राजकीय इच्छाशक्ती असेल तर सुनियोजित शहर व राज्य कसे उत्तमपणे साकारता येऊ शकते, याचा साक्षात्कार छत्तीसगडमधील नवीन रायपूर वसवताना आला. या नव्या सुनियोजित शहराविषयी…
१ नोव्हेंबर २००० साली मध्य प्रदेशातील रायपूरसकट २७ जिल्ह्य़ांचे स्वत:च्या स्वतंत्र राज्याचे स्वप्न साकार झाले व छत्तीसगड नावाचे नवीन राज्य जन्माला आले. राज्यातील जनतेच्या व नेत्यांच्या आपल्या राज्याबाबतच्या खूप इच्छा-आकांक्षा आहेत, त्यातूनच राज्याची राजधानी एक उत्तम नियोजित शहर असावे, ही कल्पना जन्माला आली. रायपूर शहर जरी सध्या राजधानी आहे तरी त्याची सद्य परिस्थिती पाहता त्याच्या विकासास खूप मर्यादा दिसून येतात. त्यातूनच संपूर्णपणे ‘नवीन नियोजित व सुंदर शहर’, छत्तीसगडची राजधानी म्हणून वसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला व शास्त्रीयदृष्टय़ा नवीन शहराच्या नियोजनास सुरुवात झाली.
शहराच्या नियोजनाचे उद्दिष्ट मुख्यत: खालीलप्रमाणे ठरविण्यात आले-
१) राज्याचे आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडविणे.
२) राज्याचा विकास व समृद्धी.
३) राज्यातील मोठय़ा उद्योगांसाठी सेवा केंद्र.
४) मध्यवर्ती मुख्य आर्थिक केंद्र.
५) राज्यासाठी शैक्षणिक व वैद्यकीय केंद्र.
शहरासाठी योग्य जागा ठरविण्यासाठी रायपूरच्या सभोवतालच्या ५० कि.मी.च्या भागाचा सखोल अभ्यास करण्यात आला, त्यात मुख्यत: अस्तित्वात असलेली दळणवळणाची साधने, शासकीय जमिनीची उपलब्धता व योग्यता, पर्यावरणावर कमीत कमी परिणाम व कमीत कमी लोकवस्ती असलेली जागा शोधण्याचा प्रयत्न केला गेला. अंतिमत: रायपूर शहरापासून १७ कि.मी. अंतरावर, मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व रायपूर-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्ग क्र. ४३ च्या मधील एकंदर ४१ गावांतील २३७.४२ चौ.कि.मी. क्षेत्र नवीन शहरासाठी निवडण्यात आले. या भागातच ज्याची आंतरराष्ट्रीय विमानतळ होण्याची क्षमता असलेले माना विमानतळ आहे. तसेच या भागातून रायपूर-विशाखापट्टणम रेल्वे व रायपूर-धमतरी एक छोटी रेल्वे जाते. त्यामुळे देशातील सर्व मुख्य ठिकाणांशी नवीन शहर योग्य रीतीने जोडलेले आहे.
नवीन रायपूरचे एकंदर तीन स्तरांत नियोजन केलेले आहे. पहिला स्तर- जो शहराचा मुख्य भाग आहे; त्याचे एकंदर क्षेत्र ८६ चौ.कि.मी. असून त्यात अंदाजे ५.६ लाख लोकसंख्या येईल, अशा प्रकारे नियोजन केलेले आहे. दुसरा स्तर हा शहराच्या सभोवताली ठेवलेला हरित प्रदेश आहे; ज्याचे क्षेत्रफळ १३०.२८ चौ.कि.मी. आहे. ज्यामुळे शहराच्या सभोवताली नियमित विकास होईल व शहराला लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. तिसरा स्तर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आरक्षित ठेवलेला आहे.
