मंगल कातकर
घरात घटस्थापना झाल्यावर घराचं वातावरण मंगलमय व सकारात्मक ऊर्जेनं भारून जातं. नवरात्रीचे नऊ दिवस घरात आदिमायेची आराधना करून, सात्त्विक भोजन करून घर प्रसन्नतेची अनुभूती घेत असतं. काही घरांमध्ये आपल्यावरचं अरिष्ट दूर व्हावं म्हणून देवीचा गोंधळ घालून देवीच्या शक्तीरूपाला आवाहन केलं जातं. असं तनामनानं शुचिर्भूत झालेलं घर दसऱ्याला सामोरं जातं आणि आनंदानं न्हाऊन निघतं.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा, धनसंपदा, शक्ती आणि ज्ञानसंपदा या तीन शक्ती देवतांचे स्मरण करायला लावणारा हिंदूचा मोठय़ा सणांपैकी एक सण म्हणजे दसरा. दसऱ्याचे महत्त्व सांगताना तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा आपल्या अभंगात म्हणतात-
‘‘पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सापडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरि हृदयि धरा । आळस नका करू लहाना सांगतो थोरां।।’’
नवरात्रीचे दहा दिवस आणि विशेषत: दसरा म्हणजे घर आनंदानं नाचू-बागडू लागतं. कारण या घरातली प्रत्येक स्त्री आनंदानं भारलेली असते. आपल्या हृदयात परमेश्वराचा जयजयकार करायला लावणारा दसऱ्याचा पवित्र दिवस गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या घरी उत्साहानं साजरा केला जातो.
दसऱ्याचा सुदिन येण्याआधी नवरात्र सुरू होणार असते. घरात नऊ दिवस देवींचं वास्तव्य असणार म्हणून घर झाडून, पुसून स्वच्छ केलं जातं किंवा रंगरंगोटी करून त्याला नवीन रूप दिलं जातं. घरात घटस्थापना झाल्यावर घराचं वातावरण मंगलमय व सकारात्मक ऊर्जेनं भारून जातं. नवरात्रीचे नऊ दिवस घरात आदिमायेची आराधना करून, सात्त्विक भोजन करून घर प्रसन्नतेची अनुभूती घेत असतं. काही घरांमध्ये आपल्यावरचं अरिष्ट दूर व्हावं म्हणून देवीचा गोंधळ घालून देवीच्या शक्तीरूपाला आवाहन केलं जातं. असं तनामनानं शुचिर्भूत झालेलं घर दसऱ्याला सामोरं जातं आणि आनंदानं न्हाऊन निघतं.
हेही वाचा >>> दसरा.. घरखरेदीचा सुवर्णकाळ
आश्विन शुद्ध दशमी दिवशी असणारा दसरा म्हणजेच विजयादशमी. खरं तर दसरा हा कृषी उत्सव आहे. पावसाळय़ात पेरलेलं पहिलं पीक घरी आणण्याचा हा काळ असल्यामुळे शेतकरी हा सण उत्साहाने साजरा करतात. दसऱ्या दिवशी सकाळीच गृहिणी आंब्याची पाने, भाताच्या लोंब्या व झेंडूची फुले यांनी बनवलेलं तोरण घराला बांधतात. दारात रांगोळी काढून आपलं घर आनंदानं सण साजरा करण्यास सज्ज झाल्याचं सूतोवाच करतात. घरात पुरणपोळी, श्रीखंडपुरी, बासुंदी, खीर असा गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो. ज्या धान्याने आपले पोट भरते त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घटस्थापनेच्या वेळी स्थंडिलावर जे धान्य पेरलेलं असतं, त्या धान्याचे उगवलेले कोवळे कोंब घरच्या देवाची पूजा करताना त्याला वाहिले जातात व त्याला भक्तिभावे नमस्कार केला जातो.
दसऱ्या दिवशी शस्त्रपूजा व सरस्वती देवीचं पूजन घरांत केलं जातं. घरात वापरली जाणारी लोखंडी आयुधं, वाहनं, अवजारं सगळय़ांमध्ये ईश्वराचा वास आहे असं मानलं जातं. त्यांच्यापती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यासाठी आयुधांना, वाहनांना, अवजारांना स्वच्छ धुऊन किंवा पुसून त्यांना गंध अक्षता लावून, आंब्यांच्या पानांचं व झेंडूच्या फुलांचं तोरण बांधून यथासांग पूजा केली जाते. विद्येची देवी सरस्वतीची पूजा करण्यासाठी पाटीवर सरस्वती काढून किंवा वह्या, पुस्तके, लेखणी मांडून त्यांची मनोभावे पूजा केली जाते. अज्ञानावर ज्ञानाने मात करावी, शत्रूवर विजय प्राप्त करावा व आपलं कुटुंब अनिष्ट गोष्टींपासून दूर रहावं हीच कामना घरातल्या या पूजेमागे असते.
पूर्वी लोक दसऱ्या दिवशी सिमोल्लंघन करत व धनसंपत्ती मिळवून घरी आणतं. ही परंपरा लक्षात ठेवून सोन्याचं प्रतीक म्हणून आपटय़ाच्या पानांची पूजा आजही केली जाते. ग्रामीण भागात गावाच्या वेशीबाहेर आपटय़ाच्या पानांचं सोनं एकत्र मांडून ठेवलं जातं. त्याची यथासांग पूजा करून नंतर ते गावातल्या लोकांकडून लुटलं जातं. हे लुटलेलं सोनं पुरुष मंडळी जेव्हा घरी घेऊन येतात तेव्हा घरच्या स्त्रिया ते सोनं औक्षण करून घरात घेताना म्हणतात, ‘दसरा-दिवाळी इडापीडा जावो, बळीचं राज्य येवो.’ यातून त्यांना हेच सुचवायचं असतं की, घरात असलेल्या वाईट गोष्टी दूर जाऊ देत व बळीराजाच्या समृद्ध राज्यासारखं घर सुख-समृद्धीने भरून जाऊ देत.. अशी शुभकामना करत ओवाळून घेतलेलं सोनं आधी घरातल्या देवाला वाहिलं जातं. त्यानंतर ते घरातल्या लहानथोरांना, मित्रमंडळी, नातेवाईकांना ‘सोनं घ्या, सोन्यासारखे राहा’ असं म्हणत आदरानं दिलं जातं. शहरांमधल्या घरांमध्येही लहानथोर एकमेकांच्या घरी जाऊन असं सोनं वाटतात.
दसऱ्याचा संपूर्ण दिवस पवित्र मानत असल्यामुळे लोक या दिवशी चांगल्या कामाचा श्रीगणेशा करतात. नवीन घर, वाहन, सोन्याचांदीची आभूषणं खरेदी करतात. घरात शुभकार्य करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला जातो.
हेही वाचा >>> भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रात चॅटजीपीटीची भूमिका!
संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘दसरा दिवाळी तोची आम्हा सण । सखे संत जन भेटतील।’ अर्थात संतसज्जन आपल्याला भेटतील व आपल्या सद्विचारांचं धन आपल्याला देतील त्या दिवशी दसरा-दिवाळी सण साजरा होईल.
दसऱ्यानिमित्त संतसज्जनांच्या सुविचारांनी आपल्या घरातील प्रत्येकाच्या मनात प्रवेश करावा व आपलं आयुष्य सद्गुणांनी भरून जावं. आपल्यातल्या अविचार, अनीती, दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा; व आपण नीतीची, सत्याची कास धरून आपलं जीवन उजळवावं हीच दसऱ्यानिमित्त सदिच्छा! mukatkar@gmail.com