सुचित्रा प्रभुणे
मग यंदाच्या दसऱ्याला गोडधोडाबरोबर तुमच्या घराची आकर्षक सजावट करून या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करा
आपल्याकडे वर्षभर कितीही सण असले तरीही दसरा -दिवाळीचे महत्त्व काही खासच आहे. या सणांवारी घर कितीही स्वच्छ असले तरीही साफ -सफाई ही केलीच जाते. विशेष म्हणजे फक्त घरातच नाही तर घराबाहेर देखील या सणांचा चांगलाच उत्साह जाणवतो. त्यामुळे एखाद्या दुकानात अथवा कोणाच्या घरी गेल्यास तिथली एखादी सजावट पाहून मनाला एकदम प्रसन्न वाटते. किंबहुना या सणांमधली जी मांगल्याची अनुभूती असते ती अधिक जाणवते.
इतकेच काय अगदी नवरात्र सुरू झाले की, वर्तमानपत्रे, टीव्हीच्या माध्यमातूनदेखील छान सजविलेली घरे, सुंदर पेहराव घालून तयार झालेली घरातील मंडळी आणि सभोवतालचे आनंदी वातावरण अशा स्वरूपाच्या आकर्षक जाहिराती पाहावयास मिळतात. मग आपण देखील सणांची ही आनंददायी अनुभूती घ्यावी, अशी एक सुप्त इच्छा मनात निर्माण होते. पण नेमके काय करायचे हेच कळत नाही.
एखाद्या सणाची आनंददायी अनुभूती येते ती सजावटीने. अशी सजावट आपण घरी देखील सहजपणे करून या मंगलमय वातावरणाचा अनुभव घेऊ शकतो. थोडीशी कल्पना शक्ती लढविल्यास तुम्ही देखील तुमच्या घराची सजावट आकर्षक करू शकाल. त्यासाठी नेमके काय करावे यासाठी खास टिप्स –
घराचा मुख्य दरवाजा- सर्व साधारणपणे घराच्या मुख्य दरवाजावरून घराची आतील रचना कशा प्रकराची असेल याचा अंदाज येतो. प्रवेशद्वारापाशी असलेल्या जागेच्या सोयीनुसार आकर्षक व रंगीत रांगोळी काढावी. अथवा फुलांची रांगोळी काढून त्यामध्ये एखादा दिवा किंवा समई लावल्यास घराला उत्सवाचा पारंपरिक लूक तर येतोच, पण तितकीच प्रसन्नताही घरात प्रवेश करताना लाभते.
जर रांगोळी काढायला वेळ नसेल तर रेडीमेड रांगोळीचे उत्तम पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. बऱ्याचदा हे वेगवेगळय़ा प्रकारचे भौमितिक स्वरूपाचे आकार असतात. आणि ते जोडले की,आकर्षक अशी रांगोळी तयार होते. विशेष म्हणजे रांगोळी खराब होण्याचीदेखील भीती नसते. या आकारांच्या सहायाने सभोवताली फुले किंवा दिव्यांचा वापर करून त्या ठिकाणी आकर्षक सजावट करू शकतात.
आजकाल बाजारात सणासुदीला शोभून दिसतील अशी विविध प्रकारची फॅन्सी तोरणे उपलब्ध आहेत. यामध्ये टेरेकोटा, बांधणी किंवा लाकडी कटआउट्स असे विविध प्रकार पाहायला मिळतात. याशिवाय बाजारात अलिकडे वेगवेगळय़ा प्रकारचे कागद उपलब्ध आहेत. या कागदांपासून बनविलेली तोरणे देखील तितकीच आकर्षक दिसतात.
बाल्कनी किंवा टेरेस सजावट- बाल्कनी किंवा टेरेस या जागेची सजावट फक्त दिवाळीलाच करावी, असा एक अलिखित नियम आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. पण कोणत्याही सणावारी जर तुम्ही या जागी सजावट केली तरी घरात एकप्रकारची सकारात्मक उर्जा जाणवते.
इथे नुसते लायटिंग लावून सजावट होत नसते, तर फुलांचे तोरण लावावे. बाजारात इको फ्रेण्डली स्वरुपाची अनेक वॉल हंॅगिंग्ज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अनेकदा लायटिंगची देखील सोय असते. अशा वॉल हंॅगिंग्जचा वापर करून तुम्ही या जागा देखील आकर्षक करू शकतात.
सणांनुसार पारंपरिक चिन्ह असलेली, देवींची विविध रूपे दर्शवणारे मुखवटे किंवा घरात देखील तुम्ही सहजपणे बनवू शकाल अशा काही तोरणांचा या ठिकाणी वापर केल्यास व त्याभोवताली दिव्यांची माळेने सजावट केल्यास सांयकाळच्या वेळी अधिक प्रसन्नता लाभेल.
देवघर – त्या- त्या घरात जागेच्या सोयीनुसार छोटी -मोठी देवघरे असतात. देवघरात रोज पूजा होत असल्याने ते नेहमीच स्वच्छ असते. पण सणासुदीला देवघराची देखील सजावट केल्यास घरातील वातावरण एकदम मंगलमय होऊन जाते.
देवघराभोवती फुला-पानांची तोरण लावावे. दिवे किंवा समईच्या खाली फुलांच्या पाकळय़ांनी सजावट करावी. मोहक वासाची उदबत्ती किंवा धूप लावावा. अशा या पवित्र वातावरणात देवघरात लावलेले दिवे अधिकच उजळून निघालेले दिसून येतात.
या व्यतिरिक्त अलिकडे सजावट केलेली पूजा थाळी, कलश, रांगोळी असे अनेक आणि परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत. रंगीत खडे, बीड्स आणि कुंदनचा वापर करून अनेक दिवे किंवा थाळीची सजावट केलेली असते. बऱ्याचदा त्यांची रचना सणांचा उद्देश लक्षात ठेवून केलेली असते. अशा गोष्टी नुसत्या ठेवल्या तरी विशेष सजावट केल्यासारखे वाटते.
बहुतांश ठिकाणी अशोक किंवा आंब्याची पाने सहजपणे उपलब्ध असतात. अशावेळी ही पाने किंवा फुलांच्या पाकळय़ा किंवा कमळांचा वापर करून आरास केल्यास दसऱ्याचा पवित्र फिल लाभतो. मग यंदाच्या दसऱ्याला गोडधोडाबरोबर तुमच्या घराची आकर्षक सजावट करून या सणाचा आनंद अधिक द्विगुणित करायला विसरू नका.