नियोजनास प्रारंभ करण्यापूर्वी देशातील तसेच इतर देशांतील विविध नियोजित शहरांतील नियोजनाचा अभ्यास करण्यात आला. त्यामधील योग्य, तसेच भारतीय व स्थानिक परिस्थितीशी सुसंगत होतील, अशा बाबींचा विचार करून नवीन रायपूर शहराचे नियोजन करण्यात आले. या शहराच्या नियोजनावर चंदिगड व मलेशियाची राजधानी पुत्रजया या शहराच्या नियोजनाचा प्रभाव दिसून येतो. शहराच्या मुख्य रस्त्यांचे नियोजन ‘ग्रीड आयर्न’ प्रकाराने केलेले आहे, ज्यात सर्व रस्ते मुख्यत: काटकोनात असून, ज्यामुळे सर्व वाहतूक वेगात व सहजपणे होईल.
नवीन शहर हे दोन महामार्ग व दोन रेल्वे मार्गात नियोजित केल्यामुळे त्याचा आकार Linear आहे. शहराचा संतुलित विकास होण्याच्या दृष्टीने जमिनीचा वापर ठरविलेला आहे. संपूर्ण शहर एकंदर २१ विभागांत (सेक्टर्स) विभागलेले आहे व प्रत्येक विभाग सर्व दैनंदिन सोयीने परिपूर्ण असतील.
नवीन रायपूर शहराच्या मध्यभागी राजधानी संकुल, शासकीय व खासगी कार्यालये व त्याचबरोबर मध्यवर्ती व्यापार संकुल प्रस्तावित केलेले आहे व रहिवासी क्षेत्र शहराच्या दोन्ही बाजूंना विभागले आहे. शहराच्या दक्षिणेला शैक्षणिक संकुल म्हणजेच विद्यापीठ येणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय विधी विद्यापीठ, भारतीय प्रबंध संस्थान (IIIT) भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान (IIM) याचे शैक्षणिक संकुल इथे अगोदरच स्थापित झाले आहेत व राज्य शासनाने येथे आयुर्वेद विद्यापीठ स्थापन करण्याचे ठरविले आहे. मनोरंजन व क्रीडा क्षेत्र संपूर्ण शहरात योग्य तऱ्हेने विखुरलेले आहे. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ५०० मी.पेक्षा जास्त अंतर चालावे लागणार नाही, याची काळजी घेण्यात आलेली आहे. रायपूर व नया रायपूर क्षेत्रात व शहरांतर्गत वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतुकीवर भर देण्यात आलेला आहे. रायपूर-विशाखापट्टणम् व रायपूर-धमतरी रेल्वेला जोडणारी नवीन रेल्वे नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मंजूर केली आहे. ही रेल्वे नवीन रायपूरच्या पश्चिम सीमेलगत जाईल. अहमदाबाद शहराच्या धर्तीवर रायपूर ते नवीन रायपूर, तसेच शहरांतर्गत वाहतुकीसाठी जागतिक बँकेने BRTS योजना मंजूर केली आहे व त्याचे कामही सुरू झाले आहे. पादचाऱ्यांसाठी व सायकलस्वारांसाठी शहरात सर्वत्र पदपथ व सायकलपट्टे तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.
