‘लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून’, अशी म्हण आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजा प्रत्येक माणसाच्या आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. सध्याच्या जगात अन्न व अंगावर घालण्यास एखादा मळका जीर्ण कपडा मिळेल; परंतु निवारा मिळणे फार कठीण गोष्ट आहे. सध्याच्या काळात घर हे माणसासाठी मोठा शोध आहे.
अशा स्वत:च्या घराच्या शोधात असताना मी आणि माझी पत्नी चिपळूणपासून गोव्यापर्यंतच्या सर्व प्रदेशात ठिकठिकाणी जाऊन आलो, कारण आम्ही मूळचे कोकणात राहिलेले होतो. त्यामुळे त्या भागाला आम्ही पसंती दिली; परंतु शहरापासून दूर खेडेगावात निसर्गाची साथ असलेला शांत, स्वच्छ असलेला परिसर, शुद्ध हवा-पाणी, अशा जीवनावश्यक गोष्टी असलेला भूखंडाचा छोटासा तुकडा काही दृष्टीस पडेना.
अचानक एके दिवशी दुपारी टेलिफोनची रिंग वाजली. तो सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील एका खेडेगावातून फोन आला होता. ते आमचे नातेवाईक होते. त्यांनी पुढे माहिती पुरविली. गावात सहा गुंठे जमिनीचा तुकडा विकायचा आहे. दोन-तीन ग्राहकांनी तो पाहिला आहे. तेव्हा कसेही करून उद्यापर्यंत आंबेरी मुक्कामी यावे. हयगय करू नका, असे सांगून त्यांनी फोन ठेवला.
आम्ही जाण्याचा निश्चय करून थोडाही वेळ न दवडता मालवण एस.टी. पकडली. गाडी सुसाट धावत होती. थंडगार वारे सुटले होते. आजूबाजूला हिरवीगार शेते व डोंगर मागे पडत होते. आमचे सारे लक्ष गावच्या जमिनीकडे लागले होते. केव्हा ती जमीन दृष्टिपथात येईल या विवंचनेत पडलो होतो. ती जागा कशी असेल? आजूबाजूचा प्रदेश, तेथील माणसे, त्यांची घरे, विहिरीचे पाणी, वीज असेल काय? वगैरे अनेक प्रश्न भेडसावत होते.
गाडीतून उतरल्यावर आम्ही ज्याने फोन केला होता, त्या मध्यस्थाकडे गेलो. जमीनमालक भूखंड दाखवीत होता. प्लॉट मुख्य रस्त्याला लागून होता. त्याच्या चारही बाजूंना चिऱ्याच्या दगडाचा सुबक गडगा (भिंत) घातला होता. नियोजित घराभोवती योग्य ती जागा सोडून इतर जागेत प्रमाणबद्ध कलमी आंब्याची झाडे लावली होती. त्याच्या भोवताली चिऱ्याची देखणी अळी घातली होती. शिवाय नारळ, चिकू आणि फणस ही फळझाडेही लावली होती. जास्वंद, अबोली, मोगरा वगैरे फुलझाडे लावली होती. प्लॉटच्या तिन्ही बाजूंना भातशेतीची जमीन होती. दूर अंतरावर घरे होती. बाकीचा परिसर डोंगर माथ्याचा, हिरवीगार झाडे व कुरण पसरले होते.
सर्व गोष्टींनी अपेक्षित असा प्लॉट होता. त्याच क्षणी दोघांच्या संमतीने जमिनीचा- झाडासहित व्यवहार पूर्ण केला. प्लॉटपण एन.ए. झालेला होता. घर कसे बांधावे याबद्दलचे मार्गदर्शक पुस्तक मला मिळाले. नंतर तपशीलवार माहिती मिळवून त्याच गावातील एका कंत्राटदारास साधे घर बांधण्याचे काम दिले.
पावसाच्या सुरुवातीस घर बांधणीस सुरुवात केल्यास घर बांधणीच्या वेळेस पाणी सहज उपलब्ध होईल व पावसाळी थंड हवेत घर अधिक मजबूत होईल म्हणून जून महिन्यात घर बांधण्याच्या हेतूने मी व पत्नीने ठरवून एक लाख रुपये आगाऊ दिले; परंतु बराच कालावधी निघून गेला तरी घराच्या पायाचेसुद्धा खोदकाम सुरू होईना. सेवानिवृत्त असल्याने तिथेच एका ओळखीच्या ठिकाणी राहून, स्वत: हाती जेवण करून देखरेख ठेवली.
घर जसजसे तयार होत होते तसतसे मी समाधानी होत होतो. माझे घर लोड बेअरिंग बांधकाम असल्याने आता महत्त्वाचा स्लॅब टाकणे बाकी होते. त्यासाठी लागणारी वाळू, खडी, सीमेंट, पाणी, मिक्सर व मजदूर तैनात करून एके दिवशी सकाळी आठ वाजता नारळ वाढवून काम चालू केले. सीमेंटचा स्लॅब हा ‘स्टार्ट टू फिनिश’ सतत काम चालू असले पाहिजे. त्यात व्यत्यय येता कामा नये; परंतु पावसाळी दिवस असल्याने तीन तासांनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तो थांबण्याची काही चिन्हे दिसेनात आणि काम बंद पडले. टाकलेल्या स्लॅबवर प्लॅस्टिक शीट टाकली. आता घराची गळती होणार या विचाराने आम्ही फार घाबरून गेलो. तीन तासांनी पाऊस कमी झाल्यावर पुन्हा काम सुरू झाले व उरलेला स्लॅब पूर्ण झाला.
खेडेगावातील लोक पंचायत कचेरीला खूप मान देतात. इतका की कार्यालयात अजूनही लोक देवाच्या देवळाप्रमाणे चप्पल बाहेर काढून प्रवेश करतात; परंतु त्या ठिकाणी अर्थसंवाद केल्याशिवाय काम होत नाही. अशा संवादानंतर एकदाचा घर नंबर लावण्यात आला.
लगेच पाण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये नळ कनेक्शनसाठी अर्ज केला. बरीच खटपट केल्यानंतर घरापासून दूर सुमारे दोनशे फुटांवर अडचणीत पाण्याची तोटी मिळाली; परंतु तिथे केसासारखे बारीक पाणी येत होते. खेडेगावात तोटीला कोणीही नळ लावीत नाही. पाणी वेळेवर कधीही सोडत नाहीत. मिळेल तेवढय़ा पाण्यावर समाधान मानावे लागते.
रोजच्या अनियमित व अपुऱ्या पाण्यामुळे आम्ही त्रस्त झालो होतो. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीमध्ये फेऱ्या मारून काही होत नव्हते. सरपंच एक महिलाच होत्या. एके दिवशी भर दुपारी पत्नी तिच्या घरी गेली. तिने शांतपणे पाण्याची तक्रार सांगितली. यानंतरची लढाई म्हणजे वीजजोडणी. अर्ज करून कित्येक महिने झाले तरीही मंजुरी मिळत नव्हती. अखेर मिळाली तरी पुढील कारवाईची काही चिन्हे दिसेनात. शेवटी साहेबांची परवानगी घेऊन त्यांनी दाखविलेल्या ठिकाणी स्वखर्चाने खड्डे खणून असतील तेथून इलेक्ट्रिक पोल आणून उभे केले. पुन्हा अर्जविनंती केल्यावर उपलब्ध सामग्री मिळाल्यावर वीजजोडणी केली जाईल असे कळविण्यात आले.
ही कामे करीत असताना बरेच जमीनमालक स्वत:च्या जमिनीखाली अर्धा इंच नळाची पी.व्ही.सी. पाइप लाइन टाकण्यास व वीज पोल उभे करण्यास सहकार्य करीत नाहीत. त्यांची अनेक प्रकारे समजूत घालून व विनंती केल्यावर राजी होतात. असेच एका बाजूच्या गावात वीज पोलवरती विजेची लाइन जोडणीचे काम इलेक्ट्रिक बोर्डाचे कामगार करीत होते. तेवढय़ात एक जमीन मालकीण बाई तिथे आली. तिच्या हातात शेत कापण्याची कोयती होती. तिने तेथील मालकास सहज विचारले, काय चाललंय? ते वायुसेनेतील अधिकारी होते. ते म्हणाले, वरून वीजलाइन घेत आहे. त्याबरोबर तिने त्यांच्या अंगावर ती लोखंडी कोयती भिरकावली, त्याचं नशीब बलवत्तर म्हणून ते पटकन खाली बसले आणि वाचले. माझ्या जमिनीवरूनसुद्धा इलेक्ट्रिक वायर जाता कामा नये, असे तिने बजावले आणि ती निघून गेली.
संध्याकाळची वेळ होती. सूर्याची शेवटची किरणे घरावर पडली होती. एके ठिकाणी पक्ष्यांच्या जोडप्याने एवढय़ा हिमतीने मातीचे बांधलेले ते कलात्मक घर बघून माझ्या मनातील उदासीपणा झटकन नाहीसा झाला. मी नव्या ध्येयाने कामाला लागलो. त्याच्यापासून मी तातडीने प्रेरणा घेतली. त्या दुर्मिळ पक्ष्याचे नाव होते फी िफ४ेस्र्ी िर६ं’’६. विविध अडचणींना धैर्याने व चिकाटीने तोंड देऊन आटोपशीर असे कमी खर्चात वेळेवर घर तयार झाले होते. घराची बैठकीची खोली मोठी ठेवली होती. त्यात १०-१२ माणसे आरामात गप्पागोष्टी करत झोपू शकली असती. या वयात आराम करण्यासाठी एखादा झोपाळा असावा असे पत्नीच्या मनात खूप दिवस होते, म्हणून तिला प्रशस्त झोपाळा बांधून मला समाधान झाले.
बैठकीच्या खोलीला लागूनच स्वयंपाकघर आहे. ते पूर्व दिशेला असल्यामुळे खिडकीतून उगवत्या सूर्याचे दर्शन होते. स्वयंपाकगृहात सहा माणसे आरामशीर बसून जेवण करू शकतील एवढी जागा आहे. शौचगृह व न्हाणीघरासह दोन पुरेशी रूम आहेत. गृहसजावट म्हणाल तर फक्त मोजक्या आवश्यक गोष्टी आहेत. घरात भरपूर उजेड पडावा म्हणून प्रशस्त खिडक्यांची योजना केली आहे. त्यामुळे सबंध घरात उजेड व हवा खेळती राहते.
या विस्तीर्ण जगाच्या पाठीवर व अथांग आकाशाखाली असलेल्या माझ्या छोटय़ा घराचे गुलमोहर हे नामांकन केले गेले आणि एका शुभदिनी आम्ही गृहप्रवेश केला.
आजकाल सेकंड होम संकल्पना रुजली आहे. खूप लोक उत्साहाने अशी घरे दूर ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात बांधतात. उत्साहाने सुरुवातीला त्यांच्या तिथे फेऱ्याही होतात. नवीन पडदे लावणे, दारापुढे सुंदर रचनेचे पायपुसणे आणणे, हे सर्व चालू असते. कालौघात त्यात खंड पडून या खíचक घराकडे दुर्लक्ष होते, याचे मला मनापासून वाईट वाटते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा