मनोज अणावकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आतापर्यंत ‘घर स्वप्नातलं’ या सदरातून आपण इमारतीच्या रूपाबाबत जाणून घेतलं. म्हणजे बाहेरून तडे-भेगा गेल्यामुळे, गळतीमुळे वगैरे तिचं स्वरूप जेव्हा खराब होतं, तेव्हा कोणते उपाय करायचे वगैरेसंदर्भात माहिती घेतली. पण ‘घर स्वप्नातलं’ म्हटलं की घरातल्या अंतर्गत सजावटीबाबत जर बोललं नाही; आणि ही सजावट कशी करायची या विषयी जाणून घेतलं नाही तर हा विषय अपुराच राहून जाईल. त्यामुळे या सदराच्या आगामी भागांमधून आपण आता ‘इंटिरिअर डिझाइिनग’विषयी जाणून घेणार आहोत. फॉल्स सीलिंगचे वेगवेगळे प्रकार कोणते, ते कसं तयार केलं जातं, किचन ओटा कसा घातला जातो, वॉर्डरोब तयार करताना कोणकोणत्या गोष्टींचं नियोजन करणं गरजेचं आहे, अशा इंटिरिअरमधल्या अनेक जिव्हाळय़ाच्या गोष्टींबाबत जाणून घेतानाच कोणत्या चुका टाळणं आवश्यक आहे, वगैरे बाबींचीही माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे या भागात आपण ‘फॉल्स सीलिंग’ या संकल्पनेविषयी आणि त्याच्या विविध प्रकारांविषयी जाणून घेऊ या.
आपल्या शरीरात रक्तवाहिन्या, स्नायू, हाडं, पोटातली आतडी या सगळय़ांची अत्यंत गुंतागुंतीची रचना असते. कल्पना करा की जर आपलं शरीर पारदर्शी असतं, तर माणसं चालताना, बोलताना, वावरताना या सगळय़ाचं नको असलेलं दर्शन आपल्याला घडलं असतं. पण त्वचेमुळे केवळ या गोष्टी झाकल्याच जात नाहीत, तर शरीराच्या या भागांना इजा होण्यापासून वाचवलं जातं, तसंच माणसाच्या रूपाला सौंदर्यही प्राप्त होतं. फॉल्स सीलिंगचं कामही काहीसं असंच असतं. रहिवासी इमारतींमध्ये आणि विशेषत: व्यापारी संकुलांमध्ये सध्याच्या काळात इंटरनेटच्या वायिरगचं जाळं, टीव्ही, इंटरकॉमचे फोन आणि इतर गोष्टींसाठीच्या केबल्स, गॅस आणि अग्निरोधक प्रणालीसाठीच्या पाइपलाइन्स, अशा अनेक गोष्टींचं गुंतागुंतीचं जाळंच आपल्या सीलिंगच्या स्लॅबखालून जात असतं. या सगळय़ाचं नको असलेलं दर्शन होणं हे जसं योग्य नाही, तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही साफसफाई करत असताना या गोष्टी उघडय़ावर असल्या तर त्यांना धक्का लागून गॅस किंवा पाणी गळती, विजेचा धक्का बसणं अशा दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे या सगळय़ाला झाकून टाकणारं फॉल्स सीलिंग सुरक्षिततेबरोबरच घरातल्या किंवा ऑफिसमधल्या विविध खोल्यांना एक आकर्षक सौंदर्य प्राप्त करून देतं. फॉल्स सीलिंग हे अनेक प्रकारचं असू शकतं. पण त्यापैकी प्रमुख, सर्वसाधारणपणे वापरले जाणारे असे लोकप्रिय प्रकार कोणते ते आपण आता पाहूया. कोणत्या बांधकाम साहित्यापासून फॉल्स सीलिंग तयार केलं जातं, यानुसार हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : प्लॅस्टर ऑफ पॅरिस, जिप्सम बोर्ड, लाकूड.
- प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं फॉल्स सीलिंग : पावडरीच्या स्वरूपात बाजारात मिळणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार केली जाते. या पेस्टपासून हवं तसं नक्षीकाम किंवा इतर डिझाईन लाकडी किंवा फायबर बोर्डवर साकारलं जातं. दिवे आणि रंगाच्या साहाय्याने मग हे विलोभनीय फॉल्स सीलिंग उजळून निघतं, तेव्हा खोलीचा नूरच बदलून जातो. (छायाचित्र क्र. १)
फायदे :
- जिप्सम बोर्ड सीलिंगपेक्षा हे सीलिंग २० ते ३० टक्के स्वस्त असतं.
- पेस्ट एकदा का सिमेंटप्रमाणे टणक झाली की सीलिंग टिकाऊ असतं.
- पेस्टपासून तयार केलं जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारची नक्षी शक्य असते.
तोटे :
- हे तयार करण्याकरिता अत्यंत कुशल कारागिरांची आवश्यकता असते.
- पेस्ट लिंपून लावायच्या प्रक्रियेमुळे तयार करत असताना राडारोडा खूपच होतो. यामध्ये पेस्ट लावताना खाली पडून बरीचशी पेस्ट फुकट जात असल्यामुळे जास्तीची पावडर लागते, मग खर्च वाढतो.
- जिप्सम बोर्डचं फॉल्स सीलिंग : जिप्सम बोर्ड अर्थात जिप्सम या खनिजापासून तयार केलेल्या फळय़ा (बोर्ड) सर्वसाधारणपणे २ फूट बाय २ फूट आकारात मिळतात. वजनाला हलके, आवाजरोधकता आणि अग्निरोधकता हे त्यांचे चांगले गुण आहेत. हवे तसे कापून घेऊन वेगवेगळय़ा प्रकारची डिझाईन्स तयार करता येतात. (छायाचित्र क्र. २)
फायदे :
- केवळ बोर्ड कापून बसवायचे असल्यामुळे कोणताही राडारोडा न होता काम स्वच्छ होतं.
- थेट खऱ्या सीलिंगखाली बसवलं जातं आणि एकसंध दिसतं.
- कारखान्यात तयार होत असल्याने दर्जा एकसारखा असतो.
तोटे :
याचा सगळय़ात मोठा तोटा हा आहे की, जर सीलिंगमधून पाण्याची गळती किंवा पाझर असेल, तर आधी पापुद्रे किंवा पावडर सुटायला सुरुवात होते. आणि गळतीचं खूपच प्रमाण असेल, तर हे बोर्ड कोसळूही शकतात.
- लाकडी फॉल्स सीलिंग : लाकूड हे बांधकामाचं पूर्वापार चालत आलेलं साहित्य आहे. लाकडी विटा किंवा पोकळ लाकडी फळय़ांपासून हे फॉल्स सीलिंग तयार केलं जातं. यावर रंग, वार्निश किंवा सनमायकाही लावता येतो. लाकडामध्येही कोरीव काम करणं शक्य आहे. त्यामुळे वेगवेगळी डिझाईन्स यातही शक्य आहेत. असंच एक सनमायका लावलेलं लाकडी फॉल्स सीलिंग छायाचित्र ३ मध्ये दाखवलं आहे.
फायदे :
- यामध्ये आधुनिक किंवा अँटिक अशा दोन्ही प्रकारचा लूक देता येतो.
- रंग, वार्निश, सनमायका अशा विविध प्रकारच्या फिनिशमुळे सौंदर्यात वैविध्य आणता येतं.
- थंड हवेच्या ठिकाणी या फॉल्स सीलिंगमुळे घर ऊबदार राहायला मदत होते.
तोटे :
- लाकूड झाडांपासून तयार होत असल्यामुळे ते पर्यावरणपूरक नाही.
- इतर प्रकारांच्या तुलनेत अतिशय खर्चीक आहे.
- लाकूड असल्यामुळे ते अग्निरोधक नाही.
आधुनिक इमारतींमध्ये सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे पाइपलाइन्स, वायर्स, केबल्स यांना झाकण्याकरिता फॉल्स सीलिंग ही आता चैनीची बाब न राहता गरजेची बनली आहे. एका ऐवजी विविध प्रकारचं म्हणजे जिप्सम, लाकूड किंवा काच आणि धातूंसारख्या साहित्याचाही वापर योग्य प्रमाणात करून वेगवेगळय़ा प्रकारच्या फॉल्स सीलिंगचे फायदे एकत्रितपणे करून घेतानाच किंमतही नियंत्रणात ठेवता येते. शेवटी हौसेला मोल नाही, पण सुयोग्य आणि लोभस अशा फॉल्स सीलिंगच्या माध्यमातून अभिमानाने इतरांना दाखवता येईल, असं स्वप्नातलं घर तुम्ही सत्यात साकारू शकता.
(इंटिरिअर डिझाइनर आणि सिव्हिल इंजिनीअर)