस्वर्थ म्हणतो ना,
Reaping and singing by herself,
Stop here, or gently pass.
तसे हे विश्व फक्त तटस्थपणे पाहायचे.
इतर कवींचे ठाऊक नाही. पण संदीप खरे ‘बॅचलर’ या कवितेत थेट भिडतो या ब्रह्मचाऱ्यांच्या विश्वाला..
‘त्याच्या खोलीला असतो एक खास बॅचलर वास
स्त्रीच्या हातांची अपूर्वाई वाटणारा वास..
तोच त्याच्या रिस्टवॉचलाही येतो’
होस्टेलची खोली हे एक कलंदर समूहविश्व असते. एका प्रकारची चाळच. कारण तिथे ‘प्रायव्हसी’ नसते.
‘बाकी तक्रार, रडणे, दु:ख..
त्याच्या अस्ताव्यस्त वस्तूंसारखे
कधीतरी मधूनच हाताला सापडतात,
तो वापरतो आणि काम झाले
की टाकून देतो कुठेही –
कुठेही टाकले तरी ते चार िभतीतच राहतात’
शाळेत असताना इंग्रजीच्या पुस्तकात एक धडा होता. त्यात इंग्लंडच्या रॉबर्टने भारतातील पत्रमित्राला लिहिलेले पत्र होते. रॉबर्ट शाळेत प्रवेश घेतो. पहिल्या दिवशी वडील बरोबर येतात. वडील त्याच शाळेत शिकलेले असतात. ते म्हणतात, की शाळेत असताना बाकावर कंपासने स्वतचे नाव लिहिले होते. ते अजून असेल का पाहा. शाळेच्या वास्तूशी असे नाते जडलेले असते. मी शिकलो त्याच कॉलेजमध्ये मुलाला प्रवेश घ्यायला गेलो, तेव्हा सर्व इमारती आतून नव्याने सजवलेल्या पाहून मी निराश झालो होतो. वाटलं की हे ते आपलं कॉलेज नाहीच.
शिक्षण संपलं की हे मनस्वीपण सोडून व्यवहारी जगात प्रवेश होतो नि आयुष्य नव्याने सुरू होते. मला नोकरी लागली तेव्हा पुण्याबाहेरच व्हेकन्सीज होत्या. नव्या कर्मचाऱ्याला हमखास पुण्याबाहेर जावे लागे. औरंगाबाद गावात आमचा ग्रुपच जमला. एकाच खोलीत दाटीवाटीने राहणारे नि बदलीची वाट बघणारे आम्ही. उन्हाळ्यात जाम उकडायचं नि खोलीत पंखा नसे म्हणून गार वाऱ्यासाठी सुटीच्या दिवशी देखील कचेरीत जाऊन जास्त काम करणारे आम्ही. तरी देखील बदली झाली की ती वास्तू सोडून जाताना हळवे झालेले आम्ही. निवृत्तीनंतर एकदा त्या कचेरीत जाऊन आपल्या खुर्चीत बसायची इच्छा होणारे म्हातारे आम्ही. एकेक देखणे क्षण हातातून पाऱ्यासारखे घरंगळून जातात. कुठल्या कुठल्या जागांना आठवणी चिकटून असतात. त्या जागेपाशी गेलं नि मनात जपलेली वास्तू दिसली नाही की मन खरचटून उठतं.
बॉलीवूडने या हळव्या आयुष्याची सुंदर दखल घेतली आहे. ‘थ्री इडियट्स’ मध्ये एका खंडानंतर नायक रांचोचे मित्र एकत्र येतात. त्यांना रांचोची आठवण होते, तेव्हाचा नोस्ताल्जिक मूड स्वानंद किरकिरे यांनी किती साध्या शब्दात पकडला आहे..
‘बहती हवासा था वह
उडती पतंगसा था वह
कहां गया उसे ढूंढो..’
गाणं ऐकताना हा फक्त मित्राचा नाही, तर हरवलेल्या क्षणांचा शोध आहे, अशी अव्यक्त भावना दाटून येते.
अभ्यासात थोडासा मागे पडलेला एक होस्टेलवासी देखील या सिनेमात रंगवला आहे. अभ्यास न पेलल्यामुळे बसलेला अपयशाचा रेटा सहन होत नाही म्हणून तो आत्महत्या करतो. स्वानंद यांनी या मूडला साजेसे द्विभाषी गाणे रचले आहे. त्यातल्या इंग्रजी ओळी अशा –
Give me some sunshine
Give me some rain
Give me another chance
I wanna grow up once again
गाण्यात अमुक शब्द हवेत, वृत्त हवे, शिस्त हवी अशी बंधने युवापिढी कसली मानते. बाहेरच्या कठोर वास्तवाची माहिती असलेल्या परंतु होस्टेलच्या सुरक्षित मुक्त वातावरणात मुक्त आवाजात ओरडणाऱ्या ओठांवरच अशी बिनधास्त गाणी येऊ शकतात.
‘जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल
होठों को करके गोल
होठों को करके गोल
सीटी बजाके बोल
भया ऑल इज वेल..’
आमच्या वर्गातला शरद ज्या तालुक्यातून आलेला होता, त्या तालुक्यातल्या गरीब मुलांसाठी पुण्यात एक होस्टेलनुमा खोली होती. मोफत होती. पंधरासोळा जण झोपू शकतील अशी.भिंतीच्या कडेला प्रत्येकाची एकेक वळकटी आणि संस्थेनेच दिलेली पत्र्याची पेटी. दुपारी बारा वाजता त्या तालुक्याहून येणाऱ्या एस.टी. मार्फत जेवणाचे डबे येत. मुलांच्या आयाबाया लेकराला दिवसभर पुरेल अशा बेताने भाकरी, सुक्या भाज्या, चटण्या आणि मसालेभात पाठवीत. डबा कॉलेजच्या कँटीनमध्ये आणून सांबार किंवा पातळ भाजी घेऊन काही मुले जेवण करीत. एकदा तिथल्या मुलांबरोबर मराठी सिनेमा पाह्यला गेलो. त्या काळी गाजत असलेलं एक हिट गाणं ऐकून मित्र हसू लागले. सिनेमा सुटल्यावर त्यांनी मला त्या गाण्याच्या चालीवर तसेच शब्द असलेलं मूळ गीत गाऊन दाखवलं,
‘काठी न घोंगडी घेऊ द्या की रं
मला बी जत्रंला येऊ द्या की रं’
त्या रात्री मी होस्टेलवर जेवलो. गप्पा मारीत उशिरापर्यंत थांबलो. किती एक जुनी खास ग्रामीण गाणी त्यांच्या तोंडून पहिल्यांदा ऐकली.
‘गाडी चालली घुंगरांची, वाट बाई डोंगराची’
‘लौकिक तुझा मोठा आणि तू घरंदाज,
कशी मी हाक मारू वाटते मज लाज’
‘नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक
भर बाजारी करिशी खुणा करू नको पुन्हा हा गुन्हा’
‘तिनं साडी आणा म्हणाली.. आणली
तिनं चोळी आणा म्हणाली.. आणली
तिनं नथ आणा म्हणाली.. आणली
तिनं बुगडी आणा म्हणाली.. आणली
अहो, दाजीबाच्या वाडय़ात गडबड झाली
माडीवरची मंडळी खाली आली
आली आली हो भागाबाई
आली आली हो भागाबाई’
ते होस्टेल असलेली इमारत आता उरली नाही. पण त्या चौकातून जाताना मला ती रात्र आणि ती गाण्यांची मफल अजून आठवते. मला फक्त तितकेच आठवते. पण त्या खोलीत राहून गेलेली आणि आता कुठं कुठं नोकरीत, व्यवसायात स्थिर झालेली मुलं.. आता साठी-सत्तरीत असतील.
‘हर एक दोस्त जरुरी होता है।’ हे गाणे तेव्हा जन्माला आले नव्हते. पण ते सकाळी नळावर अंघोळीसाठी रांगा लावणे, पिण्याच्या पाण्याचा खोलीतला सामाईक रांजण आळीपाळीने एकेकाने भरून ठेवणे, शिवाजीनगरला जाऊन एकमेकांचे डबे घेऊन येणे, चटण्या-लोणच्यांची आपसात देवाणघेवाण, कुणाला एखादी मत्रीण मिळाली असेल, तर तिला भेटायला जाताना मित्राचा जरा भारीतला सदरा घालून जाणे, वर्गात एकमेकांची हजेरी लावणे, वेगळे अक्षर काढून टय़ूटोरियल लिहून देणे, सबमिशनला मदत करणे.. सगळे इतिहासात जमा झाले असले, तरी त्यांच्या मनात कृष्णधवल चित्रपटाच्या प्रिंटप्रमाणे जपलेले असेल.
होस्टेलची खोली मित्रांना प्रेमरज्जूंनी घट्ट बांधते. होस्टेलमधली मत्री असते तशी पुढे कुणाशी जुळत नाही. नोकरीत लागल्यावर अनेकदा ट्रेनिंगसाठी जायचा योग आला. आठ आठ दिवस खोलीत एकत्र राहून देखील कुणाशी घट्ट मत्री नाही जमली. जळगावहून आलेला होस्टेलमधला मित्र अनिल अजून माझ्या मनात घर करून आहे. अनिल अगदी अवलिया होता. अनिलमुळे मला हिंदी कविता वाचायचा नाद लागला. साहिर लुधियानवी हा त्याचा आवडता कवी. मला नीरजच्या कविता प्रिय होत्या.
अनिलच्या सिंगल रूमविषयी अख्ख्या इमारतीत एक गूढ भीती होती. त्याच्या रूममध्ये एका स्वामींचा फोटो होता. फोटोसमोर सदैव धूप दरवळत असे. अमावस्येच्या रात्री त्याच्या ‘अंगात’ येत असे. त्या वेळी तो पद्मासन घालून डोळे मिटून डोलत बसलेला असायचा. मुले काहीबाही विचारायची. एकदा एका गुंडाने त्याला मटक्याचा आकडा विचारला. तेव्हा तो डोळे मिटूनच ओरडला. त्याला फिट आली. तोंडातून फेस आला. रेक्टर आले. अनिलला दवाखान्यात नेले. त्याच्या पालकांना बोलावून घेतले. त्याला रूम सोडावी लागली. ते मार्चचे दिवस होते. ऐन परीक्षेत तो जळगावला गेला. परीक्षेला बसला नाही.
सुट्टी लागली. एके संध्याकाळी दाढीचे खुंट वाढलेला अनिल ‘कॅफे गुड लक’मध्ये भेटला. मी चौकशी केली तर म्हणाला, परीक्षा गेली ****. माझ्या सायकलवर बसून तो कॉलेजपाशी आला. सायकल लावून आम्ही होस्टेलला गेलो. त्या इमारतीच्या पिछाडीला. त्याच्या खोलीची खिडकी अंधारात होती. खिडकीखाली उभा राहून तो नि:शब्द रडत राहिला. आमची चाहूल लागून रखवालदार शिवाजी आला. अनिलला पाहून थबकला. मी त्याला विनंती केली, की अनिलला त्याच्या रूममध्ये फक्त पाच मिनिटे नेऊन आण. पण अनिलने रूममध्ये जायला नकार दिला.
परवा नागेश कुकनूरच्या ‘रॉक फोर्ड’ मधलं गाणं ऐकलं, तर सगळे असे जुने निरपेक्ष दोस्ताने आठवले..
‘यारों दोस्ती बडी हसीन है
यह ना हो तो क्या फिर बोलो यह जिंदगी है
कोई तो हो राजदार, बेगरज तेरा हो यार
कोई तो हो राजदार’
निरपेक्ष मैत्रीची या गाण्यातली एक व्याख्या खूप आवडली,
‘तेरी हर एक बुराई पे डांटे वह दोस्त
गम की हो धूप तो साया बने वह दोस्त’
पण या सगळ्या सुखांसाठी आयुष्यात एक वर्ष तरी आई, बाबा, भाऊ, बहीण यांना सोडून होस्टेलच्या वास्तूत राहायला हवं.