कुठल्याही शहराचे अस्तित्व तिथे उपलब्ध होणाऱ्या रोजगारांवर अवलंबून असते. प्रदूषणमुक्त उद्योग व सेवा उद्योगांसाठी विकास आराखडय़ात तरतूद केलेली आहे. त्यात माहिती-तंत्रज्ञान आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मुख्य रोजगार शासकीय व खासगी कार्यालये व त्याचबरोबर मध्यवर्ती व्यापार व बाजार यातून निर्माण व्हावा, ही अपेक्षा आहे. राजधानीचे शहर असूनही अल्प व लघु उत्पन्न गटांच्या निवासाची गरज ओळखून प्रत्येक रहिवासी विभागात २५ टक्के घरे त्यांच्यासाठी राखून ठेवण्याची तरतूद केलेली आहे. शहराच्या नियोजनात एकंदर १३ गावठाणे आहेत. त्यातील फक्त एक गावठाण नवीन जागेवर पुनस्र्थापित केले आहे; परंतु बाकी सर्व गावठाणे तशीच ठेवून त्यांना शहराच्या विकासात सामील करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
नवीन रायपूर हे राज्यातील मुख्य मनोरंजन आणि क्रीडा केंद्र करण्याचे उद्दिष्ट आहे. नैसर्गिक तलावांचा समावेश करून सभोवतालच्या हरित पट्टय़ांवर ‘थीम पार्क’ विकसित करण्याचे काम सुरू आहे. राजधानी संकुलासमोर एकंदर ४६७ हेक्टर जागेवर लंडनच्या ‘हाइड पार्क’ व न्यूयॉर्कच्या ‘सेंट्रल पार्क’च्या धर्तीवर एक वेगळ्या प्रकारचा मनोरंजन व शैक्षणिक पार्क विकसित करण्यात येत आहे, तसेच शहराच्या मुख्य ठिकाणी खासगीकरणातून बगीचे विकसित करण्यात येत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने वेगवेगळे संकल्प हाती घेण्यात आले आहेत. नवीन रायपूरचा विकास हा ऊर्जा बचतीवर आधारित राहील, अशी काळजी प्रथमपासून घेण्यात येत आहे. राजधानी संकुलातील वीजपुरवठा सोलर विद्युत पद्धतीने मिळविला जात आहे. मलशुद्धीकरणाद्वारे प्राप्त होणारे पाणी बगिच्यांसाठी व वनीकरणासाठी वापरले जाणार आहे. शहरात अस्तित्वात असणारे सर्व तलाव एकमेकांना जोडून त्यात १२ महिने पाणी राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. छत्तीसगड राज्य वनराईने आणि नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आहे. त्या दृष्टीने शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वनीकरण करण्यात येत आहे.
छत्तीसगड राज्य त्याच्या हस्तशिल्प कलेसाठी प्रसिद्ध आहे. या कलेचा व कलाकारांचा वापर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी केला जात आहे. मंत्रालयातील अंतर्गत सजावटीमध्ये छत्तीसगडी कलेचा वापर उत्तमरीत्या केला आहे. नवीन शहरामध्ये छत्तीसगड राज्यातील कलाकारांना शिक्षण देण्यासाठी व तसेच त्यांना व्यवसाय प्राप्त करून देण्यासाठी एक ‘मुक्तांगण’ नावाचे केंद्र ७० हेक्टर जागेवर स्थापण्यात आले आहे. त्यात कलाकारांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे व त्याचबरोबर त्यांना त्यांची कला लोकांसमोर प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे.
शहरविकासासाठी सर्वच भूमिपुत्रांनी आपली जमीन स्वखुषीने दिली आहे. त्यांच्या पुनर्वसनाची काळजी शासनाने योग्य रीतीने घेतलेली आहे. त्यांना त्यांच्या जमिनीची बाजारभावापेक्षा जास्त किंमत दिलेली असून शहराच्या बाहेर शेतजमीन विकत घेण्यासाठी विविध सवलती दिलेल्या आहेत. तरुणांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी एक केंद्रही स्थापित करण्यात आलेले आहे.
शहराचा विकास वेगात सुरू आहे. शहरातील सर्व मुख्य रस्ते बांधून पूर्ण झालेले आहेत. पाणीपुरवठा व मलनि:स्सारण
व्यवस्था खासगीकरणातून अमलात आणण्यात येत आहे. एक निवासी संकुल बांधून तयार आहे. राजधानी संकुलातील कामे जोमात सुरू आहेत. राज्याच्या जनतेच्या, नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून नवीन नियोजित व सुंदर शहराचे एक स्वप्न साकार होत आहे.
शहराच्या जडणघडणीत व नियोजनामध्ये मला प्रथम सिडकोतर्फे, नंतर स्वतंत्ररीत्या सल्लागार म्हणून योगदान करण्याचे भाग्य लाभले. नवीन रायपूर भविष्यात सर्वच नियोजनकारांसाठी व वास्तुशास्त्रज्ञांसाठी एक अभ्यासाचे केंद्र होणार आहे हे निश्चित. या प्रकल्पाबाबत अधिक माहिती www:nayaraipur.